आपण सह्याद्रीत का फिरतो याला अनेक कारणं आहेत.रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून चार घटका निसर्गात जावं..तिथल्या रानपाखरांशी गप्पा माराव्यात...दोन क्षण स्वत:शीच अंतर्मुख होण्यासाठी....वगैरे अनेक कारणं देत येतील.पण ट्रेकला गेल्यावर "क्षुधागडाची" अर्थात आपल्या मनसोक्त हादडण्याची मोहिम यशस्वी झाली नाही तर ट्रेकमध्ये काहीतरी राहून गेलंय असं राहून राहून वाटायला लागतं !!!!! म्हणूनच दिवसभर पाय तुटेस्तोवर भटकल्यावर पोटात जो काही "भूकंप" होतो (= मरणाची भूक लागते !!! ) ती भागवायला एखादा सिद्धहस्त आचारी मदतीला धावून आला तर त्या ट्रेकच्या आठवणींना एक वेगळाच नूर चढतो !!!! काल तैलबैल्याहून येताना (कितव्यांदा गेलो असेन आठवत नाही !!!) मुळशीच्या "दिशा" धाब्याने जो काही श्रमपरिहार केला आहे तो एन्जॉय करतानाच आजवरच्या ट्रेक्स मधल्या अश्या अनेक ठिकाणांची यादीच सर्रकन डोळ्यासमोरून तरळून गेली आणि आपल्यासारख्या पट्टीच्या "बकासुरां" बरोबर ती शेअर करायचं ठरलं !!!
आता ट्रेकमध्ये व्हेज खावं की नॉन - व्हेज हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न !!! मी मात्र या दोन्ही विरोधी पक्षांचा कॉमन मतदार असल्याने आपल्याला मटकीचा तेजतर्रार रस्सा जितका प्रिय तितकंच माशांचं कालवणही प्रिय (मला हे सांगताना कसलीही लाज वाटत नाही...कारण आवड आणि शरम एकत्र आल्या की माणसाचे खायचे वांदे होतात !!!!).माझ्या मते कोंबडी,बकरा आणि मासा हे असे तीन प्राणी आहेत ज्यांचा जिवंतपणी काडीमात्रही उपयोग नाही पण नंतर मात्र त्यांच्या आणि खाणा-याच्या आत्म्याला एकाच वेळी शांती लाभते !!!!त्यामुळेच प्रस्तुत लेखात दोन्ही पक्षांच्या सदस्यांना उपयोगी पडतील अशीच ठिकाणं आज मी सांगणार आहे.खरं तर ट्रेक मधले अत्यंत पेटंट आणि महाप्रसिध्द पदार्थ म्हणजे मिसळ,पोहे आणि खिचडी.हे जर तुमच्या ट्रेकमध्ये एकदा जरी झाले नाहीत तर "फाऊल" समजावा !!! हे ज्याला आवडत नाहीत त्याला आधी कोणी ट्रेकर म्हणतच नाही आणि त्यात जर तो "चहा आवडत नाही" असं चुकून जरी म्हणाला तरी त्याने संपूर्ण ट्रेकभर एकांतवास सहन करायची मानसिक तयारी ठेवावी !!!! एकदा गणपतीपुळ्याच्या एका घराबाहेर " घरगुती जेवण मिळेल " अशी पाटी वाचून मी त्या वास्तुपुरुषाला "आजचा मेनू काय" हा प्रश्न केल्यावर "आज पालक आणि बटाटयाची ताकातली पातळ भाजी आणि दुधी भोपळा आणि डाळिंब्याची सुकी उसळ आहे " हे त्यांचं उत्तर ऐकल्यावर त्यांना "काका....मग मसालेभातात सुरण,पडवळ आणि गवार का नाही घातली ?? " असं विचारायचं तोंडावर आलं होतं !!!! याच गणपतीपुळ्याच्या मुख्य मंदिराच्या बाहेर एक "सम्राट" नावाचं उपहारगृह कम हॉटेल आहे.अख्ख्या गणपतीपुळ्यात या सम्राट सारखी मिसळ आणि साबुदाण्याची खिचडी कुठेही मिळत नसेल !!! सकाळची फर्स्टक्लास सुरुवात करावी तर इथला नाश्ता करूनच !!! मंदिराच्या बाहेर भाऊ जोशींचा अलिशान डायनिंग हॉल आहे.इथला उकडीचा मोदक,पुरणाची पोळी,सोलकढी आणि वरणभात लाजवाब !!!! त्यात पुन्हा भाऊंकडचे कर्मचारी तव्यावरच्या गरमागरम पोळ्या आग्रह करून वाढत असतात.भाऊंच्या डायनिंग हॉल समोरच "मालवणी कट्टो" नावाचं कौलारू हॉटेल आहे.इथे मिळणारा सुरमई न पापलेट फ्राय काय वर्णावा...ब्येष्ट !!!! चिपळूणच्या "अभिषेक" मधली फिश थाळी,कोंबडी वडे तर जगप्रसिद्धच आहेत !!! आम्ही चिपळूणच्या गोविंदगडावर गेलेलो असताना ह्या अभिषेक हॉटेल मध्ये असे एक सदगृहस्थ भेटले जे फक्त कोंबडी वडे आणि पापलेट खाण्याची तीव्र इच्छा झाल्याने रत्नागिरीहून रात्री १० वाजता त्या मुंबई - गोवा हायवे वरून एकटेच बाईक हाणत चिपळूणला जेवायला आले होते !!! (अंतर - १०० किलोमीटर्स !!!!).याला म्हणतात जिभेच्या प्रेमात पडणं !!!!
कोकणाकडे खेचलं जाण्याचं एक महत्वाचं कारण....
एक परिपूर्ण नाश्ता...हा ट्रेक मध्ये मिळाला तर काय बहार येते....!!!!
अनेकदा...म्हणजे फक्त ट्रेक मध्येच नाही पण जनरली सुद्धा आपल्याला अनेकदा असा अनुभव येतो की बाहेरून सामान्य दिसणा-या हॉटेल मध्ये अतिशय अप्रतिम चवीचं जेवण मिळतं आणि बाहेरून राजेशाही दिसणा-या हॉटेलच्या पदार्थांची चव महासुमार असते !!!! नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळा,भिलाई,चौल्हेर या राक्षसी किल्ल्यांच्या ट्रेकला गेलेलो असताना सटाण्याच्या " पुष्पांजली " हॉटेल मध्ये शेवभाजी,काजू करी,व्हेज कोल्हापुरी आणि दाल तडक्याची जी काय चव चाखलीये ती आजपर्यंत विसरलेलो नाही !!! आई शप्पथ...!!! काय त्या आचा-याच्या हाताला जादू होती कळत नाही.पण आजपर्यंत अशी चव कुठेही पाहिलेली नाही.!!!! बाहेरून चहा - नाष्ट्याच्या टपरी टाईप दिसणारं हे हॉटेल सटाण्याच्या पुष्पांजली नावाच्या थिएटरच्या बाहेर उभं असून सदर थिएटर स्थानिक पब्लिक मध्ये प्रचंड फेमस आहे (कारण तिथं सगळे " C " ग्रेडचे सिनेमे लागतात !!!! ). असो. पण सटाण्याला गेलात तर ह्या हॉटेल मध्ये नक्की जाच !!! तसंच सटाणा एस.टी.स्टॅंडच्या बाहेर शिवाजी पुतळ्याशेजारी गंगा,यमुना का कावेरी असल्या काहीतरी नावाचं हॉटेल असून तिथला पाववडा चाखाच !!! एकच नंबर !!! पाववडा म्हणजे तुम्ही त्याला गोल आकाराचं पाव पॅटिस म्हणू शकता. (आणि हो...वडा पाव नाही..पाव वडाच...मी त्या हॉटेल मालकाची "स्लीप ऑफ टंग" सुधारताच "कुटून आलाय बे...!!" असा सवाल त्याच्या चेहे-यावर उमटला होता..!!! ). इथलं पाव पॅटिसही खूप प्रसिद्ध असून ते खाण्यासाठी संध्याकाळी इथे गर्दी उसळलेली असते (हे पॅटिस पाववडयापेक्षा खूप वेगळं आहे...!!!)."पुष्पांजली" प्रमाणंच नगर जिल्ह्यातील भंडारद-याजवळच्या राजूर गावातल्या "मातोश्री" ची शेवभाजी पण भन्नाट !!!! या शेवभाजीची आम्हाला इतकी भुरळ पडली आहे की त्याची चव न विसरता आल्याने ती कमी भरून काढण्यासाठी शेवटी राजूरहून एक किलो शेव विकत घेऊन रतनगडावर आमचा शेवभाजीचा बेत एकदम झक्कास जमला होता !!!! भोरच्या बाजारपेठेतल्या "श्रीराम" हॉटेलचीही खासियत काहीशी अशीच.तिथे कधीही जा आणि काहीही खा...चव अप्रतिमच !!!! भोरच्या राजवाड्याच्या शेजारी पटवर्धनांचं "श्रेयस" हॉटेल असून तिथे "मारामारी" नावाचा एक भन्नाट प्रकार मिळतो.मारामारी म्हणजे चहा आणि कॉफीचं बेमालूम मिश्रण !!! हा चहा - कॉफी एकत्र करण्याचा शुभारंभ बहुतेक याच हॉटेलने केला असावा.पण हे हॉटेल रविवारी बंद असतं (याला म्हणतात मराठी माणूस !!!!). एकदा पाटण जवळ अशाच एका हॉटेलच्या बाहेर "गरमागरम सांडविझ मिळेल" अशी पाटी वाचून उत्सुकता शिगेला पोचल्याने मी आत गेलो तेव्हा "सांडविझ" म्हणजे " सॅण्डविच " हा उलगडा मला साक्षात हॉटेल मालकानेच करून दिला !!!! पदार्थाच्या नावाबाबतच त्याची इतकी अनास्था बघून मी तसाच मागे आलो आणि पुढच्याच वर्षी ते हॉटेल बंद झाल्याचं कळालं (देव त्या हॉटेल मालकाचं भलं करो !!! )
एखाद्या अमुक अमुक हॉटेल मधेच जेवायचं असं आधीपासून ठरलेलं नसताना एखाद्या ठिकाणी सरप्रायझींगली बोटं चाटत रहावीत असं जेवण मिळावं आणि त्या हॉटेलशी आयुष्यभराची दोस्ती व्हावी असं कित्येक वेळेला होतं !!! मला आठवतंय..एकदा पुरंदरवर फुलांचे फोटो काढायला म्हणून गेलेलो असताना अचानक प्रचंड पाऊस झाला. मी आणि मित्र दोघंही नखशिखांत भिजून थंडीने कुडकुडत सासवडला आलो तेव्हा दिवे घाटाच्या अलीकडे ढाब्यांची जी रांग लागते त्यातल्या "गारवा" नावाच्या एका गार्डन ढाब्यात पोचलो आणि पुढच्या काही मिनिटातच त्या हॉटेलने ज्या चवीची चिकन हंडी आम्हाला वाढली त्याला तोड नाही !!!! त्या ग्रेव्हीत नक्की काय रसायन घातलं होतं माहित नाही पण त्याला जी काय सुरेख चव आली होती ती केवळ अप्रतिम !!!! हा गारवा अनुभवायला नंतर मी किती वेळा तिकडे गेलोय माहित नाही !!!! तिथलं एकूणच व्हेज व नॉन व्हेज जेवण अफलातून चवीचं असून माफक दरात उपलब्ध आहे.सासवडच्या एस.टी.स्टॅंडच्या समोर "समर्थ वडेवाले" म्हणून फक्त वड्याला वाहिलेलं एक लई फेमस हॉटेल आहे.तिथला वडापाव काय सांगावा !!!!! मी चॅलेंज देऊन सांगतो...या चवीचा वडापाव फार क्वचित ठिकाणी आणि तेही एखाद्या ट्रेक दरम्यान तुम्ही खाल्ला असेल !!! रसाळगडावरून चिपळूणला येताना संध्याकाळी पोटात भूकंप झाला म्हणून एक अति सुमार चवीची मिसळ खाऊन पोट न भरल्याने (खाऊन म्हणण्यापेक्षा "गिळून"!!) लोटे गावाच्या अलीकडे दोनच टेबल असलेलं एक हॉटेल दिसल्यावर नाईलाजाने आम्ही आत शिरलो.त्या मातेसमान मालकिणीने अंडा भुर्जी आणि अमूल बटर लावून खरपूस भाजलेल्या पावाचा जो काही नमुना पेश केलाय त्याला तोड नाही !!!! निखालसपणे चविष्ट !!!! त्यात वरून तेलात परतलेला बारीक कांदा आणि नंतर भन्नाट चवीची मलई लस्सी....आहाहाहा...याला म्हणतात ट्रेकमध्ये जान येणं !!!!
याच्याशिवाय ट्रेक कम्प्लीट होतंच नाही....
हीच ती "पुष्पांजली" ची आजही वेड लावणारी शेवभाजी....
बघताच क्षणी "गारवा "ची आठवण काढायला लावणारी चिकन हंडी ...
पुणे - नाशिक हायवे ड्रायव्हर्स मध्ये जरी तसा कुप्रसिद्ध असला तरी चाकण पासून नाशिक पर्यंत पसरलेल्या एक से एक हॉटेल्समुळे मात्र त्याला ट्रेकर्सनी उचलून धरलंय.चाकणचं "सहारा" आणि "इंद्रायणी" तसंच राजगुरुनगरचं "स्वामिनी" म्हणजे परिपूर्ण भोजन.इथलं जेवण तर अस्सल खवय्यानं चुकवुच नये !!! मंचर सोडून आपण नारायणगावकडे जाऊ लागलो की मध्ये अवसरी घाट नावाचा छोटा घाट आहे.या घाटाच्या शेवटी डावीकडे "आनंद ढाबा" म्हणून एक हॉटेल असून तिथला आलू पराठा म्हणजे निव्वळ स्वर्गसुख !!!! सकाळी सकाळी गरमागरम खरपूस भाजलेला तो आलू पराठा त्या अतिशय भन्नाट चवीच्या चटणी आणि दह्याबरोबर खाताना जो काही "आनंद" होतो ना तो शब्दात सांगणं कठीण आहे !!! चंदनापुरी घाटात पण असे २४ तास चालू असणारे एक दोन ढाबे असून विदर्भातले किल्ले बघायला जाताना त्यातल्या बहुदा "प्रीती" नावाच्या हॉटेल मध्ये रात्री अडीचच्या सुमारास खाल्लेला स्पेशल मसाला पराठा आणि ती वाफाळती दाल खिचडी अजूनही जशीच्या तशी लक्षात आहे !!!! रात्री अडीच वाजता ८ आलू पराठे,५ मसाला पराठे आणि ३ वेळा दाल खिचडी मागवणारे कोण सैतान आपल्या धाब्यावर आले आहेत हे बघण्याकरता साक्षात त्या हॉटेलचा आचारी स्वत:चं काम सोडून बाहेर आला होता !!! (ता .क. - आम्ही एकूण ९ लोक असल्याने एवढी ऑर्डर दिली गेली.माझं अजून तरी बकासुरात रुपांतर झालेलं नाही !!!).तुम्ही कधी रात्री या मार्गाने प्रवास केलात तर वेळ काळ विसरून खरंच हे पदार्थ टेस्ट करा !!!! अंधारबन घाटाचा ट्रेक पहिल्यांदा करून खाली भि-यात उतरल्यावर काहीच खायला न मिळाल्याने शेवटी एका चायनीजच्या हॉटेल कम गाडीवर "हाफ राईस" सांगितलेला असताना त्याने आपण हॉटेल मध्ये डोसा खातो त्या आकाराच्या प्लेट मध्ये रचून आणलेला राईसचा डोंगर बघून "ह्याने कित्येक दिवस धंदा न झाल्याचा राग आपल्यावरच का काढला" असा विचार मनात येउन गेला !!!!! जुन्नर - माळशेज रस्त्यावरच्या पारगाव फाट्याच्या अलीकडे एक पेट्रोल पंप आहे.तिथल्या "अंबर" हॉटेल मधल्या पंजाबी भाज्यांची आणि स्पेशली चिकनची चव एकदा घेऊन बघाच.काय त्या मसाल्यांमध्ये भरलेलं असतं काय माहित !!! कारण तिथे जेवल्यावर मला बाईकवर टांग टाकणंही मुश्किल झालं होतं !!! सिन्नर - घोटी रस्त्यावरच्या "हॉटेल सह्याद्री" मध्ये खाल्लेली ती अफलातून चवीची अंडाकरी आणि नंतरचा तो स्वर्गीय चवीचा दाल फ्राय आणि जीरा राईस जब्बरदस्तच !!!! आमच्या ग्रुपातल्या दोघांनी ट्राय म्हणून तिथे "चिकन लष्करी" आणि "मोगल मुर्ग" या डिशेस मागवल्यावर आम्ही व्हेजचा नाद सोडला !!!! त्या अर्थातच कित्येक पटीने चविष्ट होत्या !!!! एकदा आळेफाट्या वरच्या एका चहावाल्याच्या लहान दुकानातली गुलकंद लस्सी मी दोन ग्लास प्यायली हे बघून त्याने बिल माफ केलं !!! (चव अप्रतिम पण क्वॅंटिटी म्हणजे एक माणूस अख्खा एक ग्लास पिऊ शकणार नाही इतकी...काय करणार...हरिश्चंद्राने जीवच इतका काढला होता !!!).विरार जवळच्या तुंगारेश्वर रोडजवळ शिरसाड म्हणून एक गाव आहे.तिथे एक अस्सल पंजाबी धाबा असून ऑथेंटिक चवीचा आलू पराठा,दाल माखनी आणि सरसो का साग तिथेच जाऊनच खावं.आत्ता नाव आठवत नाही पण सगळ्या ट्रकवाल्यांचा तो ठरलेला ढाबा आहे. केळव्याच्या मन:शक्ती रिसोर्टची (अनलिमिटेड चिकन पिसेस असलेली !!! ) चिकन कढाई आणि रायगड जिल्ह्यातल्या महाड जवळच्या दासगावातल्या (मुंबई - गोवा हायवे वरच्या ) " हॉटेल निसर्ग " मधली चिकन कोल्हापुरी,बटर चिकन आणि व्हेज जाल्फ्राजी ज्या सत्पुरुषाने बनवलीये ना त्याला "भारतरत्न" द्यायची शिफारस करावी असं मला वाटू लागलं आहे !!!! काय चव असते राव एकेकाच्या हाताला !!!! राजमाचीच्या वरेमावशींकडचं एकूणच जेवण,कोथळीगडाच्या पायथ्याच्या सावंतांच्या "हॉटेल कोथळीगड" मधली लाजवाब चवीची कढी आणि राजगड पायथ्याच्या गुंजवण्याच्या "अरण्यधाम" मध्ये चाखलेली मिक्स कडधान्यांची उसळ आजही जिभेवर आहे !!!! तैलबैल्याच्या पायथ्याच्या मेणे काकांनी पहिल्यांदा गेलो असताना आग्रह करकरून वाढलेली ती नादखुळ्या चवीची झुणका भाकर आज अगदी तस्शीच लक्षात आहे !!!!
ह्याच्याशिवाय ट्रेकला काय मजा....!!!!
मी रोहीडयावर पहिल्यांदा गेलेलो असताना बाजारवाडीत जेवण सांगितलं आणि किल्ल्यावर गेलो.खाली आल्यावर आपल्या भविष्यात होणा-या लग्नाचं ताट यांनी आत्तापासूनच सजवून ठेवलंय का अशी शंका मला यायला लागली होती !!! पायथ्याच्या त्या मध्यमवयीन गृहस्थाने माझ्यावर खुश होण्याचं काहीही कारण नसताना ताटात पिठलं भाकरी (तांदुळाची बरं का!!!),आंबेमोहोरचा नुसता सुगंधानेच वेडावून टाकणारा भात,आमटी,पापड,लोणचं,चटणी,ठेचा,कोशिंबीर,गोडाचा शिरा,दिवाळी नुकतीच होऊन गेल्याने रव्याचे लाडू आणि एक परातभर पापड्या कुरडया समोर आणून ठेवल्यावर ते बघून माझी बोबडीच वळाली !!! वर त्यांनी "अजून काही लागलं तर सांगा" असं म्हटल्यावर त्यांना " काका...मंथली मेसचे किती घ्याल " असं विचारायचं तोंडावर आलं होतं !!!! काय या भाबडया प्रेमाची आपण किंमत देणार !!!! मागून थोडीच मिळतं हे !!!! हे मिळवायला तर सह्याद्रीच्या कुशीत जायचं !!!! आजवरच्या मनसोक्त भटकंतीत या ठिकाणांनीच तर ख-या अर्थाने भूक भागवली.वरील ठिकाणांशीवाय मग लोणावळ्याच्या अन्नपूर्णामधला मेदूवडा - सांबार आणि मैसूर मसाला डोसा,रमाकांतचा वडा,कोलाडच्या प्रभाकर मधली मिसळ आणि वडापाव,निजामपूरच्या सिद्धाई हॉटेल मधली गावरान चिकन थाळी,लोणावळ्याच्या रामकृष्ण मधलं गरमागरम मऊ उपीट,गुहागरच्या जगदंबा मधले अनन्यसाधारण चवीचे बटाटेपोहे,रत्नागिरीच्या वर्ल्ड फ़ेमस "छाया" मधलं पॅटिस,खेडच्या एस .टी.स्टॅंड समोरच्या पेठे हॉटेल मधला अशक्य जबरी चवीचा वडापाव आणि इडली सांबार,खेड शिवापूरच्या विलास हॉटेलची भेळ,तोरणा विहारचं सुकं चिकन,वाईच्या बंडू गोरे खानावळीच्या पदार्थांना असलेली अद्वितीय चव,संगमनेरच्या जोशी पॅलेस मधली गुजराथी थाळी,मुरूडच्या पाटील खानावळ मधील नॉन व्हेज डिपार्टमेंट मधले झाडून सगळेच पदार्थ तसंच रविवारी हमखास मिळणारे छोले,वडखळ नाक्याच्या गंधर्व मधली व्हेज महाराजा आणि....असं कितीतरी !!!!! या सर्व ठिकाणाचं आणि पर्यायाने पदार्थांच नातं ट्रेकर्सशी आता जोडलं जाऊ लागलंय.किल्ल्यांच्या पायथ्याला घरगुती जेवण ज्या आपुलकीने वाढलं जातं त्या आपुलकीमुळे नकळत तयार होणा-या नात्याला काय नाव द्यावं खरंच कळत नाही !!! वरती उल्लेख केलेल्या हॉटेल्सनी आज पर्यटक आणि ट्रेकर्सच्या मनात अढळ ध्रुवपद निर्माण केलंय !!!! म्हणूनच की काय....खास रत्नागिरीहून फक्त कोंबडी वडे खायला रात्री चिपळूणला आलेला तो जातिवंत खवय्या मला जवळचा वाटला !!! खरं तर ही यादी वाढत जाऊन या विषयावरचं एक स्वतंत्र पुस्तक तयार होईल इतकं वैविध्य तुमच्या भटकंतीत तुम्हीही अनुभवलं असेल.काही ठिकाणांचा उल्लेख राहून गेला असेल तर तो जरूर कळवा.मला खात्री आहे...ही अनोखी खाद्यसफर तुमची भूक पुन्हा एकदा नक्की चाळवेल आणि खास जिभेचे चोचले पुरवायला तुमच्या पायाला पुन्हा एकदा भिंगरी लागेल...!!!!
हे फक्त "बघण्यासाठीच" केलेले नसतात...!!!
खाद्यजगताचा अनभिषिक्त सम्राट ....याला पर्याय नाही.....!!!!!
नादखुळा....!!!!
(नम्र सूचना : वर दिलेली सर्वच हॉटेल्स ही वर्षानुवर्ष अप्रतिम चवीचं आणि उच्च दर्जाचं जेवण पुरवत आलेली आहेत.तसंच ही ठिकाणं स्व:अनुभवावरून रिकमेंड केलेली आहेत.तुम्हाला या हॉटेल्स मधला एखादा वेगळा पदार्थ पसंद पडल्यास नक्की कळवा !!! )
सर्व प्रकाशचित्रे : काही अनामिक "भुक्कड" खवय्ये ("भुक्कड" = ज्यांना "कड" कडून "भूक" लागते !!! पुन्हा वाचा म्हणजे समजेल !!!!)
सह्याद्रीमित्र....
मस्त लिहिलंय... वाचूनच कडकडून
मस्त लिहिलंय... वाचूनच कडकडून भूक लागली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त लिहिलय. आता या
मस्त लिहिलय. आता या खाद्यंतीसाठी इथले लोक, त्या त्या ठिकाणी जातील.
मस्तच!! तोपसु!!
मस्तच!! तोपसु!!
आता या खाद्यंतीसाठी इथले लोक,
आता या खाद्यंतीसाठी इथले लोक, त्या त्या ठिकाणी जातील.
अगदी अगदी...आणि कितीतरी ठिकाणांबद्दल जोरदार अनुमोदन...
अन्नपूर्णामध्ये डोसा खाल्लाशिवाय राजमाचीचा ट्रेक सुरुच होत नाही आमच्यासाठी
भटके लोक्स एकदा आता खादाडी गटग करूयाच
मस्त आहे लेख.
मस्त आहे लेख.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कुफेहेपा
कुफेहेपा
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चौफेर फटकेबाजी. पश्चिम
चौफेर फटकेबाजी. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक प्र. ठिकाणं आलीयेत. मस्स्स्स्स्स्स्स्स्त!
आता या खाद्यंतीसाठी इथले लोक, त्या त्या ठिकाणी जातील. जातील?? बरीच ओळखीचीही आहेत. ह्या धाग्याची खरंच गरज होती. ही सगळी यादी किल्ला- गांव- खादाडी ठिकाण अशा स्वरुपात टाकता येईल कांय? म्हणजे नंतर शोधायचा त्रास वाचेल.
ढाक बहिरीसाठी जातांना व येतांना दोन्ही वेळी कर्जतलाच भुकंप झालेला, मग पोस्टाच्या समोर हॉटेल मयुरामध्ये सगला रिश्टर स्केल उतरवला. आणि आमचे सुरु असतांना ३-४ ट्रेक ग्रुप्स तिथेच टेकलेले.. रिकमेंडेड!
कातिल फोटो आहेत सगळे.
कातिल फोटो आहेत सगळे. पुढल्या वेळी भारतात जाताना ह्या लेखाची प्रिंट घेऊन जाणार. पुणे , मुंबई, नाशिक ह्या मार्गे त्या मार्गे असंख्य चकरा होत असल्याने बहुतेक ठिकाणं आमच्या येण्या-जाण्याच्या रस्त्यावर आहेत.
(No subject)
फार त्रास झाला हा लेख वाचून
फार त्रास झाला हा लेख वाचून![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आई ग!! मेले.... (बघून.. जळून
आई ग!! मेले.... (बघून.. जळून मेले).
सर्व पदार्थांचा बुफे लावावा व जेवून घ्यावे असे वाटते.
पदार्थाची क्लॉलीटी बघूनच छान वाटतेय(बवडे एकदम मस्त, चिकन सुद्धा,मटण, सुरमय तर जीवघेणी... आणि बरच काही काही होण्यासारखे आहे हे पदार्थ बघूनच)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे देवा!! का वाचलं हे??
अरे देवा!! का वाचलं हे??
शूम्पी +१ दोन महिन्यांपूर्वीच
शूम्पी +१
दोन महिन्यांपूर्वीच ह्या रस्त्यांवरून ट्रीपा झाल्या. आता पुढची २ वर्षे जाणं नाही.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
भारत्वारित प्रिट-आउट काढुन
भारत्वारित प्रिट-आउट काढुन घेवुन जाणार मग जमेल तितकी चव चाखणार! लेख भारिये!
मस्त आहेत फोटो ..
मस्त आहेत फोटो ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आपण सह्याद्रीत पदभ्रमणास नाही
आपण सह्याद्रीत पदभ्रमणास नाही गेलो तरी चालेल,
मात्र भुक्कडांच्या क्षुधाशांतीस्तव ही भ्रमंती करायलाच हवी असे वाटवणारा लेख!
आवडला हे वेगळ्याने सांगायलाच नको.
मस्त लिहिलय. ..
मस्त लिहिलय. ..
व्वा मस्तच
व्वा मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भारी. भटकंतीस आणि खाद्यंतीस
भारी. भटकंतीस आणि खाद्यंतीस शुभेच्छा.
एकदम मस्त, झक्कास लिहीलय.
एकदम मस्त, झक्कास लिहीलय. जमले तर हे एका चार्ट/टेबल फॉर्म मधे द्या म्हणजे भटकंती करणार्यांना ठिकाण शोधणे सोपे जाईल.
जबरदस्त लेख आणि प्रचि अरे हे
जबरदस्त लेख आणि प्रचि![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे हे अजुन एक राहिले
गडावर केलेली चटकदार भेळ ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आई ग जीव जळला.. ...अर्धवट
आई ग जीव जळला..
...अर्धवट उकडलेल्या भाज्या खायचा प्लॅन मला संध्याकाळी किती मनोहर वाटलेला..
असो! आता पर्याय नाही!
>>>.. ...अर्धवट उकडलेल्या
>>>..
...अर्धवट उकडलेल्या भाज्या खायचा प्लॅन मला संध्याकाळी किती मनोहर वाटलेला>>><<
हो तेच ना!
परवाच भेळ करायचा घाट फसला कुरमुरे नसल्याने.
झकास लिहिलंय
झकास लिहिलंय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
मस्त ,टेस्टी झालाय लेख..
जिप्स्याची भेळ पण भारी दिसतीये.. अर्र्र्र्र्र्र्र इकडे तर चुरमुर्यांचंच दर्शन दुर्मिळ
उर्ध्वउल्लेखित सर्व
उर्ध्वउल्लेखित सर्व बकासुरांचे मनापासून आभार
!!!
आपली सदर लेख टेबल फॉर्म / चार्ट मध्ये द्यायची सूचना स्वागतार्ह .पण वरील लेखातील सर्व हॉटेल्सची खासियत त्यांच्या किस्श्यांसकट वाचली तर आपली भूक ख-या अर्थाने कडाडेल !!!! शेवटच्या पॅराग्राफमध्ये ब-याच हॉटेल्सची मोठी लिस्ट त्यांच्या खासियतसह दिलेली आहे.वरती उल्लेख केलेल्या पैकी एखाद्या विशिष्ट हॉटेलच्या गावाच्या आजूबाजूला अनेक किल्ले असल्याने आपण त्या गावात जाणार आहोत हे माहित असल्यास आपली पावलं आपोआप त्या हॉटेलकडे वळतील !!! तरीही हे हॉटेलाख्यान "चवीने" वाचल्याबद्दल धन्यवाद !!!
सह्याद्रीमित्र
भन्नाट फोटो आणि खादाडी!
भन्नाट फोटो आणि खादाडी!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नाशिक हायवेवरचा 'आनंद ढाबा'!! क्या कहने!
एकदम टेस्टी आणि वर रिझनेबल रेट!
पुण्याहुन नाशिकला जातांना नाशिकच्या अलिकडे शिंदे गाव लागतं. गावात शिरल्या शिरल्या उजवीकडे वृंदावन हॉटेल आहे. दिसायला अगदी साधसुधं. तिथली फ्लॉवर चिल्ली चाखाच. शेवभाजी पण अप्रतिम!
जीव काढला या भुकंपाने...
जीव काढला या भुकंपाने... तोंपासु लेख![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भटके लोक्स एकदा आता खादाडी गटग करूयाच >+९९
नाशिक हायवे वरिल कसारा घाट जिथे सुरु होतो तेथिल उजवी कडच्या 'बाबा का धाबा' वरिल रात्री ३ वाजता खाल्लेली दाल फ्राय असो की माणगाव एस्टी स्टॅण्ड बाहेरील पहाटे खाल्लेल्या ब्रेड टोस्टची चव असो. केवळ अप्रतिम!
एक्दम कडक .. एवढे लक्षात ठेवल
एक्दम कडक ..
एवढे लक्षात ठेवल कस?
मस्तच लेख....
Pages