गझल
शब्द शब्द काळजात ठेविले जपून मी!
भाव सर्व लोचनात ठेविले जपून मी!!
स्पर्श ते मधाळ, चांदण्यातले तुझे प्रिये....
आजही नसानसात ठेविले जपून मी!
या विराण अंगणास जे वसंत तू दिले;
ते तसेच अंगणात ठेवले जपून मी!
थेंब थेंब वेचलेत दु:ख मी जगातले!
लोचनातल्या तळ्यात ठेविले जपून मी!!
हासता न आसवांसवे कृतघ्न जाहलो;
हुंदके जुने उरात ठेविले जपून मी!
श्वास श्वास हे उधार, कर्जदार मी तुझा!
कर्ज तेच स्पंदनात ठेविले जपून मी!!
आजही जिवंत भूतकाळ काळजामधे.....
ते प्रसंग अंतरात ठेविले जपून मी!
त्यामुळेच एक दर्द मारव्यात माझिया!
नादब्रह्म या स्वरांत ठेविले जपून मी!!
माझिया पराभवांसही झळाळ आगळे!
तेच आज कोंदणात ठेविले जपून मी!!
पाठलाग जे करायचे उभी हयातभर....
तेच स्वप्न बासनात ठेविले जपून मी!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
आमच्या 'रानफुले'
आमच्या 'रानफुले' संग्रहातून..........
काही शेर नवीन टाकले आहेत!