आठवणीतली माणसे १. 'लिलाताई'

Submitted by उमेश वैद्य on 6 February, 2013 - 10:37

काही काही माणसे अशी असतात, की आपल्या स्मृति पटलावर कायमची कोरली जातात. कदाचित आपल्या सांस्कृतिक, वैचारिक जडण घडणीची वाटेकरी ठरतात. अशी काही कोरली गेलेली माणसे शब्दात पकडण्याचा हा प्रयत्न म्हणजेच 'आठवणीतली माणसे' 'आठवणीतली माणसे चा' हा पहिला भाग. आवडला तर आणखी लिहीन असा विचार आहे.

===============================================================

लिलाताई.

बघा बघा लिलाताई धडपडलात ना! तरी सांगत होतो. मधे मधे करू नका सारखे. हंपायर वाईड बॉल ऍक्शन करतो तसा हात हवेत फिरवत शेखर म्हणाला. पाठोपाठ घुमण्याचे आवाज.
अरे! अरे! त्या काही धडपडल्या नाहियेत काही. बारा वाजलेत बारा. त्यांच्या अंगात आलय" गीता हार करताना शेखरला म्हणाली. गोकुळाष्टमी चा उत्सव चालू होता. रेळ्यांच्या वाड्यातला लिलाताईंचा गोकुळाष्टमी उत्सव. शेखर बिचारा अंध. त्याला वाटल लिलाताई पडल्याच.आवाज ऐकून सगळी मुले धावत आली. दरवर्षीप्रमाणे उत्सवाला सुरवात झाली. हा उत्सव म्हणजे मुलांच्या आवडीचा. दही पोहे, काला, दहिहंडी सगळ सगळ करायच्या लिलाताई वाड्यातल्या मुलांसाठी. बरोबर बारा वाजता त्यांच्या अंगात कृष्ण यायचा.मजाच मजा.

लिलाताई एक वल्ली होती.मुलबाळ नसलेली ही स्त्री मुलांची अतिशय आवडती. रेळ्यांच्या वाड्यातल्या शेवटाला असलेल्या एका अंधाऱ्या खोलीत हे जोडपे रहायचं. दाराबाहेर कोंबड्याच खुराडं. लिलाताई आणि काका तुपे. बाई दिसायला नसल्या तरी मनानं चांगल्या होत्या. पण सगळ्या वाड्याची मिडिया. कुणाकडॆ काय, कुणाकडे काय. सगळं ठाऊक. वाड्यातल्या माणसांना त्यांचा आधार वाटायचा. बाहेर जाताना मुलांना खुषाल लिलाताईंकडे सोडाव. आईबाप निश्चिंत.
“अहो लिलाताई आमच्या श्री ला बघा ना जरा. भाजीला जातेय. हे दोन कोरडॆ लंगोट पण ठेवा.

गावाला जाताना आपापले पाळीव प्राणी, पक्षीसुध्दा लिलाताईंकडे सोडून माणसं जायची. आवाज मात्र गर्गशा. दिसायला सावळ्याशा. दात आणि ओठ यांनी आपापल्या सीमारेषांचं उल्लंघन केलेलं. दात ईतके पुढे आलेले की त्याच्यावर नारळाची वाटी खोवली तर खोवलेला नारळ अलगद तोंडात. पांढऱ्या केसांचा अंबाडा, पाच वारी सुती मळकट साडी वर खोचलेली. ग्रामीण भाषेच्या लयदार ढंगात बोलायच्या. वाड्यात जवळ जवळ वीस तरी बि-हाडं असतील. लिलाताईंची प्रत्येकाकडॆ रोजची भेट ठरलेली.

आवो... काय सांगु माई तुम्हाला, सकाळी सकाळी धारपांच्या दारापाशी येऊन म्हणायच्या, रात्री स्वप्नात हा अस्सा आलावता. हाताचा पंजा नागाच्या फण्यासारखा माईंपुढे डोलवत म्हणायच्या.

अगोबाई!! मग ग लिला. माई हसत हसत विचारायच्या.

"काय नाय गेला मग. बिलात”. धारपांच्या घरात हास्याचे फवारे.

त्यांच्या स्वप्नात कधी नाग यायचा, कधी देवि यायची, कुंकु लावायची. लिलाताईंच्या स्वप्नात आज काय आलं हे सगळ्या वाड्याला सकाळी कळायचं. मग बायकांची चर्चा. स्वप्नाचा अर्थ माई धारपांना येऊन नक्की विचारणार. माई म्हणायच्या, "काही नाही गं, चांगलच असतं असं स्वप्नात दिसणं" काहीतरी चांगलं होणार बघ. रेळ्यांचा वाडाही नामीच. मध्यमवर्ग़च होता. काही काही ईरसाल. एकदा गंम्मत झाली.

देशमुखांच्या घराबाहेर एक पोपटाचा पिंजरा लटकला. आत एक राघु मैनेची जोडी. वाड्यातली सगळी मुलं गोळा झाली बघायला. लिलाताईंना ऐता विषय मिळाला. घराघरात जाऊन, "वयनी देशमुखांचा पोपट बगीतला काय? लिला! लिला! बोलतो ”. अख्या वाड्याला करमणूक.

त्यांच्याकडे आहे मग आपल्याकडे का नको? हे त्या वेळीही होतच. काही दिवसातच सगळ्या बि-हाडाबाहेर पोपटाचे पिंजरे. पोपटांच्या कलकली सुरू. सगळ्यांचे पोपट बघायचे! मुलांना ऐतीच संधी. मग़ कुणाचा काय बोलतो, कुणाचा काय खातो, काही दिवस तरी हा धुडगुस.

गावाला जाताना आपापला पिंजरा लिलाताईंकडे देऊन जायची. “ मी खाया प्यायला देईन. पण तुमचा पोपट मेला तर मी जबाबदार नाय हां" बजावायच्या.

मे महिन्याचे दिवस. बिचाऱ्या लिलाताईच्या घरात सात आठ पिजरे लटकलेले. दुपारी पोपटांना बोलायला शिकवायच्या. बघण्यासारखं असे. मिठ्ठूs s बोल. लिलाs s . पोपट खरचं लिला लिला म्हणायचा. मिठ्ठूs s बोल. तुपे आले!s s . तुपे आले. तुपे आले. पोपट म्हणायचा.
कुटुंब परत सुट्टी संपवुन येईपर्यंत पोपटाच्या डिक्शनरीत दहा पाच शब्दांची भर पडलेली असायचीच. मुलं म्हणायची माझं नाव शिकवा ना लिलाताई पोपटाला.

एकदा रेळे वहिनींकडे जाउन म्हणाल्या, “ बगा ना ओ वयनी, सखाराम गेला..त्याचा पोपट माझ्याकडे. धनू गेला त्याचा पोपट माझ्याकडे. पोळे वहिनी गेल्या गावाला, त्यांचा पोपट माझ्याकडे. आता किती किती जणांचे म्हणून पोपट सांभाळू.”

लिलाताई दिर्घायुषी ठरल्या. तुप्यांच्या मागे बरीच वर्षे एकट्या होत्या. एकट्या कशा? सारा वाडा होता ना. त्याही अलीकडे गेल्या. त्या गेल्यावर लांबचा भाचा आला होता. त्यांचं सामान सुमान काय असणार. तुपे देवि डॉक्टरच्या हाताखाली कंपाऊंडर. कोंबड्या, कळकट गादीचा पलंग, काही भांडीकुंडी इतकेच. गादीच्या खाली बारीक बारीक गुंडाळ्या केलेल्या नोटा मिळाल्या. मोजल्या तर किती असतील सुमारे तीस पस्तीस हजार रुपये. भाचा ते घेऊन गेला.

अशी सच्ची साधी सरळ बाई. मोकळ्या मनाची. अशीच माणसे मनाच्या देव्हा-यात आठवणींचे देव होतात. माझे आजी आजोबा गेले. मामाही रेळे वाडा सोडून अन्यत्र गेला. माझा रेळे वाड्याशी संबंध संपला. पण त्या आठवणींचे काय करायचे? त्या येतात. आठवणींचे राघू अजूनही लिला..लिला करतातच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<आठवणींचे राघू अजूनही लिला..लिला करतातच.>>सुंदर शेवट.

जरा प्रशस्त लिहिले असते तर अधिक छान झाले असते.