समारोप

Submitted by kaaryashaaLaa on 20 October, 2008 - 00:26

मित्रहो,
आज कार्यशाळेच्या समारोपाचा दिवस.
निकाल वाचायला तुम्ही उत्सुक असणं स्वाभाविकच आहे. तो लवकरच प्रकाशित करतोच आहोत.

पण आपली कार्यशाळा म्हणजे केवळ स्पर्धा नव्हतीच. ती आधी शाळाच होती. गज़ल म्हणजे काय, ती लिहावी कशी, वाचावी कशी, तिचं तंत्र कसं सांभाळावं, तिची सौंदर्यस्थळं कोणती, गज़ल लेखनातली धोक्याची वळणं कोणती, या आणि अशा अनेक बाबींची या निमित्ताने चर्चा व्हावी; ज्यांना गज़लचं वेड लागलेलं आहे, अशांनी त्यांची मतं मांडावीत, आणि नवीन लोकांना ते वेड लागण्याइतकी तिची माहिती मिळावी - असं बरंच काही मनात होतं. त्यातलं काय काय साधलं, काय राहून गेलं, याचा एक आढावा घ्यावासा वाटला, कार्यशाळेच्या निमित्ताने आलेले बरेवाईट सगळेच अनुभव तुमच्याशी शेअर करावेसे वाटले. म्हणून आज हातातली छडी खाली ठेवून, प्लॅटफॉर्मवरून खाली उतरून, तुमच्या कोंडाळ्यात बसून मारलेल्या या मनमोकळ्या गप्पा.

नाहीतरी त्या छडीबिडीचं आम्हालाही एका अर्थी थोडंसं ओझंच झालं होतं हो! 'संयोजक समिती' या इतक्या मोठ्ठ्या भारदस्त नावाला आपण न्याय देऊ शकतोय की नाही, ही धाकधूकच होती मनात. कारण कुणाला काही शिकवायला जायला आम्ही तरी असे कोण लागून गेलोय! आम्हीही विद्यार्थीच आहोत ना गज़लच्या शाळेतले! तुमच्यापैकी काहींपेक्षा थोडे आधी इथे दाखल झालोय इतकंच.

मजा काय होते, की गज़ल 'शिकवायला' सुरुवात करायची, तर तंत्राची आणि व्याकरणाची चर्चा वगळून तर पुढे जाता येत नाही. आणि नवीन सहाध्यायींना ते कळतंय तोपर्यंत वेळ संपून जाते. आणि मग 'गज़ल म्हणजे नुसतं व्याकरण.. बसलेत तिथे लगालगा करत..' अश्या (गैर)समजूतींना आणि ताशेर्‍यांना वाव मिळतो. पण ते तंत्र शिकणं थोडंसं ड्रायव्हिंग शिकण्यासारखंच आहे. गाडीच्या वेगवेगळ्या भागांची, ते कसे वापरायचे असतात त्याची माहिती ते शिकणार्‍याला आवश्यकच असते. पण ती माहिती एकदा कळली, आत्मसात झाली, की गाडी घेऊन तुम्ही कुठे जाता, हे ज्याच्या त्याच्या आवडीवर अवलंबून असतं ना? किंवा त्याहून चांगलं उदाहरण द्यायचं तर शास्त्रीय संगीताचं देता येईल. ते शिकताना राग, वादी-संवादी स्वर घटवावेच लागतात. पण खरं संगीत त्यानंतरच सुरू होतं ना? केवळ त्याला तंत्राची जोड आहे म्हणून शास्त्रीय संगीत हे संगीतच नाही, असं तुम्ही म्हणाल? 'गज़ल म्हणजे काव्यच नव्हे' हा तसाच आणि तितकाच चुकीचा विचार आहे.

कार्यशाळेत आमच्या मते 'गज़लच्या तंत्राची ओळख' हा टप्पा आपण पूर्ण करू शकलो. यानंतर विचार सुरू व्हायला हवा मंत्राचा. तंत्रशुद्ध गज़ल ही सुरुवात आहे. आपल्याला 'चांगली गज़ल' लिहायला शिकायचंय. त्यासाठी आधी पुष्कळ गज़ला वाचायला हव्यात. त्यातले आवडणारे शेर आपल्याला नेमके का आवडले, याचा स्वतःशीच शोध घ्यायला हवा. त्यातले शब्द सुंदर होते का? त्यांचा नाद भावण्यासारखा होता का? वृत्त आकर्षक वाटलं का? व्याकरणाची, र्‍हस्वदीर्घांची मोडतोड टाळली होती का? अर्थ खूप प्रभावी होता का? तो अतिशय सहजसोप्या भाषेत आला का? शेर वर्णनात्मक होता का? त्यात उपहास होता का? विरोधाभास होता का? रुपक वापरलं होतं का? त्यात अर्थाचे अनेक कंगोरे होते का? जीवनाबद्दल काही खोल भाष्य होतं का? उला आणि सानी मिसर्‍यांचे अर्थ कसे जोडले होते? काही शेर सुभाषितांसारखे मनात कायमचा ठसा उमटवून जातात, सहज संभाषणांत डोकावतात.. हे कसं होतं? दोन ओळींमधे - फक्त दोन ओळींमधे - आणि सगळे नियम पाळून - इतकं प्रभावी लिहीणं कसं साधलं असेल? .. जितकं वाचत जावं तितकी या प्रश्नांची उत्तरं आपली आपल्याला स्पष्ट होत जातात. आणि मग 'चांगलं' काय ते कळायला लागतं.

उदा. प्रत्येक शेर ही स्वतंत्र कविता असते - हे आपण पाहिलं होतं. म्हणजे त्या दोन ओळींमधून एक पूर्ण विचार मांडायचा असतो. लक्षात घ्या, म्हणजे त्यातला प्रत्येक शब्द किती महत्त्वाचा आहे! प्रत्येक जागा किती काळजीपूर्वक वापरली जायला हवी! एकही भरीचा शब्द येणं क्षम्य नाही तिथे! आणि विचार पूर्ण करणारा एकही शब्द गाळूनही चालणार नाही! केवढी जबाबदारी - केवढं आव्हान - आणि ते साध्य करण्यात केवढी मजा असेल! नेमका हवा तो शब्द सापडेपर्यंत, आपल्याला जो विचार मांडायचा आहे, तो जास्तीत जास्त प्रभावीपणे येईपर्यंत कशी तडफड होते, हातून एक चांगला शेर लिहीला गेला की त्याची नशा कशी असते, या 'शिकवण्याच्या' बाबी नव्हेत! म्हणूनच आज उदाहरणं देत नाहीये. या आनंदाचा शोध तुमचा तुम्ही, तुमच्या पद्धतीनेच घ्यावा अशी आमची मनापासून इच्छा आहे.

या संदर्भात एका गोष्टीचा मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो आहे. कार्यशाळेतील काही प्रवेशिकांमधे 'च' ने संपणारी यमकं वापरली गेली होती. वाचकांनी त्यातल्या काही ठिकाणी "'च' भरीचा वाटतो, इतकंच नव्हे, तर त्यामुळे शेराचा अर्थ बदलतो" अश्या प्रकारचे अभिप्राय दिले. आता त्या त्या शेरातल्या 'च' च्या वापराबद्दल मतभेद असू शकतात, पण एकेका शब्दाचा, नव्हे अक्षराचा इतक्या बारकाईने विचार केला गेला, तसंच काही शेरांबाबत 'हे नक्की कोण कोणाला म्हणत आहे' असे प्रश्न विचारले गेले ही बाब आम्हाला खूप स्वागतार्ह वाटली.

मुळात कार्यशाळेला जो प्रतिसाद मिळाला, तो तर भारावून टाकणाराच होता. इतक्या लोकांनी शिकायची तयारी दाखवली, लिहायचा प्रयत्न केला, आम्ही सांगत होतो ते समजून घ्यायची पराकाष्ठा केली, याचा आनंद निराळाच होता. प्रवेशिका निर्दोष करून घेताना सुदैवाने काही नवीन मंडळी "तुम्ही सुचवलेले बदल मी तसेच्या तसे स्वीकारणार नाही - मग ती 'माझी' गज़ल राहणार नाही" असं बाणेदारपणे सांगणारीही भेटली, आणि दुर्दैवाने काही मंडळी "आम्हाला नाही बुवा जमत - तुम्हीच सुचवा!" असं म्हणून शस्त्र टाकणारीही भेटली. गुणांकन करणार्‍यांमधे जसे दिलखुलास दाद देणारे होते तसेच केवळ एका किंवा दोन गज़लांना १० गुण देण्यापुरतेच मायबोलीचे सभासद होणारे महाभागही होते.

आम्ही गुणांकन करताना काय निकष वापरले ते सांगावं असा एक प्रस्ताव आला होता. कल्पनांतील नाविन्य, विचारांतला नेमकेपणा, हे मुद्दे आम्ही अर्थातच विचारात घेतलेच. तंत्राच्या दृष्टीने नवीन सहाध्यायींना मदत लागणार, हे अध्याहृतच होतं, पण 'शिकण्याची कळकळ' हा निकष आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा होता. "माझं कुठे चुकतंय / कमी पडतंय सांगा, ते सुधारायचा मी स्वतः प्रयत्न करेन" असं म्हणणार्‍यांना त्यासाठी आमच्याकडून जास्त गुण मिळाले.
संग्रहासाठी गज़ल निवडताना मात्र 'अंतिम स्वरूपातील गज़लची गुणवत्ता' हा एकच निकष होता असं म्हणता येईल.

असो. गप्पा म्हणता म्हणता हे भाषणाच्याच वळणावर जायला लागलं.
मग भाषणच करायचं तर त्यात थोडंसं आभारप्रदर्शनही करून घ्यावं. कार्यशाळेसाठी जागा आणि तांत्रिक मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल मायबोली प्रशासक आणि श्री. समीर सरवटे यांचे आभार. विशेषतः समीरचे. आम्ही वेळीअवेळी आणि वाजवी-अवाजवी मागण्या करून गेला महिनाभर या माणसाला फार छळलंय. आणि त्याने कायम त्या मागण्या अत्यंत तत्परतेने आणि हसतमुखाने पूर्ण केल्या आहेत. (त्यावरून तो मूळचा मराठी नसावा अशी एक उगीचच शंका येते मनात!)

वर उल्लेख केल्याप्रमाणे कार्यशाळेत इतक्या मोठ्या संख्येने सहभागी होऊन ती साजरी करणाया सगळ्याच सहाध्यायांचे आम्ही ऋणी आहोत. तसंच प्रकाशित गज़लांवर आवर्जून मतप्रदर्शन करणाया वाचकांचेही मनापासून आभार.

आमच्यासाठी गेला महिनाभर खूप आनंदात, एक प्रकारच्या भारलेल्या मनःस्थितीत गेला. आधी म्हटल्याप्रमाणे जर ते 'वेड' आम्ही तुम्हालाही लावू शकलो असू, तर तेच कार्यशाळेचं यश.

'उत्तम गज़ल लिहिता येणं' हे साध्य खरंच, पण ती लिहिताना आणि वाचतानाही तिचा सर्वांगीण आस्वाद घेता आला, तर तो प्रवास त्या मंज़िलइतकाच, नव्हे त्याहूनही सुंदर होतो. या आनंदयात्रेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कार्यशाळा, तुमचे अनंत उपकार आहेत माझ्यावर. साहित्य हा माझा अजिबात प्रांत नाही (मला वाचायला आवडते). अक्षरशः "ग म भ न ..." सारखे तुम्ही माझ्या कडून लिहून घेतले, समजावले त्यामुळे १ली फ मधे असल्या सारख्या गजल मी लिहू शकले. कशा का असेनात त्या, पण माझ्या (एका शून्या कडून) कडून ते करुन घेणे याचे पुर्ण श्रेय तुम्हालाच. तुम्ही किती सहन केले असेल मला !!!

एक वेगळाच आणि छान अनुभव होता हा.
धन्यवाद.

खुप छान लिहिलय..
खरे तर तुमचेच अथक प्रयत्न,, अन सहन शक्ती.. की आम्ही प्रयत्न तरी करु शकलो..
त्यामुळे तुमचे खुप खुप आभार Happy

कार्यशाळा,या उपक्रमाबद्दल तुमचे खरोखर आभार..... यातुन खूप काही शिकायला मिळाले आम्हाला.. गझलविषयी असलेली मनात एक अनामिक भिती जाऊन त्याची जागा उत्सुकतेने,उत्साहाने घेतली..
गझल लिहिताना खरोखर मेंदूचा आणि मनाचा कस लागतो त्याचा एक चांगला अनुभव इथे मिळाला..

अर्थात याचे श्रेय जाते ते कार्यशाळेच्या संयोजकांना ... गझलचे व्याकरण,तंत्र आणि मंत्र शिकवताना ते नवशिक्यांना कुठेही बोजड वाटणार नाहीत याची सर्वस्वी काळजी त्यांनी घेतली.. मनात येणार्‍या प्रत्येक शंकांना सोदाहरण उत्तरे देऊन त्यांचे निरसन केले.. गझल लिहुन झाल्यानंतरही त्या निर्दोष करण्यासाठी या लोकांनी दिवसरात्र अविरत मेहनत घेतली.. जेथे अडलो तेथे योग्य ती दिशा दिली.. आणि त्याचेच फलित म्हणजे आम्ही या गझल पूर्ण करू शकलो.. तेव्हा वैभवगुर्जी, मिल्या,स्वाती आणि नचिकेत या गुर्जी मंडळींचे शतशः आभार... Happy

मी एकही गजल लिहू शकलो नाही याची मला लज्जा वाटली. पण माझ्या मित्रांनी गजल लिहिली. ती मी वाचली. मग त्यातून मला भरपूर काही शिकायला मिळालं. आनंदही प्राप्त झाला. गुरुंसोबत माझे फारसे बोलणे झालेच नाही. कारण मी फक्त पहिल्याच शेरावर अडकत गेलो. तेथेतूनच मग माघार गेतली. असो. समारोप छान झाला आहे. गजलेला लावलेले निकष छान आहेत. पण तुमच्या गुणांचा तक्ता पहायला आवडला असता. जरी त्यामुळे वाद होतील ही शक्यता ओळखून, तरी बघावासा वाटतो आहे तो तक्ता. असो..

कार्यशाळेला हॅट्स ऑफ्फ..
म्हणजे "टोप्या गुल्ल." (टो. गु.)
खूप मजा आली गझल लिहिताना आणि वाचताना...

संयोजक ............ तुम्हा लोकांना साष्टांग दंडवत !
हे अगदी मनापासून आलंय. आता हा समारोपही इतका मस्त झालाय ना..... तुमच्या पेशन्सची मात्र कमाल आहे.....हे पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतंय. एखादी क्षुल्लक गोष्ट जमली नाही स्वतःला तरी चिडचिड होते. इथे इतक्या लोकांच्या असंख्य प्रश्नांना तुम्ही किती संयमानं उत्तरं दिलीत..... माननाईच पडेंगा Happy
पुन्हा एकदा कार्यशाळा घेतल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार.....!!

कार्यशाळेच्या संयोजकांचे खूप खूप आभार. एकाहून एक सरस गझला वाचायला, आस्वाद घ्यायला मिळाल्या.

आत्तापर्यंत गझल वाचायला प्रचंड आवडायचं पण लिहिणं 'कटकट' वाटायची. पहील्या कार्यशाळेत 'छे, हे काही आपल्याला जमायचं नाही' असा पळापुटा विचार करून स्वस्थ बसले. ह्यावेळी स्वाती (आंबोळे) ने स्वतः प्रोत्साहन दिलं आणि गझल 'पाडली'!!!! थँक्यु स्वाती!!!! आता मात्र सगळं समजून घेऊन, शांतपणे लिहीण्याइतपत धीर आलाय. सगळं श्रेय संयोजकांना!

..............
कुणा आवडे चकली, कुणा कानोल्यात सुख; दिवाळीच्या फराळाचा, माझ्या पोटोबाला धाक!!!! Proud

वाह! ये हुवी ना बात!

का.शा. तुमची परवानगी न घेता निकाल जाहिर झाल्यावर माझ्या गझलेवरील (प्रवेशिका क्र. ४८) प्रतिक्रीयांना थोडेसे स्पष्टीकरण दिले आहे. का आणि कसे हे त्या पोस्ट मधेच लिहीले आहे. तरिही तुमची हरकत नसावी असे गृहीत धरतो.

आभारी.

एक गोष्टीचा इथे अगदी उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही, कवितांना ती कोणाची हे बघून त्यांना प्रतिसाद येतात असा आरोप अनेकदा झालेला आहे. या कार्यशाळेच्या निमित्तानं हे सिद्ध झालं की चांगल्या रचनांना कवीचं नाव न बघताही प्रतिसाद येतातच.

पुन्हा एकदा का शा सं धन्यवाद.
आणि ही कल्पना ज्याची त्याला/तीला खास धन्यवाद.

कार्यशाळेत सहभागी न असलेल्या माझ्यासारख्या मायबोलीकरांनाही ह्या शाळेत सहभागी न होता भरपुर शिकायला व वाचायला मिळाले. संयोजक समितीचे आभार.

| | |

आभार कार्यशाळेचे आणि सर्व वाचकांचे.
प्रसाद आणि पुलस्ती दोघांचेही अभिनंदन.
सहज सोमवारी संध्याकाळी लॉगिन केलं आणि स्वत:चं नाव पाहिलं पहिल्या पानावर तेंव्हा अगदी शाळेतल्या स्पर्धांच्या निकालाचा फील आला.
त्यात जे आनंद आणि आश्चर्य यांचं मिश्रण असे अगदी तेच.
शिवाय स्पर्धांच्या आधी गुरुजनांचं मार्गदर्शनही अगदी त्याच तोलामोलाचं होतं.
त्यांच्या पेशन्स आणि हौसेची दाद द्यायला हवी.

संयोजक,
आपले मनःपुर्वक धन्यवाद...

मलाही गझलेची खूप भिती वाटायची (तशी ती अजूनही वाटतेचं :खीखी:)
पण या कार्यशाळेतून शिकल्याने ती नक्कीच कमी झालीयं...

गझल तंत्र / मंत्र याबद्दल लिहिलंत ते चांगलं केलंत. "गझल हे काव्यच नाही, केवळ वैयाकरणीय कसरत" हे एक मत तर "गझलेच्या नावाखाली या साध्या कविता काय पाडता" (म्हणजे गझल म्हणजेच यंव अन कविता/नज्म म्हणजे काहितरी खालच्या दर्जाची रचना) अशा प्रकारचं एक दुसरं मत! माणसांच्या स्वभावाची पण गम्मत असते Happy
मायबोलीवरच मी गझल-सदृश काहितरी लिहायचे प्रयत्न सुरू केले आणि पहिल्या कार्यशाळेनेच मला थोडेफार साक्षर केले.

कसलंही व्याकरण नसलेली साधी पण चांगली कविता लिहिणंही किती महाकठीण असतं आणि अगदी "लगालगागा" सारख्या क्लिष्ट वृत्तात आणि इतर करकचलेल्या व्याकरण-नियमातली एखादी गझलही किती सहजस्फूर्त निघू शकते... याचा मी स्वतः अनुभव घेतला आहे.

तेव्हा... मी हा वाद मनावर घेत नाही. शलाका, श्यामली किंवा जयुच्या कविताही अनुभवतो; आणि वैभव, चित्त, प्रदीप कुलकर्णी आणि अनंत ढवळेंच्या तरल, प्रासादिक अभिजात कलासौंदर्य असलेल्या गझलाही!

असो. पुन्हा एकदा - कार्यशाळा संयोजकांचे अभिनंदन आणि आभार.

खूप दिवसांनी कार्यशाळेला भेट दिली आणि बघते तर समारोपही झालेला! समारोपाचे विश्लेषण/ भाष्य सुंदरच. वॅयक्तिक द्रुष्ट्या पाहिले तर, मला या निमित्ताने चक्क चार गझल सुचल्या आणि केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे हे ही पटले. त्यावेळि आजची गझल कोणती, हे पाहायची आणि वाचायची उत्सुकताही अनुभवली. मजा आली.
संयोजकांचे आभार.
आणि अर्थातच पारितोष्क विजेत्यांचे अभिनंदन. सगळ्या चाकोरीत बसून आपल्या कल्पनातरूला मूर्त रूपात आणणे, हे खरेच जिकिरेचे काम. हार्दिक अभिनंदन.

मी कार्यशाळेत भाग घेतला नव्हता... पण सर्व गझला वाचल्या आणि खूप आनंद मिळवला.... इतक्या चांगल्या कल्पना सुचणार्‍यांबद्दल खरोखर हेवा वाटतो मला... त्यात हा समारोपाचा लेख सुध्दा सुंदर लिहिला आहे... परत एकदा वाटलं की इतकं चांगलं लिहायला सुचतं कसं काय तुम्हाला... Happy

एकंदरीत खूप मजा आली... विजेत्यांचे आणि कार्यशा़ळेचे अभिनंदन !

छान झाली कार्यशाळा. अतिशय सूत्रबद्ध तितकीच मोकळीक. खरच खूप मजा आली. तुम्हाला गेले महिनाभर स्वतःचे व्याप सांभाळून सगळ्यांना गझलेत पुढे नेण्यात किती ताण पडला असेल ह्याची कल्पना येतेय. असेच उत्तमोत्तम कार्य घडत राहो ह्या शुभेच्छा..