॥ "श्रीराम" ॥
श्रवणभक्ती -सध्यस्थिती
दासबोधात रामदास स्वामींनी नवाविधाभक्ती सामान्य मनुष्यास कळेल अशी सांगितली आहे.
समर्थांना काय अपेक्षित होते व आज आपल्याला समाजात आज बहुतांशी काय दिसते याची तुलना करण्याचा हा प्रयत्न आहे
प्रथम भजन ऐसें जाण| हरिकथापुराणश्रवण |
नाना अध्यात्मनिरूपण| ऐकत जावें ||७||
पटकन आठवते का बघा की आपण शेवटचे संपूर्ण भजन कधी ऐकले! एकतर आमची पिढी हल्ली देवळात जातच नाही . जातच असेल तर देवळा समोरील गर्दीत जाते अथवा देवळातील गर्दीत जाते. बहुतांशी सगळीकडे जोरात ध्वनिवर्धक (कर्णकर्कश) चालू असतात , अनेक मोबाईल वाजत असतात . श्रवण करण्यासाठी आवश्यक ती शांतता वातावरणात नसतेच मुळी.
एखादे शांत देऊळ मिळाले तर तिथे सुंदर भजन मिळत नाही , कारण बऱ्याचदा ते निर्मनुष्य असते , जीर्णावस्थेत असते.
प्रत्येक घरात भजनांची CD असते , पण ती ऐकायची कधी हा गहन प्रश्न असतो. सकाळी लवकर उठणे हे ओल्ड fashion झाले आहे . 'प्रभात समय ' बहुदा लोप पावला आहे .
मुलांचे अभ्यास , दूरदर्शनवरील अनेक मालिका , चोवीस तास चालणारे अनेक चेनल , प्रत्येक व्यक्ती कडे असणारा मोबाईल , कामाची धावपळ / दगदग यात सवड मिळते कधी?
पूर्वी निदान म्हातारी माणसे तरी या गोष्टी करत , आता आपण म्हातारे आहोत हे मान्य करायलाच लोक तयार नाहीत!
कित्येकदा तरुण पिढी प्रमाणेच सतत मौज करण्याकडेच जेष्ठ लोकांचा कल असतो.
कर्ममार्ग उपासनामार्ग| ज्ञानमार्ग सिद्धांतमार्ग |
योगमार्ग वैराग्यमार्ग| ऐकत जावे ||८||
सकाळी मला फारतर अर्धा तास मिळतो … हे वाक्य बहुतेक प्रत्येक घरात ऐकू येते. प्रत्येक जण बिझी झाला आहे. त्या अर्ध्या -एक तासात काही चांगले ऐकले तर तो दिवस चांगला जाईल , जातोही … पण रोज तेच - तेच कोण ऐकणार ?
नाना व्रतांचे महिमे| नाना तीर्थांचे महिमे |
नाना दानांचे महिमे| ऐकत जावे ||९||
व्रते आपण का पाळली पाहिजेत हे खर तर आम्हाला कोणी नीट समजावून सांगतच नाही. भीती , रुढी, परंपरा यांचा आपल्यावर इतका पगडा असतो की आपल्याला जी अनेक व्रते सांगितली आहेत त्यातील अनेक, लोकांना भंपक वाटतात . कालानुरूप या व्रतांमध्ये कोणते बदल केले पाहिजेत या वर चर्चा होतच नाही.
वाढती लोकसंख्या व त्या मुळे निर्माण झालेली प्रचंड श्रीमंती अथवा गरिबी यांमुळे अनेक तीर्थक्षेत्रांचे वातावरण बिघडून गेले आहे.
दान करणारे लोक वाढत आहेत पण त्या मागील अर्थकारण , राजकारण , स्वार्थ थक्क करणारा आहे. तसेच अनेक दानशूर व्यक्तींचे एरवी समाजातील वर्तन भयंकर असते . पाप पुण्याची चाड तिथे दिसत नाही .
दुग्धाहारी निराहारी| फळाहारी पर्णाहारी |
तृणाहारी नानाहारी| कैसे ते ऐकावे ||११||
बहुदा या पैकी कोणतीच व्यक्ती या पिढी ला ठाऊक नाही , त्यामुळे अशा लोकांचे विचार आमच्या पर्यंत पोचण्याची शक्यता जवळपास नाहीच !
जपी तपी तामस योगी| नाना निग्रह हटयोगी |
शाक्तआगम आघोरयोगी| कैसे ते ऐकावे ||१३||
जप करणारे अनेक लोक असतात हि चांगली गोष्ट आहे. जप करत असताना क्रोध,मोह व मनातील इतर अनेक चांगली वाईट विचार बंद करू शकणारे जे असतील ते खरच भाग्यवान !इतर सर्व फक्त मोजणी करतात … जपापुर्वी अथवा नंतर निर्मळ वर्तन असणारे तर दुर्लभ आहेत.
इतर लोक शहरातील लोकांना माहितीच नसतात.
नाना मुद्रा नाना आसनें| नाना देखणीं लक्षस्थानें |
पिंडज्ञानें तत्वज्ञानें| कैसीं तें ऐकावीं ||१४||
यातील बऱ्याच गोष्टी परदेशी व्यक्ती,परभाषा यात सांगितलेल्या असतील तर लवकर पटतात. आपले कुणी काही सांगितले की ते बुरसटलेले वाटते .
नाना पिंडांची रचना| नाना भूगोळरचना |
नाना सृष्टीची रचना| कैसी ते ऐकावी ||१५||
चंद्र सूर्य तारामंडळें| ग्रहमंडळें मेघमंडळें |
येकवीस स्वर्गें सप्त पाताळें| कैसीं ते ऐकावीं ||१६||
इंग्रजी चा प्रभाव भरपूर आहे. त्या मुळे ज्यांना ती भाषा उत्तम येते ते आधुनिक विज्ञान भरपूर वाचतात, ऐकतात , बघतात.
मराठी व संस्कृत मधे या विषयी असलेली माहिती मुठभर लोकांकडे असते , इतर सर्व या वाटेला जात नाहीत
ब्रह्माविष्णुमहेशस्थानें| इन्द्रदेवऋषीस्थानें |
वायोवरुणकुबेरस्थानें| कैसीं ते ऐकावीं ||१७.
नव खंडे चौदा भुवनें| अष्ट दिग्पाळांची स्थानें |
नाना वनें उपवनें गहनें| कैसीं ते ऐकावीं ||१८||
मी देव मानीत नाही हे सांगण्याची अहमहमिका चालू असते , दुर्दैवाने सामाजिक नितिमुल्य इतक्या झपाट्याने रसातळाला जात आहेत कि देव आहे हे मानणे दिवसेंदिवस अवघड होत आहे
गण गंधर्व विद्याधर| येक्ष किन्नर नारद तुंबर |
अष्ट नायका संगीतविचार| कैसा तो ऐकावा ||१९||
tv , सिनेमा यात मिळणारे संगीत , नृत्य काही +ve करत असतील असे वाटत नाही !!!
मंत्र मोहरे तोटके सिद्धी| नाना वल्ली नाना औषधी |
धातु रसायण बुद्धी| नाडिज्ञानें ऐकावीं ||२२||
कोण्या दोषें कोण रोग| कोणा रोगास कोण प्रयोग |
कोण्या प्रयोगास कोण योग| साधे तो ऐकावा ||२३||
मी वैद्यक शास्त्रातील नाही त्यामुळे तिथे काय घडत आहे ते माहित नाही, पण अनेक मासिके , कार्यक्रम यातून अर्धवट माहिती असलेले अनेक जण भोवताली दिसतात व माझा असा कयास आहे कि त्याचे दुष्परिणाम जास्त असतील.
वेद शास्त्रें आणी पुराणें| माहावाक्याचीं विवरणें |
तनुशतुष्टयनिर्शनें| कैसीं ते ऐकावीं ||२८||
संस्कृत येत नाही त्यामुळे आपल्या पूर्वजांना आपल्याला काय सांगायचे होते ते आपण वाचू शकत नाही. क्वचित प्रसंगी ते ऐकायला मिळते तेंव्हा आनंद होतो. पण सखोल अभ्यास मात्र आम्ही करू शकत नाही
जयंत्या उपोषणें नाना साधनें| मंत्र यंत्र जप ध्यानें |
कीर्ति स्तुती स्तवनें भजनें| नानाविधें ऐकावीं ||३२||
थोर लोकांची जयंती , पुण्यतिथी साजरी करावी हे नव्या पिढीला मान्य नाही! आपला त्याच्याशी काय संबंध असेच उदगार ऐकू येतात .
साजरी करायची झाल्यास कोणी व कशी करायची यात मतभेद !
जय जय रघुवीर
जय जय रघुवीर समर्थ.............
जय सदगुरू.