रायगड...

Submitted by संत्या on 5 January, 2013 - 11:51

रायगड...

सुमारे १० वर्षांपुर्वी ट्रेक करायला सुरुवात केली. तेव्हापासुन 'ट्रेक पंढरी' 'हरिश्चंद्रगड' नि 'मराठी मनाचा मानबिंदु' 'रायगड' करायचाच हा विचार होता. १० वर्षांत भरपुर ट्रेक्स झाले पण हे दोन काही केल्या होतच नव्हते. पण अचानक समजलं की ऑफिसमध्ये माझ्यासारखाच एक ट्रेकवेडा आहे ते! काय आश्चर्य आहे बघा, आम्ही गेले ३ वर्ष एकत्र काम करतोय पण एकमेकांच्या ट्रेकच्या आवडीबद्दल आम्हाला मागच्या एप्रिलमध्ये शोध लागला. मग काय ऑफिसच्या वेळा सांभाळुन हे वेड वाढवायच असे आम्ही दोघांनी ठरवलं. त्यानुसार एप्रिलमध्ये राजमाची झाला. आणि परत एकदा ह्या वेडाला ब्रेक लागला, कारण आपलं नेहमीचचं 'दर शनिवार किंवा रविवारी कामाला यावे लागेल' अस त्याच्याही बॉसने त्याला आणि माझ्या बॉसने मला सांगितलं.

नंतर मात्र दोघांनीही ठरवलं, बस्स! आता कुठेतरी जायचच. नाही... नाही, कुठेतरी नाही, 'हरिश्चंद्रगड'लाच जायचं. कशी काय कोण जाणे पण ऑफिसमध्ये बातमी फुट्ली आणि आमचा फुगा! सगळं ठरलं, एकूण २० जण तयार झाली. सगळी तयारी झाली आणि माझ्या बॉसने मला माझ्या पुर्ण टीमसह पुढील २ रविवार कामाला यायला सांगितलं. मग काय शेवटी २ आठवड्यांनंतर हा ट्रेक देखील पुर्ण झाला. आता 'रायगड' बाकी होता. ह्या ट्रेकला थोडा ब्रेक घेऊन जायचं ठरलं. पण 'हरिश्चंद्रगड'च्या ट्रेकला काहीजण प्रथमच आले होते. त्यांनी माझ्यामागे भुणभुण चालु केली. त्यामुळे लगेच महिन्याभरात हा ट्रेक करायचा अस ठरलं. त्यातही मेव्हण्याचा लग्नामुळे हा ट्रेकपण एकदा पोस्ट्पोन झालाच! शेवटी २८-२९ चा मुहुर्त निघाला. (अक्षरशः मुहुर्तच, कारण आमच्या ऑफिसमधल्या 'गोखल्यांनी' सांगितल की २९ हा चांगला दिवस आहे ते!)

२८ला रात्री ८ वाजता कार्यालयातुन १२ जण निघालो. नेट्वर पाचाड्ला जाणारी 'डायरेक' गाडी आहे का ते बघितलं. रात्री १० वाजता बोरिवली वरुन 'बोरिवली - सांदोशी' गाडी आहे हे समजल. म्हटलं चला बरं झालं, रात्रीचं अधेमधे कुठं ऊतरायला नको. बेलापुरलाच एका हाटीलात सामिष भोजन घेतले. त्यातपण आम्ही सगळे एवढे आगाऊ की एका जैन मित्रालाच सांगितले की आम्ची आर्डर तुच दे. ज्या शिव्या खाल्यायेत म्हणुन सांगु! पण शिव्यांनंतर बटर चिकन बरं लागतं असं एकंदरित सगळ्यांचच मत पडलं!

जेवण झाल्या झाल्या थेट पनवेल गाठले. रात्रीचे ११ वाजले होते. विचार केला की बोरिवलीवरुन १० वाजता सुटणारी गाडी साधारणपणे ११-११:१५ पर्यंत येईल. कंट्रोलरकडे गाडीची चौकशी केली तर ते म्हणाले की ती गाडी कधीच बंद झालीये. आयला! हे काय नवीन! आम्ही त्यांना बोललो की 'अहो पण तुमच्या साईट्वरतर ह्या गाडीचं आरक्षण घेतात.' उत्तर मिळालं की 'अहो, नेट कधी अपडेट करतात का?' म्हटलं असेल बाबा, सर्कारी साईट आहे शेवट्ची कधी अपडेट केली असेल कुनास ठाऊक? त्यांनीच माहीती दिली की तुम्ही इथुन महाडला जा, तिथुन ७:३० ची बस आहे पाचाडला जायला. हो नाही करता करता महाडला निघालो.

पहाटे २:३० वाजता महाडला पोहोचलो. पाचाडला जाण्यासाठी काही सोय आहे का ह्याची माहिती काढायाला सुरुवात केली. तिथे एक आनंदाची बातमी समजली 'बोरिवली - सांदोशी' बस काहीही बंदबिंद झालेली नाहीये, आणि ती साधारण ४ वाजेपर्यंत महाडला पोहोचते. जाम शिव्या घातल्या पनवेलच्या कंट्रोलरला! पाचाडला ४:४५ला पोचलो. आणि कुठेही न थांबता लगेच गडाकडे कुच केले.

सकाळची वेळ... पण थंडी कुठे गायब झाली होती काय माहित? पाच मिनिटांच्या चालीनंतर सगळ्यांच्या अगांतले जॅकेट्स निघाले. चालत्या बसमध्ये हवेहवेसे वाटणारे जॅकेट्स आता ओझं वाटु लागले होते. पण सगळ्यांना 'आता एकच लक्ष आणि पायतळी अंगार' ही अवस्था झाली होती. लवकरात लवकर वर (म्हणजे किल्ल्यावर!) पोचायचं हाच एक विचार होता. तसा रुढार्थाने हा काही ट्रेक म्हणता येणार नाही कारण अगडी शेवटपर्यंत पायर्‍या आहेत. पण सरळ चढाईमुळे त्या अंगावर येतात. कसेबसे ६:३० पर्यंत महादरवाज्यापर्यंत पोचलो. आणि एक फोटोसेशन उरकले. पटापट पुढील चढाई चालु केली कारण गडाचा पसारा फार मोठा आहे आणि तो फिरायला वेळ लागणार आहे हे माहित होते.

एकदाचे पोचले गडावर वेळ सकाळी साधारण पावणे सात... गडावरील गंगासागर तलावात राजवाड्याचे अवशेषांचे प्रतिबिंब बघितले आणि त्याचे प्रतिबिंब आमच्या मनात उतरले. आणि आम्ही सगळे गड बघायला निघालो.

सगळ्यात पहिल्यांदा राणी महाल पाहिले. एकुण ७ महाल होते. राजांना ८ राण्या होत्या पण महाल फक्त सातच! ह्याचे कारण नंतर समजले की सईबाई ह्या किल्ला बनवण्याच्या अगोदरच निधन पावल्या होत्या. आणि महाराजांच्या म्हणण्यानुसार सईबाईंची जागा महाराजांच्या हृदयात होती, त्यांच्यासाठी वेगळा महाल बांधायची गरज नव्हती. (ही आख्यायिका कशी समजली ह्याची कहानी नंतर येईलच!) तिथुन राजांचा महाल बघायला गेलो. हे अवशेष पाहुनच गडाची श्रीमंती समजत होती. गड जागता असताना हे सर्व राजवाडे किती प्रचंड असतील ह्याची कल्पनाच करवत नाही!

महाराजांचा राजवाडा पाहुन आम्ही ’सदरे’वर गेलो. ह्या सदरेवरच राजांचा राज्याभिषेक झाला होता. ईंग्रजी सत्ता इथेच राजांसमोर नतमस्तक झाली. इथेच राजांचे ३२ मण सोन्याचे सिंहासन होते. ह्या सिंहासनाचा आता काहीच मागमुस नाहीये, दुर्दैव! जिथे आता महाराजांची मेघडंबरीत बसलेली मुर्ती आहे. राजांची मुर्ती सकाळच्या कोवळ्या उन्हात बघुनच सर्वांचे हात आपोआप जुळले गेले. इथेच एका माणसाने आम्हाला एक आश्चर्य दाखविले. सदरेसमोरच एक कमान आहे, ह्या कमानी मध्ये व सदरेमध्ये बरेच अतंर आहे. पण कमानीखाली उभे राहुन त्या माणसाने एक कागद फाडुन दाखविला ज्याचा आवाज आम्हाला सदरेवर अगदी व्यवस्थित ऐकु आला. 'सिव्हील' आणि 'अ‍ॅकॉस्टिक' इंजिनिअरींगचा त्या काळातील हा अभ्यास पाहुन खरचं मंत्रमुग्ध व्हायला होतं.

तिथुन आम्ही होळीचा माळ, इथे महाराजांच्या काळात होळीचा सण साजरा व्हायचा, इथे आलो. होळीच्या माळावर महाराजांची सर्वात प्रसिद्ध मुर्ती आहे. होळीच्या माळासमोरच भव्य बाजारपेठ आहे. ह्या बाजारपेठेच्या रस्त्याची रुंदी सुमारे ४० फुट आहे.

इथुनच जगदिश्वराच्या मंदिराकडे जायचा रस्ता आहे. जगदिश्वराच्या मंदिरासमोरच महाराजांची समधी आहे.समाधीसमोर नतमस्तक झालो. तिथे समोरच 'वाघ्या'ची स्माधी आहे. ह्या समाधीच्या 'संरक्षणा'साठी दोन पोलिस होते. अख्या जगात हा एकच कुत्रा असा असेल की ज्याच्या संरक्षणासाठी पोलिस असावेत.

समाधी व जगदिश्वराचे दर्शन घेऊन आम्ही सरळ टकमक टोकाकडे गेलो. तिथे काहीजण 'रॅपलिंग' करायला आली होती. त्यांना रॅपलिंग करताना पाहुन मला माझ्या नुकत्याच रॅपलिंग करताना मृत्युमुखी पडलेल्या मित्राची, संदीपची' आठवण झाली नि मन उदास झालं.

तिथुन जेवायला गेलो. एक सुचना... जेवणाची योग्यप्रकारे चौकशी करुनच कुणालाही जेवण बनवायला सांगणे. कारण आम्हाला ४० रु.मध्ये २ भाकर्‍या, ठेचा, पिठले आणि एक्स्ट्रा भाकरी ८रु. असं कबुल करुन नंतर एक्स्ट्रा भाकरी म्हणजे एक एक्स्ट्रा प्लेट अशाप्रमाणे पैसे घेण्यात आले. म्हण्जे एक एक्स्ट्रा भाकरी आम्हाला ४० रु.ला पडली.

मग उतरायला सुरुवात केली. उतरताना कल्याणच्या एक कॉलेजच्या 'कुलकर्णी' म्हणुन प्रोफेसर भेटल्या. त्यांनी माझ्या गळ्यातल्या कॅमेराकडे बघुन माझ्याकडे फोटो पहायची इच्छा व्यक्त केली. मग फोटो बघता बघता आमचा इतिहासाचा क्लास घेतला. (चांगल्या अर्थाने!) वरील राणी महाल, होळीचा माळावरील महाराजांच्या मुर्तीबद्दल कथा ह्या गोष्टींची माहीती ह्या मॅडमनीच आम्हाला दिली.

तिथुन महाडमार्गे पनवेलला परत आलो. आणि एका आणखी ट्रेकची सांगता झाली.

राजवाडा

राजवाडा २

कलाकुसर

प्रचि ३

प्रचि ४

राणीमहाल

प्रचि ५

महारा़जांचा महाल

प्रचि ६

प्रचि ७

4 ediots

मेघडंबरी

कमान

जगदिश्वराचे मंदिर

महाराज

बाजारपेठ

हा खेळ सावल्यांचा

वाघ्या

हिरोजी इंदुळकर

प्रचि १७

प्रचि १८

क्षणभर विश्रांती

Rest for a moment

शिलालेख

समाधी

तटबंदी

प्रचि १९

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संत्या.... छान फोटो. ते ट्रेकला जिन्स असल्या की तेवढ्या माझ्या डॉळ्यात खुपतात.

सगळ्यात पहिल्यांदा राणी महाल पाहिले. एकुण ७ महाल होते. राजांना ८ राण्या होत्या पण महाल फक्त सातच!

>>>> ज्याला राणीवसा म्हणतात ते एकूण ६ महाल आहेत. ७ नव्हे. मुळात ते महाल नाहीत हा भाग वेगळा. त्यातले एका बाजूचे २ आतुन जोडलेत तर इतर ४ देखील आतुन जोडलेत. प्रत्येकाला स्वतंत्र प्रवेश्द्वार आहेच.

माळावरील मुर्तीची गोष्ट आप्पांनी त्यांच्या दुर्गभ्रमणगाथामध्ये छान सांगितली आहे. Happy

छान!

मस्तच. रायगडावर परत परत फक्त मेघडंबरी, बाजारपेठ व अष्टप्रधान बघायला जावे. राजधानीचा थाट कळतो लगेच. Happy