सध्या भारत-इंग्लंड सामने चालू आहेत. भारताचे स्टार फलंदाज मोठ्या झोकात खेळपट्टीवर येतात १०-१५ मिनिटं, पाऊण तास, फार तर तास भर चांगल्या फलंदाजीचं दर्शन देतात आणि अचानक हत्तीच्या कानात मुंगीने 'मैं तुम्हारे बच्चे की मां बननेवाली हूं' म्हटल्यावर हत्ती कसा बावचळेल, तसे बावचळतात आणि दांड्या उडतात..... अशी चित्रं मी सिनेमाइतकाच क्रिकेटचाही चाहता असल्याने गेला महिनाभर तरी नियमित पाहात आहे. त्यामुळे असेल, पण जब्बरदस्त स्टाईलमध्ये व दमदारपणे इण्टर्व्हलपर्यंत येणाऱ्या आणि नंतर बावचळल्यागत विकेट फेकणाऱ्या 'दबंग - २' ने, अपेक्षाभंग करूनही, म्हणावं तितकं डोकं फिरवलं नाही.
पहिला दबंग सल्लूपटांतला शिरोमणी होता. त्याचाच हा दुसरा भाग, म्हणजे हाणामाऱ्यांमध्ये (नवराबायकोच्या फिल्मी भांडणां उडणाऱ्या उश्यांप्रमाणे) ठोश्यासरशी उडणारी माणसं आली (इथे ती टप्पे वगैरे पण खातात, हे मूल्यवर्धन), बनियानमध्ये पाल सुरसुरावी तसं वाकडं-तिकडं होऊन हसणं आलं आणि शेवटच्या दृश्यात सल्लूभायच्या शर्टाने लाजणंही आलंच. हे सगळं येणार हे माहित असतानाही हा सिनेमा बघायचा होता म्हणून मी सोबत एक मोठी रिकामी पिशवी घेऊन गेलो होतो.. बायको आणि माझं डोकं काढून ठेवायला !
तर डोकं काढून ठेवेपर्यंत जरासा उशीर झाला आणि सुरुवातीचा काही भाग चुकला.. पण जिथून पाहिला तिथून पुढे असं काहीसं झालं -
पहिल्या दबंग प्रमाणे (प.द.प्र.) एका गोडाऊनमध्ये इन्स्पेक्टर पांडे १५-२० गुंडांना यथेच्छ तुडवतो, उडवतो आणि त्याच्या तावडीतून एका लहान मुलाला सोडवतो. प.द.प्र., गोडाऊनच्या बाहेर त्याचे सहकारी पोलिस उभे असतात आणि प.द.प्र.च इथेही तो गुंडांनी 'कमावलेला' माल हडप करतो. (मुलाच्या बदल्यात देण्यासाठी बापाने आणलेले पैसे) पूर्वी लालगंजमध्ये असणाऱ्या इन्स्पेक्टर पांडेची आता कानपूरला बदली झाली आहे आणि त्याच्या सोबतीने तिवारी-मिश्रा सुद्धा आहेत. त्यांच्याशिवाय सिद्दिकी आणि अजून एक-दोन जण नव्याने आले आहेत. कानपुरातला बाहुबली आहे बच्चा भैया (प्रकाश राज). त्याचे दोन भाऊ - चुन्नी आणि गेंदा. हे तिघे मिळून कानपुरात दहशतीचं साम्राज्य पसरवून असतात. अर्थातच 'रॉबिन हूड' पांडे वि. बच्चा भैया पार्टी असा सामना रंगतो. मध्यंतरापर्यंत दोन्ही खेळाडू आश्वासक खेळ करतात, पण मध्यंतरात हत्तीच्या कानात मुंगी पुटपुटते आणि अचानक खेळ गुंडाळला जातो.. प.द.प्र., इथे पांडे 'एकटा जीव सदाशिव' नसतो, आता भाऊ, बाप व बायकोसोबत राहाणारा जबाबदार कुटुंबकर्ता असतो. साहजिक आहे, त्याच्या पोलिसी दुष्मनीचे चटके त्याच्या कुटुंबाला बसतात. वडिलांना धमकी, भावाला मार आणि गरोदर बायकोच्या मनावर मूल जन्माआधीच मरायचा वार.. हे सगळं झाल्यावर रॉबिन हूड पांडे चवताळतो आणि कपडे काढून (स्वत:चे) सर्व दुर्जनांना यमसदनी धाडतो. हे सगळं करताना तो अनेक अचाट हाणामाऱ्या करतो, मध्ये-मध्ये वेळ मिळाल्यावर कधी भावासोबत, कधी बायकोसोबत, कधी पोलिसांसोबत तर कधी नर्तकींबरोबर रस्त्यावर/ स्टेजवर/ परदेशात वगैरे ठिकाणी नाचतो व गातो. खुसखुशीत संवादही 'फेकतो'. एकंदरीत विद्या बालनला जामच सिरीयसली घेऊन मनोरंजन-मनोरंजन-मनोरंजन करतो.
शीर्षक गीत (पु. लं. च्या भाषेत) 'बिपीशायला जायपीचा डबा' जोडल्यासारखं प.द.प्र.'हूड हूड दबंग..दबंग..दबंग..' करतं. बाकी गाणी ठीक-ठाक. 'दगाबाज नैना' प.द.प्र. 'तेरे मस्त मस्त दो नैन..' ची जादू करतं.
प्रकाश राज सारख्या नटाला पूर्णपणे वाया घालवलं आहे. संपूर्ण चित्रपटात त्याला एकून मिळून १५ वाक्यंही नसावीत. प.द.प्र. सोनू सूदइतका रोल तरी त्याच्यासाठी लिहिला जायला हवा होता.
सोनाक्शी सिन्हा आता जरा तासलेला ओंडका दिसायला लागली आहे. तिचं आकारमान आटोक्यात येण्याच्या मार्गावर असलं तरी कंबर मात्र काही केल्या हलता हलत नाही आणि नाकावरची माशी काही केल्या उडता उडत नाही.
अरबाज व विनोद खन्नालाही काहीही काम नाही.
छायाचित्रणाला विशेष वाव नव्हताच, पण तेवढ्यातही माती खाऊन झालीय.
दिग्दर्शक अरबाज खान, हीरो सलमान असल्याने तरतो, अन्यथा अजून खूप प्रयत्न हवे आहेत नक्कीच. लहान मुलाने, आधीच काढून दिलेली अक्षरं गिरवावीत तसा तो बहुतांश पहिला दबंग जसाच्या तसा गिरवतो.
सलमान खान हा अभिनेता नाही म्हणजे नाहीच. तो फक्त हीरो आहे आणि त्याची हीरोगिरी प.द.प्र. इथेही पैसा वसूल ! नाही म्हणायला त्याने इस्पितळातल्या एका दृश्यात डोळ्यात पाणी वगैरे आणलं आहे, ती त्याच्या अभिनयाची पराकाष्ठा असावी.
एकूणात, प.द.प्र. हा 'दबंग' थ्रूआउट मनोरंजन न करता अर्ध्यावरच बावचळतो.
सिनेमा पाहन बाहेर आल्यावर मला पहिला दबंग पाहाण्याची अतीव इच्छा झाली, पण बाहेर येईपर्यंत खऱ्या पोलिसांनी माझी बाईक उचलून नेली होती, ती सोडवून आणण्यात इच्छा विरली आणि 'खरे पोलिस' कसे असतात ह्याची जाणीव पाकिटाला जबरदस्त फोडणी बसून झाली !
असो... ह्यात पांडेजीचा काय दोष ?
रेटिंग - * *
http://www.ranjeetparadkar.com/2012/12/movie-review-dabangg-2.html
हेच अपेक्षित होते
हेच अपेक्षित होते
कालच पाहिला.... पुर्ण
कालच पाहिला....
पुर्ण भ्रमनिरास !
गाणीतर एकदम बकवास!
फार अपेक्षा नव्हतीच. दबंग १
फार अपेक्षा नव्हतीच. दबंग १ प्रमाणे हा चित्रपटही टीव्हीवर लागल्यावर बघेन.
"तोरे नैना बडे दगाबाज" हे गाणं चांगलं आहे.
'पहिला दबंग सल्लूपटांतला
'पहिला दबंग सल्लूपटांतला शिरोमणी होता'...+१
दिग्दर्शक अरबाज खान..:हहगलो:
बनियानमध्ये पाल सुरसुरावी तसं
बनियानमध्ये पाल सुरसुरावी तसं वाकडं-तिकडं होऊन हसणं आलं आणि शेवटच्या दृश्यात सल्लूभायच्या शर्टाने लाजणंही आलंच>>> तू खास लिहीतोस
मजा आली वाचून...
छान लिहीले आहे. म्हणूनच जायला
छान लिहीले आहे. म्हणूनच जायला कसेतरी होत होते. गाणी ऐकावीत झालं.
"बायकोचं आणि माझं डोकं काढून ठेवायला' असं पाहिजे ना? मै कन्फ्युजिया गयी.
लोकसत्ताने यापेक्षा चिरफाड
लोकसत्ताने यापेक्षा चिरफाड केलीय.. ! प्रेक्षकांचे मानसिक वय किती मानतात हे लोक ? आणि स्वतःचे किती असते मानसिक वय ?
असाच असणार याची कल्पना होती..
असाच असणार याची कल्पना होती.. बरं झालं नाही गेलो १५०-२०० रु. उडवायला धन्यवाद.
टी. व्ही. वर येईलच महिनाभरात तेव्हां पाहण्याचे कष्ट घेतले जातील..
खरे तर इथे हे लिहायला नको, पण
खरे तर इथे हे लिहायला नको,
पण यातल्या हिडीस गाण्यावर लोकसत्ताने ताशेरे ओढलेत, तरी याचा दृष्य स्वरुपातला मारा देशभर होतच राहणार. करोडो रुपये घेऊन करिना हिडीस नाचली, त्या गाण्यावर खानबंधु करोडो रुपये कमावणार.. पण देशभरातल्या अशिक्षित / बेरोजगार तरुणांना वाटणार, भारतातली प्रत्येक स्त्री, अशीच उपलब्ध आहे.
करावा तितका निषेध कमी आहे, भले त्या गाण्याचे कुणीही कितीही समर्थन करो !
दिनेश, जोरदार अनुमोदन. पण
दिनेश, जोरदार अनुमोदन. पण कलेसाठी कला वगैरे मंडळींना हे पट्त नाही.
हो अश्विनी, कपडे घालून नाचलीय
हो अश्विनी, कपडे घालून नाचलीय ना ? ( हे उपकारच आपल्यावर.) आपलेच मन असंस्कृत. आपल्याच मनात वाईट्ट विचार येतात. नाही का ?
दबंगकडुन हीच अपेक्षा होती आणि
दबंगकडुन हीच अपेक्षा होती आणि ती पुर्ण झाली. मी पहिला पाहिला नव्हताच त्यामुळॅ दुसरा कशाला पाहायचा??
कलेसाठी कला एका दृष्टीकोनातुन मलाही पटते पण भारतातली आम जनता, ज्यांच्यासाठी खास असली गाणी चित्रित होतात, त्यांना ह्याच्यात तीच कला दिसते जी त्यांच्या मनात आहे. मग भले दिग्दर्शकाला केवळ विसंगती दाखवण्यासाठी साऊथ स्टाईलची गाणी दाखवायची असोत किंवा मग बिहारच्या गावातल्या अशाही गोष्टी आहेत म्हणुन वर उल्लेख केलेल्या गाण्याटाईपची गाणी दाखवायची असोत. त्यातली कला केवळ दिग्दर्शकाला आणि मुठभर जाणकार प्रेक्षकांनाच कळते. जनतेला दिसते ते उघडे शरीर आणि त्याला दिलेले आडवेतिडवे हिसके... तसेही मी टिवी फारशी पाहात नाही पण गमछा वगैरे गुंडाळून नाचणा-या लोकांचा ताफा, त्यांच्या मध्यभागी शक्य तितके त्रोटक कपडे घालुन हलणारी सुंदरी शक्य तितका जाडा आवाज काढुन बागडतेय असे दृश्य टिवीवर चॅनेल सर्फ करताना दिसले तर लगेच पुढचे चॅनेल बदलते. किळस वाटते हे सगळॅ बघायला.
पण यातल्या हिडीस गाण्यावर
पण यातल्या हिडीस गाण्यावर लोकसत्ताने ताशेरे ओढलेत, तरी याचा दृष्य स्वरुपातला मारा देशभर होतच राहणार. करोडो रुपये घेऊन करिना हिडीस नाचली, त्या गाण्यावर खानबंधु करोडो रुपये कमावणार.. पण देशभरातल्या अशिक्षित / बेरोजगार तरुणांना वाटणार, भारतातली प्रत्येक स्त्री, अशीच उपलब्ध आहे.
करावा तितका निषेध कमी आहे, भले त्या गाण्याचे कुणीही कितीही समर्थन करो !
<<
Hmm.. गाणं मलाही नाही आवडलं.
गाण्याचं समर्थन नाहीच करणार, करीनाही नाही आवडली, कोरिओग्राफी- चाल काहीच नाही आवडलं.
पण '"अशीच उपलब्ध" शब्दप्रयोग मात्रं खटकला !
अशीच म्हणजे ?
नाचणारी 'तशी' नाचते म्हणून ती 'उपलब्ध' आहे असं का assume करायचं मुळात
बाकी अशिक्षित लोक काय विचार करतील , कसे वागतील हे पुढचं, पण एखादी बाई आयटेम नंबर करते म्हणजे ती अॅव्हेलेबल असते हे निदान सुशिक्षित समाजाने तरी गृहित धरु नये.
असो.. विषयांतरा बद्दल सॉरी.
थोडक्यात
थोडक्यात काय..................
अभिनयाच्या आणि सगळ्याच बाबतीत बोंब आहे..
असे ही सलमान कडुन काहीच अपेक्षीत नसते असे म्हणण्यापेक्षा त्याच्या कडुन काही अपेक्षा ठेवणेच चुक असते..
दीपांजली, अशी गाणी कुठला
दीपांजली,
अशी गाणी कुठला प्रेक्षकगट डोळ्यासमोर ठेवून निर्माण होतात ? आणि त्यावर काय प्रतिसाद अपेक्षित असतो निर्माता दिग्दर्शकाचा ? मी जो प्रेक्षकगट उल्लेखलेला आहे, त्यांच्या मनात असे विचार येणे, हेच अपेक्षित आहे ना ? त्या प्रेक्षकाला करीना आणि रस्त्यावर दिसणारी एखादी तरुणी यांच्यातला भेदभाव कळतो ?
भारतात सुशिक्षित लोक किती टक्क्याने आहेत ? जर मला "सुशिक्षित" गटात धरत असाल तर असल्या गाण्यांकडे मी ढुंकून बघत नाही.
ढुंकून न बघताही ते अश्लील आहे
ढुंकून न बघताही ते अश्लील आहे हे कसे कळते?
ढुंकून न बघताही ते अश्लील आहे
ढुंकून न बघताही ते अश्लील आहे हे कसे कळते?>> मिलियन डॉलर्स क्वेस्चन !!
दिनेशदा, 'अशीच उपलब्ध' हे
दिनेशदा,
'अशीच उपलब्ध' हे तुम्ही लिहिलं म्हणूनच तो शब्द प्रयोग टाळावा असं लिहिलं.
स्त्री आयटेम गर्ल असो किंवा अजुन कोणी, कुथलीच स्त्री उपलब्ध असते हे कोणीच गृहित दरु नये.
बाकी मला नाही वाटत निर्माते आयटेम साँग्ज कोणी एका सामाजालाच टार्गेट करतात.. मुन्नी-शीला-जिलेबीबाई-दम मरो दम-अनारकली डिस्को चली सगळ्याच पार्टीज मधे वाजतात, किती तरी लोक ऐकतात, बघतात... काही आवडीने काही टिका करत !
असो.. विषयांतर फार झालं, हा टॉपिक इथे थांबवते.
त्यांनी कुठे पाहिलेय?
त्यांनी कुठे पाहिलेय? त्यांनी लोकसत्ताने ओढलेले ताशेरे वाचले. मीही हे गाणे पाहिलेले नाही, पण या प्रकारच्या गाण्यात काय काय असते त्याचा अंदाज आहे. हे काही पहिलेच नाही या प्रकारचे गाणे. चॅनेल सर्फिंग करताना दिसते काय दिसायचे ते.
पण रस्त्याने जाता येता फुटपाथच्या बाजुला असलेल्या झोपड्यांमधुन साधारणपणे अशाच प्रकारची गाणी ऐकु येतात. एफेमवर हेवी ट्रॅफिकच्या वेळीस असलीच गाणी सुरू असतात. हल्ली किराणावालाही दुकानात छोटा टिवी ठेऊन असतो, मी जिथे कपडे इस्त्रीला देते त्या दुकानातही कोप-यात एक टिवी चालु असतो. टाईमपास म्हणुन गाण्यांचे चॅनेल चालु असते. आता कोणी मुद्दामहुन शोधुन फक्त असलीच गाणी लावते असे नाही. पण नॉर्मली टिवी लावला की असलेच काहीतरी चालु असते.
पण जाऊदे, या विषयावर उगीच चर्चा कशाला? आपण मायबोलीवर जमणारी मंडळी असली गाणी पाहणार नाही आणि जे पाहतात त्यांना आपण इथे काय बडबड करतोय याच्याशी काही देणेघेणॅ नाही.
आपण मायबोलीवर जमणारी मंडळी
आपण मायबोलीवर जमणारी मंडळी असली गाणी पाहणार नाही <<<
माफ कर साधना यावर माझा विश्वास नाही. अनेक जण असू शकतात आवडीने पाहणारे. ज्याची त्याची आवड म्हणून मी सोडून देईन.
मी ’काय केलंय तरी काय नक्की?’ म्हणून कधीतरी टिव्हीवर लागल्यास पाहीन (माझे पैसे खर्च करून सलमानचे सिनेमे बघू शकत नाही पण त्याचा अश्लीलतेशी काहीही संबंध नाही.) वाचनामधे जसा भेळेच्या पुडीचा कागदही मी वर्ज्य मानत नाही तसेच कुठल्याही प्रकारचे दृकश्राव्य माध्यमातले प्रकरण.
जर तथाकथित अश्लील गाण्यांनी
जर तथाकथित अश्लील गाण्यांनी समाजाला अतिशय भयंकर वळण लागतेय तर मग धो धो देशभक्ती, सदाचार असलेल्या सिनेमांच्या नंतर भ्रष्टाचार गायब झाल्याची लाट का येत नाही?
नीधप, / रसप. मी लोकसत्ताचा
नीधप, / रसप. मी लोकसत्ताचा संदर्भ दिलाय. ( प्लीज जे लिहिलय तेच वाचावे.) इथल्या थिएटरात भारतीय चित्रपट लागत नाहीत. माझ्याकडे इथे टिव्ही नाही, त्यामूळे अर्थातच बघितले नाही आणि अजिबात बघणारही नाही.
असो. या विषयावर आपले यापुर्वीही मतभेद झाले होतेच. माझी मते ठाम आहेत. वादाला वैयक्तीक वळण लागण्यापुर्वीच मी माझ्यातर्फे पूर्णविराम देतोय.
दिपांजली, माझ्यातर्फेही सन्मान्य असहमती.
विद्या बालनला जामच सिरीयसली
विद्या बालनला जामच सिरीयसली घेऊन मनोरंजन-मनोरंजन-मनोरंजन करतो.
तुमची ठाम मते असतील तर
तुमची ठाम मते असतील तर असूदेत. वैयक्तिक वळण तेव्हा येते जेव्हा
’कलेसाठी कला लोकांना हे पटत नाही, त्यांना समजत नाही, अश्या प्रकारच्या गोष्टी बघणारे मानसिक रूग्णच असतील’ अश्या तर्हेचे उल्लेख यायला लागतात.
नीधप, माझ्यातर्फे पूर्णविराम
नीधप, माझ्यातर्फे पूर्णविराम म्हणजे पूर्णविराम !
आणि जिच्या मताचा उल्लेख वर झालाय, ती अश्विनीमामी यापुढे उत्तर देईलच.
आणि तिनेही कुठे मानसिक रुग्ण हा शब्द वापरलेला नाही. परत एकदा तूम्ही असे म्हणालात म्हणजे यापुढे असेच म्हणणार, असले कल्पनाविलास थांबबावेत. प्लीज लिहिलेय तेच वाचावे.
पैसे खर्चून सिनेमा
पैसे खर्चून सिनेमा बघितला...... वेळ खर्चून परीक्षण लिहिलं...... दोन्हीवर कुणी काही बोलत नाही....... सगळा भाव त्या फेविकॉलवाल्या करीनाला?
रसप जी.. . . सिनेमावर काही
रसप जी..
.
.
सिनेमावर काही बोलण्यासारखेच नाही.. कौतुक तर जाउ द्या अहो निंदा सुध्दा करता येत नाही सिनेमा बद्दल
.
सिनेमावर काही बोलण्यासारखेच
सिनेमावर काही बोलण्यासारखेच नाही.. कौतुक तर जाउ द्या अहो निंदा सुध्दा करता येत नाही सिनेमा बद्दल>>>> असं असेल तर भांडाच !!
----------------
अवांतर - तो 'जी' काढला तरी चालेल !
दबंगवर काही वाचावं असं वाटलं
दबंगवर काही वाचावं असं वाटलं नाही, त्यामुळे लेख अन चर्चा नाही वाचली. पण नावच भारी आवडलं मला, खुदकन हसू आलेच
असं असेल तर भांडाच !! >>> ते
असं असेल तर भांडाच !! >>> ते ही केले असते ...पण ........कारण पण सापडत नाही भांडायला
तुम्ही करा सुरुवात...मी आहेच
.
.
ते जी आहे ना त्या कडे लक्ष देउ नका....तो पार्लेजी वाला जी आहे .;)
Pages