चारचौघी - ९

Submitted by बेफ़िकीर on 25 January, 2013 - 04:01

पै!

पै काय माणूस असावा? ओबडधोबड दिसणारा पै रोखठोक वागतो. सिमेलियाला सपोर्ट करत आहे. त्याच्याच पेपरने तिला एक्स्पोजही केले. पण त्यानंतर तो तिच्या प्रत्येक पावलाला तिची सावली बनत आहे. बरं, त्यात काही इतर हेतूही दिसत नाही. निव्वळ प्रामाणिकपणे एका नागवल्या गेलेल्या स्त्रीला मदत करणे इतकाच हेतू दिसत आहे. पै ने सिमचा फोटो पेपरमध्ये येऊ दिला नसता तर झालेला गहजब झालाही नसता. एक प्रकारे पैनेच सिमला नागवले आहे. पण सिमचे हजारो फॅन्सही पैमुळेच तयार झाले आहेत. सिमला नेमके काय हवे होते? उत्तान पोझेस देऊन पैसे कमवणे की पैशासोबत ख्यातीही? ही अशी ख्याती? पण तिने जे केले त्यातच तिला ख्याती मिळू शकणार ना? म्हणजे उत्तान कपडे घालून एका मुलीने पोझेस दिल्या तर ती गाते चांगली असे कोण म्हणणार? ती दिसते चांगली आणि दाखवते भरपूर असेच म्हणणार ना? एका परीने सिमचा फोटो पै मुळे पेपरआऊट होणे हे सिमच्या फायद्याचेच ठरले की? सिम ज्या क्षेत्रात उतरली आहे, तिथे ती सोज्वळ राहिली तरी जग बोलायचे ते बोलणारच. सिमने उलटे केले. तुम्ही जे बोलाल त्याच्याही पुढची मी आहे. अशी मुलगी बघण्यात काय ऐकण्यातही नव्हती आणि आपल्याच गावात ती जगत असावी आणि असे वागत असावी या धक्यामुळे हा सगळा अफाट गोंधळ होत आहे. पै ने सिमचा फोटो पेपरमध्ये दिला नसता तर दोन चार दिवसांनी दुसर्‍या कोणीतरी दिला असता. एरॉटिकाची होर्डिंग्ज आज उद्यात गावात लागतीलच. येणारे जाणारे सिमच्या उठावदार कर्व्ह्जकडे आणि दिलखेचक अदांकडे चोरून बघत पुढे सटकतीलच. पेपरमध्ये काही आलेच नसते तर होर्डिंग्जमुळे गहजब माजलाच असता, जेव्हा हे समजले असते की याच गावातील ही मुलगी आहे. मग पै ने काय केले? पै ने पत्रकारिता दाखवली. की बुवा हे असे असे घडलेले आहे गावात. पण त्यानंतर पै पाय रोवून सिमवर होणारे हल्ले स्वतःवर झेलण्याच्या तयारीने उभा राहिला. तिने एक्स्पोज करावे हा तिचा निर्णय, तिने एक्स्पोज केले हे गावाला कळावे ही पत्रकारिता आणि त्यानंतर सिमला भक्कम आधार पुरवणे ही माणुसकी! पै ने माणूसकीही दाखवलेली आहे. नुसतेच सिमला एक्स्पोज करून मजा बघत बसलेला नाही आहे किंवा प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे लोक असतात तसा सिमला आणखीन शिव्या देत आर्टिकल्स लिहून प्रकरण पेटवत बसलेला नाही आहे. पै ही काय पर्सनॅलिटी असावी? तो स्वतःहून तिच्या पुढेपुढे करत नाही. लाळघोटेपणा करत नाही. त्याच्याकडे असलेले काँटॅक्ट्स, नॉलेज, पत्रकारिता हे सामर्थ्य तो चांगल्यासाठी वापरत आहे. क्षितिजसारख्या भुक्कड वर्तमानपत्रात राहून तो जमेल ते करत आहे. त्यालाही ऑफर्स येत असतील, पण तो क्षितिज सोडून जात नाही आहे. असे का? पै येऊन बसला की पोलिस, वकील यांच्या मनातील चलबिचल उघडपणे त्यांच्या चेहर्‍यावर का दिसू लागते? पै ला सगळे का घाबरतात? आणि असे असूनही पै सिमच्याच मागे का उभा आहे. त्याला शक्य असते तर त्याने सिमला आणखीन नागवे करण्याचा सपाटा लावला असता. पण तिला नागवे करून स्वतः नाव कमवायचे हा त्याचा हेतूच नाही आहे. पै कर्तव्यदक्ष वाटतो. मनाने पुढारलेल्या व प्रगत विचारांचा वाटतो. सिमने काही उदात्त कृत्य केले आहे असे नव्हे. पण ते करण्याचा आणि ते करून पोट भरण्याचा तिला अधिकार आहे हे पै स्वतःही मान्य करत आहे आणि इतरांनाही मान्य करायला लावत आहे. पै एक चांगला माणूस असावा. जबाबदार असावा. दुसर्‍या माणसाचे स्वातंत्र्य व सन्मान यांची जाणीव ठेवणारा असावा. आपल्याला ज्ञात असलेल्या विकृत पुरुषजमातीतील एक उत्तम अपवाद असावा पै! पै सारखे असावे पुरुषांनी! तरच त्यांना पुरुष म्हणण्यात यावे. नाहीतर वरवर सज्जनतेचा आव आणून परिस्थिती ताब्यात आली की वखवखल्यासारखे वागणारे खूप असतात. पै ला अजून आपण नीटसे, पुरेसे ओळखत नाही आहोत. पण आपण मानवी मनाचे इतके प्रकार पाहिलेले आहेत की त वरून ताकभात ओळखण्याची हातोटी आपल्याकडे आलेली आहे. पै आपल्या निकषांनुसार एक सच्चा पुरुष वाटत आहे. कदाचित, पुरुषाची सावलीही नकोशी झालेल्या आपण, अश्या एखाद्या भक्कम आधार देऊ शकणार्‍या प्रामाणिक पुरुषालाही इतर विकृतांच्या यादीत समाविष्ट करत असू का? हा अन्याय ठरेल का? पै ला आपण भेटावे का? अधिक समजून घ्यावे का? कदाचित मीरा भाटिया आणि वारिया दस्तूर सारख्या स्त्रीचीच शत्रू असलेल्या स्त्री वकीलांचे कारभार उघड करण्यास आणि केंद्रातील मुलींना मदत मिळवून देण्यास पै ची मदत होईल. कदाचित, आपल्या मनावर कोरला गेलेला 'पुरुष म्हणजे राक्षस' हा ठसा बुजण्यास पै ची मदत होऊ शकेल. कदाचित आपलाही हे आयुष्य पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये व्यवस्थितपणे जगण्याचा आत्मविश्वास वाढू शकेल किंवा नसलाच तर निर्माण होईल. कदाचित, असे काही पुरुष संपर्कात राहिले तर जग फक्त वाईटच आहे हा आपला विचार बदलून आपणही थोड्या सकारात्मकपणे जगू शकू. पै ची वेळ घेऊन त्याला भेटावे. आपण त्याला का भेटणार आहोत हे त्याच्या लक्षातच येणार नाही. त्याला भेटण्यासाठी काहीतरी खास कारण असायला हवे आपल्यापाशी. उगाचच एखाद्याला अधिक नीटपणे समजून घ्यायला आपण भेटू शकत नाही. वारिया दस्तूर प्रकरण किंवा सिमचा रेप झाल्याचे प्रकरण घेऊन त्याला भेटण्याआधी सिमला त्या भेटीची कल्पना द्यावी लागेल. ती अर्थातच नाही म्हणेल. मग आपल्याकडे असे काय कारण आहे पै ला भेटू शकण्याचे? कदाचित आपल्या केंद्राबाबत माहिती छापून आणाल असे विचारता येईल. कदाचित काही शोषित महिला स्वतःहून केंद्रात राहायला येऊ लागतील. कदाचित त्यांना तेथे सुरक्षितता मिळू शकेल. कदाचित काही संघटना फंडिंगही करायला तयार होतील. इतकेच काय, पै ने मनावर घेतले तर पै स्वतःच अनेकांना भेटून थोडे फंड्स रेज करू शकेल. या निमित्ताने पै हा माणूस आपल्याला समजेल. पण आपल्याला समजत नाही आहे ती गोष्ट ही, की पै हा माणूस नीट समजावा अशी आपली मानसिक गरजच का निर्माण झाली आहे? स्त्रियांचे शोषण होणार्‍या आणि पुरुषांच्या विकृतीने व्यापलेल्या आपल्या जगात पै हा एक आशेचा किरण वाटतो आहे इतकेच त्याचे कारण आहे? नाही. स्वतःशी तरी प्रामाणिकपणे संवाद साधायलाच हवा. पै आपल्याला आवडत आहे. त्याच्यातील तडफ, सच्चेपणा, स्त्रीला रिस्पेक्ट देण्याची त्याची वृत्ती आणि एकट्या स्त्रीकडे बघतानाचे वखवख नसलेले डोळे या गोष्टी आपल्याला आवडत आहेत. बरेच वर्षांनी असे होत आहे की आपल्याला एक पुरुष आवडू शकत आहे. शाळेत असताना डेंझिल नावाचा ख्रिश्चन मुलगा आपल्याला फार आवडायचा. त्यानंतर नरेशच्या अधम कृत्यांनी आपले कोवळेपण आणि जगण्यातील स्वारस्य पूर्णपणे नष्ट केले. पार निर्माल्यही राहू दिले नाही आपल्याला. आपले शरीर म्हणजे विकृत इच्छांना वीर्याचे रूप देऊन त्या डिस्पोज करण्याचे ड्रेनेज बनवलेले होते नरेशने आणि आपल्या वडिलांनी! त्या धक्यातून बाहेर येऊन पुरुषावर, पौरुषत्वावर विश्वास ठेवावा असे कधी नंतर वाटलेच नाही. पण सिमच्या या तुफानी घोडदौडीची साक्षीदार होत असताना आपल्याला पै हे व्यक्तीमत्वही ठळकपणे जाणवू लागले. त्यातील वेगळेपण आपल्या केविलवाण्या शोषित मनाला आश्वस्त करू लागले की जगात काही माणसे चांगलीही असतात. त्यांच्यावर विश्वास ठेवताही येतो. म्हणून पै ला अधिक समजून घेणे आपल्यासाठी आवश्यक आहे. त्यातून आपल्या मनाला आत्मविश्वास मिळू शकेल. ती आपली मानसिक गरज आहे. घाबरलेल्या खारीच्या पिल्लासारखे हे पुढचे पन्नास पंचावन्न वर्षांचे जे काय असेल ते आयुष्य काढण्याऐवजी एक सामर्थ्य पाठीशी ठेवून पुन्हा एकदा थोडेसे उमलू पाहणे हा आपल्यालाही माणूस म्हणून असलेला एक अधिकार आहेच की?

नीलाक्षी कस्तुरीरंगन! अतिशय सायलेंटली, कोणाच्याही नकळत ती एका पुरुषाबाबत कितीतरी वर्षांनी प्रथमच सखोल विचार करत होती. यावर तिचा स्वतःचाही विश्वास बसत नव्हता. पण ती पै ला समजून घ्यायचा प्रयत्न करणार होती.

किती विचित्र परिस्थिती होती ही! किती चक्रावणारे बदल होते हे!

लग्नसंस्थेवर ठाम विश्वास असलेली आणि इतरांपेक्षा आपण लग्न करण्याची स्वीकारलेली वाट हेच शहाणपण आहे असे मानणारी जया साखरपुडा झाल्यानंतर लग्न खरंच करावे की करू नये या विचारांपर्यंत पोचली होती.

आदल्या दिवशी पाशवी सामुहिक बलात्कार झालेली सिमेलिया जैन आपल्या कर्मठ राजस्थानी संस्कृतीला फाट्यावर मारून कपडे काढून नुसती कॅमेर्‍यासमोर बोल्डपणे उभी राहिलेली होती इतकेच नाही तर जग ढवळून काढले होते तिने! 'मी प्रेमासाठी आसूसलेली आहे' हे तिचे वाक्य पै ने जसेच्या तसे छापून तिच्यावर आणखीन एक आर्टिकल लिहिलेले होते. त्यात सिमची एका अक्षरानेही बदनामी केलेली नव्हती. उलट पै म्हणत होता की एक स्त्री खुल्या दिलाने आपल्या भावना मांडत आहे हा आपल्या कुजलेल्या, सडलेल्या संस्कृतीमधील एक शॉकिंग व चांगला बदल आहे. स्त्रीला भावनाच नसतात की काय? मग तिने त्या दाबूनच ठेवाव्यात असे आपली संस्कृती का शिकवते? पै च्या लेखाचा टोन असा होता. 'चार कोवळी मुले काय रेप करणार' हे वाक्य मात्र त्याने अजिबात छापलेले नव्हते. रेपची बातमीच दाबली गेली होती. मात्र सिमेलियाच्या कुटुंबासाठी सिमेलियामधील हे बदल म्हणजे आत्महत्या करावीशी वाटण्याच्या लायकीचे होते. पण अजून त्यांच्यापर्यंत ते पोचलेलेच नव्हते.

इकडे दीपक भसीनच्या मनात जो बाबत क्षुल्लकसाही विचार नसताना जो कुलश्रेष्ठ मात्र आतल्या आत भसीनच्या विचारांमध्ये गढत होती. आजवर पुरुष, लग्न आणि संसार या तीन विचारांना स्वतःच्या मनाच्या जवळपासही फिरकू न देणारी, मुळात एकटी राहून स्वातंत्र्य अनुभवता येते हेच चांगले असे मानणारी जो तिच्या नकळत दीपक भसीनकडे खेचली जात होती. प्रियंका दीप अंकलची रोजची खबर तिला देत राहिल्यामुळे जो च्या मनात भसीन आणि त्याच्या मुलांबाबत अतिशय कणव निर्माण झालेली होती. यामुळे जो प्रियंकाचीही जवळची मैत्रीण होऊ पाहात होती कारण भसीनच्या अधिक जवळ जाण्यास प्रियंकाची मदतच होणार होती झाली तर! जो कधीही पुरुषविरोधी नव्हती, पण नेमके पुरुषाबरोबर राहून आपले स्वातंत्र्य गमावून गृहिणी नावाचे लेबल स्वतःला चिकटवलेच पाहिजे असे काही तिला वाटत नव्हते. पुढेमागे चांगली व्यक्ती दिसली तर तिने स्वतःही प्रपोज केले असते. पण भसीनमुळे तिच्या मनावर परिणाम झाला होता. भसीन मॅरिड होता. त्याची बायको बेडरिडन असली तरी हयात होती. भसीनला असे काहीही प्रपोज करणे शक्य नाही हे जो ला माहीत होते. पण मनावर कोणाचे नियंत्रण असते?

आणि सर्वात चक्रावणारी बाब म्हणजे पुरुषाचे अस्तित्वच नकोसे वाटणारी नीलाक्षी चक्क पै बाबत गंभीरपणे विचार करत होती.

चार समांतर रेषा मुलवानी होस्टेलच्या रूमपुरत्या समांतर चालत होत्या. पण होस्टेलच्या गेटमधून बाहेर पडल्यावर त्या रेषा आपली दिशा इतकी धक्कादायकपणे बदलत होत्या, की त्या रेषांचाही विश्वास बसला नसता त्यावर!

========================

'मी काय करत आहे'!

आजवरच्या साडे चोवीस वर्षांपैकी कळत्या व आठवत्या वर्षांपासून सिमेलियाला हा प्रश्न एकदाही पडलेला नव्हता. तो आज पडला होता. दुसर्‍याला मानसिक धक्के देण्याची आपल्यात अचानक आलेली हिम्मत ही बलात्काराला तोंडही न फुटता तो अन्याय सहन होतोय न होतोय तोवर मिळालेल्या अपकीर्तीमधून बाहेर पडण्यासाठी आपण करत असलेल्या अगतिक आणि अपयशी प्रयत्नांमधून आलेली आहे का? आपण अश्या होतोच कुठे?

रेप झाला तेव्हा तो मानसिक धक्का सहन न होऊन आपण तळमळत पडलो होतो. उठून खाली आलो तर वेश्येच्या थोबाडावर जाताना गिर्‍हाईक नोटा फेकून जाते तशी आपल्या तोंडावर ऑफर फेकण्यात आली. जे जपायचे ते गेलेलेच आहे तर संधी का जाऊ द्यायची हा जैन लोकांमधील व्यावसायिक अंश आपल्याला हो म्हणायला भाग पाडून गेला. हो म्हणालो तर थेट दोन टीचभर कपड्यांवर कित्येकांसमोर तासनतास बसून राहावे लागले. त्या बसून राहण्यात रेपच्या आठवणी किती होत्या आणि मृतवत नजरांनी आपले आहेत तेही कपडे थोडे सैल करणार्‍या हातांनी होत असलेल्या अप्रत्यक्ष रेपची भीती किती होती हेही आठवत नाही आहे. पै ने छापलेला लेख स्फोटक ठरला तेव्हा आपण आत्महत्या करण्याच्या मानसिकतेपर्यंत पोचलेलोही होतो. पण ज्या क्षणी आपल्याला समजले की आज आपले, चक्क आपले, खास आपले असे फॅन्स तयार होऊ लागलेले आहेत, त्या क्षणी आपल्या रक्तातील व्यावसायिकतेने आपल्याला पुन्हा एकदा दिशा बदलायला भाग पाडले. चल! नाहीतरी नग्नताच आवडणारे जग आहे ना? मग चल हो नग्न! एकदा हाती पैसा, प्रसिद्धी आणि सत्ता आली की सगळ्यांकडे बघून घेता येईल. कोण कुजबुजले आपल्या कानांमध्ये ही वाक्ये? आपलेच रक्त? की एकटीने येथे राहून आलेली धडाडी? का आली नाही माँची आठवण आपल्याला एकदाही? अगदी आशिषच्या बेडरूममधून जखमी शरीर घेऊन खाली उतरतानाही आपल्याला असे का वाटले नाही की धावत राजस्थानला जाऊन माँच्या कुशीत शिरावे आणि आपण जगत आहोत हेही त्या उबेमध्ये विसरून जावे? नेमके काय झाले आपल्याला? काय हवे होते? हेच? जे आत्ता चाललेले आहे?

हो! मला हेच हवे होते. कारण ज्या क्षणी मी या फील्डमध्ये पाय टाकला त्या क्षणापासून मनावर पूर्णपणे ठसलेल्या काही गोष्टी होत्या. सर्वात पहिली गोष्ट! आपले शरीर हीच आपल्याकडची एकमेव कमोडिटी आहे ज्याच्या जोरावर आपण या क्षेत्रात सरस ठरू शकतो. एकदा आपण स्वतःला 'शरीर' म्हणून स्वीकारल्यानंतर मनाचे लाड करत बसण्याचा वेडेपणा करायचाच कशाला? मन आहे हेच विसरायला हवे ना आपल्याला? सूड घ्यायलाच हवा. आणि लवकरच! पण हेही नक्कीच, की या क्षेत्रात मन सुंदर असणार्‍यांना दोन कपड्यांमध्ये उभे करून फोटो घेत नाहीत त्यांचे! शरीर सुंदर असणार्‍यांना दोन कपड्यांमध्ये उभे करून फोटो घेतात. सिमेलिया जैन हे एक तरुण, फ्रेश आणि उमलणार्‍या गुलाबासारखे शरीर आहे. त्याचे निर्माल्य व्हायच्या आत पैसा, सत्ता आणि प्रसिद्धी मिळवून टाकलीच पाहिजे. अजून फार तर आठ ते दहा वर्षेच म्हणजे! सिमेलिया जैन ही व्यक्ती नाही, तिला मन वगैरे नाही, ती एक शरीर आहे. जोपर्यंत आपण स्वतःला असे मानतो तोपर्यंतच आपण विकाऊ आहोत हे लक्षात ठेवायला हवे. आणि एकदा विकायचेच ठरवले तर भाजी आणि किराणा माल कशाला विकायचा? सरळ भूखंडच विकावेत की? जे आजवर कोणी केले नाही तेच करावे की?

मला आता या खोलीत एकटीला राहायला सांगितले आहे चौघींनी! त्यांच्या रूममध्ये सत्शील मुली राहतात, चांगल्या मुली राहतात. तेथे मला जागा नाही. कुमारिका आणि सवाष्णींमध्ये वेश्या बसत नाही. त्यात माझा रेप झाला आहे हे जो, जया आणि प्रियंकाला माहीतही नाही आहे. ते समजले तर मला जणू संसर्गजन्य रोग झाल्यासारख्या माझ्यापासून लांबून चालू लागतील. माझे शरीर, जे आज प्रसिद्धीच्या शिखराकडे प्रत्येक क्षणाला उड्डाण करत आहे आणि जे वय वर्षे पंधरा ते नव्वद यातील कोणत्याही पुरुषाच्या स्वप्नात येत आहे, ते शरीर या चौघींना अस्पृश्य वाटू लागले आहे. मला एकटी टाकली आहे. पण मला त्याचे वाईट वाटून घ्यायलाही वेळ नाही आहे. सोहनी मॅडमना मी कधी एकदा होस्टेलमधून बाहेर काढली जाते याचे वेध लागलेले आहेत. होस्टेलवरची एकही मुलगी आता माझ्याशी बोलत नाही. स्टाफ फक्त कामापुरता बोलतो. मी म्हणजे जणू मुलवानी होस्टेलला लागलेली कीड आहे. जणू संस्कृती बाटवणारी ब्याद आहे. पण मला कुणीही हे विचारत नाही आहे की सिम, त्या दिवशी तुझा रेप झाला तेव्हा... तुला किती त्रास झाला असेल नाही? तुझी काहीच चूक नव्हती त्यात! कोणीही असे म्हणत नाही आहे. कोणीही म्हणत नाही आहे की सिम, केलीही असशील तू चूक तसे फोटो देऊन, पण आमच्यासाठी तू अजून आमची जुनीच सिम आहेस. खोडकर, खेळकर, बडबडी आणि प्रेमळ!

या तिघींना एकदाही असे वाटू नये की सिमच्या मनात काय चालले असेल? तिला आत्ता थोडेसे थोपटावे? तिच्याजवळ राहावे? मला खूप रडायचे आहे. अगदी ओक्साबोक्शी रडायचे आहे. यासाठी नाही की माझी अब्रू गेली किंवा मला अर्धनग्न राहण्याचीच असाईनमेन्ट मिळू शकली. यासाठी रडायचे आहे की या सगळ्या घटनांमध्ये मी काहीही करू शकत नव्हते हे कोणीतरी समजून घ्या. आक्रोशावेसे वाटत आहे. डोळ्यात भरून येणारे पाणी मला उदासी आणि सेक्सचे अजब आकर्षक मिश्रण असलेली मॉडेल बनवत आहे. पण ते बाह्य रूप आहे. एक हात हवा आहे जो वासनाहीनतेने माझ्या पाठीवरून फिरेल. मला थोपटेल. अजून काहीही बिघडलेले नाही असे आश्वस्त करेल. अजून मी, तू आणि आपण सगळ्या तश्श्याच आहोत अशी खात्री देऊ पाहील. जवळ घेईल. रात्रभर थोपटेल. डोळे पुसेल.

फार आहे का ही अपेक्षा? नाही जमत आहे इतकेही करणे? मग नुसते असे कराल? मी माझ्या खोलीचे दार उघडे ठेवते, तुम्ही तुमच्या खोलीचे दार उघडे ठेवा. नुसते तुमचे आवाज मला ऐकूदेत. मला तिथेच असल्यासारखे वाटेल. एवढे कराल?

मला माझ्या नासलेल्या शरीरासाठी दया नको आहे. अब्रू घालवणार्‍या फोटोंसाठी आधाराची भीक नको आहे. मला फक्त.... मला फक्त थोडेसे रडायचे आहे. आणि मी रडताना... ते बघायला कोणीतरी आसपास असावे इतकेच वाटत आहे. कोणीतरी आपले! मग थोपटले नाहीत तरी चालेल. रडणे पाहून हासलात तरी चालेल. मला नांवे ठेवलीत तरी चालेल. पण थोडेसे रडून घेईन तोवर इथे थांबा ना! एक दहा पंधरा मिनिटेच! जास्त नाही.

मला कोणी नाही आहे या जगामध्ये, इतके तरी समजून घ्या की? तुमच्याशिवाय कोणी नाही आहे मला!

फोन? आत्ता फोन? आय कान्ट बिलीव्ह धिस! कोणाचा कॉल आहे आत्ता? ओह! सीरीनचा गोसावी. आता काय झाले?

"येस मिस्टर गोसावी?"

"हाय सिम. एक असाईनमेन्ट आहे. शक्तीवर्धक गोळ्यांची अ‍ॅड आहे. पण यावेळी एका तरुणाबरोबर तुला पोझेस द्यायच्या आहेत. करशील?"

"मी समोर असताना तरुणाला गोळ्यांची काय आवश्यकता असेल मिस्टर गोसावी? त्याच्याजागी एखादा नव्वदीचा म्हातारा ठेवा... किंवा माझ्याजागी एखादी सत्तरीची म्हातारी... बाकी..... मी तयार आहे"

खदखदून हासत गोसावीने आभार मानत फोन खाली ठेवला. रडून रडून लाल झालेल्या डोळ्यांनी सिमने समोरच्या आरश्यात स्वतःचे प्रतिबिंब न्याहाळले. आपली मनस्थिती काय, लोक आपल्याला विचारतायत काय आणि आपण उत्तरं काय देतोय! काही ताळमेळच नाहीये कशाचा कश्यालाही!

दार वाजले? आली वाटतं कीव कोणालातरी! कोणाला कीव आली आपली? लवकर आली म्हणायचं!

सिमने दार उघडले तर दारात जया उभी! एक सूटकेस घेऊन!

जयाचे डोळेही रडून लाल दिसत होते. तिच्यामागे जो, नीलाक्षी आणि प्रियंका उभ्या होत्या. प्रियंका विशेष दु:खी दिसत नसली तरी गंभीर मात्र झालेली होती. पण जो आणि निली रडलेल्या स्पष्ट दिसत होते. जया सिमकडे बघत कसेबसे म्हणाली..

"घरून... फोन आला होता... राहुलची आजी सिरियस आहे म्हणाले.. तीन दिवसांत घाईघाईत लग्न आटोपून घ्यायचं आहे.. लग्नाच्या आधी ठरलेल्या तारखेला नुसतेच रिसेप्शन ठेवणारेत... बुलढाण्याहून मी थेट मुंबईलाच जाईन... मग नंतर कधीतरी भेटायला येईन.. आपण सहा सात महिने ... एका... एका र.. रूममध्ये राहिलो.. म्हंटलं.. जाता... जाताना तुला... शेवटचं.. भेटून जावं"

चार पुतळे! डोळे पाण्याने डबडबलेले! गाल भिजलेले. हात पाय थिजलेले. तोंडातून शब्दही फुटत नव्हता. जोरात मिठी मारून हमसून हमसून रडावेसे वाटत होते एकमेकींना! ग्रूप असा अचानक फुटला होता. आता पूर्वीची जया कधीच भेटणार नव्हती. पूर्वीप्रमाणे चौघी कधीच एकत्र राहणार नव्हत्या. तो सगळ्या रात्रींचा कल्ला, तो प्रत्येक दिवशीचा धिंगाणा, रुसवे फुगवे, अबोले, मस्करी, जीवाला जीव देणे, प्रत्येक क्षण वाटून घेणे.. सगळे संपलेले होते.. तेही असे अचानक.. तेही.. रुममधून सिमला बाहेर काढल्यानंतर ते भांडण मिटायच्या आतच.. काळीज तुटत होते.. पण कोणी कोणाला साधा स्पर्शही केला नाही.. सिम दुसर्‍या रूममध्ये राहात होती... या गोष्टीचा प्रभाव सिमच्या मनावर अजूनही होता.. पण समोर जया होती... हाच शेवटचा क्षण होता जयाला हे असे होस्टेलमधील, रूममधील एक मैत्रीण म्हणून भेटण्याचा.. नंतर ती मिसेस राहुल म्हणूनच समोर येणार होती..

डोळ्यांमधून वाहणारे पाणी पुसण्याचीही काळजी न घेता सिम रडवेली होत जयाकडे बघत अतिशय रडक्या स्वरात हुंदके देतच म्हणाली..

"विश यू... हॅपी .. मॅरिड लाईफ जयू... अ‍ॅन्ड टू यूअर ... पिझ्झा बॉय टू"

जयाच्या हातातून सुटकेस गळून पडली. कोणत्याही क्षणी ती आवेगाने सिमच्या मिठीत शिरणर हे आता दिसू लागले होते.

जो च्या तोंडातूनही हुंदका फुटला. निलीने तोंड फिरवले. आणि जया भेसूर स्वरात सिमेलियाकडे बघत म्हणाली..

"आजच्यानंतर मी इथे नसणार म्हणून... निलीने... आम्हाला सगळे सांगितले सिम.. की.. त्या बर्थ डे पार्टीत... तुझ्यावर.... "

सिमची मान खाडकन खाली गेली.. मगाचपर्यंत हेच हवे होते... की कोणीतरी म्हणावे की आम्हाला हे ऐकून वाईट वाटले.. थोपटावे.. धीर द्यावा.. पण आता... आता असे वाटत होते की... सगळ्यांनी एकटे सोडावे आपल्याला..

पण जयाला पश्चात्तापाची परमावधी सहन होत नव्हती.. ती दोन पावले पुढे होऊन सिमच्या पायांवर अक्षरशः कोसळली.. जयाची आसवे सिमच्या पावलांवर वाहात राहिली... जया आक्रंदत म्हणत राहिली..

"आय अ‍ॅम सॉरी सिम.. आय अ‍ॅम सॉरी.. मला क्षमा कर"

सिमने जयाला उठवले आणि... अलगद मिठीत घेतले... त्याचक्षणी जो आणि नीलाक्षीनेही त्या मिठीला मिठी घातली...

अव्याहत हुंदके फुटत राहिले.. खांदे एकमेकींच्या अश्रूंनी भिजत राहिले.. त्या मिठीत आजवर एकत्र घालवलेल्या सहा सात महिन्यांचे सगळे क्षण वाचवून, धरून ठेवण्याचा प्रयत्न चालला होता त्यांचा... पण घड्याळाची टिकटिक चालूच होती... काळापुढे हरावेच लागणार होते...

चारचौघी!

मुलवानी लेडिज होस्टेलच्या त्या दोन रूम्समध्ये भयाण सन्नाटा होता.. एका रूममध्ये सिमेलियाला थोपटत जो कुलश्रेष्ठ रडत होती... एका रूममध्ये नीलाक्षीला थोपटत प्रियंका बसलेली होती... जया केव्हाच बुलढाण्याच्या एस टी त बसून निघून गेलेली होती...

प्रियंका हळूहळू चालत या रूममध्ये येऊन दारात उभी राहिली...

जो ने विचारले..

"काय गं?"

"ताई... दीप अंकलचा फोन होता.. मुलं खूप रडतायत ममा कधी बोलणार आमच्याशी म्हणून.. मी.. त्यांना भेटून येऊ का?"

जो ने उत्तर दिले...

"इतक्या रात्रीची तू नको जाऊस... मी गार्डला घेऊन जाते आणि लवकर परत येते"

=======================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

छान