प्रिय बाबा,
हे संबोधन असंच आहे, नाही?
गेले अनेक अनेक वर्ष!!
आधीही कित्येकदा पत्र लिहीली आहेत तुम्हांला... कधीच 'तीर्थरूप' बाबांस असा उल्लेख नव्हता, नाही! प्रिय हाच उल्लेख.. मनातली जवळीक शब्दांत आणि हृदयातला आदर डोळ्यांत असंच आपल्या दोघांतलं गणित!
तुम्हांला पत्र लिहीण्यासारखा माझा आवडीचा छंद नव्हताच कधी... पण काळ सार्या सवयी बदलवतो, नाही बाबा?
आपल्या आवडी निवडी, आपले छंद सार्यांवर "प्रायोरिटी" नावाचा शब्द अगदी कुरघोडी करतो... 'मग मी "अमूक तमूक" फार आवडीने करत असे' असे वाक्प्रयोग उरतात!
आज-काल असं कधी पत्र लिहायला म्हणून बसते, अनेकदा तुमच्याशी मनातल्या मनात केलेलं हितगूज इथे कागदावर उतरवावं ह्या विचाराने पेन कागदाच्या पहिल्या ओळीला टेकवूनही ठेवते, पण काय... सूचत काहीच नाही... छान हवा यावी म्हणून खिडकी उघडावी अन बाहेरचं घोंघवतं वादळ अंगावर घ्यावं अशी सून्न अवस्था उरते ..मनाची ही खिडकी, आतलं वादळ, अन बाहेरचं सून्न पेन... सगळंच आवरून ठेवून द्यावं मग...
आज मात्र पुन्हा काहीतरी बोलावंस वाटलं... आणि ठरवलंय, जे जसं, ज्या ओघानं सुचेल, ते तसंच मांडायचं! त्यातलं सगळं तुम्हाला कळणार आहे, ही खात्रीच आहे, किंबहुना त्यात न आलेलंही तुम्ही समजून घ्याल हे जाणतेच!
कसे आहात?
लाख लाख वेळा फोन वर बोलणं होतं.. पण काळजातली काळजी थेट तुमच्यापर्यंत पोहोचते का, असं वाटून जातं.. त्या बोलण्यात बरेचदा औपचारिकपणा वाटतो.. असं पत्रातून कसं.. फक्त तुमची माझी भाषा असते.. दोघांची, दोघांतली!
बाबा,
वय वाढलं की नाती बदलतात का हो? की इतकी परिपक्व होऊन जातात की संभाषणाचा शिडकावा लागतच नाही?
मला सांगा ना, लग्न होऊन गेले तशी कितीशी राहिलेय जवळ तुमच्या? माझं घरात असणं तुम्हाला किती सुखावून जातं हे माहिती असूनही संसार नावाच्या व्यापात खूप गोष्टी निसटतात, हे मान्य करावच लागतं, अर्थात बाबा, ही तक्रार नाही बरं, फक्त जे फार आतून वाटतंय ते सांगतेय..
बाबा,
मी जगतेय... खूप काही शिकतेय, उघड्या डोळ्यांनी सारं समजून घेण्याचा, जमेल तसं स्वतःला परिस्थितीचा भाग बनवून घेतेय...पण सांगू, वीट येतो कित्येकदा, सगळ्याचाच... म्हणजे समाज, लग्न वगैरेचा नाही... तर आखलेल्या जगण्याचा... मग स्वच्छंदी जीवन हवंय का, तर ते ही नाही...मग हवं तरी काय... हवंय "जगणं" मूलभूत प्रकारचं जगणं! एक माणूस म्हणून... उगाच जड जड व्याख्यांनी भरलेलं नको... एका वयानंतर आपलं बरं वाईट जोखण्याची, माणूस ओळखण्याची अक्कल आपसूकच येते नाही...? मग त्या अकलेवर भरवसा टाकून असलेलं जगणं...
जगताना जीवनाची सूत्र समजत जातात, हो ना बाबा...? ही सूत्र पाठ करावी लागतच नाहीत... अनुभवांनी ल़क्षात रहात जातात...
बाबा,
कधी कधी असमाधान इतकं भयंकर व्यापून राहतं ना... सांजावलेल्या ढगांवर उतरणार्या काळीमे सारखं.. असं व्हायला नकोय, हे नीट समजतं, पण उमज? अहं.... कुठे असते कुणास ठाऊक!!!! मग अकारण मनाचा त्रागा होतो, आपल्या अशा वागण्याने ह्याला- त्याला- तिला त्रास होऊ शकतो वगैरे विचार करूच नये असं वाटतं...
कारण, वाटतं की
असमाधान पुरेपूर दाटलंय ना... दाटू देत की!! हे ही जगून घेऊ.... अशा वेळी शांत बसून राहू.. कुठल्याच चौकश्यांचा ताफा नको...
मला सांगा,
असं मुलभूत जगणं नसूच शकतं का... "आता जे वाटतंय, ते मला वाटतंय, ते तसंच मला जगून घ्यायचंय".. ह्याला आत्मकेंद्रीपणाच्या व्याखेत मोडावं लागतंच, नाही?
अशा कुठल्याश्या झोक्यावर झुलणं सुरू असतं!
बाबा,
कुठल्याही कर्तव्यात कसूर न करणं, हा माझा स्थायी स्वभाव, तुमच्या स्वभावाला पाहूनच आत्मसात केलेला असावा बहुतेक, त्यामुळे संसाराची घडी होती तशीच नेटकी आहे आणि राहू शकेलच असं वाटतं... ह्या गोष्टीबद्दल तुम्ही कायमच निर्धास्त रहा.
एक आठवतं?
"तुम्ही माझ्यासाठी आजवर इतकं केलंत... अनेक खस्ता...." हे सगळं मी कधीही बोलून नात्याला लहान करायचं नाही, असं एकदा कटाक्षाने सांगितलं होतंत ते? कित्येकदा मनात आलेलं हे सगळं परत फिरवते... खूप काही जाणवलेलं असतं.. तुमचं "देणं" तुम्ही दिलेली ठेव सार्यांबद्दल बोलायचं असतं... पण अलिखित करार मोडू तरी कसा?
हे पत्र वाचताना, प्रत्येक ओळीनिशी तुमच्या मनात जे काही सुरू असेल ते मला जाणवतंय.. आत्ता हे वाक्य वाचूनही हलकंच हसला असाल....
आणि हो, बाबा- मी शा़ळेत असताना, तुम्ही कधी शाळेत आलात किंवा आपण कधी बाहेर फिरताना तुमची ओळख "माझे बाबा" करून देण्यात फार- फार अप्रूप वाटायचं, तेच अप्रूप आजही कायम आहे ... तुम्हाला माझे बाबा म्हणून ओळख करून देताना तुम्ही बाहेर किती मोठ्या पोस्ट वर कार्यरत आहात, ह्याबाबतीत मला काहीही देण-घेणं नसायचं, पण एका लेकीला समर्थपणे समजून घेणारा पिता, इतकीच चमक डोळ्यांत असायची!!.. "मी, माझं" ह्या शब्दांतला इथे जाणवणारा लोभस अधिकार हवाहवासा आहे...
बाबा,
फार दगदगीची, फिरतीची नोकरी आहे तुमची... दूरूनच "काळजी घ्या" म्हणणं किती सोपं असतं ना, दोन शब्दांचा उच्चार!
परतून पुन्हा तुमच्याबरोबर काही दिवस घालवता येतील का हो? आधीच्या आपल्या गप्पा, म्हणजे माझे भारंभार प्रश्न आणि जगणं समजून घेण्याची धडपड अशाच असायच्या... आता वेगळ्या असतील.. कदाचित फक्त काही हूंकारांमधेच जे सांगायचंय ते उमजेल... पण "सोबतीची" मजा वेगळीच... आवडत्या व्यक्तींच्या वलयात वावरणं खरंच सुखावह....
प़क्षी उडून जातात, घरट्यात पिलांचे आई बाबा मान उंचावून पहात रहातात, असं चित्र काढलं होतं कधीतरी... ते मनात घर करून आहे... त्या चित्रासाठीच बहुधा.. बरेदा परतून यावं वाटतं... कायमसाठी नसलं तरी थकलेल्या मनांना, शरिराला फुंकर मारण्यासाठी काही भरपूर काळ "सोबत" राहण्यासाठी.. स्वार्थी म्हणालात तरी चालेल.. पण खूप प्रामाणिकपणे वाटतं हे सारं!!
बाबा,
आज खूप जवळ बसून, हात हातात घेऊन गप्पा मारल्यासारखं वाटलं..
मी मांडलेल्या विचारांवर फार विचार करून त्रास करून घेऊ नकात... मी माझ्या प्रिय व्यक्तीजवळ बोलत बसले होते... बोलतच बसले होते!
चला, बाबा, येते!
कामं पडलीत....
पत्रोत्तर द्याल ना?
तुमचीच.
माझ्या ब्लॉगवर मीच सुरू
माझ्या ब्लॉगवर मीच सुरू केलेल्या, "कुछ पन्ने" सदरातील एक पान...प्रिय बाबा!
ब्लॉगवर पूर्वप्रकाशित: वेणूसाहित्य http://venusahitya.blogspot.com/
रुमाल
रुमाल
(No subject)
बागेश्री जबर्दस्त लिहिलं
बागेश्री
जबर्दस्त लिहिलं आहे.
असं वाटतय माझ्याचं बाबांबद्द्ल लिहिलयं आणि आज नेमका त्यांचा वाढदिवस आहे.
त्यांना माझ्यावतीने वाचायला द्यावसं वाटतयं!
रिया म्हणते तसं खरचं 'रुमाल'!
माधवी, नक्की द्या "पोहोचतंय"
माधवी, नक्की द्या "पोहोचतंय" असं वाटत असेल तर
अनेक लेकींचं मनोगत असावं ते
छान लिहिले आहे.....ओळ न ओळ
छान लिहिले आहे.....ओळ न ओळ भिडली मनाला
अनेक लेकींचं मनोगत असावं ते
अनेक लेकींचं मनोगत असावं ते >> खरयं!
धन्यवाद
मनाला भिडलं !
मनाला भिडलं !
बागेश्री, खुप छान लिहिलस.
बागेश्री, खुप छान लिहिलस. अगदी माझ्या बाबांना मी लिहिलय असं वाटलं. डोळे पाणावले ग
छान आहे... हे असेच बदलून मी
छान आहे... हे असेच बदलून मी आईकरिता देखील ईम्याजीन करु शकतो.
ह्याला नाव कुछ पन्ने असे हिंदी का आहे बागेश्री?
सुंदर झालायं पत्र...खुप दिवस
सुंदर झालायं पत्र...खुप दिवस झाले मलाही बाबांना पत्र लिहायचं होतं ..नेमकं तेच आहे तुझ्या पत्रात
हेच देवु का पाठवुन ?
डोळ्यात पाणी उभं राहीलं.
डोळ्यात पाणी उभं राहीलं. पुढची अक्षरं दिसेनाशी झाली......
सुरेख!
सुरेख!
वाटतं की असमाधान पुरेपूर
वाटतं की
असमाधान पुरेपूर दाटलंय ना... दाटू देत की!! हे ही जगून घेऊ.... अशा वेळी शांत बसून राहू.. कुठल्याच चौकश्यांचा ताफा नको...
मला सांगा,
असं मुलभूत जगणं नसूच शकतं का... "आता जे वाटतंय, ते मला वाटतंय, ते तसंच मला जगून घ्यायचंय".. <<<
उत्तम.
या चार पाच वाक्यांबाबत उद्या विस्तृत लिहावेसे वाटत आहे. वेळ मिळालाच तर आज रात्री. या वाक्यांमध्ये दोन खास मुद्दे मिळाले. पहिल्या मुद्यावर काही वेळा विचार केला होता, पण विशेष फोकस केले नाही. तो आज चांगल्या पत्राचा एक भाग म्हणून समोर आला.
बागेश्री, खूप छान लिहिलयस
बागेश्री, खूप छान लिहिलयस अगदी नेहमी प्रमाणे
बाबांची आठवण आली आणि नेहमीचा फोन, मेल सोडून त्यांना एक मस्त पत्र लिहाव वाटतय ......
सेन्टी एक्दम.छानच
सेन्टी एक्दम.छानच
आभारी आहे सार्यांची..
आभारी आहे सार्यांची.. जवळच्या व्यक्तीशी पत्रातून संवाद साधण्यात किती आनंद असतो ना.. आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे सारं फार मागे पडलंय पण!
रोहन.. तसं कारण काही नाही पण कुछ पन्ने हे शब्द मला आवडतात फार.. नॉस्टलजीक वाटतात ...
बेफी.. वाचायला आवडेल..
बागुडे... हलवून
बागुडे... हलवून सोडलंस!!!!!
अतिशय मनातलं..
छान लिहिलं आहेस!
छान लिहिलं आहेस! प्रत्येकीच्या मनातलं!
बागु मस्तच. बाबा नाहीतच...
बागु मस्तच. बाबा नाहीतच... जगातही आणि मनातही... पण तरी लेकीच्या भावना पुरेपुर पोचल्या....
१०० % बागु स्टाईल.....
बागेश्री, छान लिहिलस.
बागेश्री, छान लिहिलस. प्रत्येक मुलीच प्रतिनिधीत्वच केलस.
छान लिहलंय.. आवडलं!
छान लिहलंय.. आवडलं!
ओळ न ओळ भिडली मनाला... छान
ओळ न ओळ भिडली मनाला... छान लिहलंय.. आवडलं!
खूप सुंदर बागेश्री! तरल,
खूप सुंदर बागेश्री!
तरल, हळूवार आणि जीवलग नात्यांबद्दल शब्दात पुन्हा एकदा खूप छान मांडलं आहेस!
मुलीची बाबांशी घट्ट अॅटॅचमेंट असतेच, ती कागदावर उतरवणं तुला खूप छान जमलंय... अगदी थेट पोचलं आहे हे..
काही काही वाक्यांमध्ये अगदी खास बागेश्री टच आलाय.
<<< छान हवा यावी म्हणून खिडकी उघडावी अन बाहेरचं घोंघवतं वादळ अंगावर घ्यावं अशी सून्न अवस्था उरते ..मनाची ही खिडकी, आतलं वादळ, अन बाहेरचं सून्न पेन... सगळंच आवरून ठेवून द्यावं मग...
वय वाढलं की नाती बदलतात का हो? की इतकी परिपक्व होऊन जातात की संभाषणाचा शिडकावा लागतच नाही?
कधी कधी असमाधान इतकं भयंकर व्यापून राहतं ना... सांजावलेल्या ढगांवर उतरणार्या काळीमे सारखं..
>>>
मागचा पुढचा संदर्भ नसतानाही वाचली तरी ही (ही म्हणजे काही ठराविक) वाक्ये बागेश्रीची असतील असा नियमीत वाचक आता अंदाज लावू शकतील..
आज खूप जवळ बसून, हात हातात घेऊन गप्पा मारल्यासारखं वाटलं..
>>> आणि मला एका बाबाच्या लेकीने बाबाबद्दल अगदी समोर बसून सांगितल्यासारखं वाटलं
'कुछ पन्ने' या संकल्पनेमध्ये बाबांबद्दल लिहिणे हे ही आवडले...
धन्यवाद!
मी प्रतिक्रियेसाठी रुमाल
मी प्रतिक्रियेसाठी रुमाल टाकला होता पण नाही जमतेय ते सगळं शब्दात मांडणं
सध्या एवढंच... जियो! लिहित रहा.. तुझ्यासारखं लिखाण खुप कमी जणांना जमतं
खुप छान आणी अगदी आतुन
खुप छान आणी अगदी आतुन लिहलंय.. मी पण देऊ का पप्पांना माझ्या??
प्रत्येकाची खूप आभारी आहे
प्रत्येकाची खूप आभारी आहे दोस्तहो!
मी पण देऊ का पप्पांना माझ्या??
>> अगदीच द्या सख्यांनो... शोभा म्हणतेय तसं नकळत प्रतिनिधीत्व होऊन प्रत्येकीला जर तिच्याच मनातलं वाटलं आहे, तर मला खरंच छान वाटतय...
आणि मला एका बाबाच्या लेकीने बाबाबद्दल अगदी समोर बसून सांगितल्यासारखं वाटलं >> ही कमंट प्रचंडच आवडली तुझी, नचिकेत!
'कुछ पन्ने' या संकल्पनेमध्ये बाबांबद्दल लिहिणे हे ही आवडले...>> खूप सारे धन्यवाद
विनायक, निवडाक १० साठी आभारी आहे!
दोस्तहो, लोभ असावा असंच म्हणते
सह्ही लिहलेय!!!!!!!!
सह्ही लिहलेय!!!!!!!! बागेश्री...
दोन खास मुद्यांपैकी हा पहिला
दोन खास मुद्यांपैकी हा पहिला मुद्दा. हा माझ्या मनात दोनतीनवेळा आला होता. अधिक फोकस केला नाही. पण या पत्राचा एक भाग म्हणून पुन्हा तो समोर आला:
>>>असमाधान पुरेपूर दाटलंय ना... दाटू देत की!! हे ही जगून घेऊ.... अशा वेळी शांत बसून राहू.<<<
एखादी नकारात्मक जाणीव / भावना हाही आयुष्याचा भाग आहे. मन प्रयत्न करते ती भावना लवकरात लवकर झटकायचा. पण ती भावना अनुभवून व तिला आपले मन व्यापून देऊन तिचा निचरा केल्यास मन अधिक ताजेतवाने होत असेल का? त्या भावनेवर रेंगाळले आणि तिला न झटकता तिच्यावर प्रेम केले तर आयुष्य अधिक सुंदर होईल का? होईल असे मला नेहमी वाटायचे. या विचाराला समांतर विचार वरील विधानात मिळाल्याने अधिक आनंद झाला. आपल्याला कायम सुख, आनंद, समाधान हेच का हवे असते? असली एखादी मानसिक किंवा शारिरीक वेदना अथवा व्याधी, तर काय बिघडले? ती काही शाश्वत असतेच अश्यातला भाग नाही. तीही जगावी, अनुभवावी. असे आपले वाटायचे मनात सारखे. त्यात एक तळ न सापडेल इतकी खोल शांतता जाणवत असावी असेही वाटते. तेही एक ध्यानच असावे.
दुसरा मुद्दा:
>>>असं मुलभूत जगणं नसूच शकतं का... "आता जे वाटतंय, ते मला वाटतंय, ते तसंच मला जगून घ्यायचंय".. <<<
या विधानात त्या जगण्याला, त्या विचाराला 'मूलभूत' हे विशेषण लावणे नीटसे पटले नाही. मूलभूत या शब्दाचा अर्थ 'एखाद्या गोष्टीच्या मुळाशी असणे' असा वाटतो. (काहीसे 'कारणीभूत' असण्यासारखे). 'जे वाटतंय ते तसंच मला जगून घ्यायचंय' हे जगण्याच्या मुळाशी असणे पटत नाही. त्याजागी ओरिजिनल या अर्थाने 'मूळ' असे विशेषण अधिक पटले असते व तेही 'जगण्याला' नव्हे तर मनोवस्थेला. म्हणजे, 'अश्या मूळ मनोवस्थेत जगणे नसूच शकते का'! हे शब्दांचा कीस पाडणे असे कोणाला वाटल्यास सांगता येत नाही, पण शब्दांचा चपखलपणाही काही जण वाचत असतात हे लेखकाने पाहायला हवे असे आपले वाटले.
चु भु द्या घ्या
शुभेच्छा!
-'बेफिकीर'!
छान लिहीलेय , आवडले !
छान लिहीलेय , आवडले !
Pages