चमक

Submitted by समीर चव्हाण on 28 January, 2013 - 06:10

फारा दिवसांनी घरी परतल्यानंतर
पाहिलीय मी त्याच्या डोळ्यातली चमक
फार काही उजळणारी

आयुष्यात डोकावलं तर दु:ख, विषाद, खंत भरून असेलही,
पण आनंदही कुठे कमी आहे
माणूस भ्रमाच्या बुडबुड्याप्रमाणे तरंगतोही आणि विरतोही

अस्तित्व नावाची चीज विलक्षण आहे
जो तो तिला गाठीला बांधल्याप्रमाणे वावरतो खरे,
पण मानगुटावर बसल्यावर झटकतोही
ती एक अवदसा की तिचा संगही प्रतारतो आणि असंगही

अस्तित्वाचा सदरा मळकट
काढशील तर होइल फसगत

अप्राप्याचे भूत उरावर बसल्याप्रमाणे माणूस नाचत राहतो
अलिखित जमाखर्चाच्या रेघोट्या ओढीत
हेवेदाव्यांच्या तापलेल्या कढईत मन सोडून द्यायला

कशासाठी माणूस नसत्या थराला जातो,
आपल्या करकूदीला प्रशस्तिपत्रके वाटीत
वणवणत राहतो असंतोषाच्या रणरणत्या उन्हात

आत्तापर्यंतचा प्रवास निरर्थक वाटावा असेही कित्येकदा वाटून जाते
आपल्याला आपली कीव वाटेपर्यंत
अस्तित्वाचा प्रश्न भंडावून सोडतो

आयुष्यात फार भरकटी झाली,
अगदी इथल्याप्रमाणे
असो, त्याच्या डोळ्यातली चमक आठवून निर्वाह करतोय
अजून काय बोलू

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

समीर,
आशय नक्कीच चांगला आहे, पण खूप सार्‍या उपमा आणि मोठाली वाक्य वाचताना अर्थाचा ट्रॅक सुटल्यासारखा होतो, मजा जाते.
प्रामाणिक मत नोंदवलंय.. रागाऊ नकोस.