गूळचुनातील कोकणातली पक्वान्ने

Submitted by शैलजा on 22 February, 2013 - 04:48
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गूळचून घालून केलेले ओले काजू (मवला वा मोवला असेही नाव आहे )

ओले काजू
एक नारळ खवणून
१ वाटी गूळ
१ टेबलस्पून पातळ तूप
१ चमचा - वेलची व जायफळ पूड (दोन्ही अर्धा, अर्धा चमचा घ्यावे)
चवीला मीठ

गूळचुनातील राजेळी केळी

६ पिकलेली राजेळी केळी
नारळाची अर्धी वाटी खवणून
पाव किलो गूळ
वेलची + जायफळ पूड एक चमचा
१ टेबलस्पून साजूक तूप
४-५ लवंगा

क्रमवार पाककृती: 

गूळचून घालून केलेले ओले काजू

१. थोडे पाणी घालून ओले काजू मऊ शिजवून घ्यावेत. निथळत ठेवावे.
२.गॅसवर पातेले ठेवून त्यात तूप घालून गूळ खोबर्‍याचे सारण एकत्र करुन घ्यावे, त्यात जायफळ व वेलचीची पूड घालावी.
३. त्यावर आता शिजवलेले ओले काजू घालून हलक्या हाताने ढवळावे व एक वाफ काढावी. होता होईतो काजू मोडणार नाहीत हे पहावे.

गूळचूनातील राजेळी केळी

१.केळ्यांच्या साली काढून त्यांचे लांबट तुकडे करावेत व सारण भरण्यासाठी केळ्यांना चिरा द्याव्यात.
२. गूळ, खोबरे व वेलची + जायफळ पूड एकत्र करावे व हे सारण केळ्यांमध्ये भरावे.
३. गॅसवर लंगडी ठेवून त्यात तुपाची फोडणी करुन लवंगा घालाव्यात.
४. लवंगा तडतडल्या की त्यात की भरली केळी आडवी ठेवून मंद गॅसवर एक वाफ आणावी.
५. एका वाफेनंतर केळी उलटावी व पुन्हा ५ मिनिटे ठेवून अजून एक वाफ आणावी.

वाटल्यास वरुन तूप घालता येईल. एक हळदीचे पानही सोबत घातल्यास छान वास येईल.
गॅस मंद असणे आवश्यक.

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांसाठी.
माहितीचा स्रोत: 
पारंपारिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गूळ आणि ओलं खोबर्याचे आणखी पदार्थ-खांडपोळी,रस शेवया,रस घावने,घाटलं,नारळी/गूळभात,उकडीचे मोदक, मोतीपाक(मायबोली वरील कृती)
या सर्व पदार्थांत तांदूळ पण मुख्य घटक आहे. ग्लूटीनची allergy असलेल्यांना विशेष उपयुक्त.कारण यात गहू नसतो.

Pages