प्रतारणा....

Submitted by बागेश्री on 18 February, 2013 - 11:34

हो, मी प्रतारणा करतेय.
तुझ्याशी, त्याच्याशी, तिच्याशी, आई- बाबांशी, समाजाशी - नाही.

तर 'आयुष्या', तुझ्याशी!

जन्म झाला, पहिलावहिला श्वास घेताना माझ्या हाताची कोवळी बोटे तुझ्या कणखर हातात गुंफली.... अपार विश्वासाने. शेवटाच्या श्वासालाच ही पकड सुटेल, गृहीत धरलं असावं..

मी तुझ्यापेक्षा लहान, सर्वार्थाने!  तू मोठा, सर्वार्थाने.
आणि म्हणूनच तू माझ्याही नकळत हात सोडवून घेऊन माझं बोट धरलंस.... ताबा घेतलास.

आता तू नेशील तशी निघाले..
माझ्या वाटा, माझ्या इच्छा, माझं जगणं, माझे बेत... नव्हतेच कुठे!
दिशा तुझी, बेत तुझे... सारं तुझं, मी तुझ्या बोटाशी लोंबकळत... कधी बेताची चाल, तर कधी तुझ्या वेगाशी समरसताना झालेली दमछाक....
ह्यात भरीला, 'परिस्थिती' नावाची सखी तुझी!
तुझं बोट सोडवण्याचा बंडखोरीचा विचारही करता, दुसर्‍या हाताचं बोट घट्ट धरायलाही सजग... आता पावलं पडली नाही तरी तुम्ही दोघे फरफटत नेणार... तुमच्याच दिशेने... तुमच्याच पद्धतीने.

का घडलं असं?
तुझ्यावर टाकलेल्या विश्वासाने?
तुला जाणीव असावी, "मी म्हणजे सर्वस्व, ही म्हणजे असहाय्य?
असे अनेक जण घेऊन मी धावतोय..
जो थांबला, तो संपला.
माझं बोट सुटलं, की एक जीवनसत्र संपुष्टात आलं..."

ही असहाय्यता, आम्हीच ओढवून घेतली आहे, आमच्यावर, तुला अकारण महत्त्व देऊन. जन्मापासून ते शेवटापर्यंत..

आता पुरे ना!
बदल घडवूयात.

तुझ्यावरचं हे अवलंबत्व मला झुगारायचंय.
तुझ्या विरूद्ध दिशेला वाटचाल करायची आहे.
जिथे मी बेत ठरवेन... माझ्या इच्छा असतील.. वाटा माझ्या असतील, वेगही माझा असेल.
पदोपदी धक्के नसतील... ठराविक मुक्काम असतील.
तुझीच नाही तर तुझ्या सखीची तमा बाळगण्याचा प्रश्नच नाही...

'सुटका होऊच शकणार नाही, ह्यांना स्वतःचं अस्तित्त्व नाही', ह्या समजूतीत सैल झालेले तुमचे हात झिडकारण्याची हीच वेळ!

हीच प्रतारणेची वेळ...

निघालेय...
आठवण आलीच, स्वतःची हार मंजूर करता आली, तर ये परतून...
माझं बोट तू धरल्यास, माझी हरकत नाही.

- बागेश्री
http://venusahitya.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही वेळा मुद्दे फार एलॅबोरेट करण्याने 'अरे हो, हेच मला म्हणायचे होते' असे अभिप्राय येऊ शकतात. पण अल्पाक्षरीत्वाची मजा डोके फिरवते.

एक जुनी द्विपदी वाचलेली आठवली. कोणाची आहे आठवत नाही.

तुझे आहे बरे, येतोस अन् जातोस केव्हाही
तुझ्याहीहून आहे मी अनाकलनीय आयुष्या

कळावे

गं स

सचिन धन्स...
हा विचार साधारण आहे.. सगळ्यांच्याच मनात जगताना कधी न कधी येऊन जाणारा. त्याला ललितअंगाने फुलवण्याचा प्रयत्न केला Happy

गंस
द्विपदी छान आहे..

आवडेश .. मस्त आहे.

<आठवण आलीच, स्वतःची हार मंजूर करता आली, तर ये परतून...
माझं बोट तू धरल्यास, माझी हरकत नाही.> सुरेख....

ही असहाय्यता, आम्हीच ओढवून घेतली आहे, आमच्यावर, तुला अकारण महत्त्व देऊन. जन्मापासून ते शेवटापर्यंत..

आता पुरे ना!
बदल घडवूयात.

तुझ्यावरचं हे अवलंबत्व मला झुगारायचंय.<<<

'सुटका होऊच शकणार नाही, ह्यांना स्वतःचं अस्तित्त्व नाही', ह्या समजूतीत सैल झालेले तुमचे हात झिडकारण्याची हीच वेळ!<<<

मस्त

Mazya mate, ya lalit cha vishay far vegala nahie, tari tu jya prakare mandani keli ahes tya mule te prabhavee zalay...

Arthat, vishay fulavane hi tuji khasiyat ahech.. Happy

Shubhechchhaa!
(
Sorry mobile varun type kelay)

नेहमीचाच विषय. पण ह्यातला 'मी' कसा एकदम मोठा, उत्तुंग झालाय...
एकदम मलाही झडझडून उठून कुठेतरी चालत सुटावसं वाटलं.

वाटलं... आयुष्याला त्याच्या नशीबावर सोडून द्यावं Happy

बागेश्री मला त्यातला "प्रतारणा" शब्दं खटकला, मात्रं... स्वत्वाची जाणीव झाल्यावर अवलंबित्वाशी झालेली फारकत ही प्रतारणा नाही नं होत...
तसं केलं नाही तर मात्रं... ती "स्व"तःशी केलेली मोठ्ठी प्रतारणा असेल.

खूप आतून अन तरीही सहज लिहितेस हे सगळ्यांनी पुन्हा पुन्हा सांगून झालय... पण मलाही हे परत एकदा सांगितल्याविना राहवत नाहीये.