द क्लिकिंग ऑफ कथबर्ट - पिजी वुडहाऊस.

Submitted by साधना on 28 December, 2012 - 11:25

पिजी वुडहाऊसच्या The clicking of Cuthbert या कथेचा मला जमला तसा अनुवाद. तुम्हाला आवडेल अशी आशा करते Happy

********
तो तरुण क्लबहाऊस स्मोकिंगरुममध्ये आला आणि त्याने हातातली बॅग जमिनीवर फेकून दिली. खुर्चीत कोसळत त्याने बेल वाजवली.

"वेटर........!"

"सर?"

बॅगेकडे तिरस्काराने पाहात तो म्हणाला, "हे क्लब्स लगेच माझ्या नजरेसमोरून दूर कर. तुला घेऊन टाक, तुला नको असतील तर कोणा कॅडीला दे!"

खोलीच्या दुस-या कोप-यातून, पाइपातून उठणा-या धुराआडून आद्य सभासद त्याच्याकडे गंभीर नजरेने पाहात होता. त्याच्या त्या नजरेवरूनच त्याने अवघे आयुष्य गोल्फला समर्पित केले आहे हे कळत होते.

"तू गोल्फ सोडतोयस?", त्याने विचारले.

तो तरुण असे का करतोय याची त्याला कल्पना होती. गच्चीमधून त्याने अख्खी दुपार त्या तरुणाचा खेळ पाहात घालवली होती. पहिला होल घ्यायला सात फटके घालवल्यानंतर पुढचा होल काबीज करण्याच्या प्रयत्नात त्याने ब-याच चेंडूंना तलावात जलसमाधी दिली होती.

"हो,' तरुण जवळजवळ ओरडलाच, "कायमचा सोडतोय, गेला उडत! काय फालतू खेळ आहे हा? आचरटपणाचा कळस अगदी!! वेळेचा अपव्यय नुसता!!!"

आद्य सभासद एकदम थरकापला.

"असं बोलू नकोस, मुला!"

"काय कामाचा आहे हा गोल्फ? आयुष्य आता कठिण झालेय. व्यावहारिक जमाना आलाय. सगळ्या क्षेत्रात बाहेरची स्पर्धा इतकी वाढलीय की आपल्याला वाव मिळणे कठिण होऊन बसलेय. आणि अशा वेळी आपण काय करतोय? तर गोल्फ खेळतोय! काय मिळणारे याच्यातून आपल्याला? ह्या गोल्फचा काहीतरी फायदा आहे का आपल्याला? बोला! ह्या उपद्रवी टाईमपासमुळे फायदा झालाय अशी एकतरी केस तुम्ही मला सांगू शकाल का?"

आद्य सभासद हलकेच हसला.

"एक कशाला, हजार सांगतो."

"सध्या एकच पुरे!"

"हजारोंपैकी आता लगेच आठवलेली एक सांगतो, कथबर्ट बँक्सची.

"नावही ऐकले नाही कधी त्याचे!"

"उत्तम. मग आता ऐक."

*******
आपली गोष्ट वुडस हिलसारख्या निसर्गरम्य स्थळी सुरू होते, आद्य सभासदाने सुरवात केली. तुम्ही वुड्स हिलला कधी गेला नसलात तरी त्या नितांतसुंदर जागेचे नाव तुमच्या कानावर कधीना कधी पडले असेलच. शहरापासून अगदी योग्य अंतरावर असलेल्या वुड्स हिलमध्ये शहरी सुखसोयी आणि शहराबाहेरचा निवांतपणा व ताजेपणा यांचा सुंदर मिलाफ झालाय. तिथले नशीबवान लोक भलामोठ्या प्रशस्त घरांमध्ये राहतात; त्यांना मिळणा-या सुखसोयींबद्दल काय वर्णावे! खडीचे गुळगुळीत रस्ते, ड्रेनेज, वीज, फोन, न्हाणीघरे (थंड आणि गरम पाण्यासहित) आणि वर कंपनीचे शुद्ध आरोग्यदायी पाणीही! साक्षात स्वर्गसुखात लोळणा-या तिथल्या रहिवाशांच्या आयुष्यात कसलीही उणीव नसेल असा तुमचा (गैर)समज होणे साहजिकच आहे.

पण मिसेस विलोबी स्मेथर्स्ट असल्या कुठल्याही भ्रमात नव्हत्या. वुड्स हिल परिपूर्ण बनण्यासाठी तिला संस्कृतीची नितांत गरज आहे असे त्यांचे ठाम मत होते. भौतिक सुखेबिखे सगळे ठीक आहे पण आत्मिक उन्नती ही जास्त महत्त्वाची आणि ती साधायची असेल तर सांस्कृतिक विकासाशिवाय गत्यंतर नाही. मिसेस स्मेथर्स्टनी मनाशी अगदी पक्के केलेले की जोवर त्यांच्या जीवात जीव आहे तोवर आत्म्याला त्या असे वा-यावर सोडून देणार नाहीत. वुड्स हिल हे सगळ्या सांस्कृतिक गोष्टींचे माहेरघर बनावे यासाठी त्यांनी कंबर कसली होती. आणि काय सांगावे, बाईंनी त्यात अगदी घवघवीत यशही मिळवले होते! त्यांच्या अध्यक्षतेखाली वुड्स हिल साहित्य मंडळाची सदस्यसंख्या दुप्पट झाली होती.

पण सगळे जग असे आदर्शवत थोडेच असते? इथेही दुधात मिठाची कणी पडलेली होतीच. याच कालावधीत मिसेस स्मेथर्स्ट ज्याचा अगदी मनापासून तिरस्कार करीत त्या स्थानिक गोल्फ क्लबाची सदस्यसंख्या तिपटीने वाढली होती. गोल्फर आणि सुसंस्कृत या दोन गटात जवळजवळ सगळे गाव विभागले होते. आणि ही फूट आता उघड उघड शत्रुत्वात बदलत होती.

दुर्दैवाने, अशा वेळी काही घटनाही अशा घडत होत्या की दोन गटातली दरी अजूनच रुंदावत होती. मिसेस स्मेथर्स्टचा बंगला गोल्फ लिंकलाच लागून होता जिथे वरचेवर मंडळाचे कार्यक्रम होत असत. दुपारच्या शांत वेळी इकडे एखादा गोल्फर निवांतपणे लिंकवर गोल्फचा सराव करायला यायचा आणि तिकडे बंगल्यावर एखाद्या विद्वानाचे भाषण रंगत असायचे. इकडे गोल्फर चित्त एकाग्र करून आता बॉलला टोला लगावणार तेवढ्यात तिकडे विद्वानाच्या एखाद्या वाक्याला कडाडून टाळी पडायची आणि ह्या अकस्मात झालेल्या आवाजाने दचकून बिचा-या गोल्फरचा शॉट भलतीकडेच जायचा.

अशाच एका घटनेमधून आपल्या कथेचा जन्म झाला. एका गोल्फरचा चुकलेला शॉट बंगल्याच्या उघड्या खिडकीतून सणसणत आला आणि साहित्याच्या सांप्रत आकाशातला रेमंड पार्स्लो डिवाईन हा उगवता तारा पूर्णं उगवायच्या आधीच निखळण्याच्या भयाण संकटातून थोडक्यात बचावला. बॉल जर अजून दोन इंच उजवीकडून आला असता तर रेमंड पार्स्लो डिवाईनचा ग्रंथ तिथेच आटोपला असता.

पण प्रकरण इतक्यावरच संपले नाही. बॉलपाठोपाठ बंगल्याच्या दारावरची बेल वाजली आणि मोलकरणीच्या मागोमाग स्वेटर आणि निकरबॉकर्स घातलेला एक उमदा तरुण अवतरला. गोल्फच्या नियमानुसार बॉल जिथे पडला तिथूनच तो पुढे खेळणे भाग आहे हे त्याने अतिशय विनयाने पण ठामपणे जमलेल्या मंडळींना समजावले. खिडकीतून बॉल येण्याच्या घटनेमुळे धक्का बसलेले साहित्यप्रेमी एक तरुण टेबलावर चढुन बॉल टोलावतोय हे दृश्य पाहून अजूनच अचंबित झाले. खुप समजावूनही आपले उरलेले भाषण बंगल्याच्या तळघरातूनच द्यायच्या रेमंड पार्स्लो डिवाईनच्या निश्चयाने उरलीसुरली सभा शेवटी पूर्णं फसली.

मी या घटनेची जरा सविस्तर माहिती यासाठी दिली की याचवेळी कथबर्ट बँक्सची मिसेस स्मेथर्स्टची भाची अ‍ॅडेलिन हिच्याशी ओळख झाली. हा तोच कुथबर्ट होय ज्याच्यामुळे वुड्स साहित्य मंडळाची पटसंख्या एकाने कमी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. बॉल टोलावल्यावर टेबलवरून खाली उतरताना त्याच्याकडे टवकारून पाहात असलेल्या एका तरुणीशी त्याची अचानक दृष्टभेट झाली. खरेतर खोलीतला प्रत्येकजण त्याच्याकडे टवकारून, आणि रेमंड पार्स्लो डिवाईन जरा रागानेच टवकारून, पाहात होता पण त्या जमावामध्ये सुंदर तरुणी या उपाधीला साजेल असे कोणीही नव्हते. वुड्स साहित्य मंडळाचे सदस्य बुद्धीच्या खात्यात जेवढे श्रीमंत होते, सौंदर्याच्या खात्यात ते तेवढेच दरिद्री होते. आणि ह्या पार्श्वभूमीवर कथबर्टच्या प्रेमाळू नजरेला अ‍ॅडेलीन म्हणजे साक्षात कोळशाच्या राशीवर पहुडलेल्या हि-यासारखी भासली.

कथबर्टने तिला आधी कधीही पाहिली नव्हते. अर्थात याचे कारण तिचे गावात आगमनच मुळी आदल्या संध्याकाळी झालेले हे होते. पण तिच्याकडे एक नजर जाताच त्याची खात्री पटली की ती जर परत दिसली नाही तर खडीचे गुळगुळीत रस्ते, ड्रेनेज, वीज, फोन, न्हाणीघरे (थंड आणि गरम पाण्यासहित) आणि वर कंपनीचे शुद्ध आरोग्यदायी पाणी या असल्या स्वर्गसुखातल्या निवासाला काहीही अर्थ उरणार नाही. तुमचा तर्क अगदी बरोबर आहे, कथबर्ट प्रेमात पडला होता. आणि या प्रेमाने आपल्या आगमनाचा त्याच्या खेळावरही सुखद परिणाम केला. अ‍ॅडेलिनला भेटून अर्धा तास होतो न होतो तोच त्याचे दोन सुंदर शॉट्स बसले.

कथबर्टच्या प्रेमप्रकरणाची पुढील वाटचाल कशी झाली यावर उगीच पाने खर्च न करता मी तुम्हाला आता थेट स्थानिक हॉस्पिटलला मदत करण्यासाठी भरवण्यात आलेल्या जलशाला घेऊन जातो. वर्षातला हा असा एकमेव दिवस होता ज्या दिवशी गोल्फर्स आणि सुसंस्कृत आपापले मतभेद बाजूला ठेवून एकत्र यायचे. जणू वाघ आणि बक-या सहभोजनाला आल्यासारखेच ते दृश्य दिसायचे. तर अशा या दिवशी कथबर्टने अ‍ॅडॅलिनला मागणी घातली आणि तिने त्याला क्षणात धुडकावले. तिच्या दृष्टीने तो लग्नाचा विचार करायच्याही लायकीचा नव्हता.

'मि. बँक्स, रागावू नका पण मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छिते.' ती म्हणाली.

'बिनधास्त बोल.' त्याने अनुमोदन दिले.

'मला कल्पना आहे की तुम्ही मला..... '

'माहीत आहे. तुम्ही मला खुपा मान देताहात, माझी तारीफ करताहात वगैरे वगैरे. पण हे सगळे बाजूला राहूदे. नक्की काय प्रॉब्लेम आहे? तुला माहिताय मी तुझ्यावर किती जीवापाड प्रेम करतो ते?'

'प्रेम म्हणजे सर्वस्व नव्हे!'

'काहीतरीच काय बोलतेस!,' कथबर्ट भावनेच्या भरात म्हणाला, 'तू चुकतेयस. उलट प्रेम म्हणजे.......' आणि तो प्रेम म्हणजे काय या विषयावर एक बौद्धिक घ्यायला लागणार एवढ्यात तिने त्याला थांबवले.

'मी एक खूप महत्त्वाकांक्षी मुलगी आहे.'

'आणि खूप सुंदरही!' कथबर्ट म्हणाला.

'मी एक खूप महत्त्वाकांक्षी मुलगी आहे,' अ‍ॅडेलिनने परत सुरवात केली, 'आणि मला माहितेय की माझ्या महत्त्वाकांक्षा माझ्या नव-यातूनच पूर्णं होण्यासारख्या आहेत. मी स्वतः अतिशय सामान्य कुवतीची---- "

"काय?" कथबर्ट किंचाळला," तू आणि सामान्य? काहीतरीच काय? तू म्हणजे हिरा आहेस हिरा. राणी शोभशील असे रूप आहे तुझे. तू हल्ली स्वतःला आरशात पाहिले नसणार. तुझ्यासारखी तुच आहेस. इतर कोणी तुझ्या जवळपासही फिरकू शकणार नाहीत.'

"ठीक आहे,' अ‍ॅडेलिन थोडी विरघळली, 'मान्य की मी जरा बरी दिसते पण----"

'जरा बरी दिसते? तुला जरा बरी दिसते म्हणणारा उद्या ताजमहालाला ब-यापैकी मोठे थडगे म्हणायचा!'

'माझा मुद्दा वेगळा आहे. मला असे म्हणायचेय की मी जर एखाद्या सामान्य माणसाशी लग्न केले तर मीही कायमची सामान्यच राहीन. आणि असे सामान्य आयुष्य जगण्यापेक्षा मृत्यू परवडला.'

'या कारणामुळे तू मला नकार देतेयस?'

'हं, हो, म्हणजे..... मि. बँक्स, तुम्ही आजपावेतो काही केलेय का तुमच्या आयुष्यात, किंवा यापुढे काही करण्याची शक्यता तरी आहे का?'

कथबर्ट थोडा विचारात पडला.

'हे खरे आहे की मी यावर्षी अमॅच्युअरमध्ये उपांत्य फेरीतच बाद झालो आणि ओपनमध्ये पहिल्या दहातही आलो नाही, पण मी गेल्या वर्षीची फ्रेंच ओपन जिंकलीय.

'गेल्या वर्षीची ---- काय?'

'गेल्या वर्षीची फ्रेंच ओपन गोल्फ चॅम्पियनशिप.'

'गोल्फ!!!!!?????? तुम्ही तुमचा सगळा वेळ खेळण्यात वाया घालवता. मला आध्यात्मिक, बुद्धिजीवी असलेला नवरा आवडेल."

कथबर्टच्या शरीरातून मत्सराची मोठी लहर दौडत गेली.

'म्हणजे तो, काय नाव त्याचे- डिवाईन सारखा?' तो खिन्नपणे म्हणाला.

अ‍ॅडेलिनच्या गालावर गुलाबी रंग चढला,' मि. डिवाईन खूप चांगले आहेत. एवढ्या लहान वयात किती प्रसिद्ध झालेत ते. आणि अशीच प्रसिद्धी ते पुढेही मिळवणार आहेत. मोठमोठे समीक्षक त्यांच्याबद्दल काय म्हणतात माहिताय? मि. डिवाईन सगळ्या इंग्रजी लेखकांपेक्षा जास्त रशियन आहेत!'

'आणि ह्याला चांगले म्हणायचे?'

'अर्थातच!'

'मला तर वाटलेले की इतर कुणा इंग्रजी लेखकापेक्षा जास्त इंग्रजी असणे जास्त भावखाऊ असेल.' तो कुत्सितपणे म्हणाला.

"हॅट! इंग्रजी असलेला इंग्रजी लेखक काय करायचाय? यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही रशियन,स्पॅनिश किंवा तसेच काहीतरी मोठे असणे आवश्यक आहे. रशियनांचा थोर वारसा मि. डिवाईनना मिळाला आहे.'

'रशियनांबद्दल मी जे ऐकलेय त्यावरुन निदान माझ्याबाबतीत तरी असे कधीही घडू नये अशीच मी प्रार्थना करेन.'

"असले काही होण्याची अजिबात भीती बाळगू नका. ती शक्यता शून्य आहे.' अ‍ॅडेलिन फणका-याने म्हणाली.

'ओह.. ठीक आहे, तू जेवढा समजतेस तेवढा मी काही हा नाहीय.'

'असेलही, मला काय त्याचे?'

'तुला वाटते मी आध्यात्मिक आणि बुद्धिजीवी नाही? ठीक आहे, मी उद्याच साहित्य मंडळाचे सदस्यत्व घेतो.'

तोंडातून हे शब्द बाहेर पडत असताना मनात मात्र असल्या गाढवपणाबद्दल स्वतःलाच दोन सणसणीत लाथा घालण्याची प्रबळ इच्छा त्याला होत होती. पण अ‍ॅडेलिनचा फुलून आलेला चेहरा पाहून आपण योग्य तेच करतोय असा भ्रम त्याला झाला. काहीतरी खूप शहाणपणाचा निर्णय घेतलाय ह्या गोड भावनेने त्या रात्री तो झोपी गेला. मात्र दुस-या दिवशीच्या सकाळपर्यंत तो पूर्णपणे भानावर आला आणि आपण किती मोठ्या खड्ड्यात स्वतःला लोटलेय याची त्याला जाणीव झाली.

उपनगरातल्या साहित्य मंडळांशी तुमचा कितपत परिचय आहे मला माहीत नाही, पण मिसेस विलोबी स्मेथर्स्ट्च्या देखरेखीखाली बहरत असलेले वुड्स साहित्य मंडळ इतर चार मंडळांसारखेच होते. माझे लेखनकौशल्य मोजकेच असल्याने कथबर्टला पुढचे काही आठवडे काय काय सोसावे लागले याचे यथायोग्य वर्णन मला करता येणार नाही. आणि जरी करता आले असते तरी ते न केलेलेच बरे! अ‍ॅरिस्टॉटलने सांगून ठेवलेलेच आहे की हृदय पिळवटून काढणारी भयानक वर्णने करून वाचकांच्या भावनेला हात घालणे जरी सोपे असले तरी ते टाळणेच उत्तम. जुन्या ग्रीक दु:खांतिकांमध्येही सगळ्या वाईट गोष्टी या पडद्याआडच घडल्या पाहिजेत हा नियम कटाक्षाने पाळण्यात आलेला दिसतो. आणि हा नियम मोडण्याचे धाडस मी करू इच्छित नाही. कथबर्ट बँक्स अतिशय वाईट परिस्थितीतून जात होता इतके म्हटले तरी ते पुरेसे आहे.

नवकविता, सतराव्या शतकातले निबंधकार, पोर्तुगीज साहित्यातील नव-उदारमतवादी चळवळ आणि अशाच इतर काही विषयांवरच्या अकरा चर्चा आणि चौदा भाषणांचा सामना करताकरता तो इतका थकून गेला की जेव्हा कधी तो चुकून गोल्फ लिंकवर खेळायला येई तेव्हा एक साधा शॉटही त्याच्याकडून मारला जात नसे.

आणि त्याचे हे खच्चीकरण केवळ चर्चा आणि भाषणांच्या जुलूमातिरेकामुळे झाले होते असे मुळीच नाहीय. रेमंड पार्स्लो डिवाईनवरची अ‍ॅडेलिनची वाढती भक्ती त्याला आतून उद्ध्वस्त करत होती. त्या माणसाने तिच्यावर काय जादू केली होती नकळे. तो जेव्हा बोलत असे तेव्हा ती पुढे झुकून, अवाक होऊन त्याच्याकडे पाही. तो जेव्हा बोलत नसे - अर्थात असे कधीतरीच घडे - तेव्हा ती मागे टेकून त्याच्याकडे पाही. आणि तो जेव्हा तिच्या शेजारी बसे तेव्हा ती त्याच्या बाजूला वळून त्याच्याकडे पाहात राही. कथबर्टच्या मते डिवाईनकडे एकदा पाहिले तरी ते पुरेसे होते, पण तिची अवस्था कायम 'तेरे चेहरेसे नजर नही हटती' हीच असायची. रेमंड पार्स्लो डिवाईनच्या जागी एखादे तिचे आवडते आइसक्रीम असते तरी तिने एवढ्या प्रेमाने त्या आइसक्रीमकडे पाहिले नसते कदाचित. एका बाजूला हे काळीज कुडतरणारे दृश्य सतत पाहात राहायचे आणि त्याचवेळी कोणी अचानक व्लादिमीर ब्रुसिलॉफच्या भकास वास्तववादाबद्दल मत विचारायचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी मेंदू जागृतही ठेवायचा ह्या दुहेरी कुतरओढीत कथबर्टचे पार बारा वाजले. त्याच्या रात्री झोपेविना तळमळत, कुशीवर कुशी बदलत जायला लागल्या. शिंप्याकडे जाऊन त्याने स्वतःचे ढगळ झालेले कोट तिन इंच टाचून आणले.

मी वर उल्लेख केलेला व्लादिमीर ब्रुसिलॉफ एक प्रसिद्ध रशियन लेखक होता. सध्या तो लंडनच्या दौ-यावर असल्याने त्याच्या साहित्याला अचानक उठाव आला होता. वुड्स साहित्य मंडळ सध्या त्याच्या साहित्याचा बारकाईने अभ्यास करत होते आणि त्यामुळे कथबर्टची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली होती.

नैराश्यवादी शोकांतिका ह्या साहित्यप्रकारावर व्लादिमीर ब्रुसिलॉफचे कमालीचे प्रभुत्व होते. त्याच्या सगळ्या कादंब-यात पहिल्या तिनशेऐंशी पानांपर्यंत काहीच घडत नसे. मग अचानक शेवटच्या दहा पानांमध्ये कादंबरीचा नायक आत्महत्या करून स्वतःची सुटका करून घ्यायचा आणि वाचकही सुटायचे. आयुष्यात ज्याने रोजच्या पेपरमधल्या हेडलाईन्स सोडून अजून दुसरे काहीच वाचले नव्हते अशा कथबर्टसारख्याला अचानक ह्या शोकांतिकांचा अभ्यास करावा लागणे हे फारच दुर्दैवी आणि कठिण होते. पण प्रेमाने त्याच्यावर अशी काय जादू केली होती की तो हे कठिण काम तोंडातून हूं की चू न काढता करत होता. पण जरी त्याने निमूटपणे आपले प्राक्तन स्वीकारले होते तरी ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यावर कमालीचा ताण आला होता. दुसरा एखादा माणूस असता तर ह्या ताणाखाली तो कधीच मोडला असता. पण कथबर्ट तसा आशावादी माणूस होता. रशियात सुरू असलेल्या यादवीने आणि नियमित येणा-या हिंसाचाराच्या बातम्यांनी त्याच्यातला आशावाद जागृत ठेवला होता. याच वेगाने रशियन लोक एकमेकांना संपवत राहिले तर रशियातून येणारा साहित्यिकांचा ओघ लवकरच आटेल यावर त्याचा विश्वास होता.

अशाच एका सकाळी तो नेहमीसारखा छोटा वॉक घेण्यासाठी बाहेर पडला असता त्याला अ‍ॅडेलिन भेटली. तिच्यासोबत रेमंड पार्स्लो डिवाईनला पाहुन त्याच्या मस्तकात एक तिडीक उठली.

'गुड मॉर्निंग, मि. बॅंक्स!' अ‍ॅडेलिन म्हणाली.

'गुड मॉर्निंग!' कथबर्ट उगाच काहीतरी बोलायचे म्हणून बोलला.

'व्लादिमीर ब्रुसिलॉफबद्दल ऐकले?'

'काय? मेला की काय?' कथबर्टला एकदम आशा वाटली.

'मेला? काहीतरीच काय? ते कशाला मरतील? काल क्विन्स हॉलमधल्या त्यांच्या भाषणानंतर एमिली मावशी त्यांच्या मॅनेजरला भेटली आणि त्याने आपल्या बुधवारच्या सभेला व्लादिमीर ब्रुसिलॉफना घेऊन यायचे कबूल केले!'

'ओह, असे होय...' कथबर्ट परत पहिल्यासारखा झाला.

'तिने कसे काय जमवले तिलाच माहित! मला तर वाटते तिने मॅनेजरला मि. डिवाईन बुधवारी त्यांना भेटायला हजर असतील असे सांगितले असणार.'

'पण मला वाटले व्लादिमीर ब्रुसिलॉफ आपल्याला भेटायला येताहेत.'

'मलाही व्लादिमीर ब्रुसिलॉफना भेटायला खुप आवडेल.' रेमंड डिवाईन म्हणाला.

'मला खात्री आहे व्लादिमीर ब्रुसिलॉफना तुम्हाला भेटायला खूप आवडेल.'

'शक्य आहे, शक्य आहे. माझ्या लेखणावर थोर रशियन लेखकांचा प्रभाव आहे असे मोठमोठे समीक्षक नेहमी म्हणतात.'

'तुमचे लिखाण किती वैचारिक आहे.'

'हं.. हो!'

'आणि साहित्यरसाने भरलेले.'

'खरंच.'

प्रेमरसाने ओथंबलेल्या ह्या संभाषणातून काढता पाय घेण्याची कथबर्टने तयारी केली. बाहेर जरी लख्ख प्रकाश पडला असला तरी त्याच्यासमोर अंधार पसरला होता. पक्षी मंजुळ गाणी गात होते पण त्याला काही ऐकू येत नव्हते. त्याची अवस्था व्लादिमीर ब्रुसिलॉफच्या नायकासारखी झाली होती. निघण्यासाठी तो वळणार इतक्यात अ‍ॅडेलिनने त्याला परत हाक मारली.

'तुम्ही येणार ना बुधवारच्या सभेला?'

'हं..हो.'

पुढच्या बुधवारी कथबर्टने सभेत आपली नेहमीची जागा पटकावली. तो नेहमी असाच कोपरा निवडायचा जिथून त्याला अ‍ॅडेलिन व्यवस्थित दिसे पण लोकांना मात्र तिथे कथबर्ट उभा आहे की एखादा फर्निचरचा पीस ठेवलाय याचा पत्ताही लागत नसे. आज नेहमीच्या जागी जाऊन त्याने आजुबाजुला पाहिले तेव्हा उत्सवमूर्ती रशियन साहित्यिक लोकांच्या घोळक्यात बसून आजूबाजूच्या महिलावर्गाकडे बारकाईने पाहात असल्याचे त्याला दिसले. रेमंड पार्स्लो डिवाईन अजून आला नव्हता.

रशियन कादंबरीकाराचे रूप पाहून कथबर्टला आश्चर्य वाटले. कुठल्यातरी अज्ञात कारणाने, अर्थात कारण चांगलेच असणार, शंका नकोच, त्या रशियनाने आपला पूर्णं चेहरा दाढीमिशांच्या जंजाळामागे लपवलेला होता. दाढीमिश्यांच्या जंजाळातून त्याचे डोळे तेवढे फक्त दिसत होते आणि त्या डोळ्यांमध्ये खुपच उदास भाव आहेत असे कथबर्टला उगीचच वाटले. मायदेशातून काहीतरी वाईट बातमी आली असणार, दुसरे काय?

पण प्रत्यक्षात तसे काहीच नव्हते. उलट मायदेशातून अगदी गरमागरम ताजी खुशखबर आली होती. बुर्झ्वा गटाच्या ताज्या कत्तलीत त्याचे तीन प्रमुख सावकार संपले होते. एका सुरई आणि बुटांच्या परतफेडीसाठी तो गेले पाच वर्षे ज्याच्यापासून तोंड लपवून पळत होता तो सावकार देश सोडून कायमचा परागंदा झाला होता. व्लादिमीर जरी उदास दिसला तरी घरच्या वाईट बातमीमुळे तो उदास आहे हे निलाखस खोटे होते. खरे कारण हे होते की साहित्यदौ-याच्या निमित्ताने या देशात पाय ठेवल्यापासून त्याला ब्याऐंशी साहित्य मंडळांना भेटी द्याव्या लागल्या होत्या आणि आता त्याला साहित्यमंडळांचे अजीर्ण झाले होते. त्याच्या एजंटाने ह्या दौ-याबाबत सूतोवाच करताच त्याने विशेष खळखळ न करता झटकन संमती दिली होती. रुबलमध्ये हिशोब केल्यास दौ-यातुन धनप्राप्तीही ब-यापैकी होणार होती. पण इथे आल्यावर लक्षात आले की इथल्या साहित्य मंडळांचा जवळजवळ प्रत्येक सभासद स्वतःबरोबर कायम स्वतःचे साहित्यबाड बाळगत असतो आणि संधी मिळताच कसलीही पूर्वसूचना न देता अचानक ते साहित्यबाड काढून पाहुण्यासमोर त्याचे वाचन करणे हा त्याचा आवडता छंद असतो. ह्या लादलेल्या साहित्यवाचनापेक्षा निज्ञी-नोव्गोरोड ह्या आपल्या गावी गुपचुप राहिलो असतो तर जास्त परवडले असते असे एक्क्याऐंशी साहित्यमंडळांच्या भेटी घेतल्यानंतर त्याला वाटू लागले होते. तिथे वाईटात वाईट काय होणार होते? अचानक खिडकीतून आलेल्या बाँबने हातातला चहाचा कप फुटण्याची शक्यता, एवढेच.

विषण्ण मनाने तो हा विचार करत असताना एका लंबुटांग लुकड्याश्या चश्मिष्टाला बरोबर घेऊन त्याची यजमानीण त्याच्या आजूबाजूला घुटमळतेय असे त्याच्या लक्षात आले. मातब्बर कुस्तीगिराला आखाड्यात उतरवताना कुस्ती संयोजकाच्या तोंडावर जसे अभिमान आणि गर्वाचे संमिश्र भाव असतात थेट तसेच भाव यजमानीण बाईच्या तोंडावर झळकत होते.

"ओह, मि. ब्रुसिलॉफ, मि. रेमंड पार्स्लो डिवाइनशी तुमची ओळख व्हावी अशी माझी कधीची इच्छा होती. तुम्ही यांचे नाव ऐकले असेलच ना? मि. डिवाईन हे एक अतिशय प्रतिभावंत असे उगवते साहित्यकार आहेत.'

मिशांच्या झुडपाआडून थोडेसे साशंक नजरेने व्लादिमीरने डिवाइनला फक्त न्याहाळले. इंग्लंडात याआधी भेटलेल्या एक्क्याऐंशी उगवत्या ता-यांमध्ये आणि याच्यामध्ये त्याला काहीही फरक दिसला नाही. रेमंड पार्स्लो डिवाइनने आदराने मान थोडीशी लववुन त्याला नमस्कार केला, तिकडे कथबर्ट त्याच्या जागेपासून अजून दोन पावले मागे सरकला आणि त्याने डिवाइनकडे एक जळता कटाक्ष टाकला.

'मी करत असलेल्या मोडक्यातोडक्या साहित्यसेवेची मा. समीक्षकांनी खूप प्रशंसा करून मला अगदी लाजवून सोडले आहे.' डिवाईन म्हणाला. ' माझ्या लेखनाची तुलना साक्षात रशियन साहित्याशी केली जाते हे पाहून मला खूप भरून येते. रशियन साहित्यिकांनी पहिल्यापासुनच मला वेडावून सोडले आहे. सोविएट्स्कीला मी माझा गुरू मानतो.'

जंगलात खोल कुठेतरी हालचाल झाल्याचा भास झाला. व्लादिमीरने बोलण्यासाठी तोंड उघडले होते. परदेशी भाषेत बोलण्याचा त्याला सराव नव्हता. आपल्या अंतर्भागातून काहीतरी आधुनिक यंत्रणा वापरून शब्दांचे उत्खनन चाललेय असे भाव चेह-यावर आणून त्याने शेवटी तीन शब्द आपल्या तोंडातून बाहेर फेकले.

'सोविएट्स्की खड्ड्यात गेला.'

तो क्षणभर थांबला आणि मग परत तीन शब्द त्याच्या मुखकमलातून बाहेर पडले.

'मी सोविएट्स्कीवर थुंकतो.'

हॉलमधले वातावरण अचानक बदलले. समाजातल्या उत्सवमूर्तीचा अनेकांना हेवा वाटतो, पण त्यांच्या डोक्यावर लटकलेली अनिश्चिततेची टांगती तलवार कोणी पाहिलेली नसते. प्रसिद्धी आज असते आणि उद्या नसते. ह्या क्षणापर्यंत वुड्स हिल साहित्य मंडळात रेमंड पार्स्लो डिवाइनचा बाजारभाव बराच वर होता, अचानक त्याच्यात वेगाने घसरण झाली. आजपर्यंत लोकांनी त्याची सोविएट्स्कीच्या प्रभावाबद्दल खूप तारीफ केली होती. सोविएट्स्कीच्या प्रभावाखाली असणे कमालीचे वाईट आहे ह्याचा त्यांना अचानक साक्षात्कार झाला. अर्थात पोलिस याबद्दल तुम्हाला आत करणार नाहीत पण सभ्यतेचेही काही संकेत असतात आणि रेमंड पार्स्लो डिवाइनने त्यांचा भंग केला होता. स्त्रिया त्याच्यापासून दूर सरकल्या, पुरूष प्रश्नार्थक दृष्टीने पाहू लागले, अ‍ॅडेलिन स्मेथर्स्ट इतकी दचकली की तिच्या हातून कप पडला आणि एका कोप-यात कुचंबत उभे असलेल्या कथबर्टला अचानक आशेचा किरण दिसू लागला.

रेमंड पार्स्लो डिवाइनही हादरला पण त्याने आपली पत सांभाळायचा जोरदार प्रयत्न केला.

'सोविएट्स्कीला मी गुरू मानतो यासाठी म्हटले की कोणे एके काळी मला त्याचे लिखाण खूप आवडले होते. सुरवातीला सगळेजण चाचपडत असतात. पण मी आता त्यांतून बाहेर पडलोय. सोविएट्स्कीचा खोटा झगमगाट मला आता भुलवीत नाही. आता मी स्वतःला पूर्णपणे नॅस्टिकॉफच्या विचारधारेशी संलग्न करून घेतलेय.'

लोकांनी एकमेकांकडे बघत माना डोलावल्या. सुरवातीला सगळेच चुकतात हो, पण सुबह का भुला शाम को घर आ जाये तो उसे भुला नही कहते!

'नॅस्टिकॉफ पण तसलाच,' व्लादिमीर थंडपणे म्हणाला आणि परत आपल्या आतल्या मशिनरीला त्याने कान लावला.

'नॅस्टिकॉफ सोविएट्स्कीपेक्षाही वाईट,' तो परत थबकला.

'मी नॅस्टिकॉफवर थुंकतो.' तो शेवटी म्हणाला.

आता कसलीच शंका उरली नाही. डिवाईनचे मार्केट पूर्णपणे कोसळले होते. रेमंड पार्स्लो डिवाइनबाबत आपण घोडचूक केली याची प्रत्येकाला खात्री पटली. त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन डिवाईनने त्यांना चांगलेच फसवले होते यात शंकाच नव्हती. त्याच्या बोलण्यावर त्यांनी इतके दिवस विश्वास ठेवला, तो कोणी थोर साहित्यिक आहे असा स्वतःचा गैरसमज करून घेतला आणि आता पाहताहेत तर काय! तो चक्क नॅस्टिकॉफचा हस्तक निघाला. हल्ली कोणावर विश्वास ठेवणे इतके कठिण झालेय! मिसेस स्मेथर्स्टचे पाहुणे समाजातले सभ्य लोक होते म्हणून बरे, ते मारहाणीवर उतरण्याची शक्यता नव्हती पण त्यांच्या चेह-यावरून त्यांना काय वाटतेय ते स्पष्ट होत होते. जे डिवाईनच्या जवळ उभे होते त्यांनी तिथून दूर जाण्याची एकच घाई उडवून दिली. मिसेस स्मेथर्स्टनी आपला चश्मा वर करून डिवाईनला वरपासुन खालपर्यंत न्याहाळले. कोणीतरी जरा जोरात कुजबुजल्यासारखे वाटले, कोप-यात कोणी खिडकी जोरात उघडून जणू इशाराच केला.

रेमंड पार्स्लो डिवाइन दोन-तीन क्षण चुळबुळला, मग परिस्थिती जाणून तो वळला आणि त्याने दरवाजा गाठला. त्याच्यामागे दरवाजा बंद झाल्यावर हॉलने सोडलेला सुस्कारा प्रत्येकाने ऐकला.

व्लादिमीर ब्रुसिलॉफ आपले उरलेले भाषण पूर्णं केले.

'माझ्यापेक्षा चांगला कोणीही साहित्यकार नाही. सोविएट्स्की?? हॅ.... नॅस्टिकॉफ??? हु..... मी सगळ्यांवर थुंकतो. माझ्या वरचढ कोणीच नाही. पिजी वुडहाऊस आणि टॉलस्टॉय वाईट नाहीयेत! म्हणजे चांगले आहेत असे नाही पण वाईटही नाहीत. माझ्यापेक्षा चांगला मात्र कोणीच नाही.'

आणि हे ब्रम्हवाक्य उच्चारल्यावर त्याने जवळच्या प्लेटमधल्या केकचा एक मोठा तुकडा उचलला आणि मिशांच्या जंजाळात लपलेल्या तोंडात तो सोडून दिला. मग तो शांतपणे रवंथ करायच्या कामी लागला.

हॉलमध्ये स्मशानशांतता पसरलेली हे म्हणणे जरा अतिशयोक्त होईल. कारण ज्या ठिकाणी व्लादिमीर काहीतरी खात बसलेला असतो तिथे शांतता नांदणे अशक्य असते. पण चार माणसे जमल्यावर त्यांच्या कुजबुजीचा जो हलका आवाज येतो त्याचा पूर्णं अभाव होता. प्रत्येकाला शांततेचा भंग कोणी करावा हा प्रश्न पडला होता. वुड्स हिल साहित्यिक मंडळाचे सदस्य एकमेकांकडे अवघडल्या नजरेने पाहात होते. कथबर्ट नेहमीसारखा अ‍ॅडेलिनवर दृष्टी खिळवुन बसला होता आणि अ‍ॅडेलिन शून्यात नजर लावून हरवली होती. तिला प्रचंड मानसिक धक्का बसलाय ते तिच्या चेह-यावरुन कळून येत होतं.

अ‍ॅडेलिनचे मन जणू वावळटीत सापडलेल्या कागदाच्या कपट्यासारखे भिरभिरत होते. ओल्या हिरव्याकंच हिरवळीवरून मजेत चालत असताना अचानक पायाखाली साप यावा तसे तिचे झाले होते. डिवाईनचा तिच्यावर जरा जास्तच प्रभाव पडला होता. डिवाईनने स्वतःबद्दल जी एक उच्च प्रतिमा तयार केली होती त्याच्या ती प्रेमात पडली होती. आणि आता अचानक तिच्या देवाचे मातीचे पाय तिला दिसले होते. अर्थात आजच्या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेतला तर रेमंड पार्स्लो डिवाईनवर जरासा अन्यायच झाला हे लक्षात येईल, पण काय करणार? जगरहाटी अशीच आहे. तुम्हाला डोक्यावर घेऊन लोक नाचत असताना अचानक तुमच्यापेक्षा जास्त लोकप्रिय सेलेब्रिटी तिथे येते आणि तुम्हाला जमिनीवर आदळून लोक लगेच त्या दुस-या सेलेब्रिटीच्या मागे धावतात! ह्या मुद्द्यावर अजून बरेच बोलता येईल पण सध्या इतकेच म्हणता येईल की अ‍ॅडेलिनच्या मनावरून रेमंड पार्स्लो डिवाईनचे गारूड एका क्षणात उतरले. वावटळीत भिरभिरत असलेल्या तिच्या मनात एक विचार मात्र पक्का झालेला, आपल्या खोलीत जाताच रेमंडने स्वतः सही करून दिलेले त्याचे तीन फोटो जाळून टाकायचे आणि रेमंडच्या स्वाक्षरालंकृत पुस्तकांची रद्दी घेऊन जाण्यासाठी रद्दीवाल्याला बोलवायचे.

मिसेस स्मेथर्स्ट आता ब-याच सावरल्या होत्या, सभेलाही सावरायचा त्यांनी प्रयत्न सुरू केला.

'मग, मि. ब्रुसिलॉफ, तुम्हाला इंग्लंड कसे वाटले?' त्यांनी नेहमीचा यशस्वी प्रश्न टाकला.

अजून एक केक आत टाकता टाकता उत्सवमूर्ती थबकल्या,

'चांगले आहे.'

'एवढ्यात सगळीकडे फिरून झाले असेल ना?'

'बरोबर बोललात!'

'थोरा-मोठ्यांशी भेटीगाठी झाल्या असतील...'

'हो, तसे म्हणायला हरकत नाही. तो आपला हा.. त्याला कालच भेटलो, त्यानंतर तो... ' बोलताबोलता त्या केसांच्या जंजाळात लपलेल्या चेह-यावर खिन्न भाव उमटले, आवाजात निराशा दिसू लागली.

'पण तुमचे खरे हीरो अजून भेटलेच नाहीत कुठे. तुमचे आर्बमिचेल, आरिवाडन.. ह्या लोकांना भेटता आले नाही अजून. खूप निराशा झालीय माझी बघा.... तुम्ही भेटलात काहो कधी आर्बमिचेल आणि आरिवाडनला?'

मिसेस स्मेथर्स्टचा चेहरा आत्यंतिक दु:खाने पिळवटून निघाला आणि हॉलमधल्या प्रत्येक सभासदाच्या चेह-यावर ते दु:ख प्रतिबिंबीत झाले. त्यांच्या थोर रशियन पाहुण्याने दोन नवीन नावे त्यांच्यावर फेकली होती आणि त्यांच्या उसन्या विद्वत्तेचे भांडे फुटण्याच्या बेतात आले होते. वुड्स हिल साहित्य मंडळाला एका दिवसात तिस-यांदा नामुष्कीला सामोरे जावे लागत होते. वुड्स हिल साहित्य मंडळाबद्दल काय मत होईल व्लादिमीर ब्रुसिलॉफचे?

कुठूनतरी मदत मिळेल या आशेने मिसेस स्मेथर्स्टनी हॉलभर नजर फिरवली, पण कोणीही त्यांच्या नजरेला नजर भिडवली नाही.

आणि तेवढ्यात दूर कुठल्यातरी कोप-यातून खोकण्याचा, कोणीतरी खाकरल्याचा आवाज आला. कथबर्टच्या आजूबाजूला असलेल्या लोकांच्या लक्षात आले की त्याने आपल्या एका पायाने दुस-या पायाभोवती विळखा घालायचे थांबवले होते आणि त्याच्या डोळ्यात थोडीशी बुद्धीची चमक दिसत होती.

'अं...अं...मला वाटते,' सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेल्यामुळे थोडेसे बावचळत तो म्हणाला, 'मला वाटते ते एब मिशेल आणि हॅरी वॉर्डनबद्दल बोलताहेत.'

'एब मिशेल आणि हॅरी वॉर्डन???,' मिसेस स्मेथर्स्ट गोंधळलेल्या चेह-याने म्हणाल्या, 'मी तर ही नावे ऐकलीसुद्धा ------'

'हो, हो, अगदी बरोबर, आर्बमिचेल, आरिवाडन.......,' व्लादिमीर आनंदाने ओरडला, ' तुम्ही ओळखता त्यांना, होय ना? काय, नाही काय?!!!!.

'मी एब मिशेलबरोबर नेहमी खेळतो आणि गेल्या वर्षीच्या फ्रेंच ओपनमध्ये हॅरी वॉर्डन माझा पार्टनर होता.'

थोर रशियन साहित्यिकाच्या गगनभेदी आरोळीने हॉलमधले झुंबरही थरारले.

'तुम्ही फ्रेंच ओपनमध्ये खेळता?!!!!" मिसेस स्मेथर्स्टकडे वळून तो कडाडला, 'ओपनमध्ये खेळणा-या ह्या महान माणसाशी माझी ओळख का करून देण्यात आली नाही?'

'अं, हो, म्हणजे त्याचे काय..... मि. ब्रुसिलॉफ.......'

त्यांना पुढचे शब्द सुचेनात. कुथबर्टला दरवाज्यातल्या पायपुसण्यापेक्षा जास्त किंमत त्या देत नव्हत्या हे कथबर्टला न दुखावता व्लादिमीरला सांगण्याएवढी साहित्यप्रतिभा त्यांच्या ठायी नव्हती.

'माझी ओळख करून द्या!' व्लादिमीर परत कडाडला.

'हो, हो, नक्कीच, का नाही... हे मि......'

आणि त्यांनी कथबर्टकडे काकुळतीने पाहिले.

'मि.बँक्स.' त्यांच्या नजरेतले भाव ओळखून कथबर्ट घाईघाईत म्हणाला.

'बँक्स! कुताबुट बँक्स तर नव्हे??!!!' व्लादिमीर परत ओरडला.

'तुमचे नाव कुताबुट आहे?' मिसेस स्मेथर्स्ट कशाबशा उद्गारल्या.

'अं...कथबर्ट आहे.'

'हो हो, कुताबुट.' हॉलमध्ये अचानक थोडी खळबळ माजली कारण मध्ये उभ्या असलेल्या लोकांना हाताने बाजूला सारत रशियन आपल्या जागेवरून जिथे कथबर्ट बसला होता तिथे धावला होता. कथबर्टकडे दोन मिनिटे तो प्रेमभराने पाहात राहिला आणि अचानक, कथबर्टला काही कळण्यापुर्वी, त्याने वाकून कथबर्टच्या दोन्ही गालांचे चुंबन घेतले.

'तरुण गृहस्था, मी तुला माझ्या ह्या डोळ्यांनी फ्रेंच ओपन जिंकताना पाहिलेय. ग्रेट! ग्रेट!! ग्रेट!!! सुपर्ब गेम. अतिशय सुंदर खेळलास तू! तू लोकांना खुशाल सांगू शकतोस की प्रत्यक्ष मी तुझी तारीफ केली. निज्ञी-नोव्गोरोडच्या एक छोट्या खेळाडूचा सलाम तू परत एकदा स्वीकारावा अशी माझी इच्छा आहे!' त्याने परत एकदा कथबर्टचे चुंबन घेतले. मग वाटेत उभ्या असलेल्या दोन्-चार बुद्धिजीवींना दूर ढकलून त्याने एक खुर्ची जवळ ओढली आणि तो कथबर्टशेजारी स्थानापन्न झाला.

'तू खरोखरच खुपा मोठा खेळाडू आहेस!'

'कसलं कसलं!' कथबर्ट लाजत.

'नाही खरंच, तू जे शॉट्स मारतोय ते अगदी बघण्यासारखे असतात.'

'मला खरंच कल्पना नाही, मी इतका चांगला खेळतोय त्याची.'

व्लादिमीरने खुर्ची अजून जवळ ओढली.

'आमच्या गावातली एक जम्माडी धमाल सांगतो. नेहमीसारखा मी, लेनीन आणि ट्रॉटस्कीविरुद्ध मॅच खेळत होतो. आणि जिंकण्यासाठी ट्रॉटस्कीला फक्त दोन इंच दूर असलेल्या होलमध्ये शॉट मारायचा होता. तो शॉट मारणार एवढ्यात कोणीतरी लेनीनवर रिवॉल्वरने गोळी झाडली. तुला माहीत असेलच आमचा राष्ट्रीय खेळ आहे हा- लेनीनला रिवॉल्वरने मारायचा प्रयत्न करणे. अचानक झालेल्या ह्या आवाजाने ट्रॉटस्की इतका दचकला की त्याचा शॉट दोन इंचाजागी चक्क दोन यार्ड लांब गेला. त्यानंतर लेनिनचाही शॉट चुकला. बिचारा आधीच घाबरलेला. त्याने रिवॉल्वरचा शॉटही चुकवलेला ना! ती मॅच मी जिंकलो! चक्क तीन लाख शहाण्णव हजार रुबल जिंकले मी त्या दिवशी! म्हणजे तुमच्या चलनात पंधरा शिलिंग!!! काय मस्त खेळ रंगलेला त्या दिवशी. आणि त्या आधी एकदा..............'

अगम्य भाषेमध्ये दोघांमध्ये ज्या गप्पा चालल्यात त्यातले आपल्याला ओ की ठो कळणार नाही हे हॉलमधल्या सुसंस्कृतांना कळून चुकले. हळूहळू त्यांचे नेहमीचे संभाषण सुरू झाले. मधून मधून व्लादिमीरचे बावन्नमजली हास्य त्यांना दचकवत होते पण आपले थोर पाहुणे खूश आहेत एवढे समाधान त्यांच्यासाठी पुरेसे होते.

आणि अ‍ॅडेलिन, तिच्या भावना कशा वर्णन करायच्या? प्रत्यक्ष तिच्या डोळ्यांसमोर पाथरवटांनी कुचकामी म्हणून दूर टाकलेला दगड चक्क मूर्तीत बदलून देवळात स्थानापन्न झालेला तिने पाहिला, नेहमी शेवटी येणारा घोडा चक्क शर्यत जिंकताना तिने पाहिला. कुठल्यातरी अज्ञात भावनांनी तिचे हृदय भरून गेले. कथबर्टला ओळखण्यात तिने फार मोठी चूक केली होती हे तिच्या लक्षात आले. कथबर्टकडे तिने कायम उपहासाच्या नजरेने पाहिले, पण तो चक्क असामान्य माणूस निघाला. काही मिनिटापूर्वी जिथे डिवाईन होता तिथे आता कथबर्ट जाऊन बसला.

साधारण अर्ध्या तासाने कथबर्ट आणि व्लादिमीर दोघेही उठले.

'गुडबाय मिसेस स्मेथर्स्ट, मी तुमची रजा घेतो आता, आज वेळ खूप मस्त गेला. मी आता कुताबुटबरोबर लिंकवर जाऊन एक राउंड घेतो. मला तुझे क्लब्स वापरायला देशील ना मित्रा?'

'तुमचेच आहेत समजा.'

'तसेही मला निब्लिस्कीच जास्त कामात येते. गुड बाय मिसेस स्मेथर्स्ट!'

दोघेही दरवाज्याकडे जात असताना अचानक कोपराला कोणाचातरी स्पर्श झाल्याचे कथबर्टला जाणवले. अ‍ॅडेलिन त्याच्याकडे प्रेमभरल्या नजरेने पाहात होती.

'मीही राऊंडला तुमच्यासोबत येऊ शकते का?'

कथबर्टचा उर भरून आला.

'ओह, का नाही? आणि ही सोबत कायमची मिळावी हीच माझी इच्छा आहे!' तो भरलेल्या गळ्याने म्हणाला.

'तसेच होईल तर!' अ‍ॅडेलिन हलकेच म्हणाली.

*********

'आणि यावरून,' आद्य सभासद समारोप करत म्हणाला, ' असा निष्कर्ष काढता येईल की दैनंदिन आयुष्यात माणसाला गोल्फचा खूप फायदा होऊ शकतो. रेमंड पार्स्लो डिवाईन, जो गोल्फ खेळत नव्हता, तो लवकरच ते गाव सोडून गेला. हल्ली तो कॅलिफोर्नियातल्या फ्लिकर फिल्म कंपनीत संवादलेखनिकाचे काम करतो. अ‍ॅडेलिन आणि कथबर्टचे लग्न झाले. तिने गोल्फला इतके वाहून घेतलेय की पहिल्या मुलाचे नाव एब मिशेल रिब्ड-फेस मॅशी बँक्स ठेवायचे हा हट्ट तिने धरलेला, कथबर्टने तिला कसेबसे आवरले होते. जे त्या दोघांना ओळखतात ते नेहमी त्यांच्या सुखी संसाराबद्दल............

*****************

आद्य सभासद बोलता बोलता थांबला. ऐकणारा तरुण धावत बाहेर गेला होता आणि आपली क्लब्सची बॅग परत आणण्यासाठी तो वेटरला ओरडत होता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडले. Happy

मस्त कथा आणि सुरेख अनुवाद केला आहेस साधना.. आपले मराठी शब्द अगदी चपखल बसवले आहेस. 'तेरे चेहरेसे नजर नही हटती' तर एकदम मस्त! Happy

साधना,

अनुवाद सुरेख झालाय. मराठी म्हणी वापरून केलेली वाक्यरचना अधिक भावली. या चपखल वापराबद्दल आपलं खास वेगळं अभिनंदन! Happy

बाकी, सोव्हीयेत्सकी हे नाव वाचून गडगडून हसलो. लेनिन, ट्रॉट्स्की आणि बुसिलॉफचा डाव वाचून ज्याम करमणूक झाली. Proud वूडहाउसबुवांनी चांगल्यापैकी खेचलीये.

आ.न.,
-गा.पै.

>> पण इथे आल्यावर लक्षात आले की इथल्या साहित्य मंडळांचा जवळजवळ प्रत्येक सभासद स्वतःबरोबर कायम स्वतःचे साहित्यबाड बाळगत असतो आणि संधी मिळताच कसलीही पूर्वसूचना न देता अचानक ते साहित्यबाड काढून पाहुण्यासमोर त्याचे वाचन करणे हा त्याचा आवडता छंद असतो. ह्या लादलेल्या साहित्यवाचनापेक्षा निज्ञी-नोव्गोरोड ह्या आपल्या गावी गुपचुप राहिलो असतो तर जास्त परवडले असते असे एक्क्याऐंशी साहित्यमंडळांच्या भेटी घेतल्यानंतर त्याला वाटू लागले होते. तिथे वाईटात वाईट काय होणार होते? अचानक खिडकीतून आलेल्या बाँबने हातातला चहाचा कप फुटण्याची शक्यता, एवढेच !>>> Rofl

मस्त जमतेय साधना,तुम्ही कठीण काम सोपे असल्यासारखे हाताळताय.
पु.ले.शु.

सगळ्यांचे मनापासुन आभार.

त्रिशंकु, तुमचेही आभार. इंग्रजी नावांच्या योग्य उच्चारामध्ये माझा नेहमी घोळ होतो.

मस्त जमलाय अनुवाद. अनुवाद वाटतदेखील नाही, इतका सरस झालाय.

आपले मराठी शब्द अगदी चपखल बसवले आहेस. 'तेरे चेहरेसे नजर नही हटती' तर एकदम मस्त!>>> +१.

वूडहाऊसचा विनोद शाळेत असताना अजिबात आवडला नव्हता. त्यामुळे कित्येक दिवस त्याच्या वाटेला गेले नव्हते. आता परत वाचेन Happy

द क्लिकिंग ऑफ कथबर्ट >>>
कथा वाचली नाहीये, अजून! पण शीर्षकाचा अनुवाद का केला नाहीये? हे विचारायचे होते.

कथा वाचून अनुवाद कसा झालाय ते सांगते.

मस्तच जमलाय अनुवाद.
मराठी म्हणी वापरून केलेली वाक्यरचना अधिक भावली. या चपखल वापराबद्दल आपलं खास वेगळं अभिनंदन! >>> +१

एकदम ओघवता अनुवाद !!!

सही जमलाय..........

"आमचा राष्ट्रीय खेळ आहे हा- लेनीनला रिवॉल्वरने मारायचा प्रयत्न करणे......... "
"चक्क तीन लाख शहाण्णव हजार रुबल जिंकले मी त्या दिवशी! म्हणजे तुमच्या चलनात पंधरा शिलिंग!!! "
हे असले केवळ पिजी वुडहाऊसच लिहू जाणे..............

स्वगतः
आधी कधीच कसे हे रत्न वाचनात आले नाही ?
रत्न = ही कथा...

आपले मराठी शब्द अगदी चपखल बसवले आहेस. 'तेरे चेहरेसे नजर नही हटती' तर एकदम मस्त! >>> +१००

सुंदरच लिहिलंस साधना ..... Happy

सुंदर झालाय हा अनुवाद. या गोल्फ स्टोरीज अनुवादासाठी एकदम योग्य आहेत, हलक्या फुलक्या, त्याच्या इतर कादंबऱ्यांप्रमाणे गुंतागुंत नसलेल्या आणि छोटेखानी. मजा आली वाचताना.

Company's own water ला मराठीत काय म्हणता येईल? असा विचार माझ्याही मनात तेव्हा वाचताना आला होता, लेखकाला काय सांगायचे ते कळूनही चपखल प्रतिशब्द सापडलाच नव्हता.

<< वुड्स हिल हे सगळ्या सांस्कृतिक गोष्टींचे माहेरघर बनावे....>> हे आवडले. लॅटिन-ग्रीक वचने अधोविधानांसारखी (understatements) वापरायची वुडहाऊसची जुनी सवय. मूळ कथेत तो लॅटिन summum bonum ही उक्ती (जिच्यावर प्लेटो अरिस्टॉटल पासून विद्वानांनी वाद घातलेत) संदर्भ फिरवून काय मस्त वापरतो!

आणखी अनुवादांच्या प्रतीक्षेत Happy

sadhana, tuza ha pailu mala mahit navhata... mast kelahes anuvad. ajun ase ankhi yeu det....

पुन्हा एकदा वाचले हे आणि पुन्हा एकदा खी खी खी खी ...
मूळ कथा भारीच आहे आणि तुमचा अनुवाद पण जबरदस्तच रंगलाय. .
हल्ली तुम्ही फारसे लेख लिहित नाही ...