कहाणी अंधारातल्या बनाची.....

Submitted by सह्याद्रीमित्र on 18 February, 2013 - 14:17

असं म्हणतात की " खुदा देता है तो हमेशा छप्पर फाड के देता है !!! " म्हणजेच काय तर जे मिळतं ते एकदम राजेशाही !!! आपल्या ट्रेक्समध्येसुद्धा अनेकदा तुम्हाला असा अनुभव आला असेल. उदाहरणार्थ..एस.टी वेळेवर निघते,वेळेवर पोचते,गुहेमध्ये मुक्कामासाठी आपल्याशिवाय कुण्णीही आलेलं नसतं, ट्रेकमध्ये स्वर्गीय चवीचं जेवण मिळतं वगैरे वगैरे...पण समजा एखाद्या ट्रेकमध्ये याच्या बरोब्बर उलटंच झालं तर ???? येस...आमच्या अंधारबन ट्रेकची कहाणी काहीशी अशीच आहे.ट्रेकच्या अगदी पहिल्या क्षणापासून "कोणत्या मुहूर्तावर निघालो..." अशी जेव्हा जाणीव व्हायला सुरुवात होते तेव्हा पुढे काहीतरी विचित्र वाढून ठेवलेलं असतं !!!! अंधारबन...केवळ हे नाव ऐकताच आमच्या ग्रुपातल्या अनेकांनी कोणतीही चौकशी करायच्या भानगडीत न पडता ट्रेकला यायचं नक्की केलं होतं. मार्च महिन्यातल्या रखरखीत उन्हातून सुटका मिळवायला अंधारबन सारखा ऑप्शन शोधूनही सापडला नसता !!!! फायनली सतरा जण जमले आणि मोठी बस हायर करायचं ठरलं. पण आमचा नेहमीचा ट्रॅव्हल एजंट कामानिमित्त सिंगापूरला गेल्याने दुस-या एका नवीन बसवाल्याचे पाय धरावे लागले आणि इथेच त्या विचित्र नाट्याला सुरुवात झाली.रविवारी सकाळी साडेपाच वाजता बालगंधर्व रंगमंदिर इथे नेहमीसारखं जमायचं ठरलं. पण आमचा ड्रायव्हर गाडीसकट बहुदा झोपेतच असावा. कारण त्याला २-३ वेळा फोन केल्यावर साहेबांनी फोन उचलला तेव्हा "जिस किसी ने मुझे इस वक्त निंद से जगाने कि जुर्रत कि है उसका सत्यानाश हो " असला विचार मनात आल्याच्या टोन मध्ये फोन उचलत "ऐनवेळेस ड्रायव्हर बदलला आहे.बदललेल्या ड्रायव्हरचा नंबर मेसेज करतो " असं म्हणून दुस-या सेकंदाला फोन ठेऊन माझी बोलतीच बंद केली !!! सकाळी सकाळी हा धक्का पचवत असतानाच मला दुसरा धक्का मिळाला.तो म्हणजे आमच्या बदललेल्या डायवराचा मला "अहो साहेब कुठे आहात ? मी सव्वापाच पासून तुमची बालगंधर्वला वाट बघतोय" असा स्वत:हून फोन आला आणि ते ऐकून आम्ही ज्या सुसाट स्पीडने बालगंधर्वला पोचलो त्याला तोड नाही !!!! आमचा नवपरिणीत डायवर हा अगदीच कोवळा म्हणजे विशीचा तरुण होता.नाव अमित !!!! मग बाकीचे मेंबर जमेपर्यंत सहा वाजले आणि गाडी मुळशीकडे धावू लागली.
मुळशी तालुक्यात वांद्रे - पिंपरी हा टिपिकल डोंगरी मुलुख आहे.पावसाळ्यात म्हणजे भटक्यांसाठी आणि पर्यायाने पर्यटकांसाठी जिताजागता स्वर्गच !!!! धुक्याच्या लोटांमध्ये आणि ढगांच्या पुंजक्यात स्वत:चेच हिरवेगार पण सरळसोट कडे शोधणारा सह्याद्री हा त्या स्वर्गाचा अधिपती !!! त्याला बघण्यासाठीच तर पावसाळ्यात हा अट्टाहास होतो !!! पिंपरीच्या अलीकडून एक वाट सुरु होते आणि जिथे दिवसाढवळ्याही सूर्यकिरणे जमिनीला स्पर्श करायला धजावत नाहीत अश्या निबीड पण हिरव्यागार जंगलातून रायगड जिल्ह्यातील भिरा गावी जाऊन विसावते. ही प्रसिद्ध पायवाट म्हणजेच अंधारबन घाट !!!! त्या सदाबहार जंगलात स्वत:चेच अस्तित्व हरवून बसलेला पण नुकताच भटक्यांच्या नकाशावर आलेला !!! आम्ही अंधारबनाची कास धरली होती ती ह्याच गोष्टीसाठी !! गाडीने पिरंगुट सोडलं तेव्हा साडेसात वाजले होते.पौड - मुळशी - पिंपरी असा पूर्वनियोजित मार्ग होता.सुरळीत प्रवास सुरु असतानाच पौडच्या थोडसं पुढे गाडी थांबली आणि "तुम्ही गाडीतच थांबा मी बघून येतो" असं सांगत त्या चतुष्पाद रथाच्या सर्वेसर्वा सारथ्याने खाली उडी मारली. मला ना खूप पूर्वीपासून या ड्रायव्हर लोकांबद्दल कमालीचं कुतूहल आहे आणि ते म्हणजे अख्ख्या गाडीत एवढी टाळकी भरलेली असताना गाडीला काहीतरी झालंय याचा साक्षात्कार ड्रायव्हर लोकांनाच सर्वात पहिल्यांदा कसा काय होतो हे मला आजतागायत न सुटलेलं कोडं आहे !!! कोणालाही चाहूल नसताना हे लोक गाडीची नस कोणत्या अमानवी शक्तीने बरोबर ओळखू शकतात कोणास ठाऊक !!! पाच - दहा मिनिटं झाली तरी डायवराचा पत्ता नाही म्हणून मी आणि मागून बाकी सेना खाली उतरली आणि समोरचं दृश्य बघून आता आम्हाला सामुदायिक हार्टअटॅक येतोय का काय असं वाटू लागलं .आमच्या गाडीचा मागचा टायर सुमारे वीस टक्के जाळून खाक झाला होता आणि उरलेला ऐंशी टक्के जळण्याच्या तयारीत होता !!! मुळशी रोड सारख्या तुलनेने अरुंद रस्त्यावर फक्त पन्नासच्या स्पीडने गाडी चालवूनही हा प्रकार कसा काय घडला याचं खरच अप्रूप वाटत होतं . त्या टायर मधून इतका धूर येत होता की आमची सतरा जणांची खिचडी काही मिनिटात त्याच्यावर शिजली असती !!!! शेवटी आम्ही शेजारच्या घरात धावत जाऊन त्यांच्याकडून एक बादलीभर पाणी आणून त्या रथचक्रावर ओतलं आणि त्याचा जीव शांत झाला !!!! अमितही ते प्रकरण बघून गांगरून गेला होता. शेवटी स्टेपनी लावायची हा शेवटचा पर्याय उरला होता.पण सगळं व्यवस्थित सुरु आहे हे त्या वरच्या कर्त्याकरवित्याला का बघवत नाही काय माहित.गाडीची स्टेपनीही पंक्चर निघाली आणि ते बघून अमित आणि मागोमाग आमचे चेहेरेही पंक्चरावस्थेत गेले !!!! मामला खरोखरंच बिकट होता. आमच्या नशिबाने ताम्हिणी घाटाचा रस्ता वर्दळीचा असल्याने एस.टी आणि खासगी जीप्सची वाहतूक सुरु दिवसभर सुरु होती.पण आम्ही गाडीचे हाल तपासत असतानाच दोन एस.टी आणि तीन चार रिकाम्या जीप्स आमच्यासमोरून निघून गेल्या होत्या.बराच वेळ त्या ठिकाणी थांबूनही एकही जीप किंवा एस.टी मिळाली नाही आणि शेवटी सुमारे अर्ध्या तासाने एक रिकामा टयांपो ( टेम्पो नाही !!!!!) आमच्या गाडीचं वाभाडं निघालेलं बघून स्वत:हूनच थांबला आणि आम्ही घुसळखांब फाट्यावर पोचलो.नाश्ता उरकला आणि पाचव्या मिनिटाला कर्मधर्मसंयोगाने महाडजवळच्या विन्हेरे गावाला जाणारी एस.टी मिळाली आणि धक्के खात का होईना पण निदान उभं राहायला तरी मिळालं या नोट वर आम्ही सुटकेचा नि:श्वास टाकला !!!!
एस.टीने आम्हाला वांद्रे फाट्याला सोडलं तेव्हा साडेनऊ वाजत आले होते.ऊन तापायला लागलं होतं.या वांद्रे फाट्यापासून उजवीकडचा रस्ता पिंपरी,भांबुर्डे,तैलबैला फाटा,सालतर,आंबवणे मार्गे लोणावळ्याला गेला आहे.इथून आमच्या ट्रेकची सुरुवात असणारा पिंपरीचा पाझर तलाव तीनेक किलोमीटर वर होता. गाडीशिवाय वाढत्या उन्हात ही डांबरी तंगडतोड करणं जीवावर आलं होतं. पण भरवश्याच्या म्हशीला टोणगा असल्याने आम्ही पाउणेक तासात परातेवाडीच्या पुढे असलेल्या दरीच्या कडेच्या अर्धवट रेलिंगजवळ पोचलो आणि समोर जे दृश्य उलगडलं त्याला काय नाव द्यावं अजूनही कळत नाहीये !!!!! समोर कोकणापर्यंत पसरलेली प्रचंड खोल अरुंद दरी..दोन्ही बाजूने सह्याद्रीचे तुटलेले रौद्रभीषण कडे...दरीच्या उजवीकडे नावजी..अंधारबन..कुंडलिका सुळक्यांची मालिका...खाली पसरलेला विस्तीर्ण उन्नई तलाव व धरण...समोरच्या डोंगरात पसरलेलं ते जंगलाचं मनमुराद साम्राज्य...आणि त्याच्यापासून थोडयाच अंतरावर असणारे आम्ही....सुन्न....नि:शब्द !!!! अहाहा !!!! केवळ स्वप्नवत !!!! मी हे दृश्य आधी या ठिकाणी दहा -बारा वेळा येउन गेल्याने बघितलेलं होतं. पण आमचे बाकीचे सदस्य हे दृश्य पहिल्यांदाच बघत होते...आणि एकही शब्द न बोलता फक्त त्यांची कॅमे-यावरच्या बोटांची हालचाल सुरु होती !!!! पण इतक्या वेळा बघूनही आजही मला ते दृश्य तितकंच नवीन आणि जिवंत वाटत होतं !!! हीच तर आहे त्या सह्याद्रीची किमया.त्याला ज्या ज्या वेळी बघावं त्या प्रत्येक वेळी तो निराळाच आणि नवीनच भासतो !!!! ह्या दरीलाच कुंडलिका व्हॅली म्हटलं जातं.सुमारे अर्धा तास आम्ही त्या ठिकाणी थांबलो आणि शेवटी भानावर येउन पाय उचलले !!!!

कुंडलिका व्हॅली आणि उजवीकडे कुंडलिका,नावजी व अंधारबन हे सुळके....

कुंडलिका व्हॅली आणि खाली दिसणारा उन्नई तलाव..ऑक्टोबर मधला फोटो...

पिंपरीचा पाझर तलाव...ऑगस्ट मधील फोटो..केवळ कल्पना येण्यासाठी दिला आहे...

कुंडलिकेच्या ह्या पॉइंट पासून वर फोटोत दिसणारा पाझर तलाव दहा मिनिटांवर आहे.आम्ही पाझर तलावाला पोचलो तेव्हा अकरा वाजले होते.खरं तर गाडीचा प्रॉब्लेम आला नसता तर आम्ही इथे साडेनऊलाच पोचलो असतो !!!! असो.आता इथून शेजारच्या सिनेर खिंडीत जाणारे टॉवर्स दिसतात .सिनेर खिंड म्हणजे वीर नावजी बलकवडेंचं स्मारक असणारी जागा.तिथे बांधलेलं स्मारक नसलं तरी विरगळ आहे.या टॉवर्सच्या खाली सुरुवातीला दगडांवर बाण काढलेले असून त्यांचा मग काढत गेलं की अर्ध्या तासात आपण पलीकडच्या डोंगरावर येतो आणि इथूनच अंधारबनाची वाट सुरु होते.एक गोष्ट इथे निक्षून लक्षात ठेवावी.ती म्हणजे या संपूर्ण ट्रेकमध्ये आपल्या अर्ध्या वाटेवरचं हिर्डी गाव येईपर्यंत फक्त एकाच ठिकाणी पिण्यायोग्य पाणी आहे आणि बाकी कुठेही नाही.हे पाण्याचं ठिकाणही ट्रेकच्या सुरुवातीच्या जागेपासून दोन तासांच्या अंतरावर आहे.त्यामुळे ट्रेकर्सनी आपल्याजवळ किमान तीन लिटर पाण्याचा साठा ठेवावा (अनेक लोक या मधल्या ठिकाणच्या पाण्याला बघून चित्रविचित्र चेहेरे करून पाणी पिण्याचं टाळतात..त्याचं दुर्दैव !!!!).या ट्रेकमध्ये प्रचंड जंगल असून उन्हाचा त्रास जरी होत नसला तरी चाल बर्रीच असल्याने पाणी सारखं लागतं..म्हणून ही सोय.टॉवर्स खालून निघाल्यापासून आम्ही अर्ध्या तासात जंगलात शिरलो आणि आपण पुणे जिल्ह्यातल्या एका अनवट जंगलात आहोत की आफ्रिकेच्या भयाण जंगलात असा प्रश्न क्षणार्धात सगळ्यांच्या मनाला शिवून गेला...अंधारबन...हे नाव या जंगलाला ज्यानी कुणी दिलाय ना त्याच्या क्रिएटिव्हीटीला मानाचा मुजरा !!!! काय विचार करून त्याला हे नाव सुचलं माहित नाही पण दोनशे टक्के सार्थ नाव असलेल्या निबिड अरण्यात आता आमचा प्रवेश झाला होता.दुपारी १२ वाजता गर्द झाडीने भरल्याने जर इथे अंधार असेल तर मावळतीला इथे काय परिस्थिती असेल याचा विचार करून पहा !!!! हा प्रत्यक्ष अनुभव प्रत्येकाने घ्यायलाच हवा !!! चालायला सुरुवात केल्यापासून अवघ्या काही मिनिटात डोक्यावर इतकं भारी छत्र आल्याने पब्लिक माझ्यावर ज्जामच खुश झालं होतं !!! अंधारबनाच्या या ट्रेकमध्ये सलग जंगल नाही. मध्ये मध्ये मोकळं माळरान आहे आणि नंतर परत जंगलाचा टप्पा आहे .त्यामुळे कितीवेळा जंगलाचे पॅचेस आणि किती वेळा मोकळी चाल हे सांगणं कठीण आहे. यथावकाश पहिला जंगलाचा टप्पा पार करून आम्ही वर उल्लेख केलेल्या पाण्याच्या नैसर्गिक कुंडापाशी पोचलो आणि आमच्यातील काही उत्साही पोरांनी आंघोळीची तयारी सुरु केलेली बघून माझी सटकली !!!! आधी ड्रायव्हर मुळे ठणठण झालीच होती.त्यात उन्हाचे तडाखे बसत नसले तरी वातावरणात उन्हाच्या झळा जाणवत होत्या. त्यामुळे भोजनवेळेत हिर्डी गाठून पुन्हा उरलेलं अंधारबन उतरून भिरा गाठायचं होतं.त्यामुळे "तुम्हाला पायथ्याच्या उन्नई धरणात हवं तेवढया वेळ जलक्रीडा करून देईन " असं आश्वासन देऊन मी त्यांच्या नाड्या आवळल्या !!! त्यांनीही स्वत:ला आवरतं घेऊन पुढची पायवाट तुडवायला सुरुवात केली !!!!

अंधारबनाच्या वाटेची एक झलक....

संपूर्ण पायवाट अशी रुळलेली असल्याने चुकनेका कोई चान्सही नही है !!!!

पाण्याच्या नैसर्गिक कुंडाचा हा स्पॉट..याच्या खालच्या टप्प्यातही थंडगार पाणी आहे... !!!!

नाव सार्थ करणारं अंधारबन...हा भर दुपारी काढलेला फोटो आहे !!!!

आपण मागच्या कुंडलिका पॉइंट पासून समोर जो डोंगर बघतो त्याला पूर्ण वळसा घालून त्याच्या पायथ्यापासून बर्रच चालल्यावर हिर्डी गाव येतं.हा पूर्ण वळसा अंधारबनाच्या गर्द जंगलातून आहे.काही ठिकाणी मोकळ्या पठारावरची कंटाळवाणी चाल असून ही थकावट दूर करण्यासाठी पुढे अंधारबनचं जंगल आपल्याला त्याच्या कवेत घ्यायला तयारच असतं !!! अशीच एक कंटाळवाणी तंगडतोड झाल्यावर पुन्हा जंगलात शिरून थोडं टेकल्यावर एक वाजला असल्याने आमच्यातील काही मंडळींनी इथेच जेवणाच्या पुड्या सोडायला सुरुवात केल्यावर "आत्ता जेवताना पाणी संपवाल तर पुढे हाल होतील.त्यापेक्षा गावात जाऊन जेवण करू " या माझ्या (फेकलेल्या) आश्वासनावर विश्वास ठेऊन बिचा-यांनी सगळं बि-हाड पुन्हा आवरलं !!!! हिर्डी यायला अजून किमान २ तास बाकी आहेत हे माहित असूनही मी लीडरच्या रोलमध्ये इतका मनसोक्त घुसलो होतो की "आता फक्त अर्धाच तास राहिलाय (असं मागच्या २ तासांपासून सांगत !!!!) आमची मिरवणूक पुढे नेत होतो !!!! शेवटी काही चतुर लोकांच्या हे लक्षात आल्याने त्यांनी एका मस्त मोकळ्या पठारावर बैठा सत्याग्रह पुकारून "आता खरा किती वेळ राहिला आहे हे सांगितलं नाहीस तर एकही माणूस आजच्या दिवसात इथून हलणार नाही " अशी धमकीच दिल्याने मला सत्य कबूल करण्यावाचून पर्याय उरला नाही !!! मी वरती ज्या डोंगराचा उल्लेख केला त्याच्या पायथ्याच्या विस्तीर्ण पठाराला आम्ही " तैलबैला पॉइंट " असं नाव दिलंय.याचं कारण म्हणजे तुम्ही ह्या डोंगराच्या पायथ्याला पोचलात की उजवीकडे तैलबैल्याच्या आभाळात घुसलेल्या त्या दोन अजस्त्र कातळभिंती आणि शेजारीच घनगडाचा बुटका डोंगर नजरेस पडतो.सप्टेंबर - ऑक्टोबर मध्ये तर या स्थळाचा महिमा काय वर्णावा !!!! केवळ स्वर्ग !!!! चारही बाजूला पसरलेली पिवळ्या - जांभळ्या फुलांची चादर..मागे त्या प्रचंड आकाराच्या पर्वताने ल्यालेली हिरवाईची शाल..दोन्हीकडे ढगांचे असंख्य पुंजके आणि मध्ये आपण...निस्तब्ध होऊन ते दृश्य मनात साठवून घेणारे...एक चक्कर पावसाळ्यानंतर इथे झालीच पाहिजे. या पठारापासून हिर्डी गाव एक तासावर आहे (यावेळी खरोखरंच एक तास !!!!).दुपारचे दोन वाजत आले होते.पाण्याच्या बाटलीने खडखडाटाचा नारा द्यायला सुरुवात केली होती .त्यामुळे आता थेट गावातच जाऊन थांबावं असा विचार सुरु असतानाच आमच्या मागच्या फळीने साळींदराचे काटे सापडले म्हणून अजून पंधरा मिनिटं खाल्ली.उन्हाचे चटके आता सहन होत नव्हते.शेवटी बरीच ओरड केल्यावर आमची मागची "साळींदर माझा सांगा कुणी पहिला" करणारी टाळकी आमच्या कळपात येउन मिसळल्यावर आमची पावलं पुन्हा हिर्डीच्या दिशेने वळाली !!! पण एक मात्र आहे.कुंडलिका पॉइंटवरून निघाल्यापासून पार खालचं भिरा गाव येईपर्यंत या ट्रेकमध्ये कुठेही चढ नाही.मध्ये जंगलातली नगण्य अशी पाचेक मिनिटांची चढण सोडली तर संपूर्ण पायवाट सपाटीची आहे.त्यामुळे तसं एक्झर्शन काहीच नाहीये. हिर्डी गावाच्या बरंच अलीकडे एका झाडाखाली विठ्ठल रुक्मिणीची उघड्यावरील मूर्ती असून आता गाव आलं हे ओळखण्याची ही एक उत्तम खूण आहे.तैलबैला पॉइंट वरून निघाल्या पासून अर्ध्या तासाने हिर्डीची शेतं सुरु होतात.तिथे काम करणा-या शेतक-याला बघून इतक्या वेळाने जिवंत माणूस दिसला हा आनंद अनावर झालेल्या आशिष शर्माने इतक्या जोरात बोंब मारली की त्या शेतक-याच्या बैलाच्या अंगावरही दचकल्याने सर्रकन काटा आला !!! आशिषच्या चेहे-यावर म्हणजे आपण कित्येक महिने या निर्मनुष्य प्रदेशात वाट चुकून एकटेच भटकत आहोत आणि आपल्या पत्रिकेतल्या ग्रहांची दशा बदलल्याने त्यांची आपणावर कृपा होऊन हा शेतकरीरुपी देवदूत भेटला असले काहीतरी भाव होते !!!! शेवटी त्या शेतक-यानेही त्याचा उत्साह समजून घेऊन "आता फक्त ५-७ पावलांवर गाव आहे" असं सांगून त्याच्या आनंदात दुप्पट भर पाडली !!!! आम्ही त्याला आवरून थोडसं पुढे गेलो आणि एक अनपेक्षित धक्का बसला. हिर्डी हे गाव अशा ठिकाणी आहे की गावातल्या लोकांना तांदूळ जरी आणायचे म्हणले तरी सुमारे दीड तास भि-यापर्यंत उतरत जावं लागतं आणि तेवढंच अंतर पुन्हा चढून यावं लागतं.गावात कुणी सिरियस कंडीशन मध्ये असेल डॉक्टरला गाठण्यासाठी हे अंतर कापण्यावाचून त्यांच्याकडे पर्याय नसतो.गावातील मुलही शाळेसाठी सुमारे दोन तास नागशेत किंवा घुटक्याला चालत जातात आणि येताना पुन्हा दोन तास तंगडतोड करत येतात.मी हा ट्रेक आधी तीन - चारदा केल्याने मला हे सगळे प्रकार माहित होते .पण या वेळी गावात प्रवेश करण्याच्या आधी थोडं अलीकडे दोन जीप येउन आरामात सावलीत उभ्या होत्या. शेवटी गावात पोचल्यावर याचा उलगडा झाला.तो म्हणजे हिर्डीच्या गावातील लोकांच्या परिस्थितीला लक्षात घेऊन घनगडाशेजारच्या घुटके गावातून हिर्डीपर्यंत कच्चा रस्ता काढण्यात आला असून पुढच्या काही दिवसात तो डांबरी रस्त्याचं रूप घेईल. हा रस्ता तयार होताना अंधारबनाचं वैभव मात्र अबाधित राहो अशी मनोमन प्रार्थना करून आम्ही गावातल्या शिवमंदिरात जाऊन विसावलो.या मंदिराच्या बाहेर एक मोठ्ठ पुष्करणी सारखं कुंड असून मंदिरातच बारमाही थंड पाण्याचा झरा आहे.आमच्या ग्रुपातल्या तन्मय,संजीत आणि कुलकर्णी काकादी तहानलेल्या जीवांना ते पाण्याचं टाकं बघून काय भरून आलं म्हणून सांगू तुम्हाला !!!! मागचे सहा सात तास आम्ही अगदी विदाऊट पाण्याचे भटकत नसलो तरी बाटल्यांमधलं पाणी आग ओकणा-या सूर्यनारायणाच्या कृपेने गॅस गिझर मधल्या पाण्यासारखं गरम झालं असल्याने हा थंड पाण्याचा अनलिमिटेड स्त्रोत म्हणजे बंपर गिफ्टच होतं !!! आता आधी जेवावं का आधी पाठ टेकवावी ह्यावर चर्चा सुरु होणार तेवढयात आमच्या ड्रायव्हर महाशयांचा " मी भि-याला पोचलोय.कधी येताय !!!!" असा फोन आल्याने पहिला पर्याय स्वीकारण्यात आला (इतका वेळ आम्ही,आपण आपली स्वत:ची गाडी ट्रेकसाठी घेऊन आलोय हे विसरूनच गेलो होतो !!!!) उन्हाच्या काहिलीत ते जेवण अगदी बेचव लागत असलं तरी दुसरा मार्ग नव्हता.जेवणाचा शेवटचा घास पोटात गेल्या गेल्या मंदिराच्या थंडगार फरशीवर सांडलेल्या तन्मयादी पोरांना बघून आमच्यातल्या काही ज्येष्ठ नागरिकांनाही झोप अनावर झाली होती.चार वाजले होते.साडेचारला आम्ही हिर्डीचा निरोप घेऊन भि-याकडे उतरायला सुरुवात केल्यावर उजवीकडे सरसगड आणि सुधागडाने डोकी वर काढली.हा उतार फार फार तर एक दीड तासांचा असून गावक-यांच्या रोजच्या वापरातला असल्याने राजमार्ग आहे.उन्नई धरणाला पोचलो तेव्हा सव्वासहा होत आले होते.उन्नई धरणाचा तो विस्तीर्ण जलाशय बघून मी सकाळी केलेल्या कमीटमेंटचा द्र्रुष्टांत झाल्याने असंख्य म्हशी अंगात संचारलेल्या संजीत आणि आशिषने त्या पाण्यात कधी बुडी मारली ते कळालच नाही (शप्पथ सांगतो...ते दोघं त्या पाण्यात डुंबताना खरोखरच म्हशिंसारखे दिसत होते !!!!) उन्नईतून सगळ्यांची जलक्रीडेची हौस भागवून निघालो तेव्हा सात वाजले होते.अमितही त्याच्या ब-या झालेल्या रथाला घेऊन तीन वाजताच आलेला होता.त्याला साष्टांग दंडवत घालून समस्त टोळकं गाडीत शिरलं आणि गाडी ताम्हिणी घाट चढू लागली !!!!

हाच तो तैलबैला पॉइंटचा अजस्त्र डोंगर..इथून हिर्डी तासाभराच्या अंतरावर आहे..

डावीकडचा झाडामागचा सुळका म्हणजे तैलबैला आणि उजव्या कोप-यात बुटका घनगड दिसतोय...

तैलबैला पॉइंटचं प्रचंड मोठ पठार..ऑगस्ट मधील फोटो...

भि-याकडे उतरताना दिसणारा ताम्हिणी घाट....

उन्नईचा विस्तीर्ण जलाशय..एवढया तंगडतोडी नंतरच्या श्रमपरिहारासाठीची अप्रतिम जागा !!!!

तर असा हा आमचा अंधारबनचा ट्रेक !!! या सा-या अडचणी येऊनसुद्धा सुफळ संपूर्ण झाला (या ट्रेकचा गाडीवाला नवीन आणि अनोळखी होता म्हणून ही मुसीबत आली होती.त्यानंतरच्या प्रत्येक ट्रेकला आमचा नेहमीचा गाडीवाला असल्याने आजपर्यंत कसलाही प्रॉब्लेम आलेला नाही !!!) आमचं पब्लिक तर घराजवळच मिळालेल्या या हक्काच्या जंगलावर प्रचंड खुश झालं आहे !!!! मी मगाशी म्हटलं तसं हा ट्रेक मी तीन चार वेळा केला असला तरी या वेळचं अंधारबन मला वेगळंच भासलं.बरोबरची माणसं बदलली तरी सह्याद्रीचा रुबाब थोडीच बदलतो !!! त्याचं रूप फक्त ऋतुपरत्वे बदलत रहातं आणि प्रत्येक वेळी....प्रत्येक क्षणी एक नवा अनुभव देऊन जातं !!!!!

सह्याद्रीमित्र...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.

छान जागा आहे... पहिल्यांदाच ऐकलं...

आम्ही एकदा पावसाळ्यात कैलासगडावर गेलो होतो तेव्हा तुमच्या पहिल्या फोटोच्या ठिकाणी थोडा वेळ थांबलो होतो...

बरोबरची माणसं बदलली तरी सह्याद्रीचा रुबाब थोडीच बदलतो !!! त्याचं रूप फक्त ऋतुपरत्वे बदलत रहातं आणि प्रत्येक वेळी....प्रत्येक क्षणी एक नवा अनुभव देऊन जातं !!!!! > अनुमोदन

सुंदर वर्णन.. आवडलं Happy

सुंदर वर्णन.. अशा अनोळखी वाटा पण शोधता, आणि इथे लिहिता, हे आमचे भाग्यच.

आफ्रिका खंडात, आता नऊ वर्षे काढली असल्याने, थोडे स्वातंत्र्य घेतो. महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी जमिनीखाली कातळ आहे. आपल्याकडची झाडे फारशी उंच वाढू शकत नाहीत. त्यामूळे आफ्रिकेतल्या सुपीक जमिनीवर वाढणार्‍या जंगलाशी, आपल्या जंगलाची तुलना होऊच शकत नाही.
हाच प्रकार आपल्याकडे उत्तरेकडे आहे. तिथल्या नद्यांच्या सुपीक खोर्‍यात झाडे, खुप छान वाढतात.

पण म्हणून आपले वैभव कमी प्रतीचे आहे असे नाही. आपल्याकडची विविधता जगात इतरत्र नाही.
तूम्ही सर्वांनी, अशा ठिकाणी कुठली झाडे बघितली, याची नोंद ठेवली तरी याची खात्री पटेल.

व्वा! तेलबैला वेगळ्या कोनातून भारीच .. !! अप्रतिम लेख.. ओंकार रॉक्स्स्स्स्स!!!
मायबोलीकरांचा काढू या ट्रेक या अंधारबनाचे उजेडबन (..की उजाड!) व्हायच्या आत..!

एप्रिलमध्ये पुढील प्रस्तारोहण कार्यक्रम ठरविण्यासाठी आणि रेकि करण्यासाठी कुंडलिका valley ला भेट देवून आलो. आणि आलोच आहोत तर एखादा सुळकापण सर करूया अस ठरलं. फक्त रेकी करण्यासाठी आल्यामुळे प्रस्तरारोहणाचा जास्त सामान आणलं नव्हत.

तेव्हा तुमच्या पहिल्या फोटो मध्ये असलेला सगळ्यात पहिला आणि लहान सुळका दीड तासात सर केला (दुसरा कुंडलिका आणि तिसरा अंधारबन).

त्या वेळेस त्या सुळक्याचे नाव माहित नव्हते. आज माहित झाले, ''नावजी''. ''धन्यवाद''

सुळका चढाई करून खाली उतरल्यावर, अस लक्षात आल कि २ शिड्या (प्रस्तरारोहक चढाई करताना विश्रांतीसाठी वापरतात त्या) वरच कुठेतरी राहिल्या आहेत. आमचे गुरुजी ''किरण अडफडकर' यांनी फक्त ते एकल आणि कमरेला दोर बांधून सरळ चढाईला सुरुवात केली आणि फक्त १० मिनिटांमध्ये तो सुळका परत सर केला.

अप्रतिम!!!!

हेमः:: मायबोलीकरांचा काढू या ट्रेक या अंधारबनाचे उजेडबन (..की उजाड!) व्हायच्या आत..! >> +१०००