“एक अनोखी भेट"
मी भारतात असतांना खूप वेळा पुलंच्या गोष्टी ऐकत असे. आणि म्हणूनच कि काय कोण जाणे मला आलेले अनुभव जणू मला पुलंच्या गोष्टींमध्ये घेऊन गेले. त्यातली एक म्हणजे शत्रुपक्ष हि माझी आवडती कथा. परदेशी आल्यानंतर प्रथमच आज माझी मराठी भाषिकांशी भेट झाली. पु.लंच्या गोष्टीतील काही शत्रूपक्ष आपण सर्वांनी खूप ऐकले असतील हो ना? त्यापैकी मला जाणवलेला एक, म्हणजे पाठीस लागून तुम्हाला गप्प न बसू देता उद्योगाला लावणार वर्ग. जास्त पैसे कसे कमवाल याचे मार्गदर्शनच म्हणा ना, ते करणारा सज्जनवर्ग. आता मला सांगा कि प्रत्येक सुज्ञ मनुष्य ते जाणतोच कि नाही हे?
हि काय सांगण्यासारखी गोष्ट आहे का...?
पण असते ऐखाद्याची चांगली सवय...नाही का? पण हि मंडळी पुढे आणखी काय काय करतात ते पहा म्हणजे तुम्हाला हि कळेल कि किती चिकाटी असते ती त्यांच्याकडे.
जे जे आपणासी ठावे ते ते इतरा शिकवावे
शहाणे करोनी सोडावे सकलजन
ह्या उक्तीने पछाडलेले काय म्हणव ते कळतच नाही. अशा लोकांच्या तावडीत आम्हीच बर एखाद भक्ष्य मिळव तस त्यांच्या जवळ पोहचतो. एके दिवशी काही सामान खरेदीसाठी आम्ही मोल मध्ये गेलो होतो. तेव्हा आमचा संवाद मराठीतच चालू होता. हे पाहताच जस भक्ष्याचा वास यावा तस एक जोडप आमच्या संवादाच्या दिशेने येऊ लागल. प्रथम ते आले तेव्हा हाय-हैलो झाल आणि नंतर त्यांनी अधिक माहितीसाठी
“मी विवेक हि चित्रा अशी अधिक माहिती पुरवली”. मला थोडावेळ काही कळेच ना...कि हि दोघ आमच्याजवळ सुद्धा मराठी ऑझी अक्सेंट मध्ये का बर बोलत असतील. त्यांचा पेहराव आणि त्यांचा थाट पाहून ती दोघांही खूप काळापासून परदेशीच राहत असावेत अस एकंदर त्याच्या वागण्यामुळे वाटल.
विवेक सी.ए. आहे आणि चित्रा हि एका कंपनीची एक्झीक्युटीव्ह मैनेजर. एकंदर काय वेल-सेटल्ड.
घरी आल्यावर मला वाटल चांगल झाल नाही का अहो? प्रदेशात आज माझी पहिलीच मराठी लोकांशी ओळख झाली होती. बहुतेक म्हणूनच मला खूप बर वाटल असेल..काय,
“कशी वाटली नवी ओळख”? माझे मिस्टर म्हणाले हममम चांगली वाटली. कारण मराठी माणस इथे भेटण अशक्यच वाटत असताना आज अचानक मराठी ओळख होण थोड सुखद धक्का देवून गेल.
आम्ही घरी पोहचल्यावर थोडावेळ होतो न होतो तोच माझा फोन वाजला. पहाते तर काय? चित्राचा म्हणजे मी नुकतच सांगितलं नाही का? ती मोल मध्ये भेटलेली ती. तिचा मेसेज आला. मी जरा साशंक मनानेच फोन हाती घेतला. आत्ता का बर केला असेल तिने मेसेज? त्यात लिहील होत.
“नाईस मिटिंग विथ यु ... सी यु सून...गुड नाईट...आणि त्याखाली चित्रा आणि विवेक”
वा किती छान बघा न अहो ती आता भेटलेली चित्रा तिचा मेसेज आला आहे अस मी ओरडूनच ह्यांना सांगितलं. आणि अशी थोडीफार चर्चा होऊन आम्ही झोपी गेलो.
एक चार पाच दिवसातच पुन्हा त्या चित्राचा फोन आला. आत्ता मात्र मागच्या सारख आश्चर्य नाही वाटल कारण विकेंड जवळ होता त्यामुळे इथ एकमेकांना भेटायला विक डेज मध्ये वेळ मिळत नाही, म्हणून बहुधा भेटण्याचा प्ल्यान असेल. हा कशी आहेस ग? काय म्हणतेस? अस विचारताच ती म्हणाली मी बरी आहे. अगं तुम्ही या विक्नेन्डला घरी आहात का? नाही ग आम्हा ऑफिसवाल्यांच गेट-टुगेदर आहे. बाहेर जाणार आहोत दोघही. का ग काही काम होत का? नाही म्हणजे झाल तर थोड्या गप्पा मारता येतील आणि भेटून हि होईल म्हणंत होते. वेळ असेल तर याच विकेंडला आपण भेटू. मग विक डेज सारेच बिझी असता का तुम्ही? हो तस थोडं कामात व्यस्तच असतो सध्या. ऑफिसात कामाचा खूप व्याप वाढलेला आहे... पण भेटू कि पुन्हा केव्हा तरी... मग पुढच्या विकेंडला काय करताय? अं अं मी विचारच करत राहिले कारण ह्या प्रश्नाची अपेक्षाच नव्हती. मी चित्राला म्हंटल तसा पुढच्या वीकेंडचा अजून आमचा काही प्लान अस्साल्याचे मला आठवत नाही, पण चालेल मग मी तू वेळ असेल तर सांगेन बर. ती म्हणाली म्हणजे मी माझ्या डायरीत मी नोंद करून ठेवते. ओके चल बाय. अस म्हणून फोन झाला. मी ह्यांना म्हणाले अहो ती चित्रा भेटायचं म्हणत होती. मग काय झाल. केव्हा येतात भेटायला. नाही मी ह्या विकेंडच नाही म्हटल पाहू आत्ता कधी भेटण होताय ते. हे म्हणाले अगं आता तर डिसेंबर महिना येतोय ....पण ठीक पाहू कस होत ते?
आता आमच्या ऑफिसला सुट्ट्यांचा महिना सुरु झाला. तो म्हणजे डिसेंबर. आम्ही १-२ दिवसांची सुट्टी घेऊन कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा ठरवलं. एअरपोर्टला पोहोचलो. आज आम्ही फिरायला जाण्याच्या मूड मध्ये असल्यामुळे खूप मज्जेत होतो. थोडा काळ खूप छान घालवता येणार होता. काही कामाचा तणाव नाही कि वेळेच बंधन नाही....तेवढ्यात लवंग लता बंदूक कि फेम चित्रा बाईंचा फोन आला... आत्ता खरं तर मला फोन घेण नको होत. पण तो खूप वाजत होता. मी थोड निराशेनेच तो उचलला.
हेलो हा ग चित्रा कशी आहेस? हो मी मज्जेत, काय झाल? तू कशी आहेस?
अगं या विकेंडला काय करताय. घरी आहात का? झाल तिचा जणू न संपणार हा प्रश्न तिने मला विचारला आणि ती माझ्या डोक्यात गेली... सुट्टीच्या दिवशी का कोण घरी बसेल आणि ते हि लोंग विकेंडला...मला तर तिचा थोडा रागच आला.
आता मात्र मला तिचा डाउट येऊ लागला. मी माझ्या मिस्टरांना म्हटल अहो इतकी का बर ती मागे लागत असेल भेटण्यासाठी. ती तर म्हणाली त्यांना इथ खूप वर्ष झाली मग तिच्या कोणी ओळखीच नसेल का?
तेव्हा मला एका क्षणाला थोड वाईट हि वाटल कारण जर अस असेल तर आपण त्यांना परत घरी गेलो कि लगेचच भेटायला हव नाही का हो? अस मी ह्यांना विचारले पण ह्यांच लक्षच नव्हत. त्या वातावरण मस्ती-मज्जा करण्यात हा विचार घरी आल्यावर थंड पडला..आणि मग काय वाट न पाहता पुन्हा चित्राचा फोन आला. मला क्षणभर वाटल, कि हि काय हातात फोन घेऊनच बसलेली असते कि काय? बरोबर लक्षात ठेवून फोन करते.
आपत्ती टाळता येते अस म्हणतात पण ती चुकत मात्र नाही हेच खर!!! म्हणजे अगदी आम्ही घरी पोचल्यावर लगेच. यावेळी मात्र काही कारणच नसल्यामुळे आणि आता मी कोणतही कारण देवू इच्छित नसल्यामुळे आपण लवकरच भेटू अस मनाशी ठरवत मी हेलो म्हंटल.
ती म्हणाली आपण आज सविस्तर बोलूया बर ....
मीही अगदी पूर्ण मुभा दिली म्हटलं काही हरकत नाही.
तर त्या दिवशी तिने माझी जणू कैद्याची प्रथम ओळख परेड घ्यावी तशीच थोडी चौकस पणाने ओळख करून घेतली. जणू तिने प्रश्नावली तयार केली होती. म्हणजे तू काय करतेस?
नोकरी व्यतिरिक्त (कंसात रिकाम्या वेळेत) मी म्हटलं तस आराम... अरे बापरे आराम... आणि त्या व्यतिरिक्त काय? मी म्हंटल.. कविता लिहिण, वाचन, इ इ. का ग? ती म्हणाली आराम आणि कविता वाचण... या व्यतिरिक्त...
अह्ह्ह.. मला यावेळी हि तिला नक्की कोणत उत्तर अपेक्षित असाव हे कळल नाही. मी म्हटलं नाही बाई हे सगळ केल्यानंतर मग मी दमते... मला नाही राहत एनर्जी. आणखी काही करण्याची...
चल ठीक ते पाहू नंतर... मला सांग तुला बोलायाला आवडत का? अस तिने विचारल. आता एखाद्या वादकाला विचारल बाबारे तुला वाजवायला आवडता का? तर त्याच जे उत्तर असेल ते माझ होत.
म्हणजे हो.... पण कुठे हे फार महत्वाच होत बर... मी हो म्हणताच तिला आनंद झाला.
ती म्हणाली मग आपण कधी भेटायचं मी म्हंटल मला वेळ असेल तेव्हा मी तुला मेल करेन... कस? तिने विचारलं,
“येत्या शनिवारी संध्याकाळी तुम्ही फ्री आहात का”?
“म्हटलं हो कुठे भेटायचं”?
लगेचच तिने तारीख, वार वेळ आणि ठिकाण सार ठरवलं. ठीक मग आपण भेटूच, अस म्हणत फोन ठेवला. यावेळी आलेल्या फोन मधून फक्त धूर येण बाकी राहील होत.त्यादिवशीच्या संभाषणातील मुख्य विषय असा कि तुम्ही आमच्यासाठी रविवारातील दोन तास द्यावेत हि धमकी वजा माहिती तिने मला दिली.
असो तर अशा प्रकारे त्यादिवशी आमच बोलणं झाल आणि भेटण्याचं नक्की झाल पण त्यांनतर उभ्या ठाकणार्या गोष्टीची आम्हाला काडीमात्र कल्पना नव्हती. आम्ही भेटण्याच्या आदल्या दिवशी पुन्हा एकदा चित्राचा फोन आला. आता काय झाल? तर चित्राबाईंनी दिलेली वेळ आमच्या लक्षात आहे ना ह्याची खात्री तिन केली. त्या फोन नंतर मात्र आमच भेटण हे काही वलयानि म्हणजे टेन्शननि भारावलेले असेल अशी शंका मनी आली. मी ते टेन्शन न घेण्याचा प्रयत्न केला.
प्रथमच आम्ही त्यांच्या घरी जाणार होतो म्हणून जाताना खाऊ नेला. तिथे गेल्या नंतर आमच आदरातिथ्य झाल आणि विवेक आणि चित्रा चहाचा कप घेवून आमच्या समोर बसली. सुरवातीच्या हवापाण्याच्या गप्पा झाल्यावर विवेक म्हणाला चला आता आपण मुद्याकडे वळू. असे म्हणत डायनिंग टेबलजवळ जाऊन बसला.
विवेकने समोरच्या टेबलावर असलेला आपला laptop, काही वह्या, कागदपत्र या सार्याचा गठ्ठा घेऊन तो बसला. थोड्याशा कागद पात्रांच्या जुळवा-जुळवी नंतर त्याने आम्हाला आमच्या खुर्च्या आणखी जवळ घ्यायला सांगितल्या. त्यांनतर आमच्यातील दुवा ठरावा त्याप्रमाणे एक–एक कागद आणि त्यावरील अपरिचित अशा लोकांच्या कहाण्या अधिक खुलवून त्यांच्या उद्योगातील फायदे आम्हाला पटवून देवू लागला. काहींच्या सांपत्तिक यशाची आणि त्यांच्या उन्नतीची अनेक उदाहरणे हि तो अधूनमधून देत होता.
त्यातील अनेक मंडळी म्हणे अगदी शिखरापर्यंत पोहोचली आहेत असही तो सांगत होता.... हा आता कोणत्या ते नाही बर सांगितलं म्हणजे विंध्य, सातपुडा....कि आणखी कुठल्या ते.
तेवढ्यातच चित्रा कपाटातून काही वस्तू घेवून आली आणि आम्हाला काही माहिती अधिक त्यांची किंमत सांगू लागली. अशा एकंदरीत पैसे अधिक कसे मिळवता येतील याची रूपरेखा पटवून देत त्यांनी आमच्या आयुष्यातील तीन-चार तास सहज कुरतडवले.
खर सांगू का? त्यांच्या या उद्योगी बैठकीत माझ लक्ष मात्र तिथल्या टेबलावर ठेवलेल्या छान नक्षीकाम केलेल्या मोठ्या फोल्वरपोट वर होत. एखादा न आवडणारा विषय ज्या प्रमाणे आपण एका कानाने ऐकून दुसरी कानाने सोडून देतो ना? अगदी वरच्या भागाला म्हणजे मेंदूला काही त्रास न देता तसच काहीस माझ चालल होत. पण त्या चर्चेत मी तल्लीन झाले आहे अशा आविर्भावात चलाखीने काही प्रसंग ऐकून कधी होकार तर कधी नकार देत ते दर्शवत होते. अशा या नाटकात माझा वेळ फार छान गेला.
तेवढ्यातच त्यांच्या घराचा अक्सेस फोन वाजला. चित्राने उठून अक्सेस दिला आणि ३-४ मंडळीनी घरात प्रवेश केला. मग ते सोफ्यावर बसले. तेवढ्यात पुन्हा एकदा चित्राने कपाटातून काही सी.डि., पुस्तक मला सुपूर्द करत आमची सुटका केली. निघताना मात्र त्या दोघांनी खूप आग्रह करून आम्हाला एका कार्याक्रमाला हजेरी लावायला सांगितले. त्यांच्या संस्थेचा हेड ऑफिसर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी खास यु एस मधून येणार असल्याच त्यांनी सांगितलं. त्यावर आम्ही होय म्हटलं. लगेच चित्राने मेसेज करून कार्यक्रमाची डिटेल्स पाठवण्याचे सांगितले आणि आम्ही त्यांचा निरोप घेतला. आम्ही उठताच आलेल्या नव्या मंडळींचा नंबर त्या हॉट सीटवर लागला.
मी गाडीजवळ येताच हुश्ह्ह केल...
“सुटलो एकदाचे बाबा”... झाल आम्ही घराकडे येण्याच्या परतीच्या प्रवासाला लागलो. गाडीत बसलो तेव्हा खूप थकल्यासारख वाटल.
माझ्या डोक्याला ताप झाला नसला, तरी तिथ बसण्याची शिक्षा मात्र झाली. त्यामुळे मी माझ्या मिस्टरांना विचारल काय हो कस वाटल? खूप नोलेजेबल होत नाही का सगळ? तुम्ही तर अगदी आताच त्याची मेम्बरशिप घेता कि काय, आणि लगेच कंबर कसून नव्या उद्योगाला लागता असच वाटल मला तर. त्यावर ते मिश्कील हसत म्हणाले अगं आजचे काही तास आपले नव्हतेच अस समजून मी त्यांना ते देवू केले होते.
काही दिवसातच ठरल्याप्रमाणे आम्ही त्या कार्यक्रमाला निघालो. सवयीप्रमाणे चित्राने आम्ही निघालो कि नाही इथपासून ते शार्प किती वेळात पोहचू हि सारी तासातासाची स्टेटस इंक्वायरी मोबिइलच्या What’s App वरून चालू ठेवली. आम्ही मजल दर मजल करत कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो. विवेक आणि चित्रा बाहेर आमची वाटच पाहत होते. सुरुवातीला मोघम गप्पा झाल्या आणि नंतर आम्ही त्या मंडळीत जाऊन बसलो.
आम्ही जणू रंगात रंगून गेलो. म्हणजे त्या सार्या उद्योगी मंडळींमध्ये हरवून गेलो. काही ठिकाणी पाहिलं तर जोरजोरात हसण्याचा आवाज तर काही ठिकाणी टाळ्यांचा आवाज. खरच सांगते मला काय चाललय ते कळलच नाही. आणि तेवढ्यातच कोणीतरी उठून “हलो फ्रेंड्स” असा धीरगंभीर आवाज आला.सार वातावरण एकदम शांत झाल. बोलणाऱ्या गृहस्थाने स्टेजवरील मंडळींचा परिचय करून देण्यास सुरुवात केली. प्रत्येक मंडळींच्या नावापुढे इ.एम.एच.आई जी इंग्रजी अक्षर तो लावत होता. त्याचा अर्थ काय हे परमेश्वच जाणे.
सर्व मान्यवरांची ओळख करून दिल्यानंतर त्याने दुसर्या व्यक्तीकडे मंचाची सूत्र सुपूर्त करत स्वतः प्रेक्षकवर्गात जाऊन तो स्थानापन्न झाला. आता ह्या दुसर्या मनुष्याला किती वेळ झेलाव लागणार हे कोण जाणे. पण त्याने त्याचे भाषण १०-१५ मिनिटातच संपवत माईक दुसर्याकडे सोपवला. हे सर्व नाट्य चालू असताना मी मनात गणित मांडत होते कि मंचावरील १० लोकांनी प्रत्येकांने १५ मिनिट जरी भाषण ठोकले तरी अडीच तासाच्या आत आमची नक्कीच सुटका होत नाही. पण माझ्या डोक्यातील हे गणित थोडे चुकलच. कारण हा जो तिसरा वक्ता उभा राहिला होता ना त्याने “लेडीज अंड गेन्त्लेमान” असे म्हणून जी भाषणाला सुरुवात केली ते जवळ जवळ दीड-दोन तास सहज संपवले. बर त्यांचे भाषण हे फार मधुर रसाळ होत म्हणून श्रोते तिथे बसले अस नाही बर, तर त्यांच्या भाषणात जवळ जवळ प्रत्येक दोन वाक्यांमागे नुसता टाळ्यांचा कडकडाट होत असे. कारण त्यांची ती पद्धतच असावी. त्यात ते कुठल्या सदस्याने किती अटकेपार झेंडे रोवले ह्याचे गणित मांडत होते. आणि त्यावर तिथे जमलेली उद्योगी मंडळी व्वा व्वा असे म्हणत टाळ्या वाजवत होती. मी मधेच बाजूला विवेक आणि चित्राकडे पाहिलं तर ती दोघाही काहीतरी नोट्स लिहून घेत होती. तस पाहिल तर तो स्टेजवरील नेता नक्की कुठले ज्ञान वाटतोय असा प्रश्न मला पडला. कारण तो तर सदस्यांची नावे घेऊन त्यांच्या व्यावसाईक पराक्रमाचे गुणगान करीत होता. त्यामुळे ती दोघ नक्की काय लिहून घेत असतील हे सांगणे जरा कठीणच होत. मधेच विवेक हात वर करून “that’s great” असे म्हणत होता. मी हि मान हलवून सहमती दर्शवत होते. त्यानंतर त्या महान वक्त्याने Thank You म्हणून त्याचे अध्यक्षीय भाषण संपवल.
नंतर आणखी एक गृहस्थ हातात काही फुगे घेऊन उभे राहिले. त्यांनी प्रेक्षकातल्या ५-६ लोकांना स्टेजवर बोलावल आणि प्रत्येकाला एक फुगा देत ते म्हणाले यापैकी कोण सर्वात मोठ्ठा फुगा फुगवतो हे पाहूया आणि त्याला बक्षीसही लावले. सुरवातीला १-२ लोकांचे फुगेच खराब असल्यामुळे त्यांना दुसरे फुगे देण्यात आले. त्यानंतर शर्यतीत दुर्दैवाने त्यातील एकही मनुष्य त्यांना दिलेला फुगा मोठ्या आकारात फुगवून त्याला गाठ मारू शकला नाही. कारण त्यांनी फुगा जास्त फुगवण्याच्या नादात तो फोडून टाकला. त्यानंतर ते फुगे देणाऱ्या गृहस्थाने एक फुगा काढून स्वतः तो साधारण आकाराचा फुगवला आणि सर्वाना उद्देशून तो म्हणाला ग्राहक हा जास्त ताणून धरण्याचा विचार कधी करू नये बर. बहुधा हेच त्यांच्या उद्योगातील सूत्र असावे असे मला वाटल. म्हणजे एखादा ग्राहक थोडा जास्त नफा कमवून देईल अशा आशेने त्याच्या मागे जास्त न लागता, कलेकलेने त्याला आपल्या उद्योगाकडे अधिक आकर्षित करावे.
झाल अशाच प्रकारे आणखी एक दोन लोकांची उपदेशपर भाषणे झाल्यानंतर संयोजकांनि ‘नेटवर्किंग ब्रेकची’ घोषणा केली आणि उपस्थित मंडळींची एकच गडबड सुरु झाली. अनेक जण चहापाण्याच्या निमित्ताने दुसर्या हॉलमध्ये जाऊन छोट्या-छोट्या ग्रुप मध्ये गप्पा मारू लागले. आम्हीही विवेक आणि चित्रा बरोबर बाहेर गेलो. ते आमच्यांशी अनेक लोकांच्या ओळखी करून देऊ लागले. त्यामध्येच त्यांनी एक ओळख करून दिली ती म्हणजे मिस्टर आणि मिसेस अग्निहोत्री यांची. मी त्या दोघांकडे बघितले तर मला मिसेस अग्निहोत्रींचा चेहरा थोडा ओळखीचा वाटला. मी काही बोलणार इतक्यात तीच मला म्हणाली अग तू सुगंधा ना? अगं मी अश्विनी! तू कशी आहेस आणि इथे कुठे? चित्रा हे पाहताच म्हणाली अरे तुम्ही एकमेकींना ओळखता का? मी म्हटल, अग आम्ही नुसतं ओळखतच नाही आम्ही बालपणीच्या मैत्रिणी आहोत. आम्ही शाळेत असताना एकाच बाकावर बसायचो. त्यावेळी आमच्याकडे मोबाईल, फेसबुक किंवा एमैल वगैरे साधने उपलब्ध नसल्यामुळे आमची शाळा संपल्यानंतर आमचा एकमेकिंशी काहीच संपर्क राहिला नाही. तेव्हा ती तिच्या मामांकडे राहत असल्याने भारतात असताना फक्त चौकशी होत असे पण पुढील शिक्षणाच्या निमित्ताने मला हि दूर जाव लागल्यामुळे तो हि संपर्क विरळ होत गेला. त्यानंतर आज कित्येक वर्षांनी अनपेक्षितपणे घडलेली अश्विनीची भेट अनोखीच वाटली. मग आम्ही दोघींनी आमच्या बालपणीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आणि काही मिनिट आम्ही त्यात हरवूनच गेलो. त्याच गप्पांच्या दरम्यान समजल कि आज आमच्यासारखे ते देखील इथ पहिल्यांदाच हजेरी लावत आहेत. मग काय आम्ही दोघींनी मिळून त्या उद्योगाचा थोडा समाचार हि घेतला. त्या कार्यक्रमातून घरी परतण्यापूर्वी आम्ही दोघींनी एकमेकांचे फोननंबर घेऊन लवकरच भेटण्याचही ठरवल.
त्या दिवसानंतर दोन-चार दिवसातच फोनच्या रिंग पुन्हा एकदा घणघणु लागल्या. प्रथम मी काही रिंग ऐकल्याच नाहीत अस केल पण हा त्रास आता इतक्या लवकर संपणारा नसल्यामुळे काय करणार उचला फोन.
“हैलो हा चित्रा कशी आहेस अस विचारलं”..... मला थोडा अंदाज आला होता कि, आज हि काही नवा प्ल्यान दाखवणायाच्या उद्देशाने येणार्या सुट्टीच्या दिवशी आमचे आणखी काही तास मागण्याचा आग्रही आज होणार होता. अहो काय विचारता नशीब आमच. तसच झाल. तिने मला विचारलं शनिवारी संध्याकाळी काय करताय? त्यावेळी मी खोट म्हणजेच काहीतरी प्ल्यान असल्याच का बोलले नाही याचा पश्याताप मला फोन ठेवल्यावर झाला. कारण आता तिने मला विचारलं घरीच आहात का?
आता मला सांगा सुट्टीच्या दिवशी घरी असण हा काय गुन्हा आहे का? पण का कुणास ठाऊक आम्हाला हल्ली असच वाटू लागल आहे.... असो.. मी त्या चित्राबाईना हो अस सांगितल.. मग काय विचारता तिच्याबाजुने चांगले फासे पडल्यामुळे आता मी फक्त श्रोत्याची भूमिका निभावणारी म्हणून राहीले... सारी सूत्र हाती घेत तिचा आवडता विषय तिने सुरु केला... म्हणजे भेटण्याचा प्ल्यान कसा सक्सेस करता येईल आणि दुसर्याला म्हणजे माझ्यासारख्यांना त्यात अडकवता कस येईल... ते सुरु झाल. ती म्हणाली आम्ही आता त्याच सबर्ब मध्ये येतोय तर तुमच्या घरी किंवा एखाद्या जवळच्या कोफी शोप मध्ये भेटू, म्हणजे सविस्तर गप्पा मारता येतील आणि भेटताहि येईल निवांतपणे कस? आता घरी असताना कुणी घरी येतोय अस म्हटल्यावर नाही कस सांगणार शेवटी मराठी माणूस आपण..... चांगल नाही दिसत न ते..... असले विचार आले समोर.... माझ्या मिस्टरांची परवानगी वैगरे घेणे दूरच फक्त त्यांना मी सांगितले.... मंडळी येत आहेत... कारण चित्रान तो चान्सच दिला नाही ना... आणि म्हणूनच मला मी खोट का बोलले नाही याचा पश्याताप झाला...
मग आम्ही दोघहि त्या मंडळींच्या स्वागताची तयारी करू लागलो.... म्हणजे काही चहापाणी वैगेरे... झाल ती फारसा दूर प्रवास करून येणारी मंडळी नसल्यामुळे तासभरातच यायची वेळ झाली.... ती वेळ जवळ येऊ लागली आणि मला माझ्याच घरातून थोड्यावेळासाठी कुठेतरी बाहेर जाव अस वाटू लागल.... कारण त्यांची उद्योग बैठक म्हणजे १५-२० मिनिटांत आटपणारी नसते ह्याचे १-२ अनुभव माझ्या गाठीशी होते. आणि आता ते तुम्हालाही माहिती आहे, कि त्यातली विषयरुची मला किती आहे ती ..काय? एक गोष्ट मला खरच कळत नाही कि ह्या मंडळीना दुसर्यांच्या आयुष्यातले काही तास खाण्याचा हक्क दिला कोणी? ऑफिसच्या बिझी शेड्यूल मधून नवरे मंडळीना एखाद- दुसरा दिवस सुट्टीचा मिळतो. पण त्याच दिवशी हि उद्योगी मंडळी टपकतात. झाल मंडळी आमच्या बिल्डींगच्या खाली आली आणि त्या बाई चित्रांनी अक्सेस मागितला. मग मी जावून अक्सेस दिला. मंडळी घरी आली. मनाविरुद्ध असल तरी हि हसतमुखाने स्वागत केल... उभयता सोफ्यावर विराजमान झाले. त्यानंतर मी हि भारतीय पाहुणचार केला. चहा पाणी झाल्यावर विवेकने प्रचंड उत्साहात आपल्या बागेतून वही, लाप्तोप म्हणजे आपली सारी हत्याराच म्हणाना ती काढायला सुरवात केली. माझ्या मिस्टरांनी त्याआधीच विवेकला मेल पाठवून आम्ही या उद्योगाला सध्यातरी तयार नाहीयोत अस सांगितलं होत. पण या प्रकारच्या मंडळींकडे एक गुण सारखाच पाहायला मिळतो तो म्हणजे ‘आशावाद’ हि मंडळी याचा अर्थ चिकाटी असा घेतात. काय म, कशी वाटली आमची सीडी आणि पुस्तक? हा प्रश्न चित्राने सोफ्यावर बसताच आम्हाला केला.
झाल अशा प्रकारे आमच्या बैठकीला प्रश्न उत्तराने सुरुवात झाली... प्रथम चित्राने एक पुस्तक हाती घेत म्हंटल काय कस वाटल हे पुस्तक वाचलास का? मी म्हंटल, चाळलय थोड. पाच-सहा पुस्तक ३-४ दिवसात वाचायला मी काय पुलांचा गटणे वाटले कि काय तिला... म्हणजे एकदा हाती घेतलेलं पुस्तक पूर्ण होईपर्यंत खाली न ठेवायला. असो मग तिने हि ते जास्त खेचून न धरता एक सीडी उचली आणि विचारल हि पहिली का? नशीब.. काही घेणे न देण असताना जेवताना नक्की काय ते जरा पाहू असा म्हणून आम्ही ती ऐकली होती....मी लगेच उत्साहात त्यातील एक दोन लीडरची नाव चलाखीन फेकली. या माझ्या चतुर उत्तराने विवेक आणि चित्रा माझ प्रचंड म्हणजे अगदी तुडुंब खुश होऊन कौतुक करू लागले. त्यांचा आत्मविश्वास आता दुपट्टीने वाढल्याच त्यांच्या चेहरर्यावर झळकू लागल. त्याना जणू त्याचं ते शिखर दिसू लागल.
पण खर सांगू का? तस काहीच नव्हत. त्यावेळीतरी आमच पदव्युत्तर शिक्षण हे आमच्यासाठी जास्त महत्वाच होत. त्यामुळे हा उद्योग सध्यातरी आमच्यासाठी शक्य नाही हे स्पष्ट होत. तरीही जिज्ञासू विवेकाने आयपड बाहेर काढल. बहुधा त्याला यावेळी आणखी काहीतरी नव दाखवायचं असणार. परंतु आम्ही दोघ हि या उद्योगाला पुरेसा वेळ देवू शकत नाही, हे पटवण्यासाठी अनेक कारणच नव्हे तर आमच्या समोरील ध्येय हि आम्ही त्यांना सांगितली. त्यात सगळ्यात महत्वाच म्हणजे या साच्यातील एक पिल्लू आम्ही याआधी पाहिलं होत. ते अस कि एखाद्या दुकानातून मिळणारी वस्तू जर कंपनीतून घेतली तर तिची किंमत काही पर्सेट ने कमी होते व आपल्याला ती वस्तू थोडी स्वस्त मिळते. हे करतांना अनेक सदस्य तयार करून त्या लोकांनीही त्यातून काही वस्तू खरेदी केल्यास मुख्य सदस्याला काही पोंइंट मिळतात आणि बक्षीस म्हणून काही वस्तू किंवा त्याला खरेदीवर काही पर्सेंट सुट मिळते. यासाठी अनेक लोकांना भेटून त्यांना हे पटवून देवून त्याच्याजवळ २-३ मिटिंग करून त्यांना सुद्धा अनेक सदस्य तयार करण्याची अपेक्षा ठेवून हा उद्योग वाढवला जातो.
एकंदरीत सध्या उद्योगाच्या दृष्टीने आम्ही कसे निरुपयोगी आहोत याबद्दलची आम्ही सांगितलेली कारण थोडी स्पष्ट झाल्यामुळेच कि काय? म्हणूनच चित्राने या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी आता आम्हाला काही उपाय आणि सोयीस्कर मार्ग सांगण्यास सुरुवात करतांना ती म्हणाली तुझे पुढचे प्ल्यान काय आहेत? अस विचारून तिने आजच्या बैठकीतील वाद –विवाद पुढे नेण्याचा प्रयत्न केला. परंतु गम्मत अशी झाली कि आम्ही दोघांनीही असा एकही मुद्दा उत्पन्न केला नाही कि, ज्यावर त्यांनी एखाद्या योद्धयासारख तो खोडून आम्हाला हार मानण्यास प्रवृत्त कराव, अस न झाल्यामुळे त्यांची थोडी निराशाच झाली. कारण या उद्योगातील अनुभवाबरोबरच काही त्रुटीं हि आम्हाला माहित होत्या हे त्या चतुर बुद्धीमतेने हेरले असावे. विवेकने काढलेले वही, पेन, laptop, iPad हे सारे ज्या उत्साहाने बाहेर काढले होते तितक्याच काहीशा निराशेने आणि जणू अपयशाच्या भावनेने ते आत ठेवेले. ते दोघही आता निरुत्तर झाले होते.. आमच्या बोलण्यातून बहुतेक त्यांना आमच्या भविष्याकडील दृष्टिकोनाचा निर्धार पाहता त्यांच्यावर चमत्कारिक परिणाम झाला. मग मात्र त्यांनी हातातील शस्त्र सोडली. एका पोंइंट नंतर तर त्यांनी आम्हाला शाबासकीच्या उद्गारांनी भारावूनच सोडलं. आणि अशा प्रकारे आमची उद्योग बैठक अंतिम टप्प्यात आली. त्यांनी हळूहळू आपल्या सामानाची आवर आवर सुरु केली. टेबलावरील पसरलेल्या सीडी गोळा केल्या... आता ते आमचा निरोप घेण्याच्या तयारीला लागले; जरा लगबगीनच.
मी मनोमन म्हटलं पुन्हा या उद्योगाबद्दल अशी काही अपेक्षा ठेवून कृपया आमच्या जवळ येऊ नका. पुन्हा त्या दिवसा पासून आजतागायत त्या बाई चित्रानचा फोन आला नाही. त्यांना जणू वाघाच्या शिकारीला जावून ससा सुद्धा हाती न लागल्याच दु:ख झाल असेल.
परंतु काही का असेना, ह्या सगळ्या प्रकारात चित्राच्या निमित्ताने म्हणा किंवा त्या नवीन उद्योगाच्या निमित्ताने म्हणा मला मात्र माझ्या एका बालमैत्रीणची अनोखी भेट झाली.
भारतात अॅमवे सुरू करणार्या
भारतात अॅमवे सुरू करणार्या स्टेफान ऑलसन या माणसाला मी १९९८ मध्ये एका अॅमवे पार्टीत भेटलो होतो. मित्राच्या घरी ठाण्यालाच होती. वीसेक बकरे जमले होते. तो आला आणि तीन तास आम्हाला मंत्रमुग्ध करून सोडलं. आम्ही सगळे ठोकळेबाज (टिपिकल) मध्यमवर्गीय होतो. त्याच्या बोलण्याने भारावून गेलो. मित्र तर अगोदरच अॅमवेच्या प्रेमात पडला होता. स्टेफानची साखळी साताठ लोकांची होती. मित्राने ठाण्याच्या मेंटरकडून टेपा आणल्या होत्या. मी दोन घेतल्या.
हा प्रकार कसा चालतो ते माहीत असल्याने मी पुढे काहीच केलं नाही. टेपा परत करण्यासाठी मेंटरने माझा जो पिच्छा पुरवला त्यावरून त्या लोकांची चिकाटी मात्र दिसून आली. मित्र एकदोन 'बिझनेस मीटिंग्ज'ना जाऊन आला. त्यानंतर त्याचा रस कमीकमी होत गेला. शेवटी पूर्णपणे गेला. मित्र जवळचा (आणि मनाने चांगला) असल्याने आम्हा दोघातिघांना विश्वासात घेऊन खरी गोष्ट सांगितली, की धंदा शून्य आणि सगळी नुसती बडबड आहे. सुदैवाने मला अगोदरच सुगावा लागला होता म्हणून यात पडायचं नाही असं ठरवलं होतं. पण तोंड उघडलं नव्हतं. उगीच अवसानघात का करा म्हणून.
आज वाटतं जर १९९८ ला अॅमवेत शिरलो असतो तर...!
अधिक माहिती अॅमवेच्या विकीवर आहे : http://www.amwaywiki.com/Staffan_Ohlson
-गा.पै.
आम्ही देखील भेटलोय अशा विवेक
आम्ही देखील भेटलोय अशा विवेक चित्राला. अगदी जवळचे मित्र गप्पा मारायला म्हणून रात्री ११ वाजता आले ते ह्या गप्पा मारून रात्री २ वाजता गेले. तेंव्हाच आम्ही ठरवलं ह्यामध्ये पडायचं नाही. ज्यांना भेटीची खरी कारणे भेटीपूर्वी सांगता येत नाहीत त्यांचा व्यवसायाचा प्लान तरी कसा खरा असणार.
सोप्या पैशाच्या मागे लागून स्वतःची आणि इतरान्ची फसवणूक करण्यात काय अर्थ आहे?
अजून एका भारतीय सी ए ने
अजून एका भारतीय सी ए ने लिंक्डइन वरून मला बिझीनेसमध्ये इंटरेस्ट आहे का हे विचारले. मला जरा आश्चर्य वाटले की लिंक्ड-इन चे प्रोफाईल फारसे अपडेटेड नसताना या माणसाने का बुवा संपर्क साधला असावा? मला वाटले की या माणसाचा अकाऊंटिंग सॉफ्टवेयर्/ऑटसोर्सिंगचा बिझीनेस असावा. पण जरा १-२ फोन्समध्ये खोदून खोदून विचारल्यावरही त्याने धंद्याबद्दल काहीही न सांगितल्याने त्याला स्पष्टपणे विचारले की बाबा रे तुझा मल्टि-लेवल-मार्केटिंगचा धंदा हाये का? तर म्हणे मल्टि-लेवल-मार्केटिंग काय असते? मग सरळ विचारले, अॅमवे आहे का? तर हो म्हणाला. म्हटलं आजिबात इंटरेस्ट नाही वगैरे. वरुन मलाच लेक्चर देत होकश, इथे जॉब मिळवण्यासाठी असे नेटवर्किंग करावेच लागते इत्यादी. मी म्हटलं बरं! धन्यवाद! रामराम!
(वेळीच लक्षात आल्याने माझा सिटीत जाण्याचा वेळ + त्याची बडबड ऐकण्याचा वेळ वाचला)
मला नेहमी प्रश्न पडतो की सी ए लोक यात एव्ह्ढे का आहेत???
अजून एक किस्सा नंतर लिहीते.
मी अभियांत्रिकीच्या दुसऱ्या
मी अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाला असताना एका EnTC च्या मुलाने हे प्रकरण कॉलेजमध्ये सुरु केलं होतं, तो होस्टेल्वरच राहत असल्यामुळे बर्याच लोकांच्या रात्री बरबाद केल्या हे सगळं पुराण ऐकवुन.तो आला की पळापळ सुरु व्हायची माझे रुमी पण अडकले ह्यात, पण रुमींची चैन पुढे नाही वाढु शकली..त्यांनी ते प्रॉडक्टस स्वतःच वापरुन टाकले.
आणि तो EnTC चा मुलगा ३ वर्ष वाया घालवुन गायब झाला नंतर त्याच काय झालं माहित नाही.. पण त्याने दुसर्या वर्षाची परिक्षा सुद्धा दिली नव्हती..
multil level मध्ये सुरुवातिला जे जातात त्यांचा बराच फायदा होतो.. पण नंतरचे फक्त बकरेच बनतात..
Pages