नव्या युगाचा सैनिक असल्याने, संवेदना बधीर करणारा वेग हे माझ्याही आयुष्याचे लक्षण ठरले होते. जलदगती मार्गावरून पुढे जात असताना चिंतन, आत्मपरीक्षण या सारख्या बोचऱ्या गोष्टींना आपण 'विचारपूर्वक' बाजूला टाकतो. कधीमधी आनंद - दुःखाचे टोलनाके लागतात पण त्या क्षणांनाही आपण टोल चुकता करावा तेवढीच किंमत देतो. इच्छित स्थळी पोचण्याचा ध्यास घेतल्याने प्रवासातली खुमारी अनुभवता येत नाही आणि मुक्कामाचे स्थळ आहे तरी कोठे? या अनादि प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने, प्रवास चालू ठेवण्याला पर्याय नाही, अशा चमत्कारिक चाकोरीत आयुष्य पिळून निघते, रस ठिबकत राहतो. अब्जावधी सर्वसामान्यांपैकी मी एक असल्याने माझेही आयुष्य अशा नेमस्त चाकोरीतून छान चालले होते. जीवनाला सहज वेग आला होता. गोळाबेरीज, पुनरावलोकन अशा वेळखाऊ गोष्टींसाठी मला 'टाईम' नव्हता. पण एका साध्या घटनेने मला स्वतःकडे पाहण्याची नवी दृष्टि दिली, थोडसं अंतर्मुख केलं ; ती म्हणजे माझा मोबाईल हरवला.
स्लो मोशनमध्ये प्रसंग स्वच्छ दिसतोय. बऱ्याच दिवसांनी सुट्टी घेऊन घरी चाललो होतो. दिल्ली पर्यंत ट्रेनचा छोटा प्रवास नि विमानाने पुण्य-नगरी गाठायचा मनसुबा होता. ऐनवेळी तिकीट काढूनही 'कन्फर्म' आरक्षण, धुक्याचे दिवस असूनही वेळेवर आलेली ट्रेन अशा दैवदुर्लभ गोष्टी साध्य झाल्याने आनंदाचा पतंग वरवर उडत होता. दिल्ली जवळ आल्याने मुखमार्जनासाठी प्रसाधनगृहात गेलो आणि रुमाल काढता काढता खिशातील मोबाईल खाली पडला. त्याला मी पायाने अडविले देखील, परंतु नेमकी त्याच वेळी आगीनगाडीने 'कशासाठी पोटासाठी' म्हणत उडी मारली आणि माझा जीवश्च मोबाईल ट्रेनच्या प्रसाधनगृहरुपी कृष्णविवरात कायमचा गडप झाला.
बधीर झालो. माझ्या चेहऱ्यावरचे आणि एखाद्या मालिकेतील रड्या नायिकेच्या चेहऱ्यावरचे भाव यांत भयंकर साम्य असेल. मालिकेत ढम्म- ढूश्श असं (दिग्दर्शकाला प्रत्ययकारी वाटणारं) संगीत असतं तर इथे पार्श्वभूमीला नतद्रष्ट आगगाडी कोरडेपणाने रूळ घासत होती एवढंच! मोबाईल माझा फार वर्षांचा सोबती होता. नित्य सहवासानं तो माझं सहावं बोट, तिसरा हात किंवा तिसरा कान अशा 'शारीरिक' दर्जाला पोचला होता. महागाचा 'स्मार्ट फोन' असल्यानं त्यात म्युझिक प्लेयर, इंटर नेट, ई मेल अशा अनेक सुविधा होत्या. अशा बहुगुणी वस्तूला हरवल्या बद्दल माझं व्यावहारिक मन मला टोचून काढत होतं.
दिल्लीला गाडी वेळेत पोचली पण मला आता त्याचं कौतुक नव्हतं. घुशीचं बिळ आदर्श मानून प्रसाधन गृहांची बांधणी करणाऱ्या अनामिक रेल्वे - अभियंत्याला लाखोली वाहत मी सामान उतरवलं. जिने कसे उतरले आणि भाड्याने गाडी मिळणाऱ्या वाहन तळावर कसा आलो, काही आठवत नाही.
' एयर पोर्ट चलना है' (दिल्लीत राष्ट्रभाषेत बोलावं लागतं, हे लक्षात होतं) असं कुजबुजत गाडीत बसलो. 'मीटर से चलना है तो चलो, भैय्या हम भी दिल्ली के ही है, लुटो मत' इत्यादी नेहमी उत्साहाने होणारी बाचा-बाची काहीच केली नाही. अपार दुःखाने गोठलेल्या नजरेने खिडकीबाहेर बघत बसलो. बाहेर नाताळ आणि काही दिवसात येणारे नववर्ष यांच्या स्वागतासाठी दिल्ली सज्ज झाली होती. सगळीकडे रोषणाई होती. बच्चा, बाबा आणि मा अशी छोटेखानी कुटुंबे रस्त्यांवर सांडली होती. खरेदी विक्रीला उधाण आलं होतं. जाम रहदारी असल्यानं गाडीचा वेग बहु मंद होता.
'मोबाईल असता तर ई मेल चेक करत, गाणी ऐकत छान वेळ गेला असता!', स्वतःशीच हळहळलो. माझं अंतर्मन दिलासा देणारं काही बोलेल, थोडी फुंकर घालेल म्हणून वाट बघू लागलो. पण काही भलतंच घडलं. ' अरे बरंच झालंय की! मोबाईल नाही म्हणून तू बाहेर बघतो आहेस, रस्त्यावरच्या लोकांचा आनंद समजतो आहेस, म्हणजेच प्रवास चक्क एन्जॉय करतो आहेस ना?'. हे कोण बोललं, म्हणून मी चमकून बघितलं पण गाडीत मी आणि डायवर साहेब सोडून कोण नव्हतंच तिथं ! त्यात डायवर बाबांनी गाडी सुरु करताना 'खैनी' च्या दोन पुड्यांची जबरदस्त गोळी तोंडात टाकली होती. ' पाशिन्जरांशी चार दोन गोष्टी बोलून प्रवास हलका-फुलका करणारे छिचोर डायवर असतील, पण आपून त्यातले नव्हेत', हे त्यानी पुडी फोडतानाच्या झटक्याने समर्थपणे दाखवून दिलं होतं.
माझंच मन बोललं हे तर नक्की होतं. हे असं ऐकायची मला सवय नव्हती, आत असलं काही कोंडी-फोडू चालू असेल इतकं उमजायची बुद्धी पण नव्हती. पण आता अंतर्मन अगदी खडबडून जागं झालं होतं आणि फॉर्मात आलं होतं. " कसली रे इतकी घाई तुला? घाईत जेवायचं, जेवताना टी.व्ही. बघायचा. काय खाल्लं त्याची चव घेता येत नाही, काय पाहिलं ते आठवत नाही. मग दोन्हीचं प्रयोजन काय?''. बोल बाबा, आज तुझा वखत आहे. " का नको बोलू? कामात घाई, बोलण्यात घाई, वाचनात घाई, नुसती लगबग सगळी!" " ए वाचनाचं काढू नको हं ", कारण वाचन हा माझा दुखरा कोपरा होता. आपण इतरांपेक्षा जास्त आणि वेगळं वाचतो अशी माझी (गैर) समजूत होती. " का नको काढू? भाराभर वाचतोस पण 'फ्याक्टरी-छाप' पद्धतीनं! वाचल्यावर थोडं थांबून विचार करूया, एखादा विषय निवडून त्याचा व्यासंग करूया, असं कधी वाटलंय तुला?" हं, आज सुनावून घ्यायचं नशिबात आहे, असं म्हणत मी सुस्कारा सोडला. "मग आता करू तरी काय?", मी मनाला विचारलं. " आधी भाड्याचे पैसे दे!". बरोबर होतं. गाडी विमान तळावर पोचली होती आणि चक्राचे धनी मुखरस सांभाळत 'हूं - हूं ' असा आवाज काढत माझं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना 'मोकळं' करून मी सामान खाली काढलं. " ओ के, आता तुझ्याकडे मोबाईल शिवायचे विमान सुटे पर्यंतचे अमोल तीन-चार तास आहेत. हा वेळ स्वतःकडे वळून बघण्यात वापर. बघ भूत काळाची आठवण येते का, वर्तमानाची समीक्षा होते का आणि भविष्याच्या काही संकल्पना पक्क्या होतात का ते."
मनातल्या जणू गुप्त दाराची कडी उघडली होती. मनात आठवणींना उधाण आलं होतं. सीनियारिटी नुसार बालपणीच्या आठवणी कोपरे सरसावून पुढं आल्याच. समुद्र किनारी बालपण गेलं होतं. वाळूतले खेळ, अमर्याद भटकंती, शाळेतली गडबड ....काही न बाही आठवू लागलं.आई- वडिलांनी केलेले संस्कार (त्याला संस्कार म्हणतात हे खूप नंतर उमजलं!) दिसू लागले. घड्याळ, सायकल हे शाळेतले स्टेटस - सिम्बॉल, ते मला वेळच्या वेळी मिळावेत म्हणून धडपडणारी आई डोळ्यासमोर येवू लागली. स्वतः आयुष्यभर सायकल चालवूनही माझ्यासाठी कॉलेज च्या पहिल्या दिवशी मोटर-सायकल देणारे बाबा दिसू लागले. मध-माशीला लाजवेल अशा उद्योग प्रियतेने काम करणारा, पण तरीही रसिकतेचे दालन जागते ठेवणारा काका आठवला. त्याच्या उदाहरणाचा आयुष्यावर किती परिणाम झाला होता! आठवणींची काच थोडी धुरकट झाली होती खरी, पण शाबूत नक्कीच होती. फुंकर मारून पुसायची वाट बघत होती.
आवडते शिक्षक आठवले. सकाळ दुपार त्यांच्या घरी आम्ही बापाचे घर असल्याच्या थाटात बागडत असू. एकदाही त्यांच्या कपाळावर आठी कशी उमटली नाही? कुठल्या मुशीतून ही माणसे घडली? आणि सध्या अशी माणसे निर्माण होण्याचा 'फॉर्मुला' कुठे हरवला? असंख्य विचार चमकत- विझत होते. कुठे होत्या या आठवणी इतके दिवस? माझ्यातच होत्या , पण आजच फेर धरून का नाचतायत? आज मोबाईल नाही हे निमित्त, का असा स्फोट होणार हे 'ओवर- लोड' झालेल्या मनाने ओळखलंच होतं? काही सुधरत नव्हतं.
मनाच्या वेगाने भूतकाळ समोर येत होता. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर देवाने नेमणूक करून पाठवल्यासारखी देव-माणसे भेटली होती. त्या बद्दल 'त्याचे' आभार तर होतेच पण त्यांच्याप्रमाणे आपणही कुणासाठी इतकं करू शकू का अशी धास्ती पण वाटत होती. अनेक कमनशिबी माणसांपेक्षा थोडेसे जास्त समृद्ध जीवन दिल्याबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त करायची होती. गर्भश्रीमंत नसेल पण गर्भरेशमी पोत असलेले आयुष्य अधिक सुजाणपणे जगण्याची जाणीव दृढ होत होती. बुडत्या माणसाला एका क्षणात पूर्ण आयुष्यपट दिसतो म्हणतात, मला तर छान बसल्या बसल्या आतापर्यंत घडलेल्या विविध प्रसंगांची चित्रफीत दिसत होती. एकदा पुन्हा हे सर्व नव्याने अनुभवावे अशी भाबडी आशा जागृत होत होती. सततच्या विचारांनी शीण आला होता, पण तो आनंदाश्रूंसारखा हवा हवासा थकवा होता.
आता घरी पोचण्याची ओढ लागली होती. मेंदू वरची काजळी झाडल्यानं शुभ्र वाटत होतं. पत्नी व मुलाचा हसरा चेहरा खुणावत होता. आपण अगदी कामातून गेलेलो नाही, असा विश्वास आला होता. पुढे घेणारे निर्णय अधिक समजुतीचे असतील आणि आयुष्य आणखी संतुलित असेल, असा दिलासा माझ्या मनानं मला त्या तीन - चार तासात दिला होता. रात्रभर न झोपूनही लख्ख जागा होतो. जगण्याचा समतोल साधणारी तरफ देण्याची देवाजी कडे प्रार्थना करत होतो.
माझा मोबाईल हरवला पण त्या आगळ्या प्रवासात, कवि म्हणतात त्या प्रमाणे " मी माझ्या मधल्या मला एकदा भिडलो, मी माझ्या मधल्या मला भेटूनी आलो!".
माझा मोबाईल हरवतो त्याची गोष्ट
Submitted by अमेय२८०८०७ on 15 February, 2013 - 22:54
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रुमाल... वाचतो आता... छान
रुमाल... वाचतो आता...
छान लिहिलंय...
छान लिहिलयं , इंटरनेट ,
छान लिहिलयं , इंटरनेट , मोबाईल युगात आपण कुठेतरी आपल्यालाच हरवुन बसलोय .
वाचले आणि आवड्ले. खूप छान
वाचले आणि आवड्ले. खूप छान लिहिलय..
लेख आवडला, पण मोबाईल वगैरे
लेख आवडला, पण मोबाईल वगैरे आपल्याला चिकटतात कारण आपण चिकटवतो म्हणून.
( मला तरही / तरीही या शब्दाची सध्या धास्तीच बसलीय. असे शब्द असलेले बीबी उघड(व)त नाहीत )
दिनेशदा यू आर राईट तरीही
दिनेशदा यू आर राईट
तरीही बद्दल ...लॉल्झ !! (याला समर्पक मराठी प्रतिशब्द नाही. ह.ह.ग.लो. वगैरी हाजम्याच्या गोळ्यांच्या ब्रँडसारखे काही वाटते). हे तरीही प्रकरण मी इथे नवीन असल्याने लेख पेस्ट केल्यावर ध्यानात आलं.
छान लिहिलयं
छान लिहिलयं