"ए विशालकाका, कधी रे येणार ? आता कंटाळा आला बसून बसून..."
पार्थने पुन्हा तो प्रश्न विचारला आणि मी पुन्हा तेच उत्तर दिले.
"पोचलोच रे आपण ..., अजुन फ़क्त अर्धा तास?"
तसे सगळेच खुसखुसायला लागले. बिचारा पार्थसुद्धा नाईलाजाने हसायला लागला. गेले दहा दिवस प्रत्येक वेळी त्याच्या ’कधी येणार पुढचे गाव?" या प्रश्नाला मी एकच उत्तर देत होतो...."अजुन अर्धा तास फ़क्त, आलेच!"
पण आज खरोखर दहा किमीवर येवून पोचले होते आमचे गंतव्य स्थान. त्यामुळे जास्तीत जास्त अर्धातास अजुन. पण दैवाने पार्थची परीक्षा घ्यायचे अजुन सोडले नव्हते बहुदा. आमच्या वाहनचालकाने पार्थवर अजुन एक बाँब टाकला.
साsssर (हे कृपया 'सर' असे वाचावे) , सुचींद्रम, जस्ट टू मिनीट्स डिस्टन्स. यू गो देअर (?) प्रश्नचिन्ह कंसात यासाठी आहे की त्याला विचारायचे होते "डु यू वाँट टू गो देअर?" पण त्याची एकंदरीत केरळाळलेली (?) इंग्रजी त्याला एवढेच सुचवत होती. आणि त्याने हिंदी बोलण्यापेक्षा त्याचे हे इंग्रजी चालवून घेणे आम्हाला जास्त आनंददायी होते. तो मल्याळममधली गाणी गुणगुणत असायचा, आवाजही बरा होता. म्हणून त्याला विचारले की मराठी गाणी कधी ऐकली आहेत का? हाईट म्हणजे या माणसाने एक मराठी गाणेही ऐकलेले होते. आणि त्याने ते आम्हाला म्हणूनही दाखवले. गाणे होते...
"वाट माझी बघतोय रिक्षावाला."
तो जातीवंत ड्रायव्हर आहे या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाले.
तर आम्ही सुचींद्रमला थांबून दर्शन घेवून मगच पुढे जायचा निर्णय घेतला आणि पार्थ अजुन वैतागला.
Driver uncle, how much time will it take here?
वन्ली टू हार्स साsssर ! (हावर्स मधला 'व' त्यानेच खाल्लेला होता, लगेच माझ्याकडे संशयाने बघू नका.) पार्थने माझ्याकडे बघीतले. मी अजुन एक पाचर मारली...
"दोन तासानंतर फक्त अर्धा तास रे !" तसं त्याने बसल्या जागीच मागे डोके टेकवले. तुम्ही लोक या जाऊन मी झोपतो आणि आम्ही सगळे 'सुचींद्रम'मंदीरातील ब्रह्मा विष्णु महेशाचे दर्शन घ्यायला बाहेर पडलो. अत्रि ऋषींची पत्नी अनुसया हिला बालरुपात दर्शन दिल्यानंतर ब्रह्मा, विष्णु आणि महेशांचा या ठिकाणी काही काळ निवास होता. अशी आख्यायिका आहे. संपूर्ण भारतात ब्रह्मा, विष्णु आणि महेशाचे एकत्रित मंदीर फक्त याच ठिकाणी आहे असे म्हटले जाते. तसेच रामायण काळात लंकादहन केल्यानंतर मारुतीरायाने आपली शेपटी इथेच येवून विझवली होती असेही म्हटले जाते. बराच अंधार पडलेला असल्याने तिथे काही फ़ोटो काढता आले नाहीत मला. केवळ कल्पना येण्यासाठी म्हणून आंतरजालावरून ढापलेला एक मंदीराचा फ़ोटो ...
असो सुचींद्रमबद्दल नंतर कधीतरी. सद्ध्या आम्हाला कन्याकुमारीला पोचायची घाई होती. 'सुचींद्रम' क्षेत्राचे दर्शन घेवुन आम्ही कन्याकुमारीला प्रस्थान केले.
इथुन कन्याकुमारी अवघ्या ९-१० किमीवर आहे. त्यानंतर मात्र आमच्या ड्रायव्हरने खरोखर अर्ध्या तासाच्या आत आम्हाला कन्याकुमारीला पोचवले (व्यवस्थीत). रात्रीचे साडे दहा वाजले होते. जेवणे वगैरे आटपेपर्यंत १२ वाजले. (हॉटेलच्या किचनमधील उरला-सुरला भात मनसोक्त (?) खाल्ला आणि बरोबरच्या सात जणांना (मी आणि माझी पत्नी सायली धरून आम्ही आठ मोठी माणसे आणि चार लिंबू-टिंबू असा एकुण परिवार होता बरोबर) विचारले...
"उद्या सुर्योदय पाहायला कोण-कोण येणार आहे? साधारणतः सकाळी सहा वाजताची सुर्योदयाची वेळ असते."
सात पैकी सहा जणांनी ते पहाटे १० वाजता उठणार असल्याचे कबूल केले. लिंबु-टिंबू तर गृहित धरलेले नव्हतेच. शेवटी मी आणि आमच्या बरोबर असलेल्या आबनावे कुटुंबियांपैकी श्रीयुत आबनावे (बाळासाहेब) असे दोघेच फक्त भास्कररावांना भेट द्यायला जाणार असे निश्चीत करून आम्ही आपापल्या रुम्स गाठल्या. पहाटे साडेपाचलाच जाग आली. जाग आली म्हणजे काय, बायकोने अक्षरश: हलवून उठवले.
"उठ, आपल्याला सुर्योदय पाहायला जायचय ना?"
"आपल्याला....?" मला आनंदमिश्रीत आश्चर्याचा धक्का.
"अरे काल रात्री जेवण झाल्यावर इथल्या वेटरला विचारले मी. तेव्हा त्याच्याकडून कळाले की 'पहाटेचा शांत समुद्र आणि सुर्योदय अनुभवण्याची इच्छा असलेल्या पर्यटकांसाठी म्हणून आपल्या हॉटेलची गच्ची रोज पहाटे साडे चार वाजताच उघडली जाते, ."
मी चक्क आदराने वगैरे बघायला लागलो तिच्याकडे, "च्यामारी, माझ्या डोक्यात का आलं नाही हे?"
मी अगदी किनार्यापर्यंत चालत जायची वगैरे तयारी ठेवलेली होती. तर त्यावर 'नंतर जावूच रे आपण तिकडे, पण सद्ध्या फारसा वेळ नाहीये हातात. वर टेरेसवर जाईपर्यंतच पावणे सहा-सहा होतील, चल आटप.'हे तीचे उत्तर तयारच होते.
आम्ही दोघेही गच्चीवर पोचलो. फार नाही पण तरीही १०-१५ लोक हजर होते आधीच. हवेत बर्यापैकी गारवा. नुकतेच क्षितीजेने आपले रंग उधळायला सुरूवात केली होती. त्यामुळे आसमंतात हळुहळू प्रकाश पसरायला सुरूवात झाली होती. तिथे जमलेल्या लोकांमध्ये अगदी हलक्या आवाजात, कुजबुजीच्या स्वरूपात बोलणे सुरू होते. एकमेकाची ओळख करुन घेण्याचा कार्यक्रम चालला होता. (गंमत म्हणजे या केरळ सहलीत प्रत्येक ठिकाणी भेटलेल्या पर्यटकात मराठी आणि गुजराथी लोकांचे प्रमाण जास्त आढळत होते.) इथेही मराठी बोलणार्यांचा भरणा जास्त दिसत होता. पण आपल्या कुटुंबियांशी मराठीत बोलणारी मंडळी, इतरांशी मात्र समोरची व्यक्ती आपल्यासारखीच मराठी आहे हे कळल्यावर देखील हिंदी किंवा इंग्रजीमधून (विशेषतः इंग्रजीतुन) संभाषण करण्याचा प्रयत्न करताना दिसत होती. ते मात्र जरा खटकलेच. मी दोघा-तिघा मराठी भाषिकांशी मराठीत बोलण्याचा प्रयत्नही करुन बघीतला. पण एक साठीच्या घरातले काका (हे ठाण्यावरून आले होते) काका सोडले तर बहुतेक सगळ्यांनीच लगेच इंग्रजी फाडायला सुरुवात केली. मग मी आपला मोहरा गुजराथी आणि इतर लोकांकडे वळवला. इथे मीच मराठीची कास सोडली आणि हिंदी व जमेल तश्या इंग्रजीत त्यांच्याशी बोलायला लागलो. गंमत म्हणजे अहमदाबादहून आलेले वर्गीस कुटुंबीय माझ्याशी मोडक्या-तोडक्या का होइना पण मराठीत बोलले. धक्का असला तरी सुखद धक्का होता तो. मी त्यांच्याशी गप्पा मारायला लागलो. एवढ्यात बायकोने हाताला धरून अक्षरशः खेचतच गच्चीच्या कठड्याकडे ओढून नेले.
"ते बघ....!"
मी स्पेल-बाऊंड झाल्यासारखा बघतच राहीलो. समोर लांबवर, अगदी जिथवर नजर पोहोचेल तिथवर थेट क्षितीजेला चुंबणारा निळाशार समुद्र पसरलेला होता. अर्थात याठिकाणी समुद्राच्या पाण्याचे तीन रंग दिसतात हे नंतर लक्षात आले. याचे कारण असे की इथे हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र असे तीन समुद्र एकत्र येतात. विशेष म्हणजे पाण्याचे तीन वेगवेगळे रंग (निळसर, करडा आणि हिरवा) असे स्पष्टपणे पाहता येतात. अर्थात त्या सकाळच्या वेळी हे सगळे दिसणे अशक्य होते. दिसत होता तो फक्त दुरपर्यंत पसरलेला शांत सिंधू....
आणि त्यात मध्येच एका प्रचंड खडकवजा बेटावर ती वास्तू उभी होती जिच्या दर्शनासाठी आम्ही इथवर धडपडत आलो होतो. अतिशय देखणी अशी ती वास्तू त्या महामानवाच्या तिथल्या वास्तव्याचा अभिमान मिरवीत शांतपणे उभी होती. त्या क्षणी खरेतर मला ती संपूर्ण जागाच एखाद्या शांत, सात्विक आणि नतमस्तक साध्वीसारखी भासायला लागली. तिथे साक्षात स्वामी विवेकानंदांनी तीन दिवस साधना केली होती. धर्म, कर्मकांडे, रुढी , परंपरा असल्या कुठल्याही अवडंबरात न अडकता....
"उत्तिष्ठत: जागृत: प्राप्य वरान्नि बोधत: " (उठा, जागे व्हा आणि इच्छीत ध्येयाची प्राप्ती होइपर्यंत थांबू नका)
असा तेजस्वी कर्मयोगाची साधना - आराधना करण्याचा संदेश देणार्या त्या 'योद्धा संन्याशाच्या' पावन स्पर्शाने पुनीत झालेली ती परम पवित्र भूमी होती.
हे कमी की काय म्हणून बाजूला उभा असलेला थोर केरळी संत आणि कवि थिरुवल्लुवर यांचा भव्य पुतळा आपल्या तोकडेपणाची पुन्हा पुन्हा जाणिव करून देत होत्या. एकाच ठिकाणी इतक्या भव्य गोष्टी सापडण्याचे मला वाटते हे एकमेव उदाहरण असावे.
आजुबाजुला कुजबूज चालु होती. भास्कररावांनी अजुनही दर्शन दिले नव्हते. कोणीतरी सांगत होते या कोस्टसाईडवर सुर्योदय फार कमी वेळा पाहायला मिळतो. तो दिसला तर ते उंबराचे फूल समजुन आनंद मानायचा असतो. वेळ होवून गेली होती, पण भास्करराव अजुनही ढगांच्या अवगुंठनातून बाहेर यायला तयार नव्हते. हा नाही म्हणायला पुर्वा हळुहळू उजळायला लागली होती. क्षितीजावर प्रकाशाची एक नाजूक पट्टी दिसायला सुरूवात झाली. आणि माझ्या उभ्या आयुष्यात प्रथमच ते घडले. माझ्या गळ्यात लटकणार्या कॅमेर्याचा मला जणुकाही विसरच पडला. किंबहुना त्याचा वापर करायची इच्छाच होइना. समोर जे काही अदभूत घडत होते त्यापैकी एक क्षणही गमवायची मनाची तयारी नव्हती. त्या धुसर सागराच्या शेवटच्या टोकाला हळु-हळू एक लालसर शेड यायला सुरूवात झाली होती. कुठून्-कुठून अलगद प्रकाशाचे नाजुकसे धुमारे फुटायला लागले होते. मनात सारखे येत होते की हे दृष्य टिपायला हवे. पण हात कॅमेर्याकडे जायला तयार नव्हते. एक क्षणभर जरी क्षितिजावरून नजर ढळली तर काही गमवावे लागेल की काय अशी भीती वाटत होती. अगदी हळूवारपणे क्षितीजेच्या एका भागातली लाली अचानक वाढायला लागली. लालसर सोनेरी प्रकाशकिरण पाझरायला लागले आणि....
अचानक एका बेसावध क्षणी तो तेजोगोल नजरेत आला. तेजाचा तो लालभडक गोळा, त्याच्याबाजुचे पिवळसर, किंचीत जांभळ्या तर काहीशा लालसर रंगाचेही वलय हळू हळू आपली व्याप्ती वाढवायला लागले. मी ...., आम्ही सगळेच अक्षरशः दिग्मुढ वगैरे म्हणतात तसे होवून तो सोहळा अनुभवत होतो, उपभोगत होतो. आजुबाजूला कॅमेर्याच्या फ्लॅशचा चकचकाट जाणवत होता. पण मला मात्र माझ्या कॅमेर्याला हात घालायची इच्छाच होत नव्हती. अक्षरशः स्पेलबाऊंड झाल्याप्रमाणे मी आणि सायली (माझी पत्नी) ते अदभुत डोळ्यात भरुन घेत होतो. ते म्हणतात ना " देता किती घेशील दो कराने " अशी काहीशी अवस्था झाली होती आणि अचानक भास्कररावांना पुन्हा ढगांनी गराडा घातला. यावेळी मात्र साहेब जे गायब झाले ते परत आलेच नाहीत. पण क्षितीजावर त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा मात्र जाणवत होत्या. त्यानंतर मी भानावर येवून पटापट काही स्नॅप्स मारले. पण ......,
भलेही मी तो सुर्योदय नाही पकडू शकलो माझ्या कॅमेर्यात. पण त्यामुळेच प्रकाशाचा, रंगांचा जो सोहळा आम्ही अनुभवला, आम्हाला अनुभवता आला तो मात्र मनाच्या कॅनव्हासवर कायमचा कोरला गेला आहे.
आम्ही ठरवलय, आता दरवर्षी एकदा का होइना, दोन दिवसांसाठी का होइना पण तिथे जायचच आणि ते सुद्धा फक्त कन्याकुमारीला म्हणूनच जायचं...
पुन्हा एकदा हरवायला...
स्वतःचंच अस्तित्व विसरण्यातली मज्जा उपभोगायला !
तळटिप : खरेतर प्रवास वर्णनाच्या वाट्याला जायचे नाही असे ठाम ठरवलेले आहे, पण हा अनुभव शेअर करण्यापासून स्वतःला रोखू शकलो नाही.
विशाल
जबहराट प्रचि! मस्त वर्णन!
जबहराट प्रचि! मस्त वर्णन!
खरेतर प्रवास वर्णनाच्या
खरेतर प्रवास वर्णनाच्या वाट्याला जायचे नाही असे ठाम ठरवलेले आहे, पण हा अनुभव शेअर करण्यापासून स्वतःला रोखू शकलो नाही. स्मित>>>>> अरे, बरं झालं - तुला हे शब्दात मांडावसं वाटलं - तू इतके अप्रतिम वर्णन केलंस ना की मला ते फोटो पहाण्याचीही इच्छा झाली नाही. (अर्थात जरा वेळाने फोटोही पाह्यलेच रे ).
तुझ्या या शब्दांकनाकरता शंभर गावे इनाम.....
अप्रतिम वर्णन आणि फोटू हा
अप्रतिम वर्णन आणि फोटू हा सोहळा बर्याच वर्षांपूर्वी अनुभवला आहे अगदी किनार्यावर जाऊन तिथे बसून.
परत एक्दा गेलं पाहिजे आता..
मस्त अनुभव !
मस्त अनुभव !
मस्त... एकदा जमवायला पाहिजेच
मस्त... एकदा जमवायला पाहिजेच
विशालजी, छानच ! स्वतःला
विशालजी, छानच !
स्वतःला विसरवायला लावण्याची किमया 'कन्याकुमारी'त आहे, हें नेमकं टिपलंय आपण !
मस्त लिहिलं आहेस. प्रवास
मस्त लिहिलं आहेस.
प्रवास वर्णन
फोटु तरी??
स्वतःला विसरवायला लावण्याची
स्वतःला विसरवायला लावण्याची किमया 'कन्याकुमारी'त आहे, हें नेमकं टिपलंय आपण!>>>> +१००
एकदा जाउन समाधानच होत नाही असे ऐकलं होतं आज या वर्णनाने पुरेपुर पटलं...
कधी योग येतो काय माहीत!
खुप खुप हेवा वाटणारी बाहुली!
सह्हीच!!!!!!!!!!!
सह्हीच!!!!!!!!!!!
मनःपूर्वक आभार मंडळी !
मनःपूर्वक आभार मंडळी !
मस्त अनुभव
मस्त अनुभव
छान लिहीलयस रे... त्यातही
छान लिहीलयस रे... त्यातही खुद्द समाधीशिला तर एक वेगळाच अनुभव देते.. out of this world..
कन्याकुमारी व बाजूचा परिसर नक्कीच मंत्रमुग्ध करणारा आहे.. रामेश्रवरम वगैरेही छान आहे.. फक्त 'पंड्या' लोकांपासून दूर रहावे लागते..
मी स्वतः कन्याकुमारीला जाऊन
मी स्वतः कन्याकुमारीला जाऊन आलो. शब्दांची फेक इतकी अचूक होती की सारे काही त्या जागी प्रत्यक्ष न जाता अनुभवता आलं! आता अर्थात जेव्हा प्रत्यक्ष जाईन तेव्हा तुमच्या ह्या लेखाची नक्कीच आठवण होईल!
फारच छान शब्दांकन! अनुभव
फारच छान शब्दांकन! अनुभव असल्यामुळे प्रत्येक शब्द मस्त भिडला. त्सुनामीच्या केवळ एकच दिवस आगोदर आम्ही कन्याकुमारीला होतो. त्या परीसरात उडलेला हाहा:कार टिव्हीवर बघून थरकाप उडाला होता.
खरोखर तो एक अपुर्व अनुभव होता
खरोखर तो एक अपुर्व अनुभव होता माझ्यसाठी. मनःपूर्वक आभार मंडळी
खूप सुंदर फोटो जे कॅमेर्यात
खूप सुंदर फोटो
जे कॅमेर्यात टिपायला तुम्ही मिसलात त्यात नुकसान आमचे झाले राव
देशाच्या या भागात कधीतरी जाणे होईलच हे नक्की