पंधराशे हॅरिसन- हाफ बेक्ड

Submitted by Barcelona on 11 March, 2013 - 21:41

(पंधराशे हॅरिसन बुलेव्हार्ड - उत्तर अमेरिकेत कुठेही सापडेल असा एक पत्ता. तिथे राहणाऱ्या एका भारतीय कुटुंबाच्या गोष्टींची ही साखळी.)

हाफ- बेक्ड

फुल्ल प्रोफेसर झाले ती नेमकी नीना हायस्कूलमध्ये जाणार त्याच वर्षी. अम्मा जर आल्या तर सगळ निभेल …अम्मा राघवनची आई, माझी सासू . लग्न केल तेव्हा अम्माना बघून माझ्या सगळ्या काकूंना अगदी आनंद झाला. काकू नंबर एक म्हणाली - “आपली आरती अशी तोंडाळ आहे न. सासूच्या डोक्यावर मिरे वाटले असते. बऱ्या भेटल्या अम्मा तिला”. काकू नंबर दोन - “अग सासू कसली अगदी कैदाशीण.” आणि नेमक्या तिथे अम्मा आल्या. लहान काकूने लगेच “मराठीत कैदाशीण म्हणजे कैदी सुधारणारी, किरण बेदीच समजा न” असे काहीच्या काही थातूर मातुर सांगून वेळ मारली. अम्मांचे मराठी तेव्हा मोडके तोडके त्यामुळे त्याही फार भानगड वाढवण्याच्या प्रकारात पडल्या नाही. पण त्यांचे कैदाशीण हे टोपण नाव मात्र उगीचच कायमचे झाले. अम्मा आणि मी कधी १०-१५ दिवसांच्या वर एकत्र राहिलो नाही, त्याही कधी जास्त इकडे आल्या नाहीत. माझे काही फार कधी वाद झाले नाहीत, उलट त्यांच्या सडेतोड स्वभावामुळे आम्ही दोघी आमच्या आमच्या जगात सुखी होतो. हल्ली हल्ली स्काईप मुळे आम्ही गप्पा मारत होतो. नाही पूर्वी तर १० सेंट प्रती मिनिट ह्या दराने कोण बरे सासूशी गप्पा टाकेल?

काल अम्माना मी नीनाच्या, म्हणजे माझ्या मुलीच्या, आफ्टर स्कूलची परिस्थिती, नीनाच्या इंजीनियेरींगच्या महत्त्वाकांक्षा आणि माझी नवी प्रोफेसर post सार सांगितलं. आलात तर मला जरा बर पडेल अशी विनंती केली. त्या म्हणाल्या “आरती , दोन महिने येईन मी. पण माझी जवाबदारी फक्त आफ्टर स्कूल सारखी थोडावेळ. शाळेतून रिटायर झाल्यावर मला साड्यांचे बुटिक काढायचय. अप्पा म्हणतायत काय गरज आहे. इथे रोज अप्पांशी त्यावरून वाद घालण्यापेक्षा मी जरा दिवस तिथे येते.” छ्या, अम्मांची अम्मा कायम त्यांना पंजाबी ड्रेस वापरते म्हणून नावे ठेवत, आणि आता ह्यांना साड्यांचे बुटिक... ह्या हल्लीच्या सास्वांचा ना काही कळतच नाही !!! मी रा्गाने माहेरी गेले तर ह्यांनी मला समजवायचं, तर ह्याच बॅग भरून माझ्याकडे येतायत, काय हे??!! मी राघवन ला सांगितले. मग ऑफिस मधून येताना राघवन छोटा डॉर्म फ्रीज घेऊन आला - “अग, मुलांचा अंडी-ट्युना असलेला फ्रीज कसा चालेल अम्माला”. खरच की! पंजाबड्रेसी घालणे हा एक नुसता बाह्य देखावा होता, आतून अम्मा तशा त्यांच्या अम्माच्याच काळातल्या. मी गुपचूप नवे झारे - चमचे काढले. एकूणात माझा “कीपिंग अप विथ कैदाशीण” चा सिझन वन सुरु झाला होता. अम्मा आल्या त्याचमुळी २८ किलो मसाले आणि काहीबाही पुस्तके घेऊन. फक्त एक कपड्याची बॅग. “लागले कपडे तर घेऊ इकडे नवीन. कॉलेज मध्ये असल्यापासून राघवन नाही हं कंटाळा करीत नेण्याचा. पण मसाले नको कमी व्हायला. ” त्या म्हणाल्या. काय बोलणार? मी गुपचूप पुढच्या शनिवारी झूम्बा नाही जमणार म्हणून मेलिसाला टेक्सट केला. अम्मा मास- मच्छीचा त्या मायक्रोवेवला वास येतो म्हणत. कधी मायक्रोवेव किंवा ओवन ही वापरत नसत. पण बाहेर कुठे गेलो की त्यांना पर्शियन जेवण मात्र आवडत असे - शिरीन पोलो. तिथे असणाऱ्या लेन्टील सूप वरही फिदा असत. डावा - उजवा हात लागलेला बर चालत तिथे. माणूस विसंगतीने भरलेला असतो हेच खरे.

पण काही म्हणा अम्मांच्या नुसत्या असण्याने मला तशी बरीच मोकळीक मिळत होती. माझा पेपर मँचेस्टर कॉन्फेरेंस साठी निवडला गेला. मी अगदी खुशीत!! मी ज्या आठवड्यात जाणार त्याच वेळी नीनाच्या शाळेत बेक सेल घोषित झाला. अनाथ मुले किंवा अशाच काही कारणासाठी फंड रेजर म्हणून मुले आणि आया एकत्र येऊन बेक्ड पदार्थ विकत. नाही म्हणायला दोन बाबा असलेल एक कुटुंब मागच्या वर्षी वेड्यावाकड्या ‘ड्रॉप कुकीज' घेऊन आले होते. मी केलेली नानकटाई सगळ्यांना आवडली होती. एक तुकडाही घरी नाही आला परत. पण ह्यावेळी नाही मला जमणार. हायस्कूल मध्ये गेल्यापासून नीनाला ही शिंग फुटली आहेत. बेक सेल मध्ये भाग घ्यायचाच म्हणून हट्ट करते. कम्यूनिटी सर्विस करून लोक राष्ट्रपती होतात हा समज हल्ली फार बळावलाय. तिला बेकिंग अजून जमत नाही. तिला समजवायला मी नाही पुरी पडणार, तिच्या बाबालाच करू दे ते. पण उलट राघवन मला म्हणाला तू निवांत जा, मी आणि अम्मा काय ते बघतो. अम्मा काय बघणार? हल्ली त्यांना नवीनच कॉम्पुटरचा खूळ चढलय. लायब्ररीत पुस्तके काय आणलीये, नीना बरोबर काय फेसबूक शिकण चालू आहे . पण जबाबदारी आफ्टर स्कूल इतकीच हे एकदा ठरलेल असल्याने मी त्यांच्या त्या कॉम्पुटर प्रेमाकडे दुर्लक्ष करीत असे. एकूण त्या काही बेकिंगच बघतील हे शक्य नाही आणि अगदी जरी त्यांना वेळ असला तरी विगन कुकी कोण बनवणार त्या ओवन मध्ये? आणि दोन बाबा येणाऱ्या शाळेत कोण घेऊन जाणार ?? राघवन चा अम्मावर नको इतका विश्वास. छे, मी काकूलाच बोलवायला हवे होते. नको इतका गिल्टी वाटतय मला जाताना!

आज नीनाचा बेक सेल झाला असेल. घरी जाऊन तिचा हिरमुसला चेहरा बघणं नको वाटतय. अचानक हॉलिडे साठी सज्ज मँचेस्टर, माझ्या पेपरला मिळालेले प्रोत्साहन, नवीन कोलाब्रेशनची आश्वासने हे सगळे मँचेस्टरचे अनुभव मला फोल वाटू लागले. मी एयर पोर्ट पार्किंग मधेच राघवन ला विचारले “कायरे बरी आहे का ती, का घरी जाऊन …?” राघवन म्हणाला “अग अम्मानी सांभाळल सगळ.” मी उद्गारले “म्हणजे त्यांनी बेकिंग केल का काय?” “नाही ग, अम्मा ने तिला ‘एप्रन इन बॉटल’ करून दिले. म्हणजे एका जार मध्ये एप्रन आणि त्याबरोबर एक रेसिपी कार्ड, असा किट विकलं. खूप आवडल सगळ्यांना. बघ बघ माझ्या फोन मध्ये फोटो आहेत.” मी आश्चर्याने फोटो बघत राहिले. जुन्या वळणाचा फूल लेन्थ एप्रन. नंतरचे फ्रीलचा एप्रन. नंतर पिनाफोर्क सारखा एप्रन. अम्मा आणि नीना साठी खास कशिदा केलेले एथनिक एप्रन. नीनाचा हसरा चेहरा आणि अम्मांचे समाधान ह्यात राघवन चे फोटोशॉप कौशल्य नव्हते. चांगला सेल झाला म्हणून खुललेली नीना आल्या आल्या मला बिलगली. मी नंतर गरम एपल सायडर घेऊन अम्माच्या रूममध्ये गेले. “अम्मा, थँक यु , कस काय सुचल तुम्हाला हे?” अम्मा हसल्या आणि म्हणाल्या “अग, नीना म्हणे की कुकीज आणि दुध सांताक्लोजला नैवेद्य म्हणून ठेवतात. त्या बनवण्यात काही चूक नाही. मग मीही विचारले की नैवेद्य असेल तर ह्यांचे सोवळे नेसणे ही काही असेलच की. तर ती एप्रन म्हणाली. जगात माणूस सगळीकडे सारखाच असतो ग, गरज आहे ते फक्त ‘तुमचं’ आणि ‘आमचं’ ह्यातला सुवर्णमध्य गाठण्याची. मग आम्ही ते एप्रन बनवले, झालं. माझाही जीव रमला बघ ते करण्यात. विचार करतीये की आता हा जर फेसबूक शिकले तर साड्यांपेक्षा ऑन लाईन हे एप्रनच विकेन. अप्पांच्या ‘काय गरज आहे?’ला ‘कित्ती गरज आहे!’ हे मला आता नक्की सांगता येईल.”... मी हतबुद्ध होऊन बघत राहिले. उगीच नाही अम्मांची अम्मा त्यांना नावे ठेवायची. पण मी मात्र आता आमच्या “कीपिंग अप विथ कैदाशीण” सिझन २ ची आतुरतेने वाट बघतीये.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages