"नमस्कार.आजच्या ठळक बातम्या.रत्नागिरी जिल्ह्यात इतके दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने आज अचानक रौद्ररूप धारण केले असून ढगफुटी झाल्यासारखा प्रचंड पाऊस रत्नागिरी शहर,खेड तालुका व आजूबाजूच्या परिसरात सकाळपासून पडत आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पावसाचा हा जोर कायम राहिल्यास पुढच्या दोन दिवसात हा भाग पूरग्रस्त भाग म्हणून जाहीर करावा लागेल असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे .रत्नागिरीकडे व खेड तालुक्याकडे येणारे वाहतुकीचे सर्व रस्ते बंद झाले असून दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे.पावसाने अचानक धारण केलेल्या या भीषण रुपामुळे स्थानिक जनतेकडून चिंता व्यक्त केली जात आहे .."
पुढच्या काही मिनिटांत फोन खणाणतो......
"हॅलो मी अजय बोलतोय.अरे आत्ताच न्यूज बघितल्या.सो आमच्या तिघांचही ट्रेकला येणं कॅन्सल होतंय."
"अरे पण............."
फोन कट...!!!!
माणसाची इच्छाशक्ती कितीही दुर्दम्य असली तरी निसर्गाने तांडव सुरु केल्यानंतर माणसाला त्याच्यापुढे सपशेल शरणागती पत्करावी लागते..!! हेच ते क्षण असतात जे तुमच्या विचारचक्राला विलक्षण धार चढवतात.पुढच्या काही सेकंदात तुमच्या "स्पीडी डिसीजन मेकिंग स्कील" ची ख-या अर्थाने कसोटी लागलेली असते.पापणी मिटायच्या आत एक अविस्मरणीय अनुभव देणारा निर्णय घेतला जातो आणि पुन्हा एकदा विजयाचं एक मिश्किल स्मितहास्य आपल्या चेह-यावर उमटतं...!!!!
होय.......ही गोष्ट आहे आमच्या अशाच एका अविस्मरणीय अनुभवाची...सह्याद्रीने पेश केलेल्या त्याच्या अद्वितीय रुपाची...आणि कायम लक्षात राहतील अशा काही सुंदर क्षणांची...!!!!
तर त्याचं असं झालं ....
दरवर्षीच्या शिरस्त्याप्रमाणे सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यात हिरवाईने नटलेल्या आणि रानफुलांनी सजलेल्या सह्याद्रीला डोळे भरून बघण्यासाठी "पोस्ट मॉन्सून ट्रेक" चा प्लॅन ठरला होता .कोजागिरी पौर्णिमेसारखा ट्रेकर्सच्या जिव्हाळ्याचा मुहूर्त शोधूनही सापडला नसता.कोजागिरी सह्याद्रीतल्या एखाद्या रसिक किल्ल्यावर साजरी करायची हे मनाशी पक्कं करून लोकेशन ठरवण्याच्या आठवडाभर आधी मी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या परिचितांना फोन लावून परिस्थिती विचारली तेव्हा "अहो साहेब तुम्ही इकडे याच.नाही ना हिरवळ बघून तुम्ही खुश झालात तर माझं नाव बदलून टाकेन" असं उत्तर मिळाल्याने मी रत्नागिरी जिल्ह्यातल्या रसाळगड,पालगड आणि मंडणगड या तुलनेने सोप्या पण अवशेषांनी संपन्न असलेल्या देखण्या किल्ल्यांची मोहीम आखली होती .सरत्या पावसाळ्यात या ऑफबीट किल्ल्यांना जायला मिळणार म्हणून आमची सुमो कधीच फ़ुल्ल्ल झाली होती.पण ट्रेकला निघायच्या काही तास आधी वरचा प्रसंग घडला आणि कोकणातल्या पावसाचं पाणी आमच्या प्लॅन वर फिरलं !!! अजयचा फोन आल्यानंतर मला बाकी पब्लिकचेही फोन अपेक्षीत होते.पण त्यांनी "तू करशील ते योग्यच करशील" हे आधीच ठरवून टाकल्याने आता खरी जबाबदारी होती.
मी मनाशी काहीतरी योजलं आणि अजयचा नंबर फिरवला...
" हॅलो अजय.......अरे पाऊस रत्नागिरी जिल्ह्यात पडलाय...संपूर्ण महाराष्ट्रात नाही ना ...आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊ."
"हां.मग ठीके."
"चालेल.मग उद्या ठरलेल्या ठिकाणी भेटू."
"ओके.बाय.."
मुळचा अडीच दिवसाचा असलेला आमचा प्लॅन पुढे काही रिस्क नको म्हणून मी दीड दिवसांवर आणला.शनिवारी आम्ही मिटिंग पॉइंटला जमलो तेव्हा एक वाजत आलेला होता.गाडीही येउन थांबली होती.आता पुन्हा कोकणातलाच एखादा किल्ला ठरवून जोखीम वाढवण्यापेक्षा देशावरच्या आणि पावसाळ्यातही सहजसाध्य असणा-या अशा अनेक किल्ल्यांची नावं सर्रकन डोळ्यासमोरून गेली आणि शिक्कामोर्तब झालं आड,पट्टा आणि डुबेरगडावर...!!! नाशिक जिल्ह्यातले अतिशय सुंदर आणि आदल्या रात्री निघाल्यास पुण्या - मुंबईवरून सहज होतील असे हे तीन किल्ले !!! पुणे - नाशिक हायवेवरच्या सिन्नर गावापासून हाकेच्या अंतरावर असलेले आणि कोणत्याही ऋतुत अगदी सहज बघता येण्यासारखे !!!! प्लॅन फायनल करून पुणं सोडलं तेव्हा दुपारचे दोन वाजले होते.संगमनेर क्रॉस करून आमची गाडी सिन्नर दिशेने धावू लागल्यानंतर पुण्यातून निघून सुमारे तीन तास झाल्याने आणि त्या वेळात डायवराची आणि आमची चांगलीच घष्टन जमल्याने आपल्या जवानीच्या तरुण सळसळत्या रक्ताशी इमान राखत आदरणीय डायवरमहाराजांनी कीर्तनास सुरुवात केली.."काय साहेब,आवो रत्नागिरीला पाऊसच झालाय ..ते शुनामी तर आली नाईये ना...आपन दरडी कोसळत असताना पन गाडी घातली असती आणि तुम्हाला पोचवलं असतं "
(मी फक्त त्याचं "तुम्हाला पोचवलं असतं" एवढंच ऐकलं आणि समोरच्या कप्प्यात ठेवलेली रामरक्षेची सीडी सुरु केली !!!! ).
आम्ही सिन्नरमध्ये दाखल झालो तेव्हा साडेपाच वाजले होते.पट्टा चढायला अत्यंत सोपा आणि वरती मुक्कामाची अलिशान व्यवस्था असल्याने अंधार पडला तरी काळजीचं काही कारण नव्हतं.सिन्नरला दक्षिणेतल्या कोरीव कामांच्या मंदिरांना लाजवेल इतकं अप्रतिम आणि उच्च दर्जाची कलाकृती असलेलं गोंदेश्वराचं मंदिर आहे.हे मंदिर भूमिज प्रकारातील असून याचं बांधकाम चालुक्य शैलीतलं आहे.जाणकारांनी या माहितीत अजून भर घालावी.मंदिराच्या बाहेरच्या आवाराच्या मुख्य दरवाजातून आपण आतमध्ये शिरलो की अक्षरश: स्तंभित व्हायला होतं.महाराष्ट्राचा एक देखणा वारसा असलेलं हे गोंदेश्वराचं पंचायतन प्रकारातील शिवालय एकदातरी न चुकता पहाच.टोटली वर्थ व्हिजिटिंग !!!! सिन्नर मधली अनेक मुलं या शांत वातावरणात अभ्यासाला येतात (बघा......शिका काहीतरी....नायतर तुम्ही !!!!!).गोंदेश्वराच्या मंदिरापासून पाय निघायलाच तयार नव्हते पण त्या शंकरापेक्षा आमचा डायवरच जास्त जागृत असल्याने त्याने साडेसहाला हॉर्नरुपी शंख वाजवायला सुरुवात केल्यावर आम्ही गाडीच्या दिशेने पळालो. पुण्याहून निघतानाच सिन्नरला फोन करून फिल्डिंग लावल्यामुळे कोजागिरीसाठीचं दुध आणि त्याच्या केशरयुक्त मसाल्याची आधीच सोय झालेली होती.हे सगळं गाडीत भरल्यावर आता ठाणगावच्या दिशेने गाडीची चाकं वळाली !!!
सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिराचे काही फोटो....
मंदिराचं सुंदर प्रवेशद्वार
गोंदेश्वराचं अप्रतिम कोरीवकाम....
गोंदेश्वर मंदिरातील एक अविस्मरणीय संध्याकाळ.....!!!!
हीच ती वेड लावणारी सप्तरंगांची उधळण....!!!!!
महाराष्ट्रचं "माउंट एव्हरेस्ट" म्हणून ओळखल्या जाणा-या कळसूबाई शिखराच्या पश्चिमेकडील अलंग - मदन - कुलंग या दुर्गत्रिकुटाच्या रांगडेपणावर भाळून दरवर्षी त्याची वारी करणारे अनेक ट्रेकर्स महाराष्ट्रात सापडतील.पण याच कळसूबाई शिखराच्या पूर्वेकडील भाग मात्र गिर्यारोह्कांकडून कायमच दुर्लक्षिला गेलाय.कळसूबाईच्या पूर्वेकडील रांगेत बितनगड,पट्टा,औंढा व आड या सह्याद्रीतल्या अतिशय दुर्गम पण अनोख्या चार किल्ल्यांचा समावेश होतो.अपु-या माहितीमुळे ट्रेकर्स या किल्ल्यांच्या वाटेला फार कमी वेळा गेलेले आढळतात.पण उत्तम नियोजन केल्यावर मात्र यासारखा आनंद देणारी डोंगरयात्रा शोधूनही सापडणार नाही.सिन्नर घोटी रस्त्यावरून जाताना दिसणा-या पट्ट्याच्या विशाल आकाराकडे आणि आकाशात बाणासारख्या घुसलेल्या औंढ्याच्या त्या सुळक्याकडे बघून वेळोवेळी हा प्रत्यय येतो.
आम्ही ठाणगावला पोचलो तेव्हा चांगलाच अंधारून आलं होतं.सिन्नर ते ठाणगाव हे अंतर साधारणपणे २५ किलोमीटर्स आहे.मुंबईकडच्या भटक्यांनी कसारा - घोटीमार्गे टाकेद वरून जाणा-या रस्त्याचं बोट धरून कोकणवाडीमार्गे पट्ट्याला यावं. अंधार पडला असल्याने आणि मुक्कामाची गुहा शोधण्यापासून सुरुवात करावी लागल्याने आम्ही ठाणगावातून पट्ट्याच्या दिशेने सुटलो आणि दहाव्या मिनिटाला रस्त्याला दोन फाटे फुटल्याने (आणि अर्थातच दिशादर्शक पाटीच्या नावाने बोंब असल्याने) सुमोला करकचून ब्रेक लागला !!!!! अतिशय निर्जन रस्ता,मधूनच होणारे घुबडांचे विचित्र घुत्कार आणि कोजागिरी पौर्णिमा असूनही आकाशात प्रचंड ढग असल्याने अमावस्या असल्यासारखं वातावरण !!!! कोणाला विचारावं म्हटलं तर मोबाईलला रेंज नाही. काय करावं तेच कळेना. इतक्यात लांबून टॉर्चचा एक भगभगीत प्रकाश येताना दिसला आणि मी सावरून बसलो.
"पट्ट्याचा किल्ला ??? भाऊ… रस्ता चुकलात तुम्ही…. हिकडं किल्ला वगैरे काय बी नाईये… !!!! " ठाणगाव ते पट्टावाडी या रात्रीच्या अंधारात बुडालेल्या निर्मनुष्य एकाकी रस्त्यावर देवदूतासारख्या भेटलेल्या स्थानिक तरुणाच्या निर्विकार उत्तराने आमचा उरलासुरला उत्साहही धुळीला मिळाला.।!!!
"अरे तो पट्टा किल्ला म्हणजे…तो लक्ष्मणगिरी महाराजांची गुहा असलेला डोंगर आहे ना तो… तिकडे जायचय आम्हाला… " त्याच्या अज्ञानामुळे मला त्याला स्थानिक संदर्भ देणं भाग पडलं ।!!
"मग सरळ सांगा ना बाबांकडे जायचंय…!!!!" इति तरुण…"ह्योच रस्ता हाये…त्यो बगा डोंगुर।!!!" त्याने अंधारात कुठेतरी अंगुलीनिर्देश केला…
पण रात्रीच्या त्या मिट्ट काळोखात पट्ट्याच्या पहाडाचा आकार शोधण्याचे भगीरथ प्रयत्न करूनही आम्हाला तो सापडला नाही !! त्यामुळे त्या अंधारात जो दिसेल तो डोंगर म्हणजे पट्टा किल्ला असली अफवा तोपर्यंत आमच्या गाडीत पसरली होती !!! त्या तरुणाने सांगितलेल्या रस्त्याने अर्ध्या तासात आम्ही पट्टावाडीत पोचलो तेव्हा पट्ट्यावरून जोरजोरात भजनांच्या सीडीचा आवाज ऐकायला येत होता. पट्ट्यासारख्या आडवाटेवरच्या किल्ल्यावर हे काय नवीन प्रकरण उपटलं हा विचार करायच्या आत पट्टावाडीच्या आपलं नाव सार्थ करणा-या हौशीराम गोडेने अगदी हौसेने आणि स्वखुशीने याचा खुलासा केला. पट्ट्याच्या मध्यावर लक्ष्मणगिरी महाराजांची समाधी असलेली प्रशस्त गुहा असून तिला बाहेरून लोखंडी दर लावून कुलूप घातलं गेलं आहे. ही गुहा फक्त पौर्णिमेलाच उघडण्यात येते. आज कोजागिरी असल्याने ठाणगाव - पट्टावाडी परिसरातले सर्व उत्साही ग्रामस्थ पट्ट्यावर जमले होते आणि प्रथेप्रमाणे रात्री चंद्रोदयानंतर मसाला दुधाचा फर्मास बेत ठरला होता.
(आम्ही पट्ट्याला गेलेलो असताना प्रचंड धुकं असल्याने फोटो येऊ शकले नाहीत. पण त्याच वर्षी डिसेंबर मध्ये खास फोटोंसाठी पट्टावारी केली त्याचे हे सर्व फोटोज असून रेफरन्स साठी इथे देत आहे.)
पट्ट्यावरची लक्ष्मणगिरी महाराजांची समाधी असलेली गुहा…. तिचं लोखंडी दारही फोटोत दिसत आहे.
पट्ट्याचा उत्तर कडा….
गुहेपासून उजवीकडे दिसणारा पट्ट्याचा दक्षिण कडा…
"तुमी पण बरोबर टायमाला आले बरं का सायेब. आज बाबांचे शिष्य पन गडावर हायेत. त्यांची पन गाठ घालून देतो तुमास्नी." हौशीराम इतक्या उत्साहाने आमची मदत करायला निघालेला बघून माझ्याही अंगात दुप्पट उत्साह संचारला !!! त्यालाच बरोबर घेऊन १५व्या मिनिटाला आम्ही गुहेसमोर पोचलो तेव्हा जमलेली समस्त टाळकी इन्कमटॅक्स डिपार्टमेंटची सरप्राईज रेड पडावी तशी सावध होऊन आमच्याकडे बघायला लागली !!! त्यातल्या दोघांनी काठ्या उचललेल्या बघून मी संदर्भासहित स्पष्टीकरण कथनाचं काम हौशीरामकडे देऊन टाकलं !!!
"काय रं हौश्या…कोनाला आनलंय संगती??? कोन हायेत ह्ये सायेब ?? अन ह्या ल्येडीज कोन ??" त्यातल्या एका पोक्त्यापुरवत्याने पट्ट्याच्या पायथ्याला ठेवलेली तोफ पौर्णिमेच्या रात्री अंगात संचारल्यासारखी पोलिसी इंट्रोगेशनला सुरुवात केली !!!!
"आरं पावने हायेत ह्ये सायेब. प्येपरात लिवतात किल्ल्यांबद्दल . आपला किल्ला दाखवायला आनलंय संगती या समद्यांना. आता आपला कोजागिरीचा उच्चाव (उत्सव) काय कमी मोटा असतो व्हय. त्ये बगायला आलेत आन त्यावर प्येपरात छापनार्येत ." हे ऐकताच साक्षात राष्ट्रपतींनी सरप्राईज व्हिजीट द्यावी असं वातावरण क्षणार्धात तिथे पसरलं आणि लक्ष्मणगिरी बाबांच्या त्या परमपूज्य शिष्याला आयुष्यात जेवढा आदर मिळाला नसेल तो मी काही सेकंदात मिळवला !!!! मग कोणता प्येपर इथपासून ते "आमच्या गावाला चांगला रस्ता नाई की वो",
"पाऊस पडत नाय कदी कदी…. तुमी जरा सायेबांशी बोलून बगा की… (!!!!)"
"सायेब आमचं पोरगं सुनेच्या लई नादाला लागलंय…. जर समजावता का त्याला… " इथपर्यंत ही लिस्ट वाढून तिथे "आज की अदालत" टाईप सीन सुरु झाला !!! शेवटी हौशिरामानेच तो सगळा गोंधळ थांबवून आणि आमची गुहेत रवानगी करून माझी गावक-यांच्या तोंडाच्या "पट्ट्यातून" सुटका केली !!!
पट्ट्याची ती गुहा म्हणजे बाहेरून गुहेसारखी पण आतून वन रूम किचन सारखी सर्वथा सुसज्ज असून गॅस सकट सगळं स्वयंपाकाचं सगळं मटेरियल तिकडे उपलब्ध आहे. गुहेच्या बाहेर पाण्याचा नळ असून पट्ट्याच्या वरच्या टाक्यातलं पाणी पाईपने खेचून गुहेपर्यंत पोचवलं गेलं आहे.आतमध्ये चंद्रोदयापर्यंत तरी झोप काढून घेऊ या विचाराचे काही महापुरुष निवांत झोपलेले होते.आमची भुकेची वेळ जवळ आल्याने मी पावभाजीच्या रेडी टु कुकची पाकीटं बाहेर काढली आणि मेम्बरांच्या टाळ्या मिळवल्या !!! कोजागिरीला पट्टा किल्ला,त्यात हे मस्त वातावरण,मुक्कामाची झालेली अलिशान सोय,पावभाजीचा राजेशाही मेनू आणि नंतर अनलिमिटेड गरम गरम मसाला दुध… वा… सगळं कसं झक्कास जमून आलं होतं !!!!! बाहेर मसाला दुधाची तयारी सुरु होताच मी माझ्याकडचं दुध आणि एव्हरेस्टच्या केशरी दुध मसाल्याची तीन खोकी ग्रामस्थांच्या हवाली करून त्यांच्याही कडकडून टाळ्या मिळवल्या. कारण आधी गुहेतले बाबा दुध गरम करून त्यात फक्त आलं घालून देणार होते. आता माझ्यामुळे या बापड्यांना सुकामेवा + चारोळ्या मिश्रीत मसाला दुधाची पार्टी मिळणार होती !!!! मी पावभाजीच्या भाजीची पाकीटं गरम करायला पाणी उकळत ठेवणार तेवढ्यात त्यांच्यातल्या एका दांडग्या पैलवानाने ती माझ्या हातातून "आवो हिकडं आना त्ये. तुमीपन आमी असताना फुकटचा तरास करून घेता." असं म्हणत हिसकावून घेतली आणि स्वत:च्या हाताने बाहेरच्या दुध उकळवण्याच्या पातेल्यात थोडं पाणी घालून त्यात त्यांना जलसमाधी दिली. काडीचेही कष्ट न करता पाचव्या मिनिटाला (रेडी टु कुकचे पाकीट न फोडता !!! ) भाजी तयार झाल्याचा जगावेगळा चमत्कार बघून उपस्थित मंडळींमध्ये माझा भाव शेअर्सपेक्षा पण जास्त वाढला आणि त्या भाजीला "आटुमॅटिक भाजी" आणि मला "जादूवाले पत्रकार सायेब" ही नवीन नावं कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर प्रदान करण्यात आली !!!!
चंद्रोदय रात्री दहा वाजता होता. आम्ही आणलेलं प्लस गावक-यांकडचं असं एकूण बारा लिटर दूध (केशरी दूध मसाल्यासकट बरं का !!!) रटारटा उकळत होतं. त्याच्यावरच्या चवीचे सगळे संस्कार पूर्ण झाल्यावर आणि लक्ष्मणगिरी महाराजांना आणि चंद्राला नैवेद्य दाखवल्यावर आमच्यासकट तिथे उपस्थित सगळ्या टाळक्यांनी कसलीही पर्वा न करता परहेड सुमारे पाच ग्लास दूधाचा फडशा पाडला. दरम्यान आम्ही पूर्ण अज्ञानी आहोत असा समज झाल्याने त्यातल्या एकाने स्वत:हून लीड घेऊन पट्ट्याचा इतिहास सांगायला सुरुवात केली…
"बरं का सायेब... एकदा का नाय हिथे शिवाजीम्हाराज आले होते. तो औरंग्या स्वत्ता मारायला आला होता राजास्नी. मंग त्ये हिथून जात होते.. म्हनाले कशाला रिक्स ग्यायची. थांबू हिथच. म्हणून त्ये आमच्या पट्ट्यावर रायले. आमचा पट्टा नसता तर म्हाराजांना औरंगज्येबाने कंदीच न्येला असता. अन अफझलखान आला तवा पन ते याच गडावर त्या भाड्याला गाडनार व्होते. पन पुन्याहून लई लांब पडतं ना ह्ये.. म्हनून मग राजगडावरच खून क्येला त्याचा (वा !!!). आन तुमाला अजून एक मायतीये का. राजधानी म्हनून पन आदी ह्योच गड निवडला होता.पन पुन्याहून लई लांब पडतं ना ह्ये !!! म्हनुन मग क्यान्सल क्येलं. कळालं का तुमाला आता. छापा आता ह्ये प्येपर मदे !!! "
(ता. क़. - मी बाबांना फकस्त दूध आणि केशरी मसाला दिलेला होता. ह्या थोर इतिहासकाराने नक्की काय प्यायलं ते मला माहित नाही !!! )
कशी त्या रात्री झोप लागणार हो…. तुम्हीच सांगा !!! पण पट्ट्याच्या त्या अतिआरामदायी गुहेने आणि त्या झक्कास पावभाजी + फक्कड मसाला दुधाने सारा शिणवटा घालवला आणि जडावलेल्या डोळ्यांना निद्रादेविने कधी कुशीत घेतलं कळालच नाही !!!!
सकाळ झाली ती "लक्ष्मणगिरी महाराज की जय" अशा घोषणांनी !!!! कालची सगळी सेना रात्रीच आपापल्या गावी गेली होती आणि ज्यांना जायला वाहन नव्हतं ते चार पाच जण आज सकाळी गड उतरून परतणार होते. सगळ्यांना उठवायच्या आधी मी बाहेर आलो तर बाहेर धुक्याने सगळा परिसर गिळून टाकला होता. आमची बाकीची मंडळी पण अर्ध्या तासात तयार झाली आणि आम्ही गड भटकायला बाहेर पडलो. लक्ष्मणगिरी बाबांच्या गुहेच्या शेजारी अजून एक छोटी गुहा असून त्यात मंदिर आहे. पट्ट्याच्या गुहेकडे पाठ करून आपण सरळ गेलो की वाट डावीकडे वळते आणि किल्ल्याच्या अवशेषांना सुरुवात होते. पट्ट्याची तटबंदी उजवीकडे ठेवत आपण काही पाया-या चढून वर गेलो कि एक छोटेखानी गुहा लागते. दहा बारा जणांसाठी उत्कृष्ट !!! गुहेत देवीची मूर्ती असून गुहेबाहेरचे प्रांगणही एकदम प्रशस्त आहे. गुहेपासून आपण पाच मिनिटात वरती गेलो की जिच्यामुळे या किल्ल्याला "पट्टा" नाव पडलं त्या पट्टाई देवीचे छोटे मंदिर आहे. शेजारी पिण्यायोग्य पाण्याची खोदीव टाकी असून यातीलच पाणी पाईपने खालील मोठ्या गुहेपर्यंत पोचवले गेले आहे. मंदिराकडून आपण जसेजसे माथ्याकडे जायला लागतो तसेतसे जोत्यांचे अवशेष दिसायला लागतात. पट्ट्याच्या उत्तरेकडे तोंड करून असलेले पण अजूनही भक्कम स्थितीतले "दिल्ली दरवाजा" नामक एक प्रवेशद्वार नजरेस पडते. दिल्ली दरवाज्याकडून माथ्याकडे जाताना पट्ट्याचा प्रचंड विस्तार नजरेत भरतो. पट्टा किल्ल्याच्या मध्यभागी अंबारखान्याची एकच इमारत पूर्णपणे सुस्थितीत असून त्याच्या आत कमानयुक्त दालने आहेत. या अंबारखान्याला छोटी दोन उपद्वारे असून बाहेर झेंडावंदनाचा एक पोलही उभारला गेला आहे. पट्ट्याच्या विस्तीर्ण पठारावर ब-यापैकी भग्नावशेष असून सर्वोच्च माथ्यावर पाण्याच्या बारा खोदीव जोडटाक्यांची एकसलग मालिका आहे. या सर्वोच्च भागातही एक सुंदर अशी मुक्कामायोग्य गुहा असून तिच्या जवळही पाण्याची टाकी असल्याने तिथेही मुक्काम करता येऊ शकतो. त्या गुहांची योग्य दिशा फक्त माहित असणे गरजेचे आहे. पट्ट्याच्या उत्तर टोकावरून समोरच्या औंढा किल्ल्याचा नजर काय वर्णावा !!!! पट्ट्यापासून औंढयापर्यंत धावत गेलेल्या कोकणकड्याच्या आकाराच्या डोंगररांगेचा नजारा निखालस सुंदर आहे. सह्याद्रीची सगळी वैशिष्ट्य या एकाच दृश्यात सामावली आहेत !!!! सध्या या डोंगररांगेवर पवनचक्क्यांची फौजच उभी केल्याने पट्टावाडीतून पट्ट्याला पूर्ण वळसा घालून कच्चा गाडीरस्ता औंढयाच्या सुळक्यापर्यंत पोचवण्यात आला आहे. पट्ट्याच्या माथ्यावरून सूर्यास्त पहाणे हा अविस्मरणीय अनुभव असून तो न चुकवण्यासारखाच आहे !!!!
पट्ट्याचा दिल्ली दरवाजा
पट्टा किल्ल्यावरचा अंबारखाना
अंबारखाना समोरच्या बाजूने…
पट्ट्यावरची देवीची छोटेखानी गुहा…
वरच्या बाजूला पट्टाई देवीचे मंदिर व खाली ती छोटी गुहा…
दिल्ली दरवाजातून पट्टा किल्ला… !!!!
पट्टा किल्ल्याची तटबंदी
पट्टाई देवीचे मंदिर
पट्ट्याचे सर्वोच्च शिखर… !!!
पट्ट्यावरून दिसलेला विहंगम सूर्यास्त !!!!!!
पट्टा माथ्यावरची बारा जोडटाकी
औंढा किल्ल्याचा अविस्मरणीय नजारा…. !!!!
औंढा किल्ला क्लोजअप. फोटोमध्ये पवनचक्क्याही दिसत आहेत… !!!
कोकणवाडीतून दिसणारा आणि नाव सार्थ करणारा पट्टा… फोटो - नितीन प्रभूदेसाई
आता थोडं इतिहासाबद्दल…
पट्टा किल्ला हे मराठी इतिहासातलं मानाचं पान !!! १६७९ साली जालन्याची लूट करून मराठी सैन्य परतत असताना मोगल सरदार रणमस्तखानाने त्यांचा पाठलाग सुरु केला. शिवाजी महाराजांनी त्याचा दणकून पराभव करून त्याला कैद केलं. पण मागून सरदारखान व केसरीसिंह यांची ज्यादा फौज महाराजांवर चालून आल्याने त्या खजिन्याची मोगलांच्या मगरमिठीतून सुटका कशी करावी हा पेच पडलेला असताना स्वराज्याच्या हेर खात्याचा प्रमुक बहिर्जी नाईक मराठी फौजेच्या मदतीला धावून आला आणि त्याने अत्यंत शिताफीने ही सगळी फौज खजिन्यासकट एका आडवाटेने पट्टा किल्ल्यावर नेली आणि मोगलांच्या जाचातून मराठ्यांची आणि खाशा महाराजांची सुटका केली.पुढे महाराजांनी काही दिवस या किल्ल्यावर विश्रांती घेतली आणि नंतर ते रायगडी रवाना झाले. पट्टा किल्ल्याच्या अस्तित्वाला महाराजांच्या पदस्पर्शाने एक नवा अर्थ प्राप्त झाला आणि त्याने आपली जुनी कात टाकून नवे नाव धारण केले "विश्रामगड"!!!! ती तारीख होती २२ नोव्हेंबर १६७९ !!!! शिवाजी महाराजांच्या महापराक्रमी कारकिर्दीतली हि शेवटची लढाई !!!! पट्टा ख-या अर्थाने इतिहासात गाजला !!!!
हा सगळा इतिहास आठवत पट्टा उतरलो आणि हौशिरामचे आभार मानून (आम्ही ऑफर केलेलं मानधन त्याने स्वीकारलं नाही !!!) गाडीची चाकं ठाणगावच्या दिशेला सोडली. वातावरण स्वच्छ व्हायला सुरुवात झाली होती. आमचं पुढचं लक्ष्य होतं नाशिक जिल्ह्यातला एक अतिशय "आड" वाटेवर वसलेला पण तितकाच रमणीय असा आड किल्ला !!! ठाणगावला सकाळी नाष्ट्यासाठी पोचलो तेव्हा काल रात्री अंधारात बुडलेलं हे गाव ब-यापैकी मोठं आहे याची जाणीव झाली होती. नाश्त्यासाठी एक त्यातल्या त्यात बरं हॉटेल शोधून आम्ही गाडीच्या बाहेर पडणार तेवढ्यात अंघोळीचा शॉवर अचानकपणे सुरु व्हावा तशा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि आता नाश्त्याचा प्लॅन गाडीतच बारगळतोय की काय असं वाटायला लागलं !!! कारण ठाणगावात असूनही जर पोटात काही ढकललं नसतं तर पुढे सिन्नरला पोचेपर्यंत उपासमार ठरलेली होती. पण पावसाचा जोर इतका प्रचंड होता की रत्नागिरीचा पाऊस निसर्गाने आमची हालत खराब करण्याकरता इकडे धाडलाय का काय असं वाटू लागलं होतं !!! शेवटी आमची द्विधा मनस्थिती त्या हॉटेलवाल्याच्या लक्षात आली आणि त्याने एका पोराला तीन छत्र्यांसकट आमच्या गाडीकडे पाठवून दिलं.आमचा नाश्ता होईपर्यंत पाऊस थांबला होता. ठाणगाव ते आडच्या पायथ्याची वरची आडवाडी हे अंतर सुमारे १० किलोमीटर्स असून सुझलॉन कंपनीने उभारलेल्या पवनचक्क्यांमुळे कतरिना कैफच्या स्किनसारखा झक्कासपैकी गुळगुळीत आहे !!!! त्यामुळे आमच्या डायवराने पण फायरब्रिगेडची गाडी पळवावी त्या वेगात वीस मिनिटात हे अंतर कापलं आणि आम्ही आडवाडीत पावते झालो !!!! आड किल्ला धुक्याने पूर्ण झाकून टाकला होता. त्याची पायवाटही स्पष्ट दिसत नव्हती. गावात उतरताच समोरच्या घरातला एक मध्यमवयीन पुरुष बाहेर आला…
"कोन पायजे ?"
"आम्ही हा आडवाडीचा किल्ला बघायला आलोय पुण्याहून. कसं जायचं वरती ??"
त्याने "आम्ही चोर आहोत आणि तुमच्या कोणत्या खोलीत किमती ऐवज ठेवला आहे ते प्लीज सांगाल का ?" असा प्रश्न विचारल्याच्या अविर्भावात आम्हाला खालपासून वरपर्यंत न्याहाळलं आणि तंबाखूची पिचकारी पचकन सोडली.
"कोनी पावसापान्याचं तडमडायला सांगितलंय तुमाला. काय ठ्येवलय या किल्ल्यामंदी…गप परत जावा. जाताना सिन्नरची गारगोटी बघा (सिन्नर येथील प्रसिद्ध गारगोटी म्युझियम !!!) गोंदेश्वराला दंडवत घाला आणि सुटा पुन्याकडं."
पिकतं तिथं विकत नाही म्हणतात ना त्यातला हा प्रकार !!!! आम्ही अनोळखी आहोत याचा पुरेपूर फायदा उठवत त्याने तोंडाचा लगाम कधीच सोडला होता. धुकंही कमी व्हायला तयार नव्हतं त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी स्थानिक माणूस बरोबर घेणं गरजेचं होतं. तेवढयात आपला बाप कोणावर फुकटची भाषणबाजी करतोय हे बघायला त्याचा वीस वर्षीय बाळू नामक पोरगा घरातून बाहेर आला आणि "चला, मी घेऊन जातो तुमाला गडावर" असं सांगत आणि स्वत:च्या बापाला आमच्याच समोर तोंडावर पाडत गाडीत येउन बसला.
"त्ये बेनं लई बडबड करतं !!!! मला पन काय कमी तरास हाये का. एकदा लग्न होऊ द्या मंग दावतो त्याला !!!! "
तो हे वदल्यावर त्याच्या बापाला आत्ताच्या आता जाऊन त्याच्या "दमलेल्या पोराची कहाणी" ऐकवावी असं मला वाटू लागलं होतं !!!!
वरच्या आडवाडीतून आड किल्ला !!!
गडावर जाणारी मळलेली पायवाट…
वरच्या फोटोत आडचं जे नाकाड दिसतंय त्याच्यावरून अगदी सोप्पा चढ चढल्यावर वाट आडवी उजवीकडे वळते आणि गावातून निघाल्यापासून एक तासात आपण गडमाथ्यावर पाऊल ठेवतो. आड हा मी आत्तापर्यंत बघितलेल्या सुमारे २०० किल्ल्यांमधला असा किल्ला आहे की ज्याच्यावर लहान मोठी मिळून सुमारे ७५ हून जास्त पाण्याची टाकी असावीत !!!! त्यामुळे जिथे जाईल तिथे जोडटाकी हा प्रकार पूर्ण किल्ला फिरून होईपर्यंत होत राहतो. मी बराच वेळ झाला तरी किल्ल्याविषयी काहीच विचारत नाहीये हे असह्य होऊन बाळूने स्वत:हूनच तोंड उघडलं "सायेब तुमाला माहितीये का लई फ्येमस किल्ला हाये आमचा. कंदीमंदी फारिनची पण लोकं येतात बगायला.त्ये टाकेदचं जटायू मंदिर हाये ना थिकडे रामायनात जटायू म्येला तवा रावणानंच शीतेला पळवली होती ना. तर राम अन त्याचा भाव (भाऊ !!) हिथे इश्रांती ग्यायला आले होते. द्येव असला म्हणून काय जाला. मानुस दम्तोच की वो !!! अन शिवाजीराजे पण रायगडावरून हवा खायला हिकडेच यायचे !!! आपला गड लई भारी हाये !!!!" (काही वेळाने मला ह्या महापुरुषाकडूनही "राजधानी म्हनून पन आदी ह्योच गड निवडला होता म्हाराजांनी .पन पुन्याहून लई लांब पडतं ना ह्ये !!!" असलं ऐकायला मिळतंय का काय असं वाटू लागलं होतं !!!). पण आपल्या गडाविषयीचा जाज्वल्य अभिमान त्याच्या प्रत्येक शब्दातून दिसत होता !!!! आड किल्ल्याच्या आडवाडीच्या बाजूच्या कड्यात एक विस्तीर्ण गुहा असून आत देवीचे मंदिर आहे. या गुहेतच पाण्याचे टाके असून गुहेच्या शेजारी एका साधूने एक खोली बांधलेली आहे. मुक्कामासाठी अत्युत्कृष्ट जागा !!!! आड किल्ल्याच्या माथ्यावर जोत्याचे थोडेफार अवशेष असून दोन अज्ञात वीरांच्या समाध्याही आहेत. याशिवाय एक मोठा तलाव या किल्ल्यावर असून उत्तरेकडे कोकण दरवाज्याचे (??) अवशेष आहेत. आमची आडफेरी बाळूने सुफळ संपूर्ण करून दिली !!!! वर पोचताच वातावरण क्लिअर झालेलं होतं. आड वरून दिसलेला त्या हिरव्यागार दृश्याचं वर्णन करायला आत्ता खरोखरंच शब्द कमी पडतायेत !!!! याचसाठी केला अट्टाहास हे तिथे क्षणाक्षणाला जाणवत होतं !!!! आड किल्ला बघून आम्ही खाली आलो आणि बाळूला आम्हाला किल्ला व्यवस्थित दाखवल्याबद्दल आणि बापाच्या कचाट्यातून वेळीच सुटका केल्याबद्दल बक्षिसी प्रदान करून आडवाडी सोडली !!! आता वेध लागले होते डुबेरगडाचे !!!!
आड वरील पाण्याचे एक जोडटाके !!!
अजून एक जोडटाके !!!!
आडवरची देवीची गुहा !!!
आडच्या माथ्यावरची समाधी…
आड माथ्यावरून दिसणारं सुरेख दृश्य…
आड किल्ला… मागे वळून पाहताना… !!!
"छोटा पॅकेट बडा मजा" हे बहुतेक डुबेरगडाकडे बघूनच म्हटलं गेलं असावं !!! ठाणगाव - सिन्नर रस्त्यावर सिन्नरच्या अलीकडे ४ किलोमीटर्सवर डूबेरा नावाचं गाव आहे. गावाच्या मागेच स्वत:च्या माथ्यावर देवीच्या देवळाचा कळस घेऊन उभा असलेला छोटा डुबेरगड दिसतो. डुबेरगावात बर्वेंचा वाडा असून थोरल्या बाजीराव पेशव्यांचा जन्म इथे झाला असं सांगितलं जातं. डूबेरा गावात डुबेरगडाला "देवीगड" असं म्हटलं जातं. डुबेरगडाच्या पायथ्याला भैरवाचं मंदिर असून किल्यावर जायला अंजनेरी टाईप सिमेंटच्या पाय-या बनवल्या आहेत.मंदिरापासून गडमाथ्यावर आपण अर्ध्या तासात पोचतो. किल्ल्यावर एक मोठा तलाव,सप्तशृंगी देवीचं एक मंदिर,एक बंद पडलेल्या रडार सिस्टीमची इमारत आणि त्याच्याच समोर दोन पाण्याची टाकी आहेत. डुबेरगडावरचा थंडगार वारा,वरून दिसणारे सह्याद्रीच्या रंगांचे दृश्य आणि गडावरची निरव शांतता …तासा - दोन तासांच्या या छोटया भेटीतही डुबेरगड मनामध्ये घर करून गेला !!!! कोणत्याही ऋतूत सहज भेट द्यावा असा अजून एक किल्ला सापडल्याचं समाधान होतं !!!! सिन्नरला परतलो तेव्हा फक्त एक वाजला होता. सूर्यास्ताच्या आत ट्रेकचं ठिकाण सोडायचं नाही असा अलिखित दंडकच असल्याने पुन्हा गोंदेश्वर भेट करायचा ठराव विनाविरोध पास झाला. काल फक्त एक तास मंदिर बघायला मिळाल्याची कमी आज पूर्ण भरून काढायची होती. कारण गोंदेश्वराचं गारुड अजूनही उतरलेलं नव्हतं !!!! त्यामुळे भोजनोत्तर सुमारे पाच वाजेपर्यंत आम्ही गोंदेश्वराच्या मंदिरातच रमलो होतो !!! सिन्नर सोडताना एक अविस्मरणीय अनुभव मिळाल्याच समाधान होतं !!!! नारायणगाव जवळ आल्यावर मेम्बरांनी वडापावचा नारा द्यायला सुरुवात केल्यावर मी ड्रायव्हरला गाडी थांबवायला लावली !!! रात्रीच्या मिट्ट अंधारात दुरूनही नारायणगावचे दिवे उजळलेले दिसत होते. हॉटेल मध्ये तुम्हाला हवी ती ऑर्डर द्या असा शाही फर्मान सोडल्यावर आनंद अनावर झालेल्या पब्लिकने शैक्षणिक सहलीवर आलेल्या पोरांसारखा कल्ला सुरु केला !!!! गाडीच्या बाहेर उतरल्यावर मी सहज आकाशाकडे नजर टाकली आणि अचानक…… कालपासून ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण अवतरला !!!! काल रात्रीपासून आमच्या डोक्यावर असणारं कृष्णमेघांचं सावट पूर्ण बाजूला झालेलं होतं आणि त्यातून डोकावणारा पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आमच्याकडे स्मितहास्य करत बघत होता. आपली यंदाची कोजागिरी विदाऊट चंद्रदर्शनाची जातीये का या माझ्या प्रश्नार्थक शंकेला त्या चंद्रबिंबाने समर्पक उत्तर दिलेलं होतं !!!! त्या क्षणाला आपण ट्रेकला आलो याचं सार्थक झाल्याची जाणीव ख-या अर्थाने झाली !!!! भान हरपून कितीतरी वेळ आम्ही ते गोलाकार आणि नितांत सुंदर असं देखणं चंद्रबिंब बघत होतो आणि मनोमन स्वत:चीच पाठ थोपटून घेत होतो !!!! निसर्ग अशी अविस्मरणीय सरप्रायझेस देतो म्हणूनच तर त्याचा "फॅन क्लब" इतका मोठा आहे !!! अशाच गोष्टी त्या एका क्षणातून आयुष्यभराची स्फूर्ती देऊन जातात आणि निसर्गाविषयीचा…. सह्याद्रीविषयीचा आदर मनोमन नकळत वाढवून जातात !!!!
तर यावर्षीची आमची कोजागिरी "ब्लॉकबस्टर हिट" झाली !!!! रत्नागिरीच्या त्या हाहाकार माजवणा-या पावसाला घाबरून घरी बसलो असतो तर कदाचित आड,पट्टा आणि डूबेरगडासारख्या सह्याद्रीतल्या तीन निखालस सुंदर किल्ल्यांना मुकलो असतो !!! सो…दी बॉटमलाईन इज… तुमच्या समोर आलेल्या कोणत्याही प्रॉब्लेमचं सहजसोपं उत्तर त्या प्रॉब्लेममधेच दडलेलं असतं !!!! ते आपल्या ट्रेकरच्या नजरेने शोधावं लागतं. ते उत्तर एकदा सापडलं की मग तेच तुमच्या पंखांमध्ये एक उंच भरारी घेण्याचं बळ देतं आणि त्याच वेळी तुमच्यासाठी एका नव्या दुनियेची दालनं खुली करून जातं !!!
डूबेरा गावातून दिसणारा डुबेरगड
डुबेरगडावरच्या बंद पडलेल्या रडार सिस्टिमची इमारत
डुबेरगडावरची पाण्याची टाकी….
डुबेरगडावरून दिसणारा आड किल्ला….
डुबेरगडावरील सप्तशृंगी देवीचे मंदिर
सप्तशृंगी देवी मंदिराचा कळस… !!!!
उदंड करावे दुर्गाटन…. !!!!!
मस्त रे! Savistar nantar
मस्त रे! Savistar nantar lihitoch..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अपरिचित किल्यांची छान ओळख
अपरिचित किल्यांची छान ओळख करून दिलीत सह्याद्रिमित्र .नाशिकडच्या डोंगरातल्या काही गुहेंत उत्तरेच्या बाबा लोकांनी बस्तान बसवले आहे . मनमाडजवळ अंकाइ किला रे स्टे जवळ अंकाइवर हिच परिस्थिती आहे .टंकाइच्या जोड किल्याच्या पोटातील जैन लेणी छान आहेत .
सहीये
सहीये![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Arre bhidu, sahyadrimitra
Arre bhidu, sahyadrimitra mhanaje tu ahes hoy!! Welcome here.. :)vachun lihitolihito.. vac
फार भारी वर्णन केलंय राव तुमी
फार भारी वर्णन केलंय राव तुमी .... सगळं डोळ्यासमोर उभं राह्यलं....
ते "वॉटर मार्क" (पाण छाप) मात्र जरा कोपर्यात ढकला की फोटुच्या - फारच डोळ्यात खुपून राहिले राव .....
मस्त वर्णन, सुंदर प्र.चि आणि
मस्त वर्णन, सुंदर प्र.चि आणि खुमासदार लेखनशैली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मजा आ गया![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लय भारी वर्णन.....म स्त ...
लय भारी वर्णन.....म स्त ... फोटो तर खुपच सुदंर....
सुरेख लिहिलं आहेस! फोटॉही
सुरेख लिहिलं आहेस! फोटॉही झक्कास! वॉटरमार्कबद्दल शशांकजींशी सहमत... आपल्या नावामुळे किल्ल्यांच्याच नै तर किल्यांच्या फोटोंच्या सौंदर्यालाही ठेच पोचू नये...![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
नचि..शशांकजी तुमची सूचना
नचि..शशांकजी तुमची सूचना योग्य आहे पण मधल्या काळात मी वॉटरमार्क फोटोच्या तळाशी टाकल्याने ते फोटोशॉप मधून काढून टाकून माझे काही फोटोज फेसबुकवर स्वत:च्या नावाने खपवून त्यावर भरघोस कॉमेंट्स घेणारे महाभाग भेटले.तेव्हापासून ही खबरदारी.अर्थात हे पण एडीट करता येतील.पण तेव्हापर्यंत असच सुरु ठेवावं असं वाटू लागलंय.तरी पुढच्या वेळी नक्की वेगळी व्यवस्था करायचा प्रयत्न करेन.
पण मधल्या काळात मी वॉटरमार्क
पण मधल्या काळात मी वॉटरमार्क फोटोच्या तळाशी टाकल्याने ते फोटोशॉप मधून काढून टाकून माझे काही फोटोज फेसबुकवर स्वत:च्या नावाने खपवून त्यावर भरघोस कॉमेंट्स घेणारे महाभाग भेटले.तेव्हापासून ही खबरदारी. >>>>> अरेरे रे, खरंच काय एकेक विचित्र मंडळी असतात...
पण एक लक्षात आलं का तुमच्या - तुम्ही काढलेले फोटोच एवढे अप्रतिम असतात की त्याचाही मोह त्या चोरालाही/रसिकालाही होतोय ना !!!
त्यामुळे एवढेच म्हणीन की - फोटो काढीत रहा, असेच लेख लिहून त्याचा आनंद आम्हा रसिकांना देत रहा - फोटोग्राफीत अजून प्राविण्य मिळवा - अनेकानेक व हार्दिक शुभेच्छा.
वर्णन व फोटो दोन्ही मस्तच. तो
वर्णन व फोटो दोन्ही मस्तच. तो आड किल्ल्याचा पहिलाच फोटो कसला देखणा आलाय.
आपली यंदाची कोजागिरी विदाऊट चंद्रदर्शनाची जातीये का या माझ्या प्रश्नार्थक शंकेला त्या चंद्रकोरीनं समर्पक उत्तर दिलेलं होतं >>>> चंद्रबिंबाने हवं नां इथे?
एकदम भारी वर्णन. पट्ट्याचा
एकदम भारी वर्णन. पट्ट्याचा इतिहास सांगणाराही भारी भेटला.. ही अशी मंडळी बहुतेक वेळा भेटतात पण बर्याचदा कुणी लक्ष देत नाही. ते सांगतात त्यातील सत्यासत्यतेपेक्षा त्यांची सांगण्याची स्थानिक शैली जी असते त्यासाठी तरी मी ऐकतो.. मला लक्षात राहिलेत ते, शिरपुंज्याच्या भैरववरून पाबरला पायी जातांना वाटेत एका आजोबांनी आम्हां दोघांबरोबर चालतांना आख्खी हरिश्चंद्राची गोष्ट सांगितली होती. त्यांच्या गावरान शैलीतील ती कथा आजही आठवली तरी हसू येतं.
आड हा मी आत्तापर्यंत बघितलेल्या सुमारे २०० किल्ल्यांमधला असा किल्ला आहे की ज्याच्यावर लहान मोठी मिळून सुमारे ७५ हून जास्त पाण्याची टाकी असावीत !!!!
तू ठाम असशील तर एकदा आड ला मी केवळ टाकी मोजायला जाईन, आणि जर कमी भरली तर आडवरच खिचडीची पार्टी द्यावी लागेल.. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अॅ..! हे ७५ आहे की १५ आहे.???? ७५ आकडा कैच्या कै मोठा वाटतोय..
डुबेरगड. याचा उल्लेख गॅझेटियरमध्ये नाही. नाशिकचे इतिहास अभ्यासक व संशोधक गिरिश टकले यांनी याचं दुर्गपण सिद्ध केलं. डुबेर गांव मी ३ गोष्टींसाठी पहायला गेलो होतो. थोरल्या बाजीराव पेशवेंचं हे जन्मगांव आहे. त्यांची जन्मखोली असलेला बर्वेंचा वाडा. त्यानंतर वाड्याजवळच असलेलं सटवाई देवीचं मंदिर. लहान बाळाच्या कपाळावर मोरपीसाने भविष्य लिहिणार्या सटुआईची मूर्ती अप्रतिम आहे. तिसरं म्हणजे या ठिकाणी असलेलं भोपळ्याचं झाड. भोपळा म्हणजे तुणतुण्यासाठी वापरतात तो भोपळा. शास्त्रिय नांव- cresentia cuseta. नटसम्राट दत्ता भट हे डुबेर्याचेच.
तुम्ही परत गोंदेश्वर मंदिराकडे मोर्चा वळवण्याऐवजी त्याच्यापेक्षाही प्राचिन असं ऐश्वर्येश्वराचं मदिर कां पाहिलं नाहीत?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
या भागात तुम्ही पुन्हा येण्यासाठी मोठ्ठं निमित्त देण्यासाठी हा प्रतिसादप्रपंच केला.
(आणखी २ ओळी होत्या त्या आडो ने कमी केल्या)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
- हेमंत पोखरणकर.
हेमंत.. अरे आड किल्ला म्हणजे
हेमंत..
अरे आड किल्ला म्हणजे जिथे जाऊ तिथे पाण्याची टाकी ह्या प्रकारातला आहे.आडवर असलेल्या या असंख्य टाक्यांचा पुरावा भगवान चिले यांच्या अपरिचित गडकोट या पुस्तकातही आहे.मी टाकलेल्या २ फोटोतच जवळपास १० टाकी आहेत.त्यातल्या वरच्या फोटोत खरं तर ५ टाकी आहेत पण पाणी ओव्हरफ्लो झाल्याने ती झाकली गेली आहेत.खालच्या फोटोत याचा पुरावा मिळेल.गावातली लोकं तर २५० टाकी आहेत असं सांगतात.पण ७५ धरून चालायला हरकत नसावी.
अन खिचडीची पार्टी करायला टाकी मोजायचं निमित्त कशाला.एकदा एखाद्या ऑफबीट ट्रेकलाच भेटून होऊन जाऊदे
....
ऐश्वर्येश्वर मंदिर मी पहिले आहे पण ते या ट्रेकमध्ये नाही.तसेच त्या मंदिराचे मूळ स्वरूप घालवून नुतनीकरण करणार असल्याची बातमी कानी आली आहे.इतक्या लांब हे अप्रतिम मंदिर पहायला गेलेल्यांचा भ्रमनिरास व्हायला नको म्हणून उल्लेख टाळला.
आडो...बारकाईने वाचल्याबद्दल कौतुक आणि आभार..चेंजलय....:-)
आटुमॅटिक भाजी > औंढा
आटुमॅटिक भाजी >![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
औंढा किल्ल्याचा अविस्मरणीय नजारा…. !!!! > सुंदर!
वृत्तांत फार आवडला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूपच धमाल वर्णन आहे. मज्जा
खूपच धमाल वर्णन आहे. मज्जा म्हणजे गडावरची रात्र डोळ्यासमोर उभी रहावी असे वर्णन केलेय तुम्ही. बाकी त्या गावकर्याची कॉमेंट्री पण मस्तच.
बाकी ट्रेकर्स लोकांची खरच मजा असते.
निसर्ग आणी डोंगर दर्यांच्या सहवासात आपण किती नशीबवान आहोत असे जाणवत असेल ना?
मस्त फोटो आणि तितकेच सुंदर
मस्त फोटो आणि तितकेच सुंदर वर्णन
खुप सुंदर वर्णन.. आता
खुप सुंदर वर्णन..
आता प्रत्येकाची वेगवेगळ्या शैलीतली फोटोग्राफी पण बघायला मिळतेय.
आडवर असलेल्या या असंख्य
आडवर असलेल्या या असंख्य टाक्यांचा पुरावा भगवान चिले यांच्या अपरिचित गडकोट या पुस्तकातही आहे.
भगवान चिलेंच्या अपरिचित गडकोट पुस्तकांत आडवर असंख्य टाकी आहेत असा कुठेही उल्लेख नाही. ते टाकीसमूह सोडले तर एवढ्या मोठ्या संख्येने तिथे टाकी नसावीत.
हेम "अपरिचित गडकोट" पान नंबर
हेम
"अपरिचित गडकोट" पान नंबर ७१... वरून चौथी ओळ.."आडगड प्रशस्त पठारावर वसला असून त्याच्या माथ्यावर असणारी असंख्य कातळकोरीव पाण्याची टाकी 'गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा' या आज्ञापत्रातील शिवछत्रपतींच्या विचारांची साक्ष देतात
मस्त लिहिलंय! पन पुन्याहून लई
मस्त लिहिलंय!![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
पन पुन्याहून लई लांब पडतं ना ह्ये.. म्हनून मग राजगडावरच खून क्येला त्याचा >>
फोटो सुरेख आहेत! ठेवा तो
फोटो सुरेख आहेत! ठेवा तो वॉमा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लिखाणाची शैलीही मस्त आहे!
या कोजागिरीची मी पण साक्षीदार
या कोजागिरीची मी पण साक्षीदार होतेच की!
पट्ट्यावरील अंबारखान्यात.
![Shadow.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u36343/Shadow.jpg)
पट्ट्यावरच्या लक्ष्मणगिरी
पट्ट्यावरच्या लक्ष्मणगिरी महाराजांची समाधी असलेल्या गुहेत गावकरी महिलांसोबत कोजागिरी साजरी करतांना
नक्की किती टाकी आहेत? टाकगणना
नक्की किती टाकी आहेत? टाकगणना कराच येकदा. बाकी तुमचे लिखाण वाचतच रहावेसे वाटते आणी छा.चि. पहातच. ऊगाच नाही चोरी होत. प्रज्ञाताई संस्मरणीय आठवण.
येस्स्स्स्स! खिचडीची पैज
येस्स्स्स्स! खिचडीची पैज जिंकलो..
कालच आड दुर्गावर जाऊन आलो.. कोपरान कोपरा तपासला.. मोजून २० टाकी आहेत.. (अगदी टाक्याच्या आतील कप्पा धरला तरी..) अजूनही टाकी कोरडीच आहेत. वरील फोटोमध्ये आहेत तशी भरली नाहीयेत त्यामुळे व्यवस्थित मोजता आली...
प्रज्ञा ताई फारच सुंदर
प्रज्ञा ताई फारच सुंदर …अप्रतिम ……….!