अजून पूर्ण मला, जाणतात लोक कुठे?

Submitted by गझलप्रेमी on 19 March, 2013 - 07:36

गझल
अजून पूर्ण मला, जाणतात लोक कुठे?
अजून थेट मला पाहतात लोक कुठे?

मनात एक, दुजे चेह-यावरी दिसते.....
घडेल भेट असे, भेटतात लोक कुठे?

कशास रक्त असे,आटवू उगा इतके?
झिजा, जळा, उसळा....मोजतात लोक कुठे?

कशास मीच घसा कोरडा करू दुनिये?
इथे तिथे बहिरे, ऐकतात लोक कुठे?

उगारुनी बघतो, हात जोडुनी बघतो!
जुमानतात कुठे? मानतात लोक कुठे?

हवा कशी पडली यावरीच वाद घडे.....
उरात जे सलते.....बोलतात लोक कुठे?

जरा कुणाविषयी, पेपरात स्फूट दिसे!
बडी करून मने, सांगतात लोक कुठे?

भलेभलेच चिखल, फेकतात मुक्तपणे......
गळे गळ्यात परत, भांडतात लोक कुठे?

किती सशक्त, सकस, वाचनीय शेर इथे......
विवाद फक्त दिसे, वाचतात लोक कुठे?

भरीव शेर किती आतुनीच तो स्फुरला......
कशास फोड करू? तोलतात लोक कुठे?

सुखे समोर उभी राहतात, कष्ट कुठे?
अतीव भोग असे, भोगतात लोक कुठे?

अजून दु:ख मला जाणवेच ओझरते....
अजून खळखळुनी, हासतात लोक कुठे?

हरेकजण दिसतो धावण्यात व्यग्र इथे!
पुकारतोस कुणा? थांबतात लोक कुठे?

....................गझलप्रेमी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून पूर्ण मला लोक जाणतात कुठे >>>>>>>बेफीजींनी दिलेला बदल पटला

अजुन एक सुचते आहे की प्रत्येक शेरात असेच , लोक हा शब्द काफियाच्या आधी आला तर तो रदीफेसारखाच आल्हाद देईल व तिची मजा द्विगुणीत करेल (वैयक्तिक मत)

अजून पूर्ण मला, लोक जाणतात कुठे?
अजून थेट मला लोक पाहतात कुठे?
घडेल भेट असे, लोक भेटतात कुठे?
झिजा, जळा, उसळा...लोक.मोजतात कुठे?
इथे तिथे बहिरे, लोक ऐकतात कुठे?
जुमानतात कुठे?लोक मानतात कुठे?

हा मुद्दा मलातरी आत्ता व्यक्तिशः फार इंट्रेस्टींग वाटतोय

कळावे

सुखे समोर उभी राहतात, कष्ट कुठे?

यातील "कष्ट कुठे?" त बदल हवा असे वाटते आहे (का ते आत्ता मलाही नक्की सांगता येणार नाही )..............

चु भु द्या घ्या

भूषणराव, आपले म्हणणे पटले!
पण काही गोष्टी आम्हालाही निदर्शनास आणून द्याव्याशा वाटतात, त्या अशा...........
गझलेचे बहिरंग व अंतरंग असे विभाग आपण केवळ आपल्या सोयीसाठी कल्पितो!
वस्तुस्थिती अशी आहे की, गझलेचे बहिरंग व अंतरंग हे इतके एकमेकांत गुंतलेले असतात(interwoven) की, समग्र गझलेस वा शेरास सौंदर्य / लावण्य नेमके कशाने मिळाले हे सांगणे कुणालाही, अगदी स्वत: शायराला देखिल अवघड व्हावे!
त्यामुळे शेरांच्या / समग्र गझलेच्या कामयाबपणावर वा सौंदर्यावर चर्चा करताना अंतरंग व बहिरंग दोहोंचा समग्र विचार करणे जरूरीचे बनते!
मूळत: शेराच्या गद्य आशयातच/विचारातच/खयालातच सुंदर काव्य ओतप्रोत असायला हवे! ते एकदा बावनकशी सोने असेल तर त्याचा दागिना घडविणा-या गझलकाररूपी सोनाराचे कौशल्य मागावून पणास लागण्याचा प्रश्न येतो!
सोन्याच्या एखाद्या सुंदर दागिन्याच्या बाबतीत आपण म्हणतो अर्धे श्रेय सोन्याचे व अर्धे श्रेय सोनाराचे! असे काही गझलेच्या/शेराच्या बाबतीत म्हणता येईल का असे वाटून राहिले आहे!

आता गझलकाररूपी सोनाराच्या कौशल्यांत कोणत्या गोष्टींचा समावेश असतो? खालील गोष्टी संभाव्य असाव्यात........
१) शायराची शब्दकळा
२) अभिव्यक्तीचा थेटपणा
३) शैली
४) प्रासादिकता
५) शायराची वृत्तावरील पकड
६) शब्दांवर असणारी हुकुमत
७) सुयोग्य प्रतिकांची निवड
८) प्रतिकांची कलात्मक गुंफण
९) शब्दांचे/काफियांचे/रदीफाचे सुयोग्य अर्थ अभिव्यक्त करण्याची कला
१०) सखोल चिंतन
११) शेरास अर्पण केलेली व्यामिश्रता
१२) शेराच्या वेगवेगळ्या तुकड्यांतील चमत्कृती
१३) नाट्य
१४) गूढपणा
१५) उला मिस-यातील एकंदर पीळ
१६) भावनांचा वा अर्थाचा कडेलोट
१७) प्रभावी समारोप इत्यादी.......

पण यासाठी शायराच्या जीवनात आलेला काव्यात्मक प्रत्यय त्याच्या शेरात जसाच्या तसा उतरायला हवा! हे घडते फक्त शायराच्या मानसिकतेमुळे, प्रगल्भतेने, प्रज्ञेने, प्रतिभेने व त्याला येणा-या कडूगोड अनुभवांकडे बघायच्या दृष्टीकोनाने!

ब-याचवेळा सुचलेला गद्य आशय हा काव्यात/शेरात असतो, पण, दागिना जर घाईघाईत घडवला असेल तर जशा त्यात अनेक त्रुटी राहतात तसेच शेरातही होऊ शकते!
जसे एखाद्या पदार्थात सगळे चांगले पण, मीठ थोडेसे कमी असू शकते, तसेच शेरात एखादी चिमूटच कमी पडू शकते, जिच्यातच खरे काव्य दडलेले असल्याने ते अव्यक्तच राहते!

या सर्व गोष्टींचा उहापोह व्यक्तीनिरपेक्षपणे/वस्तुनिष्ठपणे शायरांच्या खाजगी बैठकीत एकत्रितपणे, आपापला अहंकार बाजूस ठेऊन निखळ काव्यदृष्टीकोनातून होऊ शकतो!

यासाठी भूषणराव, २ पर्याय आम्ही सुचवू इच्छितो..............
१) दर महिन्यातील एखाद्या शनिवारी वा रविवारी वा सामाईक सुट्टीच्या वारी एके ठिकाणी (जे दर वेळी बदलू शकते जसे पुणे, मुंबई, नाशिक इत्यादी) आपण इच्छुक शायर मंडळी समक्ष भेटू शकतो व अत्यंत सशक्त, व्यक्तीनिरपेक्ष चर्चा करू शकतो!
२) स्काइपवर व्हिडिओ संवादही एखादी वेळ व दिवस ठरवून करू शकतो! म्हणजे आपापल्या घरी बसूनही हे करता यावे!
पण, प्रत्यक्ष भेटण्यामधील सजीवता ही मात्र औरच असेल!
थांबतो!
भूषणराव, आपली मते विस्ताराने कळवावीत, म्हणजे त्या दृष्टीने आपणांस पुढील हालचाली ताबडतोब करता येतील!
......................गझलप्रेमी
..........................................................................

भूषणराव,
उदाहरणार्थ, सदर गझलेतील 'लोक कुठे' ही रदीफ 'लोक' व 'कुठे' यात सलग येणार्‍या दोन 'कं' मुळे उच्चारायला किंचित अवघड जात आहे. शिवाय, अजून पूर्ण मला लोक जाणतात कुठे असे केल्यास काफिया बराच सैल होईल आणि रदीफ नुसतीच 'कुठे' अशी उरेल व ते कदाचित अधिक सोपे होईल खयाल मांडायला. पण शायराला जर मुळात रदीफ 'लोक कुठे' अशीच घ्यायची असेल तर त्यावर चर्चाच करणे चुकीचे ठरेल, पण इतके खरे की खयाल मग 'लोक कुठे' यावर येण्यास बद्ध होतील व त्यामुळे मर्यादीतही होऊ शकतील.<<<<<<<<<<<<<<

आपले सदर गझलेतील रदीफाबाबतचे विचार पटले! आज भट असते तर त्यांनी नेमके लोक कुठे यावरच बोट ठेवले असते याची आम्हास प्रकर्षाने जाणीव व आठवण झाली! असो.

सदर गझलेत रदीफात लोक शब्द आणायचा असा विचार व मोह प्रथमपासूनच आमच्या मनात घोळत होता!
याला एक अंदरकी वजह आहे!
बहादुरशाह जफरची एक अलौकिक गझल आहे जिच्यात लोगोने असा रदीफ आहे! ते आमच्या मनात कुठे तरी घर करून होते! त्यामुळे हे घडले असावे!
मतला असा काही तरी होता .......
इश्कने क्या क्या मेरे जुनूकी की न बुराई लोगोने
कुछ तुमने मुझे बदनाम किया कुछ आग लगाई लोगोने

मेरे सुर्ख लहूसे चमकी न जाने कितने हातोमें मेंहदी
शहरमें जिस दिन कत्ल हुवा मै, ईद मनाई लोगोने

हमही उने बामपे लाए और हमही हुए महरूम
पर्दा हमारे नामसे उठा और आख लडाई लोगोने

दुनियाका एहसान है मुझपर और मै हूं तेरा शुक्रगुजार
तीर नजरका तूने मारा और लाश उठाई लोगोने

अशी काही तरी गझल होती ती, जी आम्ही २५ वर्षांपूर्वी वाचली होती! तिची आठवण ताजी झाल्याने लोक कुठे असा रदीफ घेण्याचा मोह झाला असावा!

आपण म्हणता तसेही करता येईल!

..................गझलप्रेमी
अजूनही पूर्ण मला जाणतात लोक कुठे?
अजूनही थेट मला पाहतात लोक कुठे?

इथे जर आपण म्हणता तसे केले(अजून पूर्ण मला लोक जाणतात कुठे?) तर पूर्ण मला जाणतात व पूर्ण मला लोक या दोहोत मला पहिलाच पर्याय योग्य वाटत आहे जो आम्ही निवडला! आपल्या पर्यायी मिस-यात पूर्ण शब्द लोकांसाठी आहे असे क्वचित वाटू शकते! पूर्ण लोक अजूनही मला जाणतात कुठे असे गद्यात होणे संभवते!
अजूनही मला पूर्णपणे लोक जाणतात कुठे हे गद्यरूप बरोबर वाटते!
पण आपण जो' क 'चामुद्दा काढला तो मात्र बरोबर आहे, कारण वाचताना कदाचित नीट वाचले नाही तर
कानाला व उच्चारताना सुलभता कमी वाटेल!
असो प्रांजळ मतासाठी धन्यवाद!
..............गझलप्रेमी

वैभवा वर भूषणरावांना दिलेल्या प्रतिसादात तुझ्या पर्यायी ओळी आम्हास का पटू शकत नाहीत याचे उत्तर तुला मिळावे! गझलेत रदीफाशिवाय दुस-या कोणत्यातरी शब्दांची सानी मिस-यात पुनरावृत्ती होणे हे चांगले समजत नाहीत बरेच जाणकार लोक! पुनरावृत्ती फक्त रदीफाचीच सानी मिस-यत व्हावी असे वाटते...........वै.म.

वैभवा,
सुखे समोर उभी राहतात, कष्ट कुठे?

यातील "कष्ट कुठे?" त बदल हवा असे वाटते आहे (का ते आत्ता मलाही नक्की सांगता येणार नाही )..............
<<<<<<<<<<<<<
कष्ट कुठे? या संक्षिप्त प्रश्नात असे सुचवले आहे की, विनाकष्ट सुखे मिळणे वा सुखे विनासायास समोर उभी ठाकणे यात काही गंमत नाही, म्हणूनच सानी मिसरा म्हणतो...........

अतीव भोग असे, भोगतात लोक कुठे?
म्हणजे आम्हाला विनाकष्ट सुखे कधी मिळाली .नाहीत, त्यासाठी आम्हाला अतीव भोग भोगायला लागतात, जशी कोणत्या लोकांना भोग भोगल्यानंतरच सुखे मिळाली आहेत? असा शेराचा मथितार्थ आहे! .

गझलप्रेमी, बेफी आणि ववकु यानी त्रिकोणी झिम्मा घातलाय होय.
मला वाटलं रणांगण आहे म्हणुन वार्तांकनासाठी आलो होतो. Proud

मला पद्यातलं काहीच कळत नसल्याने त्याविषयी काहीच बोलु शकणार नाही. सॉरी.

सर्वांस माझ्यातर्फे गझलेवर मनमोकळ्या चर्चेकरीता जाहीर आमंत्रण.....

आपण सर्वजण आपल्याला योग्य असलेल्या तारखा जाहीर करा.... व एक तारीख निश्चित करु या.

मुशायरा -कम-गझलचर्चा असा जंगी कार्यक्रम करु या...

शक्यतो शनिवार संध्याकाळ असावी....म्हणजे मुशायरा..... जेवण...रात्री गझलचर्चा व निवांत सूर्य डोक्यावर येईपर्यंत झोप असा फर्मास कार्यक्रम करता येईल.

स्थळ : सानपाडा,नवी मुंबई

मध्यंतरी फक्त महिलांचा एक मुशायरा झाल्याचे ऐकण्यात आले. फक्त पुरुषांचा एक मुशायरा का होऊ नये?

धन्यवाद कैलासराव निमंत्रणाबद्दल!
मागे आम्ही कार्यबाहुल्यामुळे येवू शकलो नाही, त्याची खंत वाटते! पण यावेळेस निश्चितच येवू!
कल्पना छान आहे! पुरुषांचा मुशायरा ही कल्पना हृदयंगम आहे!
आम्ही एक सुचवू इच्छितो...........
एक पूर्ण दिवस वा एक पूर्ण रात्र मुशायरा कम गझलसौंदर्यचर्चेसाठी ठेवले तर किती बहार येईल!
जवळीकही वाढावी, व पोटभरून रसाळ चर्चाही करता यावी!
सामाईक सुट्टीचा दिवस पकडू या!

टीप: वर आम्ही लिहिलेल्या प्रतिसादांवर कैलासराव व भूषणराव आपण काही वदला नाहीत?
कृपया आपली मते कळवावीत!
............गझलप्रेमी

Pages