किशोरदाचं यॉडलिंग... पंचमदाचं संयोजन... गुलजार साहेबांच्या काव्यातील जगावेगळी प्रतीकं.. नाना पाटेकरांची विशिष्ट आक्रस्ताळी संवादफेक.. अश्या अनेक गोष्टी आहेत, ज्या मला जाम आवडतात.. मलाच नव्हे, अनेकांना आवडतात. का ? किशोर/ पंचम/ गुलजार/ नाना ह्यांपेक्षा मोठे किंवा त्या तोडीचे दुसरे कुणीच नाहीत/ नव्हते ? होते की आणि आहेतही ! तरी हेच आवडतात कारण - 'वेगळेपण'. आणि ते सादर करण्याची हिंमत, आत्मविश्वास.
तेव्हढी नाही, पण त्याच पठडीतली हिंमतवान, आत्मविश्वासू प्रयोगशीलता जेव्हा कुणी एखाद वेळेसही दाखवतं, तेव्हा तेही आवडून जातं. बिजॉय नांबियार तेच दाखवतो... 'डेव्हिड' मधून. 'समथिंग डिफरंट'.
'डेव्हिड' ही एक कहाणी नाही. 'डेव्हिड' हे एक पात्र नाही. ह्या तीन कहाण्या आहेत, तीन पात्रांच्या, तीन वेगवेगळ्या ठिकाणी आणि तीन वेगवेगळ्या कालखंडात घडणाऱ्या.
एक -
१९७५, लंडन.
इथे एक 'घनी' नामक माफिया असतो. त्याच्या दहशतवादी कारवायांची भारी किंमत चुकवलेले भारत सरकार, तीन जणांना त्याचा खातमा करण्यासाठी लंडनला पाठवते. हे तिघे भारतीय गुप्तचर/ सुरक्षा खात्याचे लोक, घनीची माहिती काढतात. त्याच्या भोवताली, अत्यंत विश्वासू लोकांचे अभेद्य कवच असल्याचे त्यांना समजून येते. ह्या विश्वासू लोकांपैकी एक, घनीचा 'उजवा हात' म्हणजे 'डेव्हिड' (नील नितीन मुकेश).
घनीला मारायचे असेल, तर आधी 'डेव्हिड'ला मारले पाहिजे. पण ह्या कथेचा हाच एक कोन नाही. घनीच्या घरीच राहाणारा, त्याच्या मुलासारखाच असणारा 'डेव्हिड' नक्की कोण आहे? ह्याबाबत संभ्रम आहे. ही कथा, घनीच्या खऱ्या, व्यसनाधीन चरसी मुलाचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी जेव्हा डेव्हिड-नूरची जोडी तोडून, जबरदस्तीने नूरशी त्याचे लग्न लावले जाते... तेव्हा एक वेगळे वळण घेते, पण त्या वळणाच्याही पुढे अजून वळणं घेऊन संपते.
दोन -
१९९९, मुंबई.
बांद्र्याच्या एका निम्न मध्यमवर्गीय वस्तीत राहाणारा फादर नोएल. त्याची तीन मुलं. दोन मुली आणि एक मुलगा - 'डेव्हिड' (विनय विरमानी).
हा डेव्हिड एक गिटारवादक आहे. घरोघरी जाऊन गिटार शिकवणारा.. संगीतकारांचे उंबरठे झिजवणारा एक 'स्ट्रगलर'. फादर नोएल, लोकांना श्रद्धेची शिकवण देणारा एक सच्च्या दिलाचा धार्मिक माणूस. त्याच्या ह्या शिकवणीमुळे, कर्मठ धर्मांधांच्या रोषाला तो नकळत ओढवून घेतो. आपल्या संगीतक्षेत्रातील भवितव्याच्या 'गोल्डन ब्रेक'च्या उंबरठ्यावर डेव्हिड असताना एक प्रचंड मोठी उलथापालथ होते आणि एकमेकांशी क्षणभरही न पटणाऱ्या बाप-मुलाचं नातंच बदलून जातं. डेव्हिडच्या आयुष्याला एक कधी मनातही न आलेलं वळण मिळतं आणि तो अखेरीस अश्या एका जागी पोहोचतो, जिचा विचार त्यानेच काय, ही कहाणी पाहाणाऱ्यानेही केलेला नसतो !
तीन -
२०१०, गोवा.
इतर दोन कहाण्या खूप गंभीर.. आणि ही कहाणी, खूपच हलकी-फुलकी !
इथला डेव्हिड (विक्रम) एक दारूचं पिंप आहे. आपल्या आईसोबत राहाणारा डेव्हिड, लग्नाचं वय सरून गेलेला, अख्ख्या गावात नालायक, पनौती म्हणून कुप्रसिद्ध असतो. त्याला तीन मित्र - 'पीटर' (निशान नानैया), फ्रेनी (तब्बू) आणि त्याच्या वडिलांचं (सौरभ शुक्ला) भूत ! मुलाच्या लग्नासाठी आईने अनेक उंबरठे झिजवले असतात, पण काही केल्या ते जुळत नसतं. पूर्वी जेव्हा एकदा लग्न ठरलेलं असतं, तेव्हा डेव्हिडची होणारी बायको तिच्या बॉयफ्रेंडसोबत आयत्या वेळी पळून गेलेली असते. अश्या सगळ्या पार्श्वभूमीवर गावात 'रोमा' (ईशा शेरवानी) ही एक मूक-बधिर मुलगी येते. तिची आणि डेव्हिडची ओळखच मुळी पीटरची गर्लफ्रेंड, जिच्याशी तो लग्न करणार असतो, अशी होते. पण तरीही डेव्हिड फॉल्स इन लव्ह ! एकीकडे त्याला असं वाटत असतं की रोमाही त्याच्यावर प्रेम करते... दुसरीकडे त्याची 'बेस्ट फ्रेंड' फ्रेनी, त्याला 'भीड बिनधास्त' म्हणून रोमाशी बोलायला भाग पाडत असते आणि... दुसरीकडे बापाचं भूत त्याला त्यापासून रोखत असतं.. शेवटी पीटर-रोमाच्या लग्नात BEST MAN बनलेला डेव्हिड एक निर्णय घेतो. निर्णय घेतो खरा, पण आयत्या वेळी तोही एक वेगळंच वळण घेतो.
अश्या ह्या तीन स्वतंत्र कथा, एकाच वेळी आलटून पालटून पडद्यावर दाखवल्या जात असतात आणि तरीही त्यात आपला कुठलाही गोंधळ होत नाही. कहाणी बदलल्यानंतर, पहिल्याच फ्रेममध्ये आपण लंडनला आहोत, मुंबईला आहोत की गोव्याला हे लगेच समजून येतं. त्यासाठी दिग्दर्शकाने सगळ्यात सोप्प्या पद्धतीचा वापर केला आहे. लंडनची कहाणी कृष्ण-धवल, मुंबईतली कहाणी रंगीत आणि गोव्यातली जरा पिवळसर छटेत दाखवली आहे. तीन कहाण्यांमधल्या पात्रांच्या वेशभूषा, केशभूषाही लगेच फरक स्पष्ट करतात आणि प्रत्येक वेळेस, कहाणी बदलल्यानंतरच्या पहिल्याच फ्रेममध्ये दिग्दर्शक 'सीनारीओ' स्पष्ट करण्याचे व्यवधान पाळतोच.
तसेच, विनाकारण त्या काळचं लंडन... त्या काळातली मुंबई वगैरे दाखवण्यावर वेळ व पैसा खर्च केलेला नाही. नाही तर त्याच त्या 'एरिअल दृश्यांनी' कंटाळा आला असता.
तिन्ही 'डेव्हिडां'नी आपापल्या भूमिकेस न्याय दिला आहे.
नील नितीन मुकेश खूप ग्रेट अभिनेता नाहीच. पण तो त्याचा वावर सहज असतो आणि त्याचा परफॉर्मन्स अवार्ड विनिंग नसला तरी हार्ट विनिंग असतो, असं माझं एक वैयक्तिक मत.
विनय विरमानी खूप टवटवीत चेहरा वाटतो. आतल्या आत घुसमटणारा तरुण त्याने चांगलाच साकारला आहे.
गोव्यातला 'विक्रम' भाव खाऊन जातो. भावनिक, विनोदी आणि हाणामारीच्या दृश्यातही तो अति अभिनय करत नाही. त्याचा संयतपणा लक्षात राहाण्याजोगा.
इतर भूमिकांमध्ये, धार्मिक भावनांना भडकावणारी 'मालती ताई' म्हणून 'रोहिणी हत्तंगडी, पिअक्कड डेव्हिडच्या पिअक्कड बापाच्या भूताच्या भूमिकेतील सौरभ शुक्ला आणि फादर नोएलच्या भूमिकेतील 'नासेर' चोख काम करतात. तब्बूही व्यवस्थित.
डेव्हिडच्या वडिलांच्या भूताने वेगवेगळ्या लोकांच्या अंगात शिरणे अतिशय गंमतशीर आहे... प्रत्येक वेळी हमखास हशा पिकतो.
फादर नोएल दाढी करतानाचे दृश्य अंगावर काटा आणते..
ह्या तिन्ही कहाण्या अखेरीस एका धाग्याने एकमेकांशी जोडल्या जातात. ते आवश्यकही होतं, अन्यथा त्यांना एकत्र दाखवण्यात काही अर्थ नसता. पण तीन-तीन कहाण्या असूनही सिनेमाची लांबी (साधारण अडीच तास) जरा कमी करणे शक्य होते, असंही वाटलं. संगीत विशेष परिणामकारक नाही, पण अत्याचारीही नाही.. (सध्याचा ट्रेण्ड पाहाता, हेही नसे थोडके!)
'विश्वरूपम' पाहावा की 'डेव्हिड' ? ह्या द्विधेत असताना माझ्या विचारांनी एक वेगळंच वळण घेतलं आणि मी 'डेव्हिड' निवडला and I think, it was a smart choice !
रेटिंग - ३.५
http://www.ranjeetparadkar.com/2013/02/movie-review-david.html
१ला मी . . . विक्रम करिता मी
१ला मी
.
.
.
विक्रम करिता मी १ स्टार अजुन देणार .......जबरदस्त ताकदीचा अभिनेता आहे.. हिंदी मधे त्याचा शिरकाव जरा उशिरानेच झाला...... जितके प्रयोग आमिर ने केले नसतील त्याच्या कितीतरी पटीने प्रयोग त्याने तामिळ मधे केले आहेत
बघावा लागेल अस दिसतय
बघावा लागेल अस दिसतय
फार छान
फार छान
बघायचा आहे.
बघायचा आहे.
तमिळ विक्रमच आहे ना. चांगली
तमिळ विक्रमच आहे ना. चांगली कामे करतो खरेच. शैतान सिनेमा मला जाम आवडलेला. विशेषतः खोया खोया चांद गाण्यावेळेचा सीन. संगीत पण चांगले आहे शैतानचे. प्रयोग चांगले करतो नंबियार.
बघेंगे.
तमीळ विक्रम म्हणजे तो
तमीळ विक्रम म्हणजे तो मध्यंतरी अपरीचित म्हणून हिंदीत डब केलेला मूव्ही दाखवायचे, तो पर्सनॅलिटी डिसऑर्डरवाला... त्यातला अंबी ना...? तसाही परीक्षण वाचण्याआधीच बघणार होतेच... बिग बी मूव्हीज पेक्षा असे लो बजेट वेगळ्या पठडीतले मूव्हीज जास्त समाधान देतात... मलातरी!!
धन्यवाद.
धन्यवाद.
तमीळ विक्रम म्हणजे तो
तमीळ विक्रम म्हणजे तो मध्यंतरी अपरीचित म्हणून हिंदीत डब केलेला मूव्ही दाखवायचे, तो पर्सनॅलिटी डिसऑर्डरवाला... त्यातला अंबी ना...? >> हे माहित नाही. पण माझ्या मते 'रावण' (मणी रत्नम चा) मधला ऐश्वर्याचा नवरा - पोलिसवाला - तोच तो.
विक्रम तमीळ विक्रम म्हणजे तो
विक्रम
तमीळ विक्रम म्हणजे तो मध्यंतरी अपरीचित म्हणून हिंदीत डब केलेला मूव्ही दाखवायचे, तो पर्सनॅलिटी डिसऑर्डरवाला... त्यातला अंबी ना...?>> हो.
माहित नाही. पण माझ्या मते 'रावण' (मणी रत्नम चा) मधला ऐश्वर्याचा नवरा - पोलिसवाला - तोच तो.>>> तमिळ रावनन मधे त्यानेच अभिषेक बच्चनने केलेला रोल केला होता. तमिळ रावनन पाहिल्यास "अभिषेक बच्चनने त्या रोलची किती माती केली आहे" हे विधान पुराव्यासह शाबित करता येते.
तमिळ रावनन पाहिल्यास "अभिषेक
तमिळ रावनन पाहिल्यास "अभिषेक बच्चनने त्या रोलची किती माती केली आहे" हे विधान पुराव्यासह शाबित करता येते.>>>
प्रचंड सहमत ! मीदेखील केवळ विक्रमसाठी म्हणून एक स्टार ज्यादाचा देइन. खरोखर, प्रचंड ताकदीचा अभिनेता आहे हा !
देखनेका है.. संगीत विशेष
देखनेका है..
संगीत विशेष परिणामकारक नाही, पण अत्याचारीही नाही.. >> अगदी.. समथिंग डिफरंट ! त्यात रेमोचे बरेच दिवसांनी गाणे.. नि यूहीरे गाणे तर खूपच मस्त
वेगळा प्रयोग दिसतोय. बघायला
वेगळा प्रयोग दिसतोय. बघायला हवा.
छान लिहिलंय... पण आता चित्रपट
छान लिहिलंय... पण आता चित्रपट बहुतेक टिव्हीवर येईल तेव्हाच पहावा लागेल.