कोकणातील शिमगा

Submitted by Mandar Katre on 17 March, 2013 - 01:12

कोकणातील शिमगा सगळ्या चाकरमानी लोकांच्या हृदयातला हळवा कोपरा !

कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणपती च्या सणांना त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात . घरट्याबाहेर उडालेल्या पिल्लाची जशी पक्षिण वाट पाहते ,तसेच गाव आणि गावकरी आपल्या चाकरमान्यांची वाट पहाट असतात.

कोकणात विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा सण सुमारे 5 ते 15 दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन शुद्ध द्वादशी /त्रयोदशी किंवा पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. यामध्ये मुख्य काम म्हणजे ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात रुपे (देवीच्या उत्सवमूर्ती) ठेवून पालखी देवळातून सहाणेवर आणणे . सहाण ही जागा मुख्यत्वेकरून गावातील चावडी असते. तर गावदेवीचे देऊळ हे दूर जंगलात असते. तर पालखी सजवून ढोल-ताशा च्या गजरात साहणेवर आणायची ती होळीच्या दिवशी संध्याकाळी .
त्यानंतर पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरू होतो.

त्यानंतर रात्री आंब्याच्या किंवा ताडाच्या झाडाची होळी तोडून आणणे .हे काम खूप जिकिरीचे आणि जबाबदारीचे असते. सुमारे 50-70 फूट उंचीचे, 15 वर्षे वयाचे , आणि सुमारे 1200-1500 किलो वजनाचे झाड तोडून ते गावकरी खांद्यावरून नाचवत साहणेवर पालखीसामोर आणून उभे करतात ।

हे सगळे होईपर्यंत सकाळचे 4.00 वाजतात . मग होम केला जातो ,ज्यामध्ये मागच्या वर्षीच्या होळीचा जो खुंट शिल्लक असतो ,तो एक मोठा खड्डा खणून त्यात उभा करतात ,व त्याभोवति गवत रचून मग पालखी प्रदक्षणा होते,आणि मग होम जाळला जातो. गावातील नवीन जोडपी या होमात नारळ देतात .तो एक महत्त्वाचा विधी असतो.

होम झाल्यावर रात्रभर दमलेले सगळे गावकरी,चाकरमानी घरी जातात ॰ मग थोडेसे झोपून/आंघोळ -देवपूजा उरकून परत सहाणेवर जमतात .आणि होळीच्या शेंड्याखाली सगळं गाव उभा राहून ~गार्‍हाणे ~ नावाचा कार्यक्रम होतो,ज्यात मागच्या वर्षीचे नवस फेडणे आणि यावर्षी नवीन नवस करणे असा प्रकार असतो. त्यानंतर बैठक(गावची सभा) असते ,ज्यात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होते.

त्यानंतर तिसर्‍या दिवशी पालखीने खुणा काढणे हा कार्यक्रम असतो ,यामध्ये गावचा गुरव आदल्या रात्री एक नारळ सहाणे समोर पटांगणात जमिनीत लपवून ठेवतो . तो नारळ पालखी हुडकून काढते. हा कार्यक्रम देखील पाहण्यासारखा असतो .

त्यानंतर सत्यनारायण पूजा आणि भजन व रात्री गावचे खेळे-नमन हा लोकनृत्यप्रकार असतो. काही ठिकाणी पालखीनृत्य स्पर्धा ही असतात. त्यानंतर पुढील दिवसात पालखी घरोघरी दर्शन देते. याचा समारोप काही ठिकाणी शिंपणे या कार्यक्रमाने तर काही ठिकाणी देवीचा दिवट्या गोंधळ घालून होते.

तर असा आहे कोकणचा शिमगोत्सव ! मंडळी , गावकरी आणि चाकरमानी यांच्या साथीने कोकणची संस्कृती अनुभवायला एकदा तरी शिमग्याला कोकणात याच !

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सूनटून्या जी हे चोरवणे संगमेश्वर तालुक्यातील आहे. नाणीज जवळ. रत्नागिरी-कोल्हापुर हायवे वर !

*

कोकणातील होळी (शिमगा ) उत्सवासंबंधीचा सदर लेख विकिपीडिया वर होळीसंबंधी अधिकृत माहिती देणारा लेख म्हणून प्रसिद्ध झाला आहे !

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80

आमच्या चोरवणे नजीकच्या नाणीज (नरेंद्र महाराज ) गावचा शिमगोत्सव काल सुरू झाला ...

चोरवणे गावचा शिमगा बुधवार २३ पासून सुरू होणार आहे

अरे वा! मस्त धागा.. आमच्याकडे (केळशी ता. दापोली) पालखीबरोबर दोन शंकासुर (काळभैरवाचे पहारेकरी म्हणून ते फक्त डोळे दिसणारा मास्क असणारा उंच टोप, त्याला मॅचिंग पोशाख आणि हातात चाबूक अश्या वेशात असतात) आणि एक नाच्या पोऱ्या (साडी नेसवलेला लहान मुलगा, जो पालखीसमोर थोडा नाचतो) पण असतात.. आजूबाजूच्या गावातल्या पालख्या पण येत असतात त्यांच्याबरोबर सुद्धा शंकासुर असतात..

रस्त्यातून पालखी जाताना शाळेतली मुलं शंकासुराना चिडवून त्यांच्या खोड्या काढतात आणि शंकासुर पाठलाग करून त्यांना चाबकाचा प्रसाद देतात Happy
मिसिंग ऑल द फन...

मॅगी, सेम सेम. गिरगावात असताना वाडीत हे शंकासूर आणि गोमू (नाच्या) यायचे. ठराविक प्रकारे नाचायचे. होळीचे दोन दिवस २-३ ग्रूप्स येत. मग आम्ही पण त्यांच्या समोर तस्संच नाचायचो Uhoh Blush :खोखो:. गोमूचा मेक-अप भयाण असायचा आणि चेहर्‍यावर कधीकधी चमकीही फासलेली असे. शंकासूर मध्येच उंच उडी मारत असे.

मॅगी, तै, मी पण आंजर्ल्याचा..
पाखाडीत घर आहे अजुन. आंजर्ल्या पाल्खी नंतर येते न..
हनुमान जयंतीच्या दुसर्यादिवशी.
हनुमान जयंतीला केळशी ल उत्सव असतो .. आमचे परांजपे आणि मंदार जोशी असतात तिथे

यंदाच्या शिमगोत्सवासाठी सर्वांना हार्दिक निमंत्रण अन शुभेच्छा …
यंदाचा शिमगा आजपासून सुरु होत आहे ...

यंदाच्या शिमगोत्सवासाठी सर्वांना हार्दिक निमंत्रण अन शुभेच्छा … >>>>>>>तुम्हालाही शुभेच्छा!
यंदाचा शिमगा आजपासून सुरु होत आहे ...<<<<<<<<गेले ८/१० दिवस जुने व्हिडीओ पहात आहे. Happy
आज कोकणात खूप मजा असेल.

Pages