बथुवा ,बथुआ किंवा बाथळा या नांवाने ओळखली जाणारी ही एक पालेभाजी आहे.उत्तर भारतात जास्त प्रमाणात खाल्ली जाते . त्यामुळे सरसु च्या भाजीबरोबर या भाजीचाही वापर केला जातो. अर्थात भारताच्या इतर भागातही ही भाजी मिळते.तीन टोके असलेली हिरवीगार बथुव्याची पाने असतात.पण पालकाच्या पानांसारखी लगेच कोमेजणारी नाजुकही नसतात .सरसु च्या पानांची भाजी करताना सरसु च्या उग्रपणामुळे त्यात पालकाची पाने व ही भाजी मिळुन यावी म्हणुन थोडेसे मका -पीठ ,चवीसाठी आले+लसुण + हिरवी मिरचीचे वाटण घालतात.बथुवा भाजी पालक न वापरता करतात.
बथुवा भाजी पातेल्यात पाणी घेवुन त्यात १० मिनिटे बुडवुन ठेवुन धुवायची असते. असे ३-४ वेळा धुतली कि त्यातील मातीचा अंश पूर्णपणे निघतो.
बथुवा भाजी-
बथुवा पाने चिरुन घ्या .कांदा,लसुण ,हिरवी मिरची, बटाटा फोडी तेलावर परतुन त्यात बथुवा भाजी व थोडेसे पाणी शिंपडुन झाकण ठेवुन परतलेली कोरडी भाजी करतात.
बथुवा रायते--
बथुवा चिरुन थोड्या पाण्यात उकडुन घ्यायचा.थंड झाल्यावर हाताने पाने छान घोटुन एकजीव करायची. घट्ट दही पाणी न घालता चमच्याने ढवळुन घ्या.या दह्यात घोटलेली बथुवा भाजी घालायचे.मीठ,चवीपुरती साखर,बारीक चिरलेली हिरवी मिरची ,जिरे-मिरे पुड आणि वरुन हिंग -जिर्याची ,थोडीशी हळद घालुन केलेली खमंग फोडणी घालायची.हे घट्टसर रायते खूपच छान लागते.
हे दोनही प्रकार पोळी,भाकरी बरोबर छान लागतात.
बथुवा पाने चिरुन बेसन ,कांदा भजी करतात.
बथुवा पुरी--वाफवलेली बथुवा पाने,हिरवी मिरची,लसुण किंवा लसुण पात मिक्सरमधुन वाटुन घ्यायची.त्यात गहूपिठ्,थोडे बेसन,ओवा,तिखट,मीठ,हळद,तीळ ,तेलाचे मोहन घालुन घट्ट भिजवुन पुर्या करायच्या.
बथुवा भाकरी- चमचाभर तेलावर बथुवा भाजी परतुन तिखट,मीठ ,भरपूर तीळ घालुन झाकण ठेवुन थोडी शिजवुन घ्यायची.मका पिठ मधे ही भाजी घालुन पिठ भिजवायचे.नेहमीप्रमाणे भाकरी करायची.तव्यावर भाजत असताना दोन्हीकडे थोडे तूप लावायचे .
बथुवा पराठे--उकडुन हाताने घोटलेली बथुवा पाने गव्हाचे पिठ,तिखट,मीठ,ओवा,हळद घालुन पिठ भिजवायचे व त्रिकोनी लहान पराठे लाटायचे .तेला-तूपावर करारे भाजायचे.
बथुवा मुठीये--बारीक चिरलेली बथुवा पाने,मक्याचे पिठ,आले-लसुण-हिरवी मिरची पेस्ट, थोडेसे आंबट दही,२ चमचे थंड तेलाचे मोहन,ओवा,तीळ,थोडीशी लवंग-दालचीनी पुड ,हळद घालुन मुटका वळता येईल इतपत पाणी घालुन पिठ भिजवायचे लहान लहान मुठीये वळुन कूकरच्या डब्यात तेलाचा हात लावुन कूकरमधे ठेवुन २ शिट्या काढायच्या. थंड झाल्यावर जास्त तेलाची फोडणी करुन त्यात हे मुठीये परतुन घ्यायचे.[जर मुठीया करायच्या नसतील तर तेलाचा हात फिरवलेल्या डब्यात मिश्रण थापुन कूकरमधे वाफवल्यावर त्याच्या वड्या कापुन त्या तेलावर परतायच्या.]
बथुवा खुरमे--
बथुवा पाने उकडताना त्यात तिखटासाठी हिरवी मिरचीही घालायचे. पाने उकडली कि हाताने एकजीव करायची.त्यात बेसन,हळद,ओवा,तिखट,मीठ,शहाजिरे व तीळ घालायचे.गरम तेलाचे मोहन घालुन घट्ट पिठ भिजवायचे .लाटुन त्याचे लांबट आकाराचे शंकरपाळे लाटुन तेलात तळायचें. नाश्ता म्हणुन हे खुरमे करतात.
इतर पालेभाज्यांप्रमाणे बथुवा भाजीत ही लोह भरपूर आहेच.
बथुवा एक पालेभाजी.
Submitted by सुलेखा on 14 February, 2013 - 01:24
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आमच्याकडे हिला चंदनबटवा
आमच्याकडे हिला चंदनबटवा म्हणतात.
हो आपल्याकडे हिला चंदनबटवा
हो आपल्याकडे हिला चंदनबटवा म्हणतात. युपीमध्ये, हरियानामध्ये याचे रायते करतात. बथुआचे पराठेपण मस्त लागतात.
अल्पना, होय,पराठे व पुरी ही
अल्पना, होय,पराठे व पुरी ही करतात.मी तसे "अॅडीशन "करत आहे .
चंदनबटवा होय ........... वा
चंदनबटवा होय ...........
वा वा
वॉव.. सुलेखा.. एम पी की याद
वॉव.. सुलेखा.. एम पी की याद ताजा हो गई...
चंदनबटवा कुठल्या भागात म्हटले जाते???
आमच्याकडे बथुवाचं रायतं
आमच्याकडे बथुवाचं रायतं अनेकदा होतं. त्याची एक झटपट कृती आहे.
पानं धुऊन एका मावेबल काचेच्या बोलमध्ये घ्यावीत. त्यात एखादी हिरवीमिरची आणि १-२ लसणाच्या पाकळ्या घाऊन पाण्याशिवायच मावेमधे तो बोल १ + १ + (गरज वाटल्यास अजून) १ मिनिटे ठेऊन शिजवून घ्यावी. प्रत्येक मिनिटानंतर बाहेर काढून चमच्याने वरखाली करावी. बाहेर काढून साधारण गार झाल्यावर मिक्सरमध्ये चटणीच्या भांड्यातून एकदा चांगली बारीक वाटून घ्यावी. मग त्या भांड्यातच घट्ट दही (१-२ चमचे), मीठ, भाजलेल्या जीर्याची पूड आणि आवडत असल्यास चाट मसाला घालून गुळगुळीत वाटून घ्यावे. मी फोडणी घालत नाही. रायतं तय्यार!
माझ्या मावेच्या ऑटोकुक
माझ्या मावेच्या ऑटोकुक मेन्युमधे बथुआ रायता हा प्रकार इतके दिवस नुसताच वाचत होते,कारण बथुआ हे काय आहे तेच माहित नव्ह्ते आता कळले! त्याला इथे चंदनबटवा म्ह्णतात तेही आताच कळले. आता करून बघता येइल!
अंशा, मावे त बथुवा/चंदन बटवा
अंशा, मावे त बथुवा/चंदन बटवा अगदी थोड्याशा पाण्यात[मावेतले भांडे झाकुन]वाफवुन घेता येईल.त्यानंतर कोणताही पदार्थ करता येईल.
फोटो दिला ते छान झाले.
फोटो दिला ते छान झाले. अनेकजणांना ओळखता येईल आता.
या भाजीला स्वतःची अशी एक चव असते. कशाही प्रकारे मस्त लागते.
मराठी पद्धतीने केलेली, ताकातली पातळ भाजी पण छान लागते.
दिनेशदा,भाजी एक, नांव अनेक
दिनेशदा,भाजी एक, नांव अनेक असे होते ना कधीकधी..त्यामुळे भाजी निवडल्याबरोबर फोटो काढला.ताकातल्या पातळभाजी सारखी बथुव्याची जास्त बेसन कालवुन ,शेवटी आंबटपणासाठी टोमॅटोच्या फोडी घालुन गोळाभाजीही फार छान लागते.या गोळाभाजीला वरुन लसणीची ,लाल तिखट घातलेली फोडणी देतात.
बथुवा याचे मराठीतले नाव
बथुवा याचे मराठीतले नाव 'चाकवात' असे गुगलवर सापडले, मग चाकवत आणि चंदन बटका एकच म्हणायचे का ?
मामी पाकृ मस्तच! बथुवा याचे
मामी
पाकृ मस्तच!
बथुवा याचे मराठीतले नाव 'चाकवात' असे गुगलवर सापडले, मग चाकवत आणि चंदन बटका एकच म्हणायचे का ? ...........अजिबात नाही.चंदनबटव्याची पाने तलम असतात.देठ व पाने यांवर हलकी किरमिजी+निळसर
झाक असते.
या भाजीला स्वतःची अशी एक चव असते. कशाही प्रकारे मस्त लागते. अगदी!
बथुआचे पराठे... बरेलीच्या
बथुआचे पराठे... बरेलीच्या आठवणी जाग्या झाल्या.