ll पार्ट आणि पार्टनर ll

Submitted by कमलाकर देसले on 31 January, 2013 - 05:09

Jan 29, 2013,
आर्टिकल (महाराष्ट्र टाइम्स -सगुण निर्गुण ) कमलाकर देसले
ll पार्ट आणि पार्टनर ll

घर या संस्थेला घरघर लागते की काय असे वाटण्याइतके दिवस आता आलेत . वरून जरी सगळं ' ऑल इज वेल ' दिसत असलं तरी तसं ' वेल ' असण्याच्या शक्यता धूसर होताना दिसताहेत . माणसे चार भिंतीत राहतात ; पण दोन ध्रुवांवर राहिल्यासारखी राहतात . पती - पत्नीतल्या संवादाची जागा आता विसंवादाने घेतली आहे . आता विद्या विनयाने शोभतांना दिसत नाही . अहंकाराने कुरूप झालेली दिसत आहे . शिक्षणाने व्यक्तीगतता सघन होतांना दिसते आहे . ही सघनता पती - पत्नी अशा दोघांत असेल तर घटस्फोटाचा कडेलोट ठरलेलाच आहे . चूक कोणाचीही असू शकते . ' त्याची ', ' तिची ' किंवा ' दोघांची .' पण चुकते आहे हे नक्की .

निसर्गात सगळं कसं संलग्न आहे . एक दुसऱ्याशी जोडलेलं . मानवेतर सृष्टीत वैविध्य आणि एकरसतेचा अनोखा मिलाफ पाहायला मिळतो . म्हणजे असं पहा , की झाड मातीत उगवलेलं . मुळांचा मातीशी संबंध . मातीचा खडकाशी . मुळे खडकाच्या काठिण्याला गुदगुल्या करतात . खडकही आपले काठीण्य सोडून मुळांना पाण्यापर्यंत जाण्यासाठी वाट करून देतात . बाळाने आईच्या स्तनाला लुचावे , तशी मुळे मातीला लुचतात . खडकाला आपल्या दैवी स्पर्शाने हरखून टाकतात . मातीतला जीवनरस पीत झाड उंच होते . फुलते . फळते . झाडाच्या बहरण्याला वाराही दाद देतो . झाडेही आपली फळे , फुले , सावली सर्व माणसाला देऊन टाकतात . सूर्य ... प्रकाश , वारा ... प्राण , मेघ ... पाऊस तर पाऊस सृष्टीला जीवन देतो . आकाशाच्या सज्जन ओंजळीत जीवनाचा हा उत्सव नित्य चालू असतो . त्यात दिल्या घेतल्याचे बोलणे , उपकाराच्या उलट्या , हक्काची हीनता , दानाची दीनता आणि फालतू स्वातंत्र्याची भाषा नसते . वसुंधरेचं ' वसुधैव कुटुंब ' सुखात नांदत असतं .

माणसाच्या दुनियेत स्वीकार नाही . निवड आणि नकार आहे . निदान ती निवड तरी चांगली असावी , म्हणून प्राचीन काळापासून शिक्षणव्यवस्था निर्माण झाली . त्यात प्रेम , त्याग , सेवा , समर्पण , समजूतदारपणा , स्वीकार , औदार्य ही जीवनमूल्ये अंतर्भूत झाली आहेत . आता ती फक्त पाठ करून लिहिण्या , बोलण्यापुरती उरली आहेत . त्याजागी स्वार्थ , कपट , असूया , द्वेष , हव्यास , लालसा , व्यक्तिगतता ही व्यावहारी मूल्ये महत्त्वाची ठरू लागली आहेत . उपयोगिता आणि स्वार्थ हाच संबंधांचा मुख्य आधार झाला . एकूणच सत्ता , समाज , धर्म आणि मुख्य म्हणजे कुटुंबव्यवस्थेत कलहाची बीजे रुजू लागली , बाळसे धरून फोफावू लागली आहेत . आता तरी उज्ज्वल भविष्यासाठी आपण आहे त्या परिस्थितीचा स्वीकार आणि विधायक बदलासाठी नव्याची निवड चांगली करू या . मग ही निवड मशीनच्या एखाद्या पार्टची असो वा आयुष्याच्या पार्टनरची . घरात पराभूत आणि बाहेर जगज्जेता ठरलेला कुणीही संतांना मान्य नाही . ज्ञानोबाराय अशा पराभूत प्रापंचिकाविषयी फार छान लिहितात ... येर विश्वभरी आदरा । मुर्खू जैसा ।।
कमलाकर देसले

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतक्या लहानशा लेखात किती विषयांना हात घातलाय. Uhoh

फायनली नव्याची निवड चांगली करायची म्हणजे नेमकं काय करायचं?

टिपीकल गोल गोल स्यूडो आध्यात्मिक लेखन. मटात ज्या कॉलमकरिता लिहिलेत त्याकरिता अगदी परफेक्ट!

खरंय साती. अगदीच टिपीकल. शेवटी काय म्हणायचंय ते कळलं नाही ते नाहीच.
तीन पॅराग्राफमध्ये चर्‍हाट न लावता घर, पती पत्नी, संवाद विसंवाद, शिक्षण, निसर्ग, धर्म, समाज वगैरेचा वेध चांगला घेतलात पण त्याच त्याच तक्रारी वाचायचाही कंटाळा यायला लागलाय आता.

चिंगी | 3 February, 2013 - 02:50 नवीन
लेखक महोदय धन्यवाद कशाबद्दल. मी लेखाची स्तुती केलेली नाहीये.>>>> अच्छा म्हणून आभार मानू नको का ?

लेख कठीण आहे खरा,
पण यात पुर्णविराम, स्वल्पविराम हे शब्द संपल्यावर लगेच न येता एक स्पेस सोडून येत आहेत त्यामुळे वाचताना जरा चुकल्यासारखे होतंय राव.
चू.भू.दे.घे.

सोनू राव खरेच की कोटी करत आहात
उद्या "B" दाबून बोल्ड कराल आणि बटबटीत बोलाल. Proud

अवांतर प्रतिक्रियेबद्दल क्षमस्व. Sad