The Boy in the Striped Pajamas
नुकतेच John Boyne यांचे The Boy in the Striped Pajamas हे पुस्तक वाचुन संपवले. ह्या लेखकाबद्दल मला आधी काहीच माहित नव्हते. एका स्पेनच्या मैत्रीणीने वाचायला सांगितले म्हणुन वाचायला घेतले. हे पुस्तक मागच्यावर्षी स्पेन मध्ये बेस्ट सेलर होते.
खर तर हे पुस्तक टीनएजर मुलांसाठी लिहीले गेलय. त्यामुळे यातली भाषा एकदम सोपी सरळ गोष्ट सांगितल्या सारखी आहे. कुठेही अलंकारीक शब्द वापरुन बोजड केलेले नाहीये त्यामुळे मला वाचायला आवडले आणि एका बैठकीत वाचुन संपवले.
ही ९ वर्षाच्या २ मुलांची गोष्ट आहे. त्यातला एक मुलगा ब्रुनो हा एका नाझी कमांडंटचा मुलगा आहे तर दुसरा मुलगा आहे श्मुएल, एक ज्यु, जो त्याच्या कुटुंबासोबत पोलंड मधल्या "Out with" या एका कॉन्सनट्रेशन कँप मध्ये कैदी आहे. ब्रुनोच्या वडीलांचे पोस्टींग याच कँप मध्ये झालेले आहे.
हे संपूर्ण पुस्तक ब्रुनोच्या नजरेतुन लिहीलेले आहे. त्यात ब्रुनोचा जुन्या घरापासुन म्हणजे बर्लिन पासुन ते कँप पर्यंतचा प्रवास, त्याचे कुटुंबीयांसोबत तिथे रहाणे आणि त्याची कँप मध्ये असलेल्या श्मुएलशी झालेली मैत्री याबद्दल आहे. दोघेही जण कँपच्या कुंपणाच्या दोन बाजुला आहेत. पण त्या दोघांनाही दुसरे महायुद्ध, नाझी-ज्यु यांचे संबंध, ज्यु लोकांना दिली जात असलेली वागणुक, कॉन्सनट्रेशन कँप, कैदी या कशाचीही कल्पना नाहीये. या संकल्पनाच त्यांना माहित नाहीयेत. हे सगळे संदर्भ आपल्याला फक्त वाचतांना background ला दिसतात आणि आपोआप कळतात. त्यामुळे हे पुस्तक वाचतांना बरेचदा लाइफ इज ब्युटीफुल या सिनेमाची वारंवार आठवण येत रहाते.
या पुस्तकावर पण येत्या १४ नोव्हेंबरला सिनेमा येतोय याच नावाचा. मला तो बघायचा आहे, Mark Herman ने दिग्दर्शनाचे आव्हान कस पेललय हे बघण्यासाठी. Roberto Benigni ने Life is Beautiful जसा संयतपणे हाताळलाय तसा हा सिनेमा हाताळला गेला असेल का याबद्दल उत्सुकता आहे. शक्यतो मी जर आधी पुस्तक वाचलेले असेल तर त्यावर आलेला सिनेमा मला आवडत नाही या उलट सिनेमा आधी बघुन मग पुस्तक वाचले तर ते आवडते असा माझा आत्ता पर्यंतचा अनुभव आहे, बघुयात यावेळी काय होते ते.
पुस्तक: The Boy in the Striped Pajamas
लेखक : John Boyne
भाषा : English
प्रकाशन : David Fickling Books
प्रकाशन वर्ष : 2006
पृष्ठ : २१४
सही प्लॉट
सही प्लॉट आहे, पुस्तक वाचायलाच पाहिजे आता.
ह्म्म.
ह्म्म. .वाचलेच पाहीजे..
रुनी...
रुनी... बघायला पाहीजे हा चित्रपट.. पण मार्क हर्मन कोणता रोल करणार आहे? तुझ्या पुस्तकाबद्दलच्या माहीतीत तर २ लहान मुले त्या पुस्तकाचे केंद्रबिंदु आहेत...
लाइफ इज ब्युटिफुल हा माझा खुप आवडता चित्रपट आहे.. कोणी अजुन पाहिला नसेल तर आवर्जुन पहा... रॉबर्तो बनीनीचा अभिनय अप्रतिम!.. त्याला त्या चित्रपटातल्या अभिनयामुळे त्या वर्षीचे बेस्ट ऍक्टरचे ऑस्कर मिळाले होते.. त्या चित्रपटात बरेच ह्रुदयद्रावक प्रसंग आहेत.. पण माझा सगळ्यात जास्त आवडता प्रसंग... तो जेव्हा त्या जर्मन एस एस गार्डच्या जर्मन फर्मानाचे (आपल्या मुलासाठी!) त्याच्या भाषेत जो अनुवाद करतो... तो प्रसंग पाहताना जबरद्स्त हसुही येत होते व त्याच वेळेला कारुण्याने डोळ्याची कडा पाणावली सुद्धा होती... त्या चित्रपटात बनिनिचा तो अभिनय पाहुन.. मी त्याचे बरेचसे इटालिअन चित्रपट बघुन काढले... त्यात मला सर्वात जास्त आवडला.. जॉनी स्टकिनो...अका..जॉनी "टुथपिक! तुला जर बनीनी आवडत असेल तर त्याचा तो हिलेरिअस चित्रपट बघच!
नाझी कॉन्सनट्रेशनची पार्श्वभुमी असलेला अजुन एक मला आवडलेला चित्रपट म्हणजे... शिंडलर्स लिस्ट... पण तुला पुस्तके आवड्त असतील तर मराठीमधे नाझी भस्मासुराचा उदयास्त म्हणुन एक पुस्तक आहे.. त्यात १९२० ते १९४५ दरम्यानचा जर्मनी व हिटलरचा इतिहास व नाझी व एस एस गार्ड्.. यांच्या भिषण अत्याचारांबादल तुला वाचायला मिळेल... राइज अँड फॉल ऑफ थर्ड राइशचा तो अत्यंत सुंदर मराठी अनुवाद आहे.. जरुर वाच...
नाझी
नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि.ग. कानिटकर लेखक आहेत. अतिशय सुंदर पुस्तक
रुनि, एका
रुनि,
एका चांगल्या पुस्तकाचि ओळख करुन दिल्याबद्दल. लवकरात लवकर वाचल पाहिजे. लाइफ इज ब्युटिफुल माझाहि आवडता चित्रपट आहे. आतापर्यंत दोन तइन वेळा बगितला पण प्रत्येक वेळि शेवटि डोळे पाणावतात.
मुकुंद,
नाझि भस्मासुराचा उदयास्त मला 'राइज ऍन्ड फॉल ऑफ थर्ड राइश' सारखच वाटल अगदि. पण तो अनुवाद नाहिये ना? लेखकाने संदर्भ पुस्तकांच्या यादित त्या पुस्तकाचा उल्लेख केलाय पण माझा असा समज होता कि हे पुस्तक म्हणजे दुसर्या महायुध्दावर लेखकाच चिंतन आहे. अर्थात बर्याच वेळेला आपण अनुवाद वाचतोय असच वाटत रहात.
नाझी
नाझी भस्मासुराचा उदयास्त ही बहुतेक कानिटकरांनी एक लेखमाला लिहिली होती माणुस किंवा अशाच कुठल्यातरी नियतकालिकात. त्याचेच पुढे पुस्तक म्हणुन प्रकाशित केले गेले (चू.भू.दे.घे.). पण हे शिरर च्या राइज ऍन्ड फॉल ओफ थर्ड राइश चे भाषांतर नक्की नाही.
--------------
The old man was dreaming of lions
तो अनुवाद
तो अनुवाद नाही पण बरेच लेख राईज ऍन्ड फॉल शी मिळते जुळते आहेत. कानिटकरांनी जबरीच लिहीले आहे ते पुस्तक.
मुकूंद, मार्क हर्मन ह्या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे.
मुकुंद, मी
मुकुंद, मी बनिनिचे अजुन दुसरे सिनेमा बघीतलेले नाहीयेत (टू डू लिस्ट वर आहेत). लाईफ इज ब्युटीफुल मी बराच उशीरा बघितला. बघितला तेव्हा मुळ भाषेत, इटालीअन मधुन बघीतला, त्याला कारण माझी इटालीअन मैत्रीण, तिच्या मते इंग्रजीत बनिनिला आवाज देणार्या कलाकाराला बनिनिच्या स्टाईलची नीट नक्कल करता आली नाही म्हणुन सिनेमा मुळ सिनेमाइतका परिणामकारक झाला नाही. खर तर हा सिनेमा इटालीअन किंवा इंग्रजी मधुन बघतांना भाषेची गरजच पडत नाही इतका छान काम केलय बनिनिने. यातला माझा आवडता प्रसंग म्हणजे शेवटचा, जेव्हा त्या छोट्या मुलाला रणगाडा दिसतो तो. एकदम अप्रतिम.
आणि मला शिंडलर्स लिस्ट तसच द पियानिस्ट (बहुदा २००३ सालचा आहे हा सिनेमा) पण आवडले होते.
बाकी मी नाझी भस्मासुराचा उदयास्त आणि शिररचे राइज ऍन्ड फॉल ओफ थर्ड राइश ही दोन्ही पुस्तकं वाचलेली नाहीयेत, आता ती माझ्या 'अजुन वाचायचय' यादीत टाकता येतील.
मलाही
मलाही शिंडलर्स लिस्ट हा सिनेमा आवडला होता..... या सिनेमामध्ये शिंडलरचा रोल करणारा ऍक्टर मला फार आवडला होता..... त्याचं ते भारदस्त व्यक्तिमत्व एकदम perfect fit होतं त्या रोलसाठी.... द पियानिस्ट सुध्दा छान होता...
मी वरील एकही पुस्तक वाचलेलं नाहिये... पण नाझी भस्मासुराचा उदयास्त हे पुस्तक ऐकून माहिती होतं..... उरलेली दोन्ही इंग्रजी आहेत, ती लायब्ररीतून घेउन वाचेन आता...
धन्यवाद
धन्यवाद केदार.. मार्क हर्मन दिग्दर्शक म्हणुन मला अनभिज्ञच आहे.. त्याचा शॉन कॉनरीबरोबरचा प्रेसिडिओ मला आवडला होता.. असो
रुनी तुझ्या वर ओरिजनल लेखात नमुद केलेल्या पुस्तकाला फाटे फोडायचे नाहीत पण नाझी भस्मासुराचा उदयास्त हे पुस्तक मराठमोळी,व शंतनुने वाचलेले आहे हे वाचुन मला खुप आनंद झाला... म्हणुन त्याबद्दल थोडेसे...
खरच जबरी पुस्तक लिहीले आहे वि. ग. कानिटकरांनी... मी ते दहावीत असताना वाचले होते.. (अक्षरशः खिळुन ठेवले होते त्या पुस्तकाने मला..) त्यामुळे नक्की आठवत नाही की तो शेररच्या राइज अँड फॉल ऑफ थर्ड राइशचा तंतोतंत अनुवाद होता की स्वैर अनुवाद होता.. नंतर मी इथे अमेरिकेत आल्यावर शेररचे मुळ पुस्तक वाचले.. १००० पानांच्या वर असलेले ते पुस्तक वाचताना मी अक्षरशः १९२० ते १९४५ दरम्यानच्या जर्मनीमधे..... खुद्द हिटलर्,त्याचा प्रॉपोगँडा चिफ गोबेल्स्,जर्मन लुफ्तवाफ्(जर्मन एअर फोर्स्)चिफ फिल्ड मार्शल हर्मन गोअरिंग्, एस एस चिफ हिमलर,या हिटलर कंपुबरोबर..... तसेच रुझव्हेल्ट्,चर्चील्,चेंबरलेन्,स्टालिन्,मुसोलिनी, जर्मनिचा परराश्ट्रमंत्रि रिबेन्ट्रॉप, रशियाचा परराश्ट्रमंत्रि मोलोटॉव्ह या राजकारण्यांबरोबर..... तसेच पॅन्झर जनरल गुडेरिन्,जनरल जोडल्,जनरल रोमेल,जनरल रुन्ड्स्टेड्ट,जनरल कायटेल या जर्मन जनरल्स बरोबर,......तसेच पॅटन्,आयसेन्हॉवर(दोघे अमेरिकन) व जनरल माँटगॉमेरी(ब्रिटिश),जनरल झुकॉव्ह्(रशिया) या दोस्त राष्ट्रांच्या जनरलबरोबर... राहीलो,फिरलो,वावरलो... मॅजीने तटबंदीला बगल देउन आर्देन्सच्या जंगलातुन जनरल गुडेरिनने केलेला हल्ला व त्यामुळे दोस्त राष्ट्रांच्या ५ लाख सैन्याचा डंकर्क इथे झालेला कोंडमारा, जर्मन लुफ्तवाफने लंडनवर सतत ६ महिने व्हज १(व्ही१) व व्हज २(व्ही २) या क्षेपणास्त्राने केलेला अविरत हल्ला,ऑपरेशन बार्बारोसाच्या नावाखाली हिटलरने केलेला रशियन आघाडीवरचा रशियावर केलेला हल्ला, १९४२ व ४३ च्या रशियाच्या कडाक्याच्या हिवाळ्यात रशियाच्या उरल व कॉकेशस पर्वतराशीमधे प्रचंड बर्फात व कडाक्याच्या थंडीत अडकलेले जर्मन सैन्य व त्यांचे झालेले हाल व संहार, डी डे च्या दिवशी नॉर्मंडि बिचवर दोस्त राष्ट्रांनी केलेला हल्ला... हे सगळे सगळे मी स्वतः पाहील्यासारखे.... मला ते पुस्तक वाचताना वाटत होते...त्या पुस्तकात डेपिक्ट केलेला तासा तासाचा, दिवसा दिवसाचा इत्यंभुत इतिहास मी ते पुस्तक वाचताना जगलो... आणि नाझी भस्मासुराचा उदयास्त आधीच वाचले असल्यामुळे ती सगळी पात्रे ,ती सगळी युद्धे, ती सगळी खलबते मला अतिशय परिचयाची वाटली...
कानिटकरांचे ते मराठी पुस्तक व शेररचे हे पुस्तक वाचण्यात मधे साधारण १५ एक वर्षे निघुन गेली होती.. म्हणुन मला असे वाटले की ते कानिटकरांचे पुस्तक या पुस्तकाचाच अनुवाद आहे.. ते चुक असेल तर माफ करा पण कानिटकरांनी त्या पुस्तकात बरेचसे प्रसंग्,लढाया,प्लान्स्,कटकारस्थाने,खलबते,अत्याचार अगदी शेररने ज्या बारकाइने लिहीली आहेत त्याच बारकाइंनी मराठीत लिहीली आहेत.. अगदी तासागणिक व दिवसागणिकचा इतिहास त्यांनी जबरदस्त रितीने टिपला आहे त्यांच्या पुस्तकात... रुनी जरुर वाच..
मराठमोळी व शंतनु.. माझ्या वरील स्पष्टीकरणाने मला ते पुस्तक शेररच्या पुस्तकाचा अनुवाद का वाटला याचा खुलासा झाला असावा असे वाटते.. पण तरीही चुकुन ते पुस्तक शेररच्या पुस्तकाचा अनुवाद आहे असे लिहिल्याबद्दल क्षमस्व..
सही मुकुंद
सही मुकुंद मी पण नाझी भस्मासुराचा उदयास्त ची पारायणे केली आहेत. त्या पुस्तकावर शिररचा खुप प्रभाव आहे असे वाटते. तसेच त्यात शिररचे दाखले अनेकदा दिले आहेत. असो रुनीचा मुळ विषय जास्त भरकवटत नाही.
>>>
>>> राहीलो,फिरलो,वावरलो... >>.
मुकुंद, १०१% अनुमोदन.. ह्या दोन्ही पुस्तकांनी एक वेगळाच अनुभव आणि थरार दिला.. रोमेलच्या आफ्रिकेतील चढाया आणि मॉन्टेग्युमेरीची प्रत्युत्तरे, रशियन आघाडी, स्टॅलिनग्राडची लढाई, डंकर्क, चेम्बर्लेन ते चर्चिल, तिकडे रूझवेल्ट, आयसेनहॉवर, जनरल ट्योगो, जपानने शेवटी दिलेला निकराचा लढा इ.इ.
माझ्या आजोबांचा धाकटा भाउ १९४० मध्ये रॉयल इन्डियन आर्मी मध्ये कॅप्टन म्हणुन रुजु झाले होते. ते आसामच्या लढाईत एका वेढ्यात जवळपास २ वर्षे अडकले होते. तिथेच त्यांना टीबी झाला आणि पुढे वेढा उठल्यावर पुण्याजवळील औन्धला टीबीच्या पेशन्टसाठी लष्कराने एक छावणी टाकली. त्यांचे तिथेच निधन झाले. पुढे ह्याच छावणीचे हॉस्पिटलमध्ये रुपांतर झाले. दुर्दैवाने ४० साली मिरजेसारख्या गावातून सैन्यात कॅप्टन झालेल्या ह्या माणसाबद्दल फारशी माहिती आमच्याच घरात उपलब्ध नाही ह्याचे मला फार वाइट वाटते. एकच फोटो मी पाहिला होता त्यांचा. जनरल थोरात (की कर्नल नक्की माहिती नाही. पण पहिल्या गणतंत्र दिनाच्या संचलनाच्या वेळी पं. नेहेरुंबरोबर हे तलवार घेउन जीप मध्ये उप्भे होते) आणि हे माझ्या वडिलांचे काका एका तोफेवर हात ठेवून उभे आहेत. माझ्या आजोबांचे अजुन दोन धाकटे भाउ देखील सैन्यात होते पण अनकमिशन्ड. एक जण पायदळात मोटर मेकॅनिअक तर एक जण वायुदलात मेकॅनिक. १९४१-४२ मध्ये कधीतरी हे तिघेही बंधु रंगुन मध्ये होते. एकाकडून दुसर्याला असे कळत कळत हे तिघे योगायोगाने रंगून मध्ये भेटले (शेवटची भेट).
ह्या कनेक्शनमुळे मला उगाचच दुसरे महायुद्ध जवळचे वाटते.
जी ए कुलकर्णींनी 'वैर्याची एक रात्र' असे एका हंगेरियन महिलेच्या छळछावणीमधील अनुभवांवर आधारित पुस्तकाचा अनुवाद केलेला आहे. हे पुस्तक मला कधिही मिळाले नाही (माझ्या वडिलांनी मला ह्या पुस्तकाबद्दल सांगितले होते. मूळ पुस्तकाचे नाव बहुतेक I survived Hitler's ovens: The story of Auschwitz )
रुनीच्या मूळ विषयाला फाटा दिल्याबद्दल क्षमस्व. पण राहवले नाही म्हणुन लिहिले.
--------------
The old man was dreaming of lions
मुकुंद,
मुकुंद, मंदार, टण्या,
तुमच्या या चर्चेमुळेच मला बाकीच्या २ पुस्तकांबद्दलपण चर्चा वाचायला मिळाल्या नाहीतर इतर वेळी तुम्ही मुद्दाम या पुस्तकांचे परीक्षण लिहीले नसते :). त्यामुळे याबद्दल लिहीले तरी स्वागतच आहे.
खुप
खुप उत्सुकता वाढली आहे.:) ....आता हे पुस्तक वाचलंच पाहीजे.
रुनी, तुझ
रुनी,
तुझ लिखाण आणि वरची चर्चा वाचून पुस्तक वाचावसं वाटतयं.
लाइफ इस ब्युटीफुल बघितल्यावर पुढचे काही दिवस बेचैनी येते,
युद्धप्रसंग असलेल्या युद्धपटांपेक्षा युद्धाचे सामान्य माणसांवर होणारे परिणाम चित्रित करणारे चित्रपट फार बेचैन करतात.
छान चर्चा
छान चर्चा आहे.
मलाही ही
मलाही ही चर्चा आवडली. पण मी यातलं काहीचं वाचलं नाही की पाहिलं नाही.
कानेटकर म्हणजे आपले नाटककार वसंत कानेटकर का?
या नावानेच एक सिनेमा आलेला
या नावानेच एक सिनेमा आलेला आहे - फारच ह्रदयस्पर्शी आहे.
दुसरे महायुद्ध हे किती विविध घटनांनी भरलेले आहे याची आपल्याला कल्पनाही करता येणार नाही असे वाटत रहाते - पण अनेकांना यातनांना, विरहाला, दु:खालाच सामोरे जावे लागले ही वस्तुस्थिती ....
Arthur Koestler ची ‘’Thieves
Arthur Koestler ची ‘’Thieves in the night’’ ही आत्मचरित्रात्मक कादंबरी Jew predicament वर लिहिलं गेलेलं अफाट वाड्मय.शब्द शिल्लक रहात नाहीत त्यावर भाष्य करायला.
व्हेरा फार्मिगा या युक्रेनिअन
व्हेरा फार्मिगा या युक्रेनिअन अभिनेत्रीचे 'द डिपार्टेड' आणि 'अप इन द एअर' हे दोन चित्रपट पाहिल्यावर आणि तिचा अभिनय भावल्यावर तिच्या चित्रपटांची यादी शोधताना मला 'द बॉय इन द स्ट्रिप्ड पायजमाज' हा चित्रपट दिसला....मूळात व्हेरासाठी पाहणार होतो, पण प्रत्यक्ष चित्रपट चालू झाल्यावर त्या दोन मुलांनी मनाचा अक्षरशः कबजा घेतला आणि पाहतापाहता मी त्या नाझी छळछावणीचा इनमेट झालो. कथानकाच्या ओघात व्हेराला तुलनेने कामे कमीच आहे, जे आहे ते या दोन मुलांनाच आणि त्यांच्या भावभावनाना.
केवळ आंघोळीसाठी नेणार आहेत आपल्याला असे समजून ब्रुनो आणि श्मुएल त्या गॅस चेम्बरमध्ये जातात. नाझी सैनिकांना आपल्या कमांडंटचा ब्रुनो हा मुलगा आहे याची वार्ताही नसते.
पुढे जे काही आहे ते पाहाण्यासाठी दगडाचे काळीज हवे.
अशोक पाटील
खूप म्हणजे खूपच वाईट
खूप म्हणजे खूपच वाईट वाटते....हा चित्रपट बघताना आणि बघून. २-३ दिवस झोप नाही लागली मला.
हो खरंय, चित्रपट पाहिल्यावर
हो खरंय, चित्रपट पाहिल्यावर मीही झोपू शकले नाही पुढचे कित्येक दिवस... अलिकडे वरचेवर वाहिन्यांवर लागत असतो, दिसला की थांबून पाहण्याचा मोह होतो पण धीर होत नाही.
मी एकदाच पाहिला हा चित्रपट ..
मी एकदाच पाहिला हा चित्रपट .. खुप्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प वाईट .. परत नाही पाहु शकणार ..