गुत्ते पे गुत्ता - १

Submitted by बाबूराव on 16 March, 2013 - 12:34

मारत्याची दारू सुटली तवा सगळंच खुष झाल्तं. मारत्या तवा लै शान्यासारखा वाटला व्हता. त्यो त्याचा पयलाच टायम व्हता. त्या टायमानन्तर मंग कुनालाच कायबि वाटंना हितक्या येळंला त्याचि दारु सुटलि व्हति. पयल्यान्दा दोन मैनं सुटलि व्हति तवा मारत्या सुधरला असं समद्यांनाच वाटल्यालं. बायकुबी सोडुन जायचं म्हनत व्हति ती थांबलि. अन पहिल्या म्हैन्यातच ग्वाड बातमि बी आलि.

तवा दारु सुटल्याचं फायनल झालं असंच समद्यास्नि वाटल्यालं. येक म्हैना अजुन गेल्यावर मंग मारत्याच्या आयनंच त्येला आता असंच वागत जा म्हनताना बाप बनणार असल्याचं बी सान्गुन टाकलं. आधी ही म्हातारिच म्हनली व्हती सुनंला कि आताच मारत्याला सान्गु नकु म्हनुन, आन आता सान्गुन बसलि तशि मारत्याची बायकु लैच खट्टु झालि. तिला तिच्या त्वांडांनं सान्गायचं व्हतं, पन म्हातारिला येळ काळ कायच समजत नव्हतं.

आता परत आल्यावर सान्गावं असा इच्चार चाललाच व्हता तर मारत्या आला त्योच लालभडक डोळं घिऊन. त्याच्या मागं दारुचा भपकारा बी आला तसं त्याचि बायकु डोळं मोठालं करुन बगाय लागलि अन येकाच जागि उभी रायलि. मारत्यानं तिला बघितल्या बघितल्या येक इचित्र आवाज काडत बायकुला शिव्या दिल्या. बाप बननार असल्याचं सान्गितलं का न्हाय म्हनुन इच्चारायला सुरुवात केली तवा त्येचा आवाज चडल्याला व्हता. त्ये आइकूनच म्हतारा म्हतारी तरातरा मागच्या दारानं आत आली. म्हतारीनं त्वांडावर हातानं मारुन घ्यायला सुरुवात केली अन म्हातारं त्येला बोल लावाय लागलं. मारत्या बॅलन्स लावत हुभा व्हता. त्येनं आयबापाकडं येक डाव बघितलं पन कायबि म्हनला नाई. बाप बनल्याबद्दल मित्रांनि दारु पाजाय लावलि तवा उलीशी प्यायलो म्हनला. तवा म्हतारीच्या त्वांडाचा पट्टा सुरु झाला अन त्येच्या मित्राच्या कुळाना बोल लावत म्हतारी तणतण कराय लागली. मारत्या डोळ्याच्या खालचा गाल उडवत कधि हातानंच कायचि खुण करत दोन पावलं फुडं अन येक मागं असं उभा व्हता.

त्या गोष्टिला आता धा वरीस झालं. आता मारत्याचि दारु सुटत व्हति ती तास दोन तासापुर्तीच. म्हतारं लै खन्गलं व्हतं. म्हतारी फोटुत जावुन बसली व्हती. त्या फोटुची काच बी फुटल्यालि व्हती. चार पोरं पदरात व्हती. जमिनिचा तुकडा, किडुकमिडुक समदं इकुन झाल्तं. आता बायकुच दुस-याच्या शेतात गवत काडाय जात व्ह्ति. म्हता-याचि खोकल्याचि दवा नाय आलि तरी पोराना दोन टाईम घास घालायला पायजे व्हता. मारत्याला कशाचि सुदीक सुद्द नव्हति.

येकदा कटाळुन ती गानगापुरला जाउन आलि. तिथला बाबा दारु सोडायचं औशद देत व्हता. गपचिप कशातुन बि चारलं कि दारु सुटत व्हति. लै बायांनि हे केलं व्हतं अन त्येन्च्या नव-याचि दारु सुटलि व्हति. तवा हा इलाज करुन बगाय काय तरास नव्हता. मारत्याला तिनं मटनात औशद कालवुन दिलं ते त्येला कळलंबि नाय. आताशा त्यो दिसभर म्हनल तरि प्यालेलाच असायचा तसा आत्ताबि व्हता. काय खाल्लं न काय न्हाय हे समजतबि नव्हतं. अजुन म्हमद्यासारकं त्येचं झालं नव्हतं. म्हमद्याला दारु भेटलि नाय कि त्येचं हातपाय थरथर कापाय लागायचं. दारु प्यायलेल्या मानसागत तो झोकांड्या खात चालायचा. पन एक पेग पोटात गेला का, कि लगिच त्याची बॉडी येकदम स्ट्रेट व्हायचि. आनखि येक पेग गेला कि त्यो नारमलला यायाचा. मंग त्येला कायबि सान्गा. पठ्ठ्या अज्जात काम करायचा.

मारत्याचं जेवन झाल्यावर त्येला लै झोप आली. त्या रातच्याला त्यो वाडुळ आदिच झोपाय गेला. त्याचं डोळंच गपकत मिटत व्हतं. बायकुला औशद पावरफुल असल्याचा सबुतच भेटला. लगिच तिनं देवाला हात जोडलं अन म्हता-याला सान्गुन ति देवळाकडं गेली.

सकाळच्याला मारत्या बोंबलतच उठला. पोटात आग पडल्यासारका त्यो वरडत व्हता. बायकुनं काळजीनं काय व्हतंय इचारलं. त्यो प्वाट धरुन फिरत व्हता. तवा तिनं रातचा भाकरतुकडा त्याला खायाला दिला. पन येकच तुकडा खाल्ला असंल तोच त्याला परसाकडं आली. अन मंग डालड्याचा डब्बा घेवुन रानाकडं त्यो पळाय लागला. त्येची अशि अवस्था बघुन बायकु लैच घाबरलि.

थोड्या येळानं त्यो आला त्योच कुत्तत कुत्तत. आग बी पडल्यालि, प्वाट मोकळ झाल्यालं अन आता पोटुशि बाईवानि कोरड्या वका-या काडाय बगत व्हता. तिनं आमसुल घेतलं पन मारत्या काय आइकंना. म्हता-यानं शिव्या दिल्यावर आमसुल घितलं. जरा येळानं त्याला बरं वाटलं. जरा बरं वाटलं तसं त्याचि बॉडी दारु मागाय लागली. बायकु भाक-या टाकाय खाली बसत व्हती तवाच तिनं पायात चपला सरकल्याचा आवाज आइकला अन पुन्यांदा तिनं नशिबाला बोल लावले.

कामावर बायांना हे समदं सान्गितलं तवा बाया तिलाच बोल लावाय लागया. कायबि झालं तरि त्याला चिच, आम्सुल असलं आम्बाट चिम्बाट द्याया नव्हतं पायजे अस समद्या बायांचं मत पडलं. बाबा सान्गायचा इसरला का तिनं आईकलं न्हाय याचा इचार आता करुन उपेग नव्हता कारन सकाळच्याला ति कबुली द्येऊन बसली व्हती. घरात पाऊल टाकल्याबरुबर दारुचा भपकारा नाकात शिरला अन शिव्या कानात. अन्नात इष कालवति म्हनुन अभन्गवानि जि सुरु झालि ति थाम्बचना. तिथुन पुडं दारु सोडवाय गेलं कि मारत्या हानुन पाडायचा.

- बाबूराव

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users