कलिंगडाची फोड

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 16 March, 2013 - 09:43

नणंदेच्या लग्नात हा प्रकार मी लग्नाच्या आदल्या दिवशी केला होता.

साहित्य :
पाव किलो खोबर्‍याचा किस (हल्ली बाजारात ड्राय मिळतो तो)
पाव किलो साखर
४-५ वेलच्यांची पुड
खायचा हिरवा व गुलाबी रंग
१०-१२ काळ्या मनुका
१ चमचा तूप

कृती:
खोबर्‍याचे व साखरेचे प्रमाण वाटी वापरून घ्यायचे. तिन भाग पुढील प्रमाणे करायचे.
हिरव्या रंगासाठी - पाऊण वाटी साखर व १ वाटी खोबर्‍याचा किस
पांढर्‍या रंगासाठी - पाव वाटी साखर व पाव वाटी खोबर्‍याचा किस
गुलाबी रंगासाठी - १ वाटी साखर व दिड वाटी खोबर्‍याचा किस

ह्या प्रकारासाठी जरा भांडी जास्त लागतात. लहान लगडी टोप किंवा थाळ्यासारखे ताट घेऊन त्याला तूप लावून घ्यायचे. पहिला एका छोट्या टोपात पाउण वाटी साखर, थोडी वेलची पूड( वेलची पुडचेही तिन भाग करायचे) साखरेच्या निम्मे पाणी व खायचा हिरवा रंग घालून गॅसवर ढवळत पक्का पाक करुन घ्यायचा. पाक झाल्यावर त्यात खोबरे टाकायचे व चांगले ढवळून घेउन लगेच लगडी पातेल्याच्या किंवा ताटाच्या अर्थ्या भागाला अगदी कडेला दाबून हा हिरवा भाग चंद्रकोराप्रमाणे (कलिंगडाच्या सालीच्या आकाराप्रमाणे) रचावा. हात भराभर चालवावा लागतो नाहीतर पाक सुकून चिकटणार नाही.

दुसरे भांडे घेउन त्यात पाव वाटी साखर, त्याच्या निम्मे पाणी, वेलची पुड घालून पक्का पाक तयार करायचा. त्यात खोबरे टाकुन हा पांढरा भाग हिरव्या भागाला अगदी चिकटून चंद्रकोराप्रमाणे चिकटवा.

आता ह्या हिरव्या व पांढर्‍या रंगाच्या पुढे जिथे कलिंगडाचा गुलाबी भाग करायचा आहे त्या भागात ७-८ मनुका बियां प्रमाणे काही अंतरावर लावून ठेवाव्यात.

आता तिसरे भांडे घेउन त्यात १ वाटी साखर, अर्धा वाटी पाणी, वेलची पूड व गुलाबी रंग टाकून पक्का पाक तयार करुन वरील प्रमाणेच खोबर्‍याचा किस टाकुन एकजीव करायचे. आता हा भाग पांढर्‍या रंगापुढे भराभर वरून टाकावा व त्याला कलिंगडाच्या फोडीप्रमाणे पटापट आकार देऊन पटापट वरूनही ७-८ काळ्या मनुका लावाव्यात.

पुर्ण सुकल्यावर साधारण अर्धा-एक तासाने ही कलींगडाची फोड सुरीचा आधार खाली घेऊन अलगद काढायची.

ह्या रुखवतीत फोड ठेवलेली आहे.

टिपः
लग्नात २-३ कॅमेरे कोण कोण वापरत असल्याने करतानाचे स्टेपचे फोटो गहाळ झाले आहेत Sad
जर एखादा तुकडा नंतर सुटला तर नुसत्या साखरेचा पक्का पाक करुन तो भाग चिकटवायचा.

रुखवत : http://www.maayboli.com/node/39399

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागु महान आहेस.:स्मितः खूपच सुरेख दिसतेय ही फोड. तोंडाला खरे तर पाणी सुटलयं, कारण मला गोड खूप आवडते. फोडीचा हिरवा भाग तर अगदी कातिल आहे. तसे सर्वच तुकडे पाहुन आवरत नाहीये.

खूपच छान्.मी नातीच्या वाढदिवसाला अशीच कलिंगडची फोड कलर न वापरता केली होती. याच पद्धतीने आकार द्यायचा.कलर न घालता. जेथे लाल भाग आहे तेथे बिटाचा रस [गाळुन] ब्रशने लावला. त्यावर मनुकाचे तुकडे लावलेत. व हिरवाकलर खस सिरप ब्रशनेच लावला. फोटो आहे. पण मला ते तंत्र जमत नाही.तशीच गाजराच्या किसाचे गाजर व खोबर्याचा पेरु ही बनवला आहे. .रेसिपी कळवेल. फोटोच बघते.

टुनटुन, प्रज्ञा, बेफिकीर, दिनेशदा, जाई, अखी, ऑर्किड, सारीका धन्यवाद.

प्रभाताई नक्की दाखवा त्या रेसिपीज.

वा! जागु मस्त झाली आहे कलिंगडाची फोड. तोपासु अगदी. रुखवत ही छान झाले आहे. पण कलिंगडाच्या फोडीसाठी ३ रंगासाठी नारळ आणि साखरेचे प्रमाण वेगवेगळे का घेतले?
तुझी मेल मिळाली थॅक्स!

विद्या कारण हिरवा रंग सालीचा थोडा जाडा असल्याने तो पांढर्‍यापेक्षा जास्त. मधला पांढरा फक्त दिसण्यापुरता हवा असतो म्हणून कमी. आणि बाकीचे कलिंगण गुलाबी असल्याने तो भाग जास्तच लागणार. जर सगळ सारख घेतल तर फोडीची डिझाईन कशी येणार?

सुरेख Happy

जागू, सहीच केले आहेस. खाणेबल आयटम असल्याने अधिक आवडला. Proud

माझ्या लग्नामधे हे रूखवत वगैरे करणे जास्त शक्य नसल्याने आम्ही रत्नागिरीत एक काकू रूखवत करून देतात त्यांच्याकडे गेलो होतो. त्या आम्हाला काही वस्तू तयार करून ठेवल्या होत्या आणि काही आयत्या वेळेला करायच्या वस्तूंची नावे घेत हे करायचे का? वगैरे विचारत होत्या. "कलिंगडाची फोड करू का?" म्हणून विचारल्यावर माझा भाऊ म्हणे, फोड कशाला? अख्खा कलिंगड करा की!!! Proud

अग, मला तसे नाही म्हणायचे. कमी जास्त प्रमाण हे ३ रंगाच्या साईज प्रमाणे ठिक आहे. पण तु हे असे प्रमाण घेतलेस.
हिरव्या रंगासाठी - पाऊण वाटी साखर व १ वाटी खोबर्‍याचा किस
पांढर्‍या रंगासाठी - पाव वाटी साखर व पाव वाटी खोबर्‍याचा किस
गुलाबी रंगासाठी - १ वाटी साखर व दिड वाटी खोबर्‍याचा किस
मला असे विचारायचे आहे कि, पांढर्‍या रंगासाठी जेवढ्यास तेवढी साखर, पण हिरव्या रंगासाठी १ वाटी किसाला पाउण वाटी साखर, आणि गुलाबी रंगासाठी दिड वाटी किसाला १ वाटी साखर असे वेगवेगळे प्रमाण का?
खंर तर हे अशासाठी विचारते कि मला वड्या जमत नाही तेव्हा वड्यांसाठी कोणते प्रमाण वापरु?

विद्या अग मी हा प्रकार पुस्तकात पाहून केला. त्यात असे प्रमाण होते तेच घेतले. पहिलांदाच केलेला त्यामुळे मी पण तंतोतंत त्यांचेच प्रमाण वापरले चुकू नये म्हणून.

ऑर्किड, संजना धन्यवाद.

जागू,कलिंगड्याची फोड छानच झालीय बरका Happy
माझ्या काकू साखरेचं रुखवत बनवण्यात खूप माहीर आहेत.मी त्याचे फोटो टाकणारच आहे Happy तुझ्या कलिंगड्याच्या फोडीची कल्पना मी त्यांना नक्की सांगेन Happy मला हि खूप आवडली