वावटळं

Submitted by vandana.kembhavi on 13 March, 2013 - 23:53

खूप दिवस असेच गेले, काय करावे याचा विचार करून मेंदू थकून गेला. पुढचा रस्ताच हरवून गेला, काही दिसेना. खूप मोठ्या प्रवासाची सुरुवात केली होती आणि तो प्रवास मधेच संपून गेला. मुक्कामाला पोचले नाही पण तो रस्ता आवाक्यात आला आणि त्याचा खूप आनंद पण झाला. आता पुढे काय? इतक्यात काही हा रस्ता संपणार नाही याची मानसिक तयारी झालेली होती. अचानक हाती घबाड लागावं तस माझं आयुष्य एका सुंदर तबकातून माझ्या समोर आलं. आता त्याचं काय करायच? मी भांबावून गेले, आनंद व्हायला हवा पण मला काय करावे हेच सुचेना. ईतकी वर्ष दुःखामधे गुरफटून राहिल्यामुळे त्या दुःखाची सवय झाली होती, त्यातून जरा बाहेर पडू शकतो ह्याचा विसरच पडला होता. त्यामुळे मनाला आता आपल्याला करायला काही उरले नाही याचे दुःखच झाले. मी जास्त दुःखी झाले. मला कळतय की मी आनंदी व्हायला हवे आहे. मी जे धेय्य गाठायला निघाले होते ते अगदी पूर्ण नाही झाले तरी माझा त्यातला सहभाग कमी करण्याची वेळ आलेली आहे. एका दृष्टीने पाहिले तर ही तर माझ्या स्वप्नांची पूर्तीच, म्हणजे मला ती साजरी करायला हवी आहे आणि आयुष्य पुढे चालायला सुरु करायला हवे आहे.....
जाणीव मनात आत कुठेतरी पाझरायला सुरुवात झाली पण नक्की काय झाले आहे हे कळेना. मनाला व्यक्त व्हायचे आहे पण कसे, हेच कळेना. मला स्वतःलाच ही घुसमट नीटशी समजली नाही तर ईतर कोणाला समजणे लांबच...पण असं नसत ना? आपल्याला समजून घेणारं कुणीतरी या जगात असतच...
माझ्या लेकीला ते कळलं, नुसत कळलंच नाही तर तिच्या कडे त्यावर उपायही होते. तिच माझ्यावर बारिक लक्षं होत. आईच्या मनातली स्थित्यंतरं कळण्याएवढी माझी लेक मोठी झाली होती. आजवर ती वाढत असताना, तिला दिलेला आधार, शिकवणं, उपाय हे सगळं आईला परत देण्याएवढी ती प्रगल्भ झाली? कधी बर झालं हे सगळं? आत्ता आत्ता तर अंगाई गाऊन जोजवलं होतं, चिमुकल्या बोटाला धरून शाळेत सोडलं होतं, तिच्या चिमुकल्या जगातल्या सगळ्या गमतीजमती आम्ही दोघींनी वाटून घेतल्या होत्या. तिच्यावर सतत मायेची पाखर घालण्या-या आईला तीच माया परत द्यायला ती सज्ज झाली होती.
सर्वात आधी तिने मला जाणीव करून दिली की मी आयुष्याच्या कुठल्या वळणावर आले आहे, ते वळण अचानक जरी आले असले तरी त्या वळणावरून मला माझा प्रवास पुढे चालू ठेवायचाच आहे. माझ्या समोर तबकातून आलेल्या आयुष्याकडे मला नव्याने बघायचे आहे आणि आता स्वतःसाठी जगायचे आहे. जे जे काही करायचे राहिले आहे ते ते कर. आयुष्य पुर्णार्थाने जगायला लाग. नवीन स्वप्नं बघ आणि ते पुर्ण करायचे धेय्य निश्चित कर...
माझीच शिकवण योग्य ठिकाणी पोहचून माझ्याकडेच परत आली आहे...डोळ्यासमोर रस्ता स्पष्ट व्हायला लागला आहे...मनावरचे मळभ झटकून आयुष्याकडे नव्याने बघायला हवेच, नाही का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users