यूआयडी आधार कार्ड साठी होणारी अडवणूक टाळा ; ही कागदपत्रे जवळ बाळगा

Submitted by विक्रांत-पाटील on 17 February, 2013 - 04:16

यूआयडी आधार कार्ड साठी होणारी अडवणूक टाळा ; ही कागदपत्रे जवळ बाळगा

अनेकदा आपली अडवणूक होते ती पुरेशी माहिती न ठेवल्यामुळे किंवा कर्णोपकर्णी ऐकलेल्या माहितीची खातरजमा न करता तिच्यावर सरसकट विश्वास ठेवल्यामुळे. सरकार अनेकदा आवाहन करते त्या जाहिराती आपण वाचतही नाही. माझ्या स्वत:च्या अनुभवावरून हे लिहितोय. 'आधार' साठी कंत्राटी मुले असतात; ते फक्त नाव व पत्ता नोंदवून मोकळे होतात. इतर माहिती नोंदविण्याचा कंटाळा करतात. मात्र ई-मेल व मोबाईल क्रमांक जरूर नोंदवून घ्यावेत. एजन्सीच्या माणसाने केलेल्या नोंदी योग्य असल्याची खात्री करून मगच पोचपावती स्वीकारावी. त्याने ई-मेल व मोबाईल क्रमांक लिहिलेले नसल्यास ते त्याला नोंदविण्यास सांगणे. बँक अकाउंट क्रमांकही आधारला नोंदणीच्या वेळीच जोडून घ्यावा.

आधार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे :
१. ओळखीचा पुरावा (पीओआय: प्रूफ ऑफ आयडेण्टिटी)
२. रहिवाशी पत्त्याचा पुरावा(पीओए: प्रूफ ऑफ एड्रेस)

आपल्याला फक्त खालील दोनपैकी प्रत्येकाची एकेक झेरॉक्स कागदपत्रे व खातरजमा/­पडताळणीसाठी मूळ (ओरिजिनल) डॉक्युमेंट आणायची आहेत. जर ओरिजिनल जवळ नसतील तर फक्त सक्षम राजपत्रित अधिकारी किंवा पब्लिक नोटरी यांच्याकडून एटेस्टेड असलेली कागदपत्रेही खातरजमा/­पडताळणीसाठी ग्राह्य धरली जातात; ती आणावी लागतील.

ओळखीचा पुरावा (पीओआय) व रहिवाशी पत्त्याचा पुरावा (पीओए) ही दोन कागदपत्रेच महत्त्वाची आहेत. इतर सर्व रकान्यात माहिती नोंदणी एजन्सी भरेल किंवा ती ऐच्छिक आहेत. तरीही रकाना ९ मधील जे बँक अकाउण्ट आधार कार्डशी जोडायचे आहे त्याची माहिती जरूर भरावी. त्यासाठी बँक खाते क्रमांक आणि खाते असलेल्या शाखेचा आयएसएफसी कोड आपणास माहिती असावा. ज्यांच्याकडे बर्थ सर्टिफ़िकेट (जन्मदाखला), एसएसएलसी बुक/­सर्टिफ़िकेट, पासपोर्ट किंवा अ श्रेणीच्या फ़र्स्ट क्लास राजपत्रित अधिकारयाने लेटरहेडवर दिलेला जन्मदाखला या चौघांपैकी एक डॉक्युमेंट असेल त्यांनी रकाना ५ मध्ये वयाचा (एज) तपशील नोंदविताना व्हेरिफ़ाईड (पडताळलेले) बॉक्समध्ये टीक करावे. ज्यांच्याकडे जन्मतारखेची कागदपत्रे नाहीत; पण जन्मतारीख माहिती आहे त्यांनी डिक्लेअर्ड (घोषित) बॉक्समध्ये टीक करावे. ज्यांना जन्मतारीख नेमकी माहिती नाही त्यांनी फक्त अंदाजे वय लिहावे. ज्यांच्याकडे आपल्या घरी जनगणना करायला आलेल्या व्यक्तीने दिलेली एका छोटीसी स्लीप असेल त्या स्लीपरील एनपीआर नंबर (राष्ट्रीय जनगणना रजिस्टर सर्वेक्षण स्लीप क्रमांक) लिहावा.
आधार नोंदणी फॉर्म केवळ एका पानाचा अतिशय सोपा व सुटसुटीत आहे. फक्त माहिती भरताना कैपिटल लेटर्समध्ये अचूक व नेमकी भरावी. फॉर्म जरी एजन्सीच्या माणसाने भरला तरी आपण स्वत: अचूक माहिती नोंदविल्याची खात्री करून घ्यावी. पत्ता, वय व बँक खाते क्रमांक याबाबत विशेष काळजी घ्यावी.
आपण आधार नोंदणीसाठी ही माहिती जरूर लक्षात ठेवावी. इतरत्रही आपणास, आपले मित्र, नातेवाईक, शेजारी, परिचित यांना ती उपयोगी पडू शकते. नेमक्या माहितीअभावी अनेकदा गोंधळ उडतो, फसवणूक होउ शकते. आधार नोंदणीसाठी बाहेरही कुठे एक पैसाही शुल्क लागत नाही. आधार कार्डची नोंदणी कोणीही भारतभर कोणत्याही केंद्रावर करू शकतो; फक्त त्याच्याजवळ ओळखीचा पुरावा आणि जो पत्ता नोंदावितोय घराचा त्याचा पुरावा आवश्यक असतो.
आधार फॉर्म अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड केलेलाही चालतो. त्यात नोंदणीच्या वेळी केंद्रावर एजन्सीमार्फत रकाना १ मध्ये जो प्रीएनरोलमेण्ट आयडी (नोंदणी क्रमांक) नोंदविला जातो. तो नंतर आधार कार्डवरही वरच्या बाजूस नमूद करून येतो. जे पूर्वीचे फॉर्म आहेत त्यात हा प्रीएनरोलमेण्ट आयडी छापील असायचा म्हणून सरकारी फॉर्मचीच सक्ती असायची. आता मात्र कोणताही विहित नमुन्यातील फॉर्म चालतो. त्यात प्रीएनरोलमेण्ट आयडी नोंदणी एजन्सी भरून देते.

१) ओळखीचा पुरावा (पीओआय: प्रूफ ऑफ आयडेण्टिटी)
(खालील १८ पैकी कोणतेही एक ज्यावर पत्ता स्पष्ट व पूर्ण नमूद असावा; त्याच पत्त्यावर पोस्टाद्वारे आधार कार्ड पाठविले जाईल.)-
पासपोर्ट, पैन कार्ड, रेशन कार्ड/पीडीएस फ़ोटो कार्ड, व्होटर्स कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सरकारी फ़ोटो आयडी कार्ड/ सरकारी कंपनीचे आयडी कार्ड, एनआरईजीएस जॉब कार्ड, नोंदणीकृत शैक्षणिक संस्थेचे आयडी कार्ड, शस्त्र परवाना, फ़ोटो असलेले सरकारी बँकेचे एटीएम कार्ड, फ़ोटो असलेले सरकारी बँकेचे क्रेडिट कार्ड, पेन्शनर्स फ़ोटो कार्ड, फ्रीडम फ़ायटर फ़ोटो कार्ड, किसान फ़ोटो पासबुक, सीजीएचएस/­ईसीएचएस फ़ोटो कार्ड, पोस्ट खात्याने जारी केलेले पत्यासह फ़ोटोआयडी कार्ड, आधार कार्ड काढू इच्छिणारयाच्या फोटोसह राजपत्रित अधिकारी किंवा तहसीलदार यांच्यापैकी कुणीही एकाने लेटरहेडवर दिलेले ओळखत असल्याचे पत्र, राज्य सरकारचे फोटोसह अपंग कार्ड.

२) रहिवाशी पत्त्याचा पुरावा (पीओए: प्रूफ ऑफ एड्रेस) :
(खालील ३३ पैकी कोणतेही एक ज्यावर पत्ता स्पष्ट व पूर्ण नमूद असावा; त्याच पत्त्यावर पोस्टाद्वारे आधार कार्ड पाठविले जाईल.)-
लाईटबिल, टेलिफोनबिल, रेशनकार्ड, पासपोर्ट, सरकारी बँक खात्याचे पासबुक किंवा अकाउंट स्टेटमेण्ट, मतदान ओळखपत्र, सरकारी ओळखपत्र, पाणी पट्टी बिल, घरपट्टी बिल, मालमत्ता कर भरणा पावती, क्रेडिट कार्ड स्टेटमेण्ट, एलआयसी/­इन्शुरन्स पोलिसी, आधार कार्ड काढू इच्छिणारयाच्या फोटो व रहिवाशी पत्त्यासह बँकेने लेटरहेडवर दिलेले पत्र, आधार कार्ड काढू इच्छिणारया कर्मचारयाच्या फोटो व रहिवाशी पत्त्यासह नोंदणीकृत नियोक्ता कंपनीने लेटरहेडवर दिलेले पत्र, आधार कार्ड काढू इच्छिणारयाच्या फोटो व रहिवाशी पत्त्यासह नोंदणीकृत शैक्षणिक संस्थेने लेटरहेडवर दिलेले पत्र, एनआरईजीएस जॉब कार्ड, शस्त्र परवाना, पेन्शनर कार्ड, फ्रीडम फ़ायटर कार्ड, किसान पासबुक, सीजीएचएस/­ईसीएचएस कार्ड, आधार कार्ड काढू इच्छिणारयाच्या फोटो व रहिवाशी पत्त्यासह खासदार/आमदार/­राजपत्रित अधिकारी किंवा तहसीलदार यांच्यापैकी कुणीही एकाने लेटरहेडवर दिलेले पत्र, आधार कार्ड काढू इच्छिणारयाच्या फोटो व रहिवाशी पत्त्यासह सरपंचाने ग्रामपंचायतीच्य­ा लेटरहेडवर दिलेले पत्र(फक्त ग्रामीण भागासाठी), आयकर विवरण आदेश, वाहन नोंदणी पुस्तक (आरसी बुक), नोटरी केलेले सेल/लीझ/­रेण्ट करारपत्र, पोस्ट खात्याने जारी केलेले पत्यासह फ़ोटोआयडी कार्ड, राज्य सरकारने जारी केलेले आधार कार्ड काढू इच्छिणारयाचा फोटो असलेले कास्ट किंवा डोमिसाईल सर्टिफ़िकेट, राज्य सरकारचे अपंग कार्ड, एलपीजी गैस कनेक्शन बिल, पत्नीचा पासपोर्ट, वडिलांचा पासपोर्ट(अज्ञान मुलांसाठी फक्त)

आधारचा फॉर्म नंदन निलकेणी यांच्या भारत सरकारच्या अधिकृत वेबसाइटवरून डाऊनलोड करा.
http://­uidai.gov.in/­images/­FrontPageUpdates­/uid_download/­enrolmentform.pd­f

तुमच्या शहरा, घराजवळील आधार नोंदणी केंद्रांची यादी पाहा -
http://­appointments.uid­ai.gov.in/­easearch.aspx

आधार कार्ड नोंदणीसाठी ऑनलाईन वेळ निश्चित करून (आपोईन्टमेन्ट घेउन) गैरसोय टाळा-
http://­appointments.uid­ai.gov.in/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Very useful. Thanks !!!
Why its (the article) is in "Media til Maaybolikar" group???

चांगली माहीती. मी गेल्या वर्षी मे महिन्यात २ तास रांगेत उभे राहून मग आधार कार्ड ची नोंदणी केली आहे परंतु अजून कार्ड घरी आले नाहीये. रिसिट आहे माझ्याकडे. अश्या वेळेस कुठे तक्रार करायची?

रिसिट आहे माझ्याकडे. >>> तुम्ही ट्राक करू शकता.

बँक खाते कोणत्याही बँकेचे चालते का?>>> बँक खाते द्यायलापाहिजे अशी अट नाहिये.

बँक खाते कोणत्याही बँकेचे चालते का? << शक्यतो राष्ट्रीयकृत बॅकेचे असावे , को-ऑपरेटीव किंवा पतपेढी नको

विक्रांत, खूपच उपयुक्त माहिती दिलीत. धन्यवाद.

१) ओळखीचा पुरावा (पीओआय: प्रूफ ऑफ आयडेण्टिटी)
२) रहिवाशी पत्त्याचा पुरावा (पीओए: प्रूफ ऑफ एड्रेस)

या दोन गोष्टींबाबत माझे प्रश्न असे आहेत -

A] फक्त सरकारी बँकेचे पासबुक उपलब्ध असेल (ज्यावर फोटोही असतो) तर या दोन्हीं पुराव्यांची पूर्तता त्यातून होईल का?

B] फक्त पासपोर्ट उपलध असेल तर वरील दोन्ही पुराव्यांची पूर्तता त्यातून होईल का?

दुसरे म्हणजे, कुटुंबातील व्यक्ती प्रत्येकाच्या सोयीनुसार वेगवेगळ्या वेळी स्वतंत्र फॉर्म भरून आपले आधारकार्ड मिळवू शकतात का? अ‍ॅपॉईंटमेंट घेतल्यानंतर कुटुंबातल्या सगळ्यांनी त्यावेळी हजर असणे आवश्यक आहे असेही ऐकले, पण ते प्रॅक्टीकल वाटले नाही, म्हणून हा प्रश्न.

आम्हाला आलेला अनुभव सांगते. कागदपत्रांच्या बाबतीत एकच पासपोर्ट हा प्रूफ ऑफ आयडेंटीटी, प्रूफ ऑफ अ‍ॅड्रेस आणि प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ- हा सगळ्याला चालतो. प्रत्येक यादीत कॉपी ऑफ पासपोर्ट आहे. तरीही एकच कागद सर्वसमावेशक म्हणून चालत नाही. तीन प्रूफं हवी आहेत, मग एकच कागद कसा?- असा प्रश्न विचारणारे सरकारी कर्मचारी आहेत Sad एकाच कागदात सर्व काही आहे असं सांगितलेलं पटत नाही त्यांना.

त्यामुळे असलेले सर्व पुरावे- पासपोर्ट कॉपी, बॅन्क पासबुक, वीजे बिल, पॅनकार्ड, बर्थ सर्टिफिकेट असे सर्व काही घेऊन जा. त्यांचा मूड आणि समज असेल त्या प्रमाणे पुरावे घेतील ते. कर्मचारी बरे असतील, तर एकच पासपोर्ट कॉपी पुरेल.

एकाच कुटुंबातील सगळे एकत्र गेले की डेटा एन्ट्रीचे काम सोपे होते :प फॉर्म सबमिट करताना ते पुढची वेळ देतात छाननीसाठी. त्याच वेळी ती वेळ आपल्या सोयीनुसार आहे की नाही ते तपासून घ्यावे. शक्यतो शनिवार हवा असेल तर सांगावे आधीच. (बरेचदा मात्र नको ती कटकट म्हणून ते देतील त्या वेळेला आपण लेट मार्क, हाफ डे वगैरे स्व्यापसव्य करतो हा भाग वेगळा)

मूड आणि समज <<< पौर्णिमा, हो ना..

अर्ध्या सदस्यांचे पासपोर्ट आहेत. अर्ध्यांचे सरकारी बँकेतले पासबुक. लेट मार्क, हाफ डे काय अख्ख्या दिवसाची पण रजा टाकायची तयारी आहे. पण एका फटक्यात काम व्हावे हेच स्वप्न! छाननीसाठी एका परिचितांना एक महिन्यापूर्वी जुलैमधली तारीख मिळाली आहे. आता आधारकेंद्रांची संख्या आणखी वाढवणार असे एका बातमीत ऐकले. म्हणून अजून थोडे थांबावे काय असा विचार मनात येतोय.

(स्वगत पुटपुट : या बातमीच्या खांद्यावर त्यानिमित्तानं हे काम अजून थोडे पुढे ढकलले जातेय या आळशी विचाराची बंदूक ठेवू नको. राम राम राम राम ... आज नाहीतर उद्या हे करायचे आहे. मग जेवढ्या लवकर सुरू करशील तेवढ्या लवकर ते होईल. पुढे ढकलायचा मोह टाळ... राम राम राम राम राम. )

माझा पासपोर्ट लग्नाआधी काढलेला आहे. त्यात माहेरचे नाव व पत्ता आहे. अमेरिकेत गेल्याने नाव बदलून घेतलेले नाही. गॅस, फोन, इलेक्ट्रीक कुठचेच बिल माझ्या नावावर नाही. वोटर्स कार्ड कधी मिळालच नाही. डोमेसाईल बर्थ सर्टीफिकेट वगैरे आहे. मॅरेज सर्टीफिकेट वर सध्या रहातो तो पत्ता नाही. अशा वेळी आधार कार्ड अ‍ॅप्लिकेशन कसे करावे?

वरदा, अशा वेळेस पासपोर्ट नाही चालणार. ज्या नावाने / पत्त्याने आधार कार्ड बनवायचे आहे ते सिद्ध करणारी कागदपत्रं लागतात.

नोंदणी केंद्राच्या यादीत फक्त हवेली/मुळशी पुणे शहर आणि अजून एक कोणता तरी ऑप्शन दिसतोय. सगळीकडे क्लिक करून पाहिलं पण मला सुट होईल असं केंद्र नाही दिसत. Uhoh
त्या खालच्या लिंक वर तर फक्त मुंबई/नागपूर/ठाणे ही तीनच ठिकाणं दिसतायत.

माझा अनुभव - मी आधार कार्डाच्या वेबसाईटवरुन, फॉर्म डाऊनलोड करुन घेतला आणि Oriental Bank of Commerce मध्ये बरोबरची सगळी कागदपत्र घेउन गेलो.
तिथे गेल्यावर तो माणुस म्हणे, वेबसाईटवरुन घेतलेला फॉर्म चालणार नाही, त्याच्यावर Oriental Bank of Commerce चा लोगो नाही.
म्हणलं ऐकावं ते नवलचं! पण शेवटी विचार केला की हे सरकारी काम आहे, इथे कामापेक्षा फाटेच जास्त फोडतात.

आधारसाठी रजिस्ट्रेशन कुठुन करु शकतो? प्रत्येक केंद्र ठराविक विभागातील अर्ज स्विकारते का? एखादा बोरिवली (पुर्व) ला राहत असेल तो बोरिवली (पश्चिम) किंवा दादर असे कुठेही जावुन अर्ज करु शकतो का?

आधारसाठी रजिस्ट्रेशन कुठुन करु शकतो? प्रत्येक केंद्र ठराविक विभागातील अर्ज स्विकारते का? एखादा बोरिवली (पुर्व) ला राहत असेल तो बोरिवली (पश्चिम) किंवा दादर असे कुठेही जावुन अर्ज करु शकतो का? <<< बहुतेक कोणत्याही केंद्रावरून भरता येते.

प्रत्येक केंद्र ठराविक विभागातील अर्ज स्विकारते का? एखादा बोरिवली (पुर्व) ला राहत असेल तो बोरिवली (पश्चिम) किंवा दादर असे कुठेही जावुन अर्ज करु शकतो का?<<< करू शकतो. पूर्ण भारतात कुठूनही अर्ज भरला जाऊ शकतो. फक्त काऊंटरवरच्या व्यक्तीने कागदपत्रे स्विकार केली पाहिजेत.

माझ्या नवर्‍याने रत्नागिरीमधे त्याच्या खेडच्या पत्त्याचा अर्ज भरून फॉर्म सबमिट केला. त्याच वेळेला माझा फॉर्म मी रत्नागिरीमधल्या पत्त्यावर सबमिट केला, माझे आधार कार्ड सुमारे पाच महिन्यांनी आले. तर नवर्‍याचे चक्क दोन महिन्यामधे खेडच्या पत्त्यावर!!

अशा वेळी आधार कार्ड अ‍ॅप्लिकेशन कसे करावे?>>> तुला माहेरच्या नावाने आधार कार्ड चालत असेल तर पासपोर्ट पुरावा म्हणून जोडता येईल. सासरच्या नावाने हवे असल्यास तुला वर सांगितलेली कागदपत्रे सासरच्या नावावर करून घ्यावी लागतील आणि मग अर्ज करता येईल.

राज्य वेगळे असेल तर चालेल का? सध्या कामानिमित्त हैद्राबादमधे आहे, आणि इथे ऑफिसमधुनच नोंदणी करायची स्कीम आहे म्हणुन

वरदा, इलेक्ट्रिक बिल/ फोन बिलवर सध्याचा पत्ता असेल ना? सध्याचा पत्ता असलेले बिल + मॅरेज सर्टिफिकेट चालेल. रेशन कार्ड सध्याच्या पत्त्यावर आहे का?

आयडेन्टीटी प्रूफ आणि बर्थ डेट प्रूफ म्हणून पासपोर्ट चालेल.
आणि अ‍ॅड्रेस प्रूफ म्हणून सध्याचा पत्ता असलेलं बिल + मॅरेज सर्टीफिकेट चालेल. बिलं जर नवरा सोडून घरातील इतर सदस्यांच्या नावावर असतील तर रेशन कार्डाची कॉपी जोडावी म्हणजे काही प्रॉब्लेमच नाही.

रच्याकने, कुठे जाणार आहेस नोंदणीसाठी?
आपल्या इथलं एकही केंद्र रविवारी चालू नसतं त्यामुळे माझी नोंदणी राहिलीय. नवर्‍याने ऑफिसतर्फे केली, साबा ज्येनांच्या वारी जाऊन नोंदणी करून आल्या. मी नी नीरजा राहिलोय फक्त. मी आता आमच्या ऑफिसात लोकं कधी येतील त्याची वाट बघतेय.

वरदा
माझी पण तुझ्या सारखीच केस होती. पण मी पॅन कार्डवर माझे नाव बदलून घेतले आहे.
त्यामुळे मी पॅन कार्ड फोटो आयडी म्हणून दिले आणि मॅरेज्-सर्टी दिले. त्यामुळे नवर्‍याचे अ‍ॅड्रेस प्रुफ पुरेसे आहे असे सांगण्यात आले आणि काम झाले. अर्थात मी आणि नवरा एकाच वेळी गेलो होतो.

मला नाव बदलायचं नाहिये पण मग अ‍ॅड्रेस प्रूफ कसं द्यावं ते समजत नाहिये. मंजू मी हे ट्राय करुन पाहणार आहे पण एक सुट्टी टाकून हे घेऊन गेले आणि नाही म्हणाले तर सुट्टी पण वाया आणि कामही नाही होणार म्हणून विचारते आहे. नाव बदललेलं नसणं हे इथे लोकांच्या पचनी नाही पडत पटकन. रेशन कार्ड सध्याच्या पत्यावर आहे. खूपच कन्फ्युजन आहे. जवळच्या सेंटर वरची मोठी रांग पाहून धस्सं होतं.

अ‍ॅड्रेस प्रूफ म्हणून सध्याचा पत्ता असलेलं बिल + मॅरेज सर्टीफिकेट चालेल. बिलं जर नवरा सोडून घरातील इतर सदस्यांच्या नावावर असतील तर रेशन कार्डाची कॉपी जोडावी म्हणजे काही प्रॉब्लेमच नाही. आणि नाही चालणार म्हणाले तर 'का चालणार नाही याची मला पटतील अशी कारणे द्या' असं ठणकावून म्हणायचं.

वरदा, पॅन कार्ड आहे ना? पॅन कार्ड डीओबी आणि फोटो आयडी म्हणून सबमिट कर. अ‍ॅड्रेस म्हणून ईलेक्ट्रिक बिल अथवा रेशन कार्ड (रेशन कार्डावर तुझं माहेरचंच नाव लावलंय्स का?)

मी आधार कार्डसाठी माहेरचाच पत्ता दिला होता. मॅरेज सर्टिफिकेट सबमिट केलं नव्हतं. त्याची काहीच आवश्यकता नसते.

पोस्टामधे जाऊन अ‍ॅड्रेस प्रूफसाठी ओळखपत्र मिळवणे हे पण एकदम सोपे काम आहे

मग मॅरेज सर्टी नाहीच लागणार.>>> मग तिने तिच्या नवर्‍याशी लग्न केलंय याचं प्रूफ काय?

मग तिने तिच्या नवर्‍याशी लग्न केलंय याचं प्रूफ काय?<< त्याचा आधार नंबरशी काय संबंध?

आधार नंबर प्रत्येक व्यक्तीला मिळतो. रेशन कार्डाप्रमाणे संपूर्ण कुटुंबाला नाही... त्यामुळे त्यामधे वैवाहिक स्थिती लिहिली नाही तरी चालू शकते. लग्नाचा पुरावा आधार नोंदणीमधे कुठेही मागितलेला नसतो.

मग तिने तिच्या नवर्‍याशी लग्न केलंय याचं प्रूफ काय? <<< पाच वर्षांखालील अर्जदारांव्यतिरिक्त अर्जात नातेसंबंध देणे बंधनकारक नाही. एक व्यक्ति म्हणून डोक्यूमेंटची पूर्तता करून आधारकार्ड मिळवता येते. (माझ्या माहितीप्रमाणे)

त्याचा आधार नंबरशी काय संबंध? >>>

नंदिनी आणि गजानन, रेशन कार्ड काय नातेसंबंधाचा पुरावा म्हणून नाही द्यावं लागत, राहत्या पत्त्याचा पुरावा म्हणून द्यावं लागतं.
उदा. मी राहते त्या घराचं इलेक्ट्रिक बिल/ टेलिफोन बिल माझ्या सासर्‍यांच्या नावाने आहे, तर मी माझ्या पत्त्याचा पुरावा काय द्यायचा?
म्हणजेच गजाच्या शब्दांत, एक व्यक्ति म्हणून डोक्यूमेंटची पूर्तता कशी करायची?

Pages