मानतो मिळाली ना बाग एक स्वप्नांची!

Submitted by गझलप्रेमी on 21 March, 2013 - 09:29

गझल
मानतो मिळाली ना बाग एक स्वप्नांची!
भोगतो सुखाने मी जिंदगीच दु:खांची!!

त्राण राहिला नाही चालण्यासही आता.....
राहिली शिदोरीही मोजक्याच श्वासांची!

ही कशास श्रीमंती पाहिजेत पक्वान्ने?
गोड वाटते आहे भाकरीच कष्टांची!

भोवती किती आहे शांतता स्मशानाची!
फक्त चालली ये-जा दोन,चार प्रेतांची!!

ना गुरांसही पाणी, खायला नसे चारा.....
जाहली सुरू वृष्टी नाटकी उमाळ्यांची!

ना रडू मला आले संकटांमुळे माझ्या;
कीव लागली येऊ दर्शनी दिलाशांची!

दंग ते किती होते पाहण्यात देखावे......
हौस वाटते त्यांना केवढी दिखाव्यांची!

जाहली किती वर्षे ऐकुनी रुकारांना!
जीवना! मला भीती कोणत्या नकारांची?

खंत वाटते याची, डाचते मनालाही!
खंत ना कुणालाही जाहल्या प्रकारांची!!

मी मनावरी काही आजकाल ना घेतो.....
ती असो स्तुती किंवा मस्करी टवाळांची!

शायरीमधे खोली येत ना कुणाच्याही.....
काळजामधे वस्ती पाहिजे विचारांची!

मी कशी करू सांगा वाटचाल ही माझी?
पाहतो जिथे तेथे चावडी टुकारांची!

व्हायची घरे केव्हा? जाहले सुरू हप्ते!
कर्ज काढुनी, झाली दुर्दशा बिचा-यांची!!

............गझलप्रेमी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ॠण काढुनी झाली......... >>> मी इथे लयीत अडखळ्लो
कर्ज काढुनी झाली....... .... व ....... काढुनी ऋणे झाली........
असे वाचले

बाकी गझलेबद्दल बोलायचे झाल्यास नेहमीप्रमाणेच .............आवडली Happy

धन्यवाद वैभवा!
ॠण =२+१=३ मात्रा (गाल)
कर्ज= २+१=३ मात्रा (गाल)
हिशेब सारखाच! कुठे लयीत अडखळायला होते?

ही गझल अक्षरगणवृत्तात लिहिली आहे!
प्रथमच या वृत्तात (आज) गझल लिहिली आहे!
वृत्ताचे नाव माहिती नाही.
जाणकारांनी वृत्ताचे नाव कृपया सांगावे
वृत्तहाताळणीत आम्ही कितपत यशस्वी झालो?

ऋण मधील ऋ र्‍हस्व असतो.

वृत्तहाताळणीत आम्ही कितपत यशस्वी झालो? <<<

पूर्ण! अभिनंदन! गणक्रम, यती सर्व काही पाळले गेले आहे.

ऋण मधील ऋ र्‍हस्व असतो. >>>>>

होयच !पण तिलकधारीजी आता माझ्या लक्षात आले की देवसर मघसपासून "ॠ-ण" बद्दल बोलताय्त
त्यातला तो "ॠ" .... RU असे टाईप केले की तो "ॠ" होतोय तो दीर्घच आहे आपण लोक्स ऋ =Ru असे करतो

असेल कुठल्यातरी डिक्षनरीत आसा "ॠ-ण" ..........
....हा.का. ना.का. Lol

धन्यवाद अरविंदराव महत्वाची माहिती दिल्याबद्दल!
मराठीतील तमाम वृत्ते अक्षरगण/मात्रा/अक्षरवृत्तांची माहिती कुठे मिळेल? उदाहरणे असतील तर उत्तमच!
कृपया आपल्याकडे ही माहिती असेल तर मला मेल कराल का? किंवा मेसेजबाक्सवर टाकाल का?
अवांतर:
एल्गारमधील शेवटची गझल या वृत्तात आहे सुरेश भटांची................
चंद्र राहिाला नाही भाबड्या चकोरांचा!
चांदण्यावरी ताबा आजकाल चोरांचा!!....
.........वा! क्या बात है, क्या बात है......

तिलकधारी धन्यवाद प्रांजळ प्रतिसादाबद्दल!
ऋण मधील ऋ र्‍हस्व असतो. <<<<<<<<<<<<<<,
कबूल! वैभवानेही सांगितले होते बहुतेक!
आताच चेक केले आपले बरोबर आहे!
एक शंका विचारू क?
ॠ (दीर्घ ऋ) पासून सुरवात होणारे शब्द कोणते मराठीत?
ॠण काढून सण साजरे करणे बरोबर, की,
ऋण काढून सण साजरे करणे बरोबर?

टीप वरील गझलेत बदल संपादितकरतआहे................
धन्यवाद बारकाईने गझल वाचल्याबद्दल!

जे बरोबर, सत्य त्याला आम्ही कधीच चूक म्हणत नाही!
पुनश्च चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद!