सिल्क पेंटिंग असा काही कलाप्रकार असतो हे मला माहित नव्हते आणि अजूनही नाही. पण अशी पेंटींग्ज मी स्वतः करत असे. त्याबद्दल हे. अगदी पहिल्यापासून सविस्तर लिहितो.
मुंबईच्या प्रिंस ऑफ वेल्स म्यूझियममधे भरतकामाचे दोन अप्रतिम नमुने आहेत. ( हे नेहमीच प्रदर्शनासाठी
असतील असे नाही.) ज्या ज्या वेळी मी ते बघतो, त्यावेळी भान हरपून जाते.
ते बहुतेक भारतीय नाहीत. माझ्या अंदाजाप्रमाणे चिनी आहेत. त्यापैकी एक आहे एका तूर्रेबाज कोंबड्याचे.
भारतीय कोंबड्यापेक्षा जरा वेगळा असा तो कोंबडा आहे. आजूबाजूला काही कोंबड्या पण आहेत. रंग आता
निस्तेज वाटले तरी मूळ रंग फार सुंदर असावेत. पण तरीही तो कोंबडा, त्याची पिसे आणि बांग देण्याचा पवित्रा
अगदी अस्सल आहे. दुसरा नमुना आहे तो एका धबधब्याचा. काळ्या कापडावर फक्त पांढर्या धाग्यांनी
केलेले हे भरतकाम आहे. पण त्यातले पाणी एवढे अस्सल भासते कि जणू तो धबधबा आता कोसळायला लागेल, असे वाटते.
हे दोन्ही नमुने लहानपणापासून माझ्या मनात भरलेले आहेत. याच दरम्यान मी कधीतरी व्ही. शांताराम
यांच्या पत्नीने त्यांचे भरतकामाने केलेले पोर्ट्रेट बघितले. ( कदाचित मूळ कलाकृती नाही, फोटो बघितला असेन.) त्याची खासियत म्हणजे, विमलाबाईंनी ते स्वतःच्या केसांनी भरलेले होते.
या कलाकृतींपैकी सगळ्यात बहुदा सॅटीन स्टीच हा टाकाच वापरलाय. आणि तसे काहीतरी करावे असे माझ्या
मनाने घेतले. जे चित्र माझ्या मनात होते, त्याला सॅटीन स्टीच थोडा कमी पडणार होता. कारण ( माझ्या
समजूतीप्रमाणे ) या टाक्याचे काही लिमिटेशन्स आहेत.
एकतर तो एक से.मी, पेक्षा लांब घालता येत नाही. त्या टाक्याला वळण देता येत नाही, म्हणजे तो सरळच
घालता येतो आणि तिसरे म्हणजे या टाक्यात एका रंगाच्या शेजारी दुसरा रंग असे भरायला थोडे कठीण जाते.
शिवाय भरतकाम कापडावर केले तर त्याची फ्रेम करताना त्याला आधार द्यावा लागणार.
तर हे सगळे टाळून मी माझ्याच मनाने एक वेगळा प्रकार करुन बघितला आणि त्याला मी सिल्क पेंटींग असे
नाव दिले. ( जून्या मायबोलीवर मी याबद्दल लिहिले होते. त्यावेळी एका सभासदाने ते करुन त्याचा नमुना पण इथे दाखवला होता. )
पण मी शेवटची फ्रेम करुन आता १० वर्षे झाली. मी अशी चित्रे करुन अनेक जणांना दिली पण माझ्याकडे
एखादा नमुना ठेवला नाही. ज्यांना दिली त्यांनी ती जपून ठेवलीच असतील, पण आता त्याचा स्कॅन / फोटो
मागायला संकोच वाटतोय.
तर इथे कुणाला करुन बघावेसे वाटले तर कल्पना यावी म्हणून लिहितोय.
याचे स्वरुप म्हणजे कागदावर सिल्कच्या धाग्यांनी काढलेले चित्र असे असले तरी तंत्र थोडे किचकट आहे.
साहित्यामधे कागद ( कार्डबोर्ड ), रेशीम धागे, धारदार कात्री, मध्यम आकाराची सुई आणि गोंद एवढेच
लागेल.
त्याबद्दल पण सविस्तर लिहितो.
१) कागद : तूमच्या चित्राला शोभेल अश्या रंगाचा कागद घ्या. आवडीप्रमाणे गुळगुळीत किंवा खरखरीत पृष्ठभाग असलेला चालेल. पण गोंद लावल्यावर देखील तो सरळ राहील असा मजबूत आणि जाड हवा.
मी अशी चित्रे व्हेलव्हेट पेपर आणि थर्मोकोल वर पण काढली होती. व्हेलव्हेट पेपर ठिक होता पण थर्मोकोलचा
पृष्ठभाग सपाट नसल्याने, हवे तसे चित्र तयार झाले नाही.
२) रेशीम धागे : तूमच्या चित्राला साजेसे रंग असतील असे रेशीमधागे लागतील. डोळ्यांना जाणवेल
अशा शेडच्या मागची पुढची शेड शक्यतो हाताशी असूदेत. बाजारात हे धागे पिळ दिलेलेच म्हणजे दुहेरी मिळतात. त्यांचा गोफ असतो. तो गोफ आणून ताणून एका बाजूला साध्या धाग्याने घट्ट बांधून गाठ कापायची
आणि मग ते धागे सुटे झाले कि त्याची सैलसर वेणी वळून ठेवायची. आपल्याला लागतील तसे धागे वेणीच्या वरच्या बाजूने ओढून काढायचे. म्हणजे बाकीचे धागे तसेच वेणीत गुंफलेले राहतात.
३) धारदार कात्री : नेहमीच्या शिवणकामाची कात्री नको तर त्यापेक्षा लहान पण धारदार कात्री हवी. आपल्याला
वरच्या धाग्याचे बारीक तुकडे कापून वापरायचे आहेत. असे तुकडे कापताना त्याचा पिळ सुटणार नाही, हे बघावे लागते. म्हणून धारदार कात्री हवी.
४) सुई : सुई हे आपले मुख्य हत्यार. ती अगदी बारीक नको. आपल्याला फक्त गोंद लावण्यासाठी आणि धागा
चिकटवण्यासाठी ती लागते. जास्त करुन तिची नेढ्याचीच बाजू वापरयाची आहे.
५) गोंद : मी साधा कॅम्लिनचा गोंद वापरत असे. हा गोंद हवा तेवढा घेऊन तो जरा हवेवर वाळवून वापरावा लागतो. तो जास्त ओला असून चालत नाही. त्यात पाणी जास्त असेल तर कागद भिजतो आणि धागादेखील भिजून त्याची चमक कमी होते.
या तंत्राने मी मोरपिस, गुलाबाचे फुल, फुलपाखरु, बासरी, इतर मोठी फुले असे बरेच चितारले होते.
शक्यतो नैसर्गिक वाटतील असे रंग तर निवडायचेच पण या धाग्यांची रचनापण नैसर्गिक वाटेल अशी
केल्यास या चित्रांना एक त्रिमिती मिळते. शिवाय आपण ज्या कोनातून बघू, त्या कोनातून मूळ वस्तू
बघितल्यावर कशी दिसेल तशीच दिसते.
आता ते नेमके तंत्र बघू.
कागदावर आपल्याला हवे ते चित्र पुसटसे रेखाटून घ्या. फक्त आऊटलाईनच काढायची आहे.
हाताशी एक रुमाल ठेवा. ( कागदावर गोंद सांडला किंवा हाताला घाम आला तर पुसण्यासाठी )
आठ दहा थेंब एका छोट्या झाकणात ठेवून जरा वाळू द्या.
समजा आपल्याला एक मोरपिस चितारायचे आहे तर आधी मधला डोळा चितारावा लागेल. त्या हिरवट
मोरपिशी रंगाचा धागा घ्या. तसेच त्याच्या आजूबाजूचा निळा आणि हिरवा रंग पण लागेल, तर ते धागे घ्या.
एक स्वच्छ पांढरी डिश घेऊन त्यात या धाग्याचे वेगवेगळ्या आकाराचे तूकडे कापून घ्या. तूकडे कापताना
हात फार वर ठेवायचा नाही. तुकड्यांची लांबी एक सेमी च्या आगेमागे ठेवायची. काही तूकडे त्यापेक्षाही
कमी लांबीचे लागतील.
आता गोंदात सुईची बोथट बाजू बुडवून त्या मोरपिसातल्या डोळ्याच्या मधल्या भागावर गोंदाची एक पुसट रेघ ओढा. सूईच्या त्याच टोकाने हवा त्या रंगाचा धागा उचला व त्या गोंदाच्या रेघेवर ठेवा. सुईला आणि
कागदाला गोंद असल्याने, हे सहज शक्य होते. असे करताना धाग्याचा पिळ सुटणार नाही असे बघा. ( सुटलाच तर दुसरा तुकडा घ्या. ) आता त्या धाग्याला सुईने किंचीत दाबून बसवा, तेवढ्याच गोंदात आजूबाजूला आणखी एकेक तुकडा बसवता येतो का ते बघा. मग दोन्ही बाजूने असे करत करत डोळा भरून घ्या.
असे करताना सर्व एकाच शेडचे धागे न वापरता मागच्या पुढच्या शेड पण वापरा. वेगवेगळ्या आकाराचे तूकडे कापून तयारच असल्याने, हवा त्या लांबीचा तुकडा निवडता येतो.
असे तुकडे चिकटवताना शक्य तितके जवळजवळ चिकटवा. म्हणजे चित्र चांगले दिसते. समजा मोरपिस करायचे असेल तर आधी मधल मोरपिशी रंग मग बाजूचा हिरवट भाग, त्यानंतर पिवळसर भाग आणि मग
चॉकलेटी तंतू करा. चॉकलेटी तंतू करताना, बाहेरचा धागा चॉकलेटी तर त्याला जोडून निळा / हिरवा असा रंग निवडा. हे तंतू सलग करायचे ( चित्राच्या आकाराप्रमाणे ४ ते ५ सेमी लांबीचे ) तसेच या तंतूना तो नैसर्गिक
बाक पण द्यायचा. ( हा बाक आणि सलगपणा टाक्यात येत नाही. ) असा बाक देताना सुईने गोंद लावतानाच
तो वळणदार लावायचा. या तंतूचे शेवटचे टोक गोंदाशिवाय ठेवायचे.
जसजसे चित्र भरत जाते तसे ते खुलतही जाते. या अशा बेसिक कामापेक्षा काही वेगळे प्रयोग मी केले.
फुलपाखराच्या मिश्या करताना काळा आणि पांढरा धागा घेऊन त्याची वेणी वळली आणि मग त्याचे टोक
जरा विखरुन न चिकटवता तसेच ठेवले. जास्वंदीच्या पुंकेसराचे टोक करताना, लाल धाग्याच्या टोकाला एक गाठ मारून असे सहा धागे एकत्र करुन त्यांची वेणी वळली. बासरीच्या टोकाचा गोंडा करताना, तो तसाच मोकळा ठेवला. गुलाबकळीचे बाह्यदल करताना, ते वेगळ्या कागदावर करुन मग कापून गुलाबकळीवर ठेवले.
या सर्वच फ्रेम्स उत्तम जमल्या होत्या ( असे माझे मित्रमैत्रिणी म्हणाल्या )
या सर्व कामाला भरपूर चिकाटी लागते पण एकाच बैठकीत सगळे पूर्ण करायची गरज नसते ( मला रोज एक ते दोन तास दिल्यावर आठ दहा दिवस लागत. ) अर्धवट झालेले काम नीट झाकून ड्रॉवरमधे ठेवले कि झाले.
आता मी परत कधी करेन का, याची शंकाच आहे. आणखी कुणी असे काम केलेले मी बघितले नाही. कुणी करत
असेल तर फारच छान.
मी घरच्या दोघांना मारुन मुटकून शिष्य बनवले होते, पण त्यांचा पेशन्स कमी पडला ! इथे कुणाला करायचे
असेल तर मी नक्कीच मदत करेन.
मला या पेंटींग्ज चे चित्र इथे देता येत नाही, याची खंत आहेच.
मला या पेंटींग्ज चे चित्र इथे
मला या पेंटींग्ज चे चित्र इथे देता येत नाही, याची खंत आहेच. >>>>
.
.दिनेश दा फोटो हवे होते ....
छान माहीती दिली आपण
दिनेशदा, किती काय काय करत
दिनेशदा, किती काय काय करत असता! उद्योगी प्राणी आहात!
माहिती वाचून इंट्रेस्टिंग
माहिती वाचून इंट्रेस्टिंग वाटतय, फोटो असते तर अंदाज आला असता. नक्कीच करुन पाहीन
दिनेश दा , फोटो नाहिच का
दिनेश दा , फोटो नाहिच का मिळणार? ज्यांना चित्र दिली आहेत त्यांना सांगुन नाही का मिळणार?
मला पण चित्र बघाविशी वाटताएत. माहिती इअतकी मस्त दिलीत.
कधि केलेल नाहि, पण तुम्हि इतक
कधि केलेल नाहि, पण तुम्हि इतक सुन्दर पध्द्धति ने हे शिकवलत ना नक्कि करुन बघणार.
अप्रतीम आहे हे सर्व
अप्रतीम आहे हे सर्व
दिनेश मैत्रिणीच्या लग्नात
दिनेश मैत्रिणीच्या लग्नात आहेरासाठी शाळेत असताना आम्ही कार्डबोर्डावर फुलपाखराचं चित्र काढून त्यात बारिक चुका मारून त्या भोवती रेशिम गुंडाळून चित्र केलं होतं. तुम्ही सांगताय ते वेगळं आहे बहुतेक.
आता मनात आलंय ना, म्हणजे आता
आता मनात आलंय ना, म्हणजे आता हात शिवशिवायला लागलेत माझे. भारतवारीत सामान घेऊन येतो.
दक्षे, ते वेगळं, तसा केलेला मोठा मोर आहे आमच्याघरी पण त्यात दोन मोळ्यात दोरा ताणून बसवताना तो सरळच ठेवावा लागतो.
कल्पना भारी अाहे, कष्टही खुप.
कल्पना भारी अाहे, कष्टही खुप. मीतर यापेक्षा भरणेच पसंत करेन
हे असे
रच्याकने ते चुका लावुन मीही केली होती काही चित्र. मज्जा यायची.
डबल पोस्ट
डबल पोस्ट
अवल, काय मस्त नमुना आहे
अवल, काय मस्त नमुना आहे हा.
पण माझ्या प्रकारात सुईत दोरा ओवावा लागत नाही ना ! तो पण एक फायदा आहेच. आता परत करावीच लागेल एखादी फ्रेम.
दिनेशदा, ____/\____ प्रकार
दिनेशदा, ____/\____
प्रकार छानच शोधलाय तुम्ही पण प्रचंड वेळखाऊ आणि चिकाटीचं काम असणार. कोणी केलं तर बघायला नक्की आवडेल.
अवल, अप्रतिम नमुना!
दिनेशदा, मस्त माहिती.
दिनेशदा, मस्त माहिती. नेहमीप्रमाणेच सविस्तर, त्यामुळे समजायला सहज. मी दोर्याची (फक्त आउटलाईन ला दोरा चिटकवुन) ग्रिटींग्स केलेली.
विमलाबाईंनी ते स्वतःच्या केसांनी भरलेले होते........इंटरेस्टिंग माहीती.
अवल, तुझ्या सारख्या कलाकाराला भरतकाम करणे सोप्पे वाटते. मस्त आहे मोर!
हि अशी पंटींग्ज मी केलीत पण
हि अशी पंटींग्ज मी केलीत पण चुका लावून. ९० ची क्रेझ होती उन्हाळ्याच्या सुट्टीतली.
खिळे ठोकून त्यावर मोर, पक्षी वगैरे वगैरे सीन्स केलेत.
सामान मूव करताना बाईने बाहेर नेवून ठेवली तिला वाटले फेकायचीत... घाईत आईन पाहिली नाही व तशीच रात्रभर दरवाज्याबाहेर इतर फेकायच्या वस्तूंच्या पिशवीखाली .. सकाळी कचरेवाल्याने घेवून गेला. (असा राग आला जेव्हा हि गोष्ट फोनवर एकली तेव्हा... बाईचा)
हे सगळं वाचतानाही मला दम
हे सगळं वाचतानाही मला दम लागला -
दिनेशदा - "उत्साह सामर्थ्य तुझे अनंत" आणि यामुळेच - "असो नमस्कार सहस्त्रवार पुन्हा पुन्हा आणि पुन्हा पुन्हाही" (संदर्भ -गीताई, अ. ११)
खुप छान माहीती. पण मला
खुप छान माहीती. पण मला बाजारातुन आणलेले धागे कसे ठेवायचे ते कळाले नाही.
झंपी, खरेतर अशा कलाकृतीच्या
झंपी, खरेतर अशा कलाकृतीच्या मागे किती मेहनत असते ते लोकांच्या लक्षात येत नाही, ठोकले खिळे आणि गुंडाळले धागे, इतके सोपे कधीच नसते ते.
शशांक, तेवढी नाही लायकी माझी.
आकांशा, आणखी महिनाभराने फोटो टाकतो.
मामी, पुढचा नमुना तूझ्याचसाठी करू का ?
दिनेशदा कोपरा पासुन _____/\
दिनेशदा कोपरा पासुन _____/\ _____
बापरे काय चिकाटी आहे.....
शशांक >>> हे सगळं वाचतानाही
शशांक >>>
हे सगळं वाचतानाही मला दम लागला -
दिनेशदा - "उत्साह सामर्थ्य तुझे अनंत" आणि यामुळेच - "असो नमस्कार सहस्त्रवार पुन्हा पुन्हा आणि पुन्हा पुन्हाही" (संदर्भ -गीताई, अ. ११)<<< +१००
उत्तम माहीती
उत्तम माहीती
दिनेशदा, हे असं काहिसं
दिनेशदा, हे असं काहिसं म्हणताय का ?
पण यात दोर्याचे तुकडे न करता सलग धागा चिकटवला आहे.
कसले सुंदर आविष्कार हे सगळे
कसले सुंदर आविष्कार हे सगळे सौंदर्यासक्तीचे अन निर्मितीक्षमतेचे.
प्रणाम घ्यावा माझा ..
हो रचनाशिल्प असेच काहिसे. पण
हो रचनाशिल्प असेच काहिसे. पण हे भरतकाम वाटतेय. छोटे छोटे तूकडे केले तर खुप खरे वाटते. आता मनावर घ्यायलाच पाहिजे मला !
लक्षात येतेय कसे करयचे ते....
लक्षात येतेय कसे करयचे ते....
दिनेशदा, ____/\____ प्रकार
दिनेशदा, ____/\____
प्रकार छानच शोधलाय तुम्ही पण प्रचंड वेळखाऊ आणि चिकाटीचं काम असणार. कोणी केलं तर बघायला नक्की आवडेल. >>>>>+१.
फारच कला आहे.ते धबधब्याचं
फारच कला आहे.ते धबधब्याचं भरतकाम आहे असा समज होता.हैदराबादच्या सालारजंगात १६/२३ दालनात आहेत चिनी रेशमी भरतकाम नमुने.सिंहाची जोडी खास आहे कारण एक पिवळसर वाळूच्या रंगातच सर्व आहे.
बापरे.. केव्हढं किचकट ,पेशंस
बापरे.. केव्हढं किचकट ,पेशंस तडीला लावणारं आर्टवर्क असतं हे. दिनेश __/\__
प्रोसेस वाचून खरंच दम लागला...
चीन मधे म्युझियम्स मधून या आर्ट चे अप्रतिम नमुने पाहताना अवाक व्हायला होते.. काही कलाकार तिथल्या तिथेच बसून प्रात्यक्षिके ही दाखवत असतात. प्रचंड मेहनतीचं काम आहे!!!
विमलाबाईंनी केसापासून केलेलंय ..वाह!!!.. फोटो पाहायला मिळाला असता तर किती बरं झालं असतं..
_/\_... अप्रतिम.. धन्यवाद
_/\_... अप्रतिम..
धन्यवाद दिनेशदा. एक नविन प्रकारा बद्दल खूप विस्ताराने माहिती दिली.
करून बघायला नक्कीच आवडेल.