Submitted by kaaryashaaLaa on 9 October, 2008 - 23:49
वरदहस्त का त्याचा आम्हां सर्वांवरती समान नाही?
नशीब देऊ केले त्याने, मजला मंजूर दान नाही
निघून गेली तरूण वर्षे आयुष्याशी झुंजण्यामधे
नीरस वाटे दिवस आजचा, वणवा नाही, तुफान नाही
"उदास का तू राजमहाली?" यावर मी ही काय म्हणावे?
अमृतप्याला हाती, जेव्हा पाण्याचीही तहान नाही
होते पैसे म्हणून म्हटले, घेऊ स्वप्ने जाता जाता
रिक्तहस्त मी तुझ्या अंगणी, या रस्त्याला दुकान नाही
सरल्यावरती रंग गुलाबी, कसे निभावे सांगा आता?
ती ही नाही तितकी सोशिक, तो ही तितका महान नाही!
नदीकाठच्या शांत दुपारी अनुभवते मी जेथे निर्गुण
मंदिर नाही, मशीद नाही, नसे आरती, अजान नाही
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
निव्वळ
निव्वळ अप्रतिम गझल आहे. प्रवाही ओळी, बोलके शेर. फार आवडली.
'घेऊ स्वप्ने जाता जाता' च्या ऐवजी 'चला घेउया स्वप्ने थोडी' असे (मला) सुचले. ते अधिक सहज, प्रवाही नि संवादात्मक वाटले असते असे वाटले. चू. भू. द्या. घ्या.
- चक्रपाणि जीवन चिटणीस
Pages