शालेय मुलांसाठी सायन्स प्रॉजेक्ट/ आर्टस अँड क्राफ्ट इ.

Submitted by मी_आर्या on 12 February, 2013 - 05:23

नमस्कार,

सध्या शाळेत केजी पासुन मुलांच्या शाळेत आर्ट्स अँड क्राफ्ट एक्जिबिशन, सायन्स फेअर वै. होतात.
मुलांना शाळेतुनच विषय दिला असेल तर ठीक नाहीतर काय करावं हा विचार करतच वेळ जातो. आई वडीलही मुलांना त्यांचं अडेल तिथे मदत करतातच. इथे आपल्या मुलांच्या प्रॉजेक्ट्साठी काय काय बनवले/ ठेवले होते किंवा त्या साठी नव नविन आयडीयाज या गोष्टी शेअर करुयात.

सुरुवात करते माझ्यापासुन. मला कमित कमी खर्चात आणि अव्हेलेबल नॅचरल रिसोर्सेसमधे पण हुबेहुब आणि नॅचरल वाटाव्यात अशा वस्तु मुलाने बनवाव्यात असे वाटत होते. त्यामुळे मी त्याला तशाच आयडीया दिल्यात.

१) मुलगा के जी मधे होता तेव्हा त्यांना क्लेपासुन मिठाई बनवायला सांगितलं होतं.
मी मुलाला दिवाळीतला गिफ्ट येतो तसा हार्टशेप बॉक्स दिला . वेगवेगळ्या रंगाची क्ले घेउन त्याचे पेढे, गुलाबजाम,सोनपापडी, जिलबीचे आकार करायला सांगितले.
गुलाबजाम करतांना एकदम डार्क ब्राउन कलरची क्ले नव्हती म्हणुन डार्क पर्पल कलरची क्ले घेउन त्याला लांबुळका आकार करुन तो खरा खुरा वाटण्यासाठी चक्क साखरेत घोळण्याची आयडीया दिली. एवढा डिट्टो जमला होता, की टीचर्स आणि पॅरेन्ट्ससुद्धा उत्सुकतेने बघत होते. एक मिठाई तळलेल्या कुरड्यांच्या चुर्‍यात घोळली. तर पिवळ्या रंगाच्या क्लेचा चौकोनी तुकडा/ ठोकळा करायला सांगितला. मुलाला रेझर हातात धरता येणार नाही म्हणुन आम्हीच त्यावर बारीक बारीक चिरा दिल्या....हुबेहुब सोनपापडी दिसायला लागली.

२) १ली त असतांना मुलाला पुन्हा मातीची फळं बनवायला सांगितली होती. यावेळेस फळांच्याच आकाराची बनवायची आणि क्ले खुप लागेल म्हणुन काळी माती आणली. गाळुन घेउन ती भिजवली. तिची छान खर्याखुर्या आकाराची आंबा, पेरु, चिक्कु, पपई, सफरचंद, सिताफळ,केळी अशी फळ बनवली. थोडा वेळ वाळवायला ठेवली (खुप वाळली की तडे जातात). अर्धवट वाळलेली असतांनाच त्यांना त्या त्या फळाप्रमाणे कलर दिले. त्यांना देठाच्या जागी काडीने आधीच छिद्र करुन ठेवलं. दुसर्‍या दिवशी ऐन शाळेत जायच्या वेळेस बागेतली पेरुची, आंब्याची, सिताफळाची, चिक्कुची पानं तोडुन आणली आणी देठाच्या जागी खोचुन ठेवली.

३)मुलगा ४थीत असतांना ख्रिसमसच्या वेळेस जनरली सगळ्या मुलांना सांगतात तसच यांनाही ख्रिसमस ट्री, सांता इ. बनवायला सांगितलं होतं. आम्ही एक रिकाम्या खोक्याचं घर बनवलं, थर्माकोलचा ख्रिसमस ट्री, त्याला मधुन मधुन कापुस चिटकवलेला. घराच्या वर आणि आजुबाजुला भुरभुरलेला बर्फ दाखवण्यासाठी कापुसाचे अगदी छोटे छोटे गोळे करुन लावले. आणि मुख्य म्हणजे घराचा दरवाजा दाखवतांना आयडीया केली ती अशी की पिवळ्या रंगाचा जिलेटीन पेपर घेउन त्याला दाराच्या आकारात, त्या प्रपोर्शनमधे कापलं. त्यावर अधिक (+)या आकारातली पांढर्या पेपरची छोटीशी पट्टी चिटकवली. जिलेटीन पेपरमुळे काचेचं दार आणि पिवळ्या रंगाच्या जिलेटीनने आतुन बाहेर येणारा लाईटाचा पिवळा प्रकाश असा इफेक्ट आला. हे असं घर 'होम अलोन' मधे पाहिल्याचं आठवत होतं. Happy

४) ५वीत असतांना त्याला वर्गात ठेवण्यासाठी 'वृक्ष व त्यांचे उपयोग' यावर चार्ट बनवायचा होता. नुसतं रंगिबेरंगी स्केचपेनने लिहिण्यापेक्षा खरोखरची फळं,फळभाज्या, धान्य, मसाल्याचे पदार्थ, सुका मेवा, एवढच काय रबर, कागद,पेन्सील, कपाशी, इ. इ वापरायचं ठरलं.
चार्टवर फळ चिकटवणं अवघड होतं....कारण कागदाचं वजन वाढलं असत. एक छोटं सफरचंद घेउन ते बरोब्बर मधोमध अर्ध कापलं. कडा आणि कडेचा थोडा पांढरा भाग तसाच ठेउन ते पोखरुन काढलं. त्या अर्ध्या भागाच्या कडेवर फेव्हिकॉल लावुन तसच ते फळ चार्टला चिकटवुन टाकलं. लवंग, मिरे, दालचिनी छोटे छोटे असल्याने तसेच चिकटवले. तर ज्वारी, बाजरी, गहु , मका त्या त्या कणसाचं ड्रॉईंग काढुन त्यावर तसे दाणे चिटकवले(मक्याचे दाणे मोठे असल्याने ते ही उभे अर्धे केले, व मक्याच्या कणसाची वरुन असतात ती पाने त्या आकारात कापुन त्यातुन मक्याचे कणिस डोकवतांना दाखवले). कागदासाठी छोटी डायरी चिटकवली त्यावर अर्धे पेन्सिल, आणि छोटसं रबरही लावुन दिले. सुका मेवा...काजु, बदाम, पिस्ता ही अर्धे कापुन लावले. कपाशी साठी नुसता कापुस लावला तर तो वाईट दिसेल म्हणुन कपाशीचं बोंड बनवलं. त्यातही मसाला वेलचीचे टरफल घेउन ते इंग्रजी व्ही आकारात चिटकवुन त्याच्या पुढे कपाशीच्या बोंडाच्या आकारात कापुस चिटकवला.
टीचरला चार्ट भारी आवडलेला.

५) मुलगा ७वीत होता त्यावेळेस त्याला civics चा प्रॉजेक्ट करायला सांगितला होता.एक साधारण शहराकडे झुकणार्या गावाचं मॉडेल बनवायचं होतं. त्यात जुन्या कौलारु घरांबरोबरच सिमेंटची बिल्डींग, स्कुल, कॉलेज, बँक, रस्ते, रस्ते सुशोभीकरण, पोस्ट ऑफीस, पाण्याची टाकी, कॉलेज ग्राउंड, त्यावर स्विमिंग टँक हे सगळं बनवायचं ठरलं. एक मोठी जुनी वुडन फ्रेम उलटी करुन त्यात हे सगळे बसवायचं होतं.
साहित्याची जमवाजमव सुरु केली. 'सुरु'च्या झाडाची सुकलेली फळं (झाडांसाठी), आयड्रॉप्स/ इयरड्रॉप्सचे येतात तसे रिकामे खोके (घरासाठी),पुठ्ठ्याचा खोका घेउन त्याच्या कागदात एक झिग्जॅग आकाराची लेयर असते ती कौलारु/पत्र्याच्या घरांसाठी, गहु निवडतांना सापडतात ते ओंब्याच्या स्वरुपातले गहु(छोट्या झाडांसाठी) घेतले.
सर्वात आधी रस्ता बनवला. इंग्रजी एस आकाराचा नागमोडा रस्ता कागदाचा कापला. त्याला ग्रे रंग दिला.नंतर त्यावर ब्रशने डिंक लावुन वरुन माझ्याकडे होती ती नर्मदा रेती भुरभुरली. झाला मस्त डांबरी रोड तयार. रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी चौकात छान सर्कल काढले. सुरुच्या झाडाची वाळलेल्या फळांना हिरवा रंग देउन रस्त्याच्या साईडने चिटकवले.
सुदैवाने, त्याच सुमारास माझ्या वडीलांचे डोळ्याचे मोतीबिंदुचे ऑपरेशन झाले होते. त्यामुळे आय्ड्रॉप्सचे भरपुर बॉक्स मिळाले. तसच घरात झालेल्या फर्निचरच्या कामाने छोटे छोटे लाकडी ठोकळे घरांसाठी वापरले. त्यावर त्या पुठ्ठ्यातुन झिगझॅग आकाराची लेयर काढुन ते कौलांसारखे चिटकवुन त्याला तपकिरी रंग दिला. बॅंकेच्या आधुनिक इमारतीला निळ्या जिलेटीन पेपरचा फॉर्म्युला वापरायला सांगितला. म्हणजे बाहेरुन ती काचेची बिल्डींग वाटत होती.
शाळेला षटकोनाच्या तीन बाजुंसारखा आकार (/-\ असा) दिला. शाळेला कंपाउंड, कंपाउंडच्या बाजुने झाडं, अर्धगोलाकार गेट, गेटवर शाळेचे नाव, फाटक, शाळेच्या भिंतींवर फुले, आंबेडकरांचे फोटो. आणि शाळेच्या मुख्य ऑफीसच्या एंट्रीला झाडांचे सर्कल... हे सगळं बनवायला सांगितलं.
कॉलेजची बिल्डींग, त्यासमोर ग्राउंड. तिथे एका कोपर्यात थोडा उंचावर स्विमिंग टँक. स्विमिंग टँकसाठी एका छोट्या चौकोनी खोक्यावर आयताकार खाच केली. त्या खाचेत त्याच आकाराचा निळाशार पाण्याचा फोटो(एका मासिकातुन कापुन)लावला. वरुन आयताकार काच बसवली.
पाण्याची टाकी: याला जरा डोकं चालवावं लागलं. काळ्या मातीचे चार ठोकळे बनवले. ते ओले असतांनाच त्यांच्यात एकसारक्या आकाराच्या झाडुच्या काड्या खुपसुन बसवल्या व नंतर वाळायला ठेवले. ते आमच्या टाकीचे पिलर झाले. वरुन एक साधारण आकाराचा गोल प्लॅस्टीकचा डबा पालथा मारला. त्याला वरुन बदामी रंगाचा कागद चिटकवला. त्या झाडुच्या काड्या दिसु नयेत म्हणुन त्यांनाही बाहेरुन बदामी कागदाच्या पट्ट्या लावुन ते झाकुन टाकले. लहानपणी कार्यानुभवात कागद फोल्ड करुन फॅन करायचो. त्याची आठवण ठेवुन तसाच पण छोटासा जिना खालपासुन वरपर्यंत तयार केला व दिला तो ही चिकटवुन.
पोस्ट ऑफीससाठी कौलारु घर व त्याच्यापुढे एक छोटीशी दंडगोलाकार पुंगळी ठेवली(लाल रंग अर्थातच दिला होता)त्यावर मुलांची बड्डे कॅप बनवतो तशीच त्रिकोणी टोपी बनवुन ठेवली. झाली पोस्टाची पेटी तयार.

दुर्दैवाने, या एकाही मॉडेलचा फोटो काढलेला नाही. त्यामुळे Sad
पण मॉडेलची एक आयडीया यावी म्हणुन हे ड्रॉईंग टाकत आहे.
final

आमचे मॉडेल जजेस व स्कुल प्रिन्सिपॉलने अ‍ॅप्रिशियेट केले हे वेगळे सांगायला नकोच. Wink

धन्यवाद!
आपल्याकडेही अशा काही आयडीया असतील तर त्या इथे शेअर कराव्यात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ठोकळ्यांचे खेळ मिळतात बाजारात. प्लॅस्टिकचे अन मजबूतही असतील. (ठोकळ्यात सर्व बाजू सारख्या मापाच्या गृहित धरतोय.)
अन्यथा, जवळपासच्या दुकानांत विषेशतः मेडिकल स्टोरमधे जाऊन रिकामे खोके मागून पहा.

मस्त धागा.. सायली लहान मुलांचा तो अक्षर, किंवा प्राण्यांच्या जिग्सॉ पझल चा सेट येतो बघ क्युब मध्ये.. तो वापरता येइल का बघ.. फार टिकाऊ नको असेल आणि लहान मुले तोंडात वगैरे घालण्याचा चान्स नसेल तर चायना शॉप वगैरे असते तिथे बघ..स्वस्तात मिळुन जाइल

धन्यवाद सर्वांना! Happy
विनार्च... इंग्रजीचा प्रॉजेक्ट मस्त जमलाय!
कागदाच्या लगद्यापासुन केलेलं कासव ही छान आहे. त्याच्या स्टेप्स सांगा प्लीज.

आकांशा, एनर्जी फ्रॉम वॉटर प्रॉजेक्ट अफाट आवडला. वॉटर इफेक्ट जमुन आलाय. छोटी घरं क्युट दिसतायत. Happy

शशांकजी,
पॅडल बोट ची आयडीया आवडली.
पण तो कारंजाचा समजला नाही. पाणी अगदी कारंजासारखे उडते का? Uhoh

पण तो कारंजाचा समजला नाही. पाणी अगदी कारंजासारखे उडते का? >>>>> हो छोटेसे कारंजेच तयार होते - रंगीत पाणी घातले की अगदी मस्तच दिसते - ते एखाद्या मोठ्याशा टबात ठेवले की आसपास प्लॅस्टिकची बदके, बेडुक असे चांगले सजवताही येते .... माझ्या मुली लहान असताना (एका गणपती सिझनमधे) घरी मी हा उद्योग परत केला होता - मुलांना अशा गोष्टीत फार मजा येते - खेळताना, लुडबुड करताना .... अजूनही काही बाही मुलांना सुचत जाते ... एकंदरीत धमाल होते. Happy

फर्टीलायझर कंपनीत असतांना छोट्या प्रमाणात बिया उगवण्यासाठी बिसलरी बॉटल्स चा प्रयोग करायचो. तसा घरी करुन बघितला होता.
bislery.jpg

बिसलरीच्या रिकाम्या बॉट्ल्स अर्ध्या कापुन घ्यायच्या. . बिसलरीच्या खालच्या अर्ध्या भागात पाणी भरायचे. वरच्या अर्ध्या भागात झाकणाच्या जागी कापसाचा बोळा घट्ट बसवायचा आणि उलटा करुन त्यात माती भरायची. त्यात सीड्स टाकायच्या.आणि माती असलेला भाग तसाच उलटा पाणी असलेल्या बिसलरीच्या अर्ध्या भागात ठेवायचा. कापसामुळे खालुन पाणी वर चढत मातीत मिसळत जाते. हवा तेवढा ओलावा टिकवला जातो. आणि ३-४ दिवसात कोंब वर आलेले दिसु लागतात.
अशा तर्‍हेने घरच्या घरी छोट्या प्रमाणात आणि कमी पाण्यावर रोपं तयार करु शकता.
ही अशी. water.jpg

पुढच्या प्रतिसादात घरीच मश्रुम कसे उगवायचे ते सांगेन.

वा आर्या - मस्त आयडिया आहे ही - बिस्लेरी बॉटल आणि छान हिरवीगार रोपे ......
असे फोटो पाहिले की सगळे कसे एका क्षणात लक्षात येते नाही का .. Wink

आम्ही कारंज जरा वेगळ्या पद्धतीन करायचो. पहिल्या सलाईनच्या बाटलीत आम्ल (फरशी धुवायच) त्याला येक लांबड नरसाळ (थिसल फनेल) लावायचो त्याच्या नळीच टोक आम्लात पार तळापर्यंत बुडालेल ठेवायचो. त्या बाटलीतुन येक नळी बाहेर काढुन दुसर्या पाणी असलेल्या सलाईनच्या बाटलीत सोडायचो. पाण्याच्या बाटलीला बॉल काढुन टाकलेली रीफिल लावायचो. नरसाळ्यात सोड्याच पाणी ओतल की (नरसाळ्याच तोंड कागदान लगेच झाकाव लागायच) पहिल्या बाटलीत आम्ल आणि सोडा रासायनिक क्रीयेमुळ CO2 तयार होऊन तो पाण्यावरच प्रेशर वाढऊन कारंज उडायच. अशे आम्ही येकाच वेळी १०-१२ कारंजे उडवले होते. बाटल्यांचे बुच हवाबंद करायला नाना उपाय केले होते.
आम्हाला शाळेत ५वी ते ९वी दर वर्षी येक येक सायन्स प्रोजेक्ट करावाच लागायचा आणि त्यातले काही वार्षिक स्नेह संम्मेलनातल्या प्रदर्शनात आणि काही जिल्हास्तरीय प्रदर्शनाला पाठवले जायचे.

व्वा, मस्त धागा आर्या. धन्यवाद.
मस्त प्रोजेक्टस लिहिले आहेत सगळ्यांनी.
सध्या गडबडीत आहे. पण जरा सवड मिळाली की एकेक करून बघणार. बिस्लेरीवाली झाडे फार आवडली.
विनार्च, कासवाची कृती लिहा ना खरंच. भारी दिसतंय.

मस्त धागा.
गुगलने ऑनलाइन सायंस फेअर आयोजित केलेले आहे.
वयोगटः १३ ते १८
प्रोजेक्ट पाठविण्याची अंतिम तारिखः ३० एप्रिल.

आणखी माहितीसाठी खालील दुवा बघा.
https://www.googlesciencefair.com

मस्त !
मी दिवाळीसाठी आकाश कंदिल तेवढा करुन देतो मुलाला त्याचा फोटो नाही माझे जवळ .

छान धागा Happy
मस्त मस्त आयडियाज मिळतिल इथे Happy

प्लॅस्टिक च्या बाटल्यांचा उपयोग करुन बनवलेल्या वस्तु/कलाकृती 'मायबोली गणेशोत्सव २०१०'.

अजुनही बर्‍याच आयडियाज सापडतिल इथे टातुटि च्या ...

माझ्या मुलाला (4 TH STD ) शाळेत तबला बनवुन दयायचे आहे. करवंटिचा बनवुन देनार आहे .. अजुन कोनाकडे काहि आयड्या असतिल तर सांगा.........

करवंटी पेक्षा शहाळ वापरता येइल का ते बघा..जरा मोठा होइल आणि नीट कडेने खुंट्या (बरोबर शब्द माहित नाही) वगैरे लावता येइल...

मुलाच्या शाळेत सायंस एक्झिबिशनसाठी विषय दिला आहे "लटकणारं घुबड" ("hanging owl"). मुलगा इयत्ता पहिलीत आहे. सामान काय वापरायचं ते सांगितलं नाहिये.

मला काय आणि कसं बनवायचं ते सुचत नाहिये. कोणी मदत करु शकेल का?

माझ्या मुलीला केबल कार बनवायची आहे. बेस्,केबीन्,मोटर केले आहे. पुली व्हील कसे बनवावे एकेरी बनवता येते पण तिला गोलाकार फिरणार हवय. खुप प्रयत्न केला पण जमत नाहीये. खाली बेस काय घ्यावा आणि खरच काही सुचत नाही.कोणाला काही आयडीया असतील तर सुचवा ना प्लीज.
प्रोजेक्ट २७ ला द्यायचा आहे.काही सुचले तर लिहा.

माझा मुलगा २ ग्रेड मध्ये आहे. शाळेत सायन्स प्रॉजेक्ट साठी काही कृपया नविन कल्पना सुचवाल का ? विषय काहीही दिला नाही. १ नोव्हेम्बर ला द्यायचा आहे.

सध्या थँक्सगिविंगचे वारे असल्याने मुलीच्या शाळेत टर्की डेकोरेशन करायचे आहे. बेलेरिना, फुट्बॉल प्लेयर, विच असे कॅरेक्टर बनवून झालेय आधी. आता नवीन काही सुचेना. अजून आयडिया सांगा प्लीज. मुलीला तिला कोणीतरी कॅरेक्टरच करायचे आहे.

Pages