खास महिला दिनानिमित्त नेस्ले कंपनी घेऊन येत आहे, त्यांचे ब्रँड न्यू अनुभव 'सिल्की मिल्की'.
आजकालच्या स्पर्धेच्या युगात स्त्रियांना नोकरी मिळवण्यासाठी पुरुषांशी स्पर्धा करावी लागत आहे. कामाचा वेळ अधिकाधिक देता यावा म्हणून स्त्रियांना फक्त आपली कामासंदर्भात असणारी स्किल्स वाढवून चालत नाही. किती वेळ पोर्सलिनच्या सिंहासनावर घालवला हे जिथे मोजतात तिथे पुरुषाच्या दाढी करण्याच्या रेकॉर्ड कमी वेळेला टक्कर देत झटपट सॅनिटरी नॅपकिनही बदलावा लागतो. या जीवघेण्या स्पर्धेतून कोणीच सुटू शकत नाही. ज्यांना उन्नती करायची आहे, पैसा कमावायचा आहे, स्वतःचं नाव कमावायचं आहे त्यांना या स्पर्धेला तोंड द्यावंच लागतं. पण त्याचा परिणाम सर्वात जास्त कोणावर होतो माहित आहे? त्याचा परिणाम होतो तुमच्या तान्हुल्या मुलांवर, तुमच्यासारख्या नवमाता आणि नवपित्यांवर.
आजच्या या काटाकाटीच्या युगात तुमच्या व्यक्तिगत कॅलेंडरमधे लाँग वीकेण्डच्या नऊ महिने आधी अलार्म वाजतो, बरोब्बर लाँग वीकेण्डलाच तुम्हाला मॅटर्निटी वॉर्डात डॉक्टर मोकळे करू शकतात, पण या तान्हुल्यांचा जोपासनेचं काय? पैसे मोजून तुम्ही दिवसभर तुमच्या बाळाची नीट काळजी घेणारं डे-केअर शोधू शकता. ते नको असेल तर पर्सनल स्पेसमधे थोडी अडचण सोसून बाळाच्या आजी-आजोबांची नातवंडं खेळवण्याची हौस भागवत, थोडे पैसेही वाचवत बाळाची जबाबदारी त्यांच्यावर सोडू शकता. आईच्या शारीरिक गरजेसाठी ब्रेस्ट पंप आजकाल डोहाळजेवणातच गिफ्ट म्हणून येतात. नवमातेच्या भावनिक गरजेसाठी दिवसभर मोबाईलवर 'निंबोणीच्या झाडामागे' ऐकता येतं. पण तुमच्या बाळाच्या गरजेचं काय? नवपित्यांसाठी 'दमलेल्या बापाची कहाणी'सुद्धा उपलब्ध आहे. पण तुम्हा नवपित्यांच्या भावनिक आणि नवमूल्याधारित गरजांचंही काय करायचं?
उत्क्रांतीने फक्त स्त्रियांनाच तान्हुल्यांना दूध पाजण्यासाठी योग्य बनवलं आहे. निसर्ग क्रूर आहे. निसर्गाला आजच्या काटाकाटीच्या युगाची काहीही कल्पना नाही. बाळाचं रडं ऐकून शेवटी आईलाच पान्हा फुटतो. मग ऑफिसात पगारवाढीसाठी आवश्यक असणार्या रिपोर्टचं तिने काय करायचं? पुढच्या नोकरीच्या मुलाखतीआधी अत्यावश्यक झालेल्या पार्लरभेटीचं काय? आणि बेडौल शरीराने आजच्या फॅशनच्या जमान्यात प्रमोशनची गॅरेंटी कशी घ्यायची? बाटलीने दूध पाजल्यामुळे मूल आळशी बनतं, बाटलीतलं दूध अधिक पिऊन एकेकाळच्या बालकावीळीप्रमाणेच आता बाललठ्ठपणा ही समस्या राक्षस बनू पहाते आहे त्याचं काय? त्यापेक्षाही स्त्री-पुरुष समतेसाठी आसुसलेल्या आणि तरीही तान्हुल्यांना पाहून पान्हा न फुटल्यामुळे काळीज तीळ तीळ तुटणार्या पित्यांचं काय?
या सगळ्यांच्या आनंदासाठी नेस्ले घेऊन येत आहे एक आधुनिक तरीही प्रेमळ अनुभव 'सिल्की मिल्की'. आम्ही फक्त दूध विकत नाही, आम्ही आईची ममता बाळांना पुरवतो आणि नवपित्यांना समानतेची वेगळीच अनुभूती देतो. या महिला दिनाला सादर करत आहोत, लाईफसाईझ आकाराची अत्याधुनिक दूधमाता 'सिल्की मिल्की'. मिल्की तुमच्या बाळाला योग्य वेळी दूध पाजेल. यात आहे मायक्रो-सेल्युलो-ऑरगॅनिक मटेरियल, जे मातेच्या स्तनांची पुरेपूर नक्कल करतं. बाळाला पत्ताही लागत नाही की आपण फॉर्म्युल्याचं दूध पितो आहोत. मिल्की वापरणार्या बाळाला मातेचं दूध मिळवण्यासाठी जसे कष्ट करावे लागतात तसेच कष्ट करून दूध ओढून घ्यावं लागतं. ज्यामुळे बाळाच्या चेहेर्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो, त्यामुळे बाळ आवश्यक तेवढंच दूध पितं. त्याशिवाय या प्रक्रियेत तोंडाचे स्नायू दमल्यामुळे बाळाचं रडणंही कमी होतं. यातले इन्फ्रारेड तापमापक सेन्सर्स बाळाच्या आईच्या शरीराचा संपूर्ण स्कॅन बनवतात आणि त्याप्रमाणे मिल्कीच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारची ऊब निर्माण होते. या मिल्कीच्या धडाच्या भागात आम्ही वेगवेगळे अठरा सेन्सर्स बसवले आहेत. नऊ महिने बाळ तुमच्या पोटात असतं, आम्ही अठरा सेन्सर्स लावून निसर्गाच्या दुप्पट वेगाने पुढे आहोत. जेणेकरून तुम्ही नवमाता आपल्या करियरमधेही दुप्पट वेगाने प्रगती करू शकता. तुमच्या उन्नतीवर जळणार्यांना आता जळू देत. कारण तुमच्या मुलांसाठी अधिक पैसे कमावताना त्यांच्या सुखासाठी काहीही तडजोड करण्याची तुम्हाला काही आवश्यकताच नाही. तुमच्या मुलाला मोठं होताना तुम्ही रोज संध्याकाळी पाहू शकत; बाळाला रोज स्वतःच्या कुशीत झोपवू शकता. पण एकदा करियरसाठी महत्त्वाची वर्ष गेली तर तुमचं करियर कायमचं बरबाद होऊ शकतं. याची काळजी आहे तुम्हाला आणि तुमची काळजी आहे फक्त आम्हालाच!
मिल्की फक्त दूध पाजण्यासाठीच उपलब्ध आहे असं नाही. नेस्लेच्या खास फॉर्म्युल्यात मिल्की विशेष बदलही करू शकते. सिल्की मिल्कीच्या हातांमधे खास अर्भकांसाठी बनवलेले इलेक्ट्रोड्स आहेत ज्यातून बाळाचं वजन आणि शरीरातले स्नायू, हाडं आणि मेद याचं प्रमाणही मोजता येतं. एखाद्या तान्हुल्याच्या स्नायूंची वाढ जलद गतीने होत नसेल तर त्यात बाललठ्ठपणा वाढू शकतो. तुमची मम्मी जशी तुमच्या वाढत्या पोटाकडे लक्ष ठेवून असते, तशीच ही अत्याधुनिक दूधमाता, मिल्कीही तुमच्या तान्हुल्याच्या संपूर्ण देखरेखेची काळजी घेईल. सिल्की मिल्कीवर आम्ही काही प्रयोग केले. त्यातून असं दिसलं की आईचं दूध बाटलीने किंवा चमच्याने पिणार्या बालकांपेक्षा मिल्कीच्या दूधमुलांमधला लठ्ठपणा साडेएकवीस टक्क्यांपर्यंत कमी होतो. त्याशिवाय या मुलांच्या उंचीत आणि मेंदूच्या वाढीतही सुधारणा दिसून येते आहे. मिल्कीचं दूध पिणारी मुलं सर्वसाधारण मुलांच्या तुलनेत तीन तास आधी रांगायला सुरूवात करतात असं एका प्रायोगिक निरीक्षणात दिसून आलेलं आहे.
'ज्युनियर'मधे आर्नोल्ड गर्भार असू शकतो, 'मीट द पेरेंट्स'मधे रॉबर्ट डीनिरो पोराला पाजतो. पण हे आत्तापर्यंत फक्त चित्रपटांमधेच होतं. कवीकल्पना होती. आता मात्र प्रत्यक्षातल्या नवपित्यांनाही आपल्या मुलाला पाजता येणार आहे. क्रूर निसर्गाच्या दुष्टपणाला आता ठेंगा दाखवण्याची वेळ आलेली आहे. ममतेने ओथंबलेल्या पित्यांनाही पान्हा फुटत नाही हे खरं असलं तरी मिल्कीचं तंत्रज्ञान पुरुषांमधल्या या उणीवेवरही मात करू शकतं हे आम्ही सिद्ध करून दाखवत आहोत. यापुढे "दूध का कर्ज"चे संवाद फक्त निरूपा रॉयपुरते मर्यादित रहाणार नाहीत. आता अविनाश नारकरही आपल्या बछड्याला "दूध का कर्ज"ची आठवण करून देऊन कर्तव्यच्युत होण्यापासून वाचवू शकतील. यापुढच्या चित्रपटांमधे कोणा ईशाला तिची धाकटी बहीण निशा "मेरे पास पापा है।" असं वरकरणी तिखट पण मनोमन भावनांनी ओथंबलेलं उत्तर देऊ शकेल. कारण प्रत्यक्षातली मम्मी जरी मॉड्यूलर रूपात नसली तरीही दूधमाता मिल्की आम्ही मॉड्यूलर स्वरूपात बनवलेली आहे. नवपित्याला बाळाला पाजण्याची इच्छा निर्माण झाली तर त्याला मिल्कीचे स्तन काढता येतील. ते आपल्या शरीरावर चढवले की नवपितेही आपल्या तान्हुल्यांना पाजू शकतील. बाळाला जोजवण्यासाठी आता बाळाच्या मम्मीची पुरुषांना काहीही आवश्यकता रहाणार नाही. आता तुमच्या पत्नी किंवा मैत्रिणीला ऑफिसातून, पार्लरमधून, जिममधून परत येण्यासाठी उशीर होत असेल तरीही बाळाला उपाशी रहाण्याची, आईची वाट बघत रडत रहाण्याची गरज नाही. आता तान्हुले आपल्या वेळेला झोपू शकतील, आपल्या इच्छेप्रमाणे भूक भागवू शकतील. अभिव्यक्तीस्वातंत्र्याची ओळख तुमच्या तान्हुल्यांना दूधपित्या वयापासून व्हावी यासाठी नेस्ले अविरत कष्टरत आहे.
तंत्रज्ञानाचा हा नवा चमत्कार आता शक्य झाला आहे. स्त्री-पुरुष समतेसाठी आसुसलेल्या सर्व स्त्री-पुरुषांनो, खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, सिल्की मिल्की. खास महिला दिनानिमित्त इंट्रोडक्टरी ऑफर म्हणून मिल्कीबरोबर मिळेल समाधानाच्या हॉर्मोनचा एका महिन्याचा साठा. रोज सकाळी एक गोळी घ्या आणि दिवसभर स्तनपानातून मिळणार्या भावनिक तृप्तीचा आनंद घ्या. ही गोळी स्त्री आणि पुरुषांसाठीही सुरक्षित आहे. (ही गोळी गर्भनिरोधक नाही.)
आजच्या मांजापेक्षा अधिक काटाकाटीच्या युगात कौटुंबिक मूल्य टिकवून ठेवणारी सिल्की मिल्कीच आहे तुमच्या संपूर्ण कुटुंबाची नवीन मैत्रीण. हॅपी विमेन्ज डे.
(अन्यत्र पूर्वप्रकाशित)
लेख आवडला नाही. पण शैली
लेख आवडला नाही.
पण शैली आवडली.
पु ले शु.