जपानी (日本語) शिकताना - 3

Submitted by kanksha on 14 December, 2012 - 01:18

जपानी (日本語) शिकताना - १
जपानी (日本語) शिकताना - २

हिसाशीबुरी दा ना (खूप दिवस झालेत ना आपण भेटून ..). आजच्या भागात एका भाषेत विचार करून दुसऱ्या भाषेत बोलायला गेलं की कशा गमती होतात ते बघूयात .

याचं अगदी क्लासिक उदाहरण आमच्या भावना सेन्सेई नेहमी सांगतात. एकदा एका मुलाला "काल क्लासला का आला नाहीस? " असं विचारल्यावर "मे गा किमाशीता (शब्दश: भाषांतर: डोळे आले होते.)" असं उत्तर मिळालं . आता सेन्सेई पण मराठीत विचार करू शकत होत्या म्हणून ठीक. पण एखाद्या जपान्यानी हे उत्तर ऐकलं कि तो बिचारा सॉलिड गोंधळणार हे काय प्रकरण आहे म्हणून....

आणखी एक उदाहरण त्यांनीच सांगितलेलं... एकदा जपानमधल्या एका कंपनीत मीटिंग सुरु होती. मीटिंग बरीच लांबल्याने थोडा ब्रेक घ्यावा असं ठरलं. भारतीय मंडळी कंपनीच्या कॅन्टीनमध्ये बसून पुढचा अजेंडा ठरवत होती. तितक्यात एका जपानी माणसाचा फोने आला. ही सारी कॅन्टीन मध्येच आहेत हे कळल्यावर तो जपानी माणूस म्हणाला, "We will also go". हे ऐकून भारतीय माणूस वैतागला. आपण ह्यांना उशीर होऊ नये म्हणून बाहेर न जाता कॅन्टीनमध्येच जेवतोय आणि आता हे कुठे निघालेत..शेवटी जेव्हा दुभाष्या मध्ये पडला तेव्हा कळलं की तो जपानी माणूस प्रत्यक्षात "आम्ही कॅन्टीनमध्ये येतोय", असंच सांगत होता. पण जपानीत आपली आहे ती जागा सोडणं म्हणजे "जाणं " असल्यामुळे त्यांनी शब्दश: भाषांतर करून "We will come" च्या ऐवजी "We will go", असा शब्दप्रयोग केला. सुदैवानं, दुभाष्याला हे बारकावे माहित होते म्हणून ठीक...

कालही वर्गात अशीच मजा झाली. एखाद्या गोष्टीचं कारण कसं सांगायचं तो वाक्याचा प्रकार आम्ही शिकत होतो. उदाहरणादाखल प्रत्येकानी एकेक वाक्य बनवा असं सेन्सेईनी सांगितलं . माझ्या एका मैत्रिणीनी "काल लग्नाला गेल्यामुळे मी क्लासला आले नव्हते" असं वाक्य बनवायचं ठरवलं. आता मराठीत स्वत:चं असो की दुसऱ्याचं, लग्न ते लग्नच. पण जपानीत लग्न समारंभाला वेगळा शब्द आहे. त्यामुळे "काल मी लग्नाला गेले होते" याचं शब्दश: भाषांतर केलं की "काल माझं लग्न होतं", असा अर्थ निघतो. साहजिकच तिचं वाक्य ऐकताना हा फरक माहित असणाऱ्यांची हसून पुरेवाट झाली.

परवा असाच एक घोळ मी पण केला. "जिंको" म्हणजे Population, असंच लक्षात असल्यामुळे bacteria ची जिंको असा शब्दप्रयोग मी वापरला. आता खरं तर जिंको म्हणजे लोकसंख्या. त्यामुळे मी नक्की bacteriaच्या संख्येबद्दल बोलतीये की माणसांच्या हे न कळल्यामुळे समोरची जपानी मुलगी पूर्णच गोंधळली आणि मला हा प्रकार कळलाच नाही. नंतर एका मैत्रिणीने जिंकोतला जीन म्हणजे माणूस हे लक्षात आणून दिल्यावर माझी ट्यूब पेटली. शब्द वापरण्यापूर्वी कांजी डोळ्यापुढे आणणं सेन्सेईना का गरजेचं वाटतं ते मला पहिल्यांदा इतक्या प्रकर्षाने जाणवलं.

असंच आणखी एकदा आम्ही काही वाक्य बनवत होतो. माझ्या मैत्रिणीनी "जखम झाली की रक्त येतं" असं वाक्य बनवलं. नेहमीप्रमाणेच वाक्य आधी मराठीत बनवून नंतर जपानीत भाषांतर केलं आणि मग झाली कीपरत गडबड. जपानीत आतून बाहेर यायला वेगळा शब्द आहे. आणि तो न वापरल्यामुळे रक्त असं समोरून पळत पळत भेटायला येतंय असं दृश्य डोळ्यापुढे आलं आणि आम्ही पोट धरून हसायला लागलो.

पूर्वी एका लेखात मराठी पुस्तकं इंग्रजीत भाषांतरित करताना "जेवायला पाने घेतली", "लोक तमाशा बघत होते" अशा वाक्प्रचारांचे भाषांतर करताना विशेष काळजी घ्यावी लागते हे वाचला होतं . आता दिवसेंदिवस त्याचा प्रत्यय यायला लागलाय...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोनीचिवा, हाजीमेमाश्ते वाताशिवा हरिहरसान देस. निहोन्गोवा ताइहेन ओमोशिरोई देस ने ?
दहा वर्षापूर्वी निहोन्गोच्या नी परीक्षा दिलेल्या होत्या. तेंव्हाचे थोडे थोडे आठविण्यास सुरुवात झालेली आहे. (.........इचि, नी, सॅन, शी, योन्‌, गो, रोकू, शिची, नाना, ह्ची? ,कु, जु, क्यु.......... अयोग्य असेल तेथे सुधारणा करावी)

जपानी भाषेतील मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे त्यांनी परभाषेतील शब्दांसाठी "काताकाना" ही स्वतंत्र लिपी विकसित केलेली आहे. त्यामुळे जपानीभाषेत परभाषीय शब्द आपल्या मराठीसारखे बेमालूमपणे मिसळू शकत नाही. आता हेच पाहा ना "बेमालूम" हा अरबी शब्द माझ्याकडून किती नकळतपणे वापरला गेला. तसे जपानीमध्ये नाही. तेथे अगदी पहिल्यापासून हे शब्द परभाषेतील आहेत याची जाणीव करून दिली जाते.

हा धागा काढल्याबद्दल धन्यवाद. वेळोवेळी क्लासमध्ये उपस्थित राहात जाईन.

सॅम, कटकटीचा मामला आहे खरा. पण मँडरीनपेक्षा वगैरे सोपी वाटते मला. हिरागाना, काताकानाने काम सोप्पं केलंय.

धमाल लिहिलंय. आवडलं.

बाय द वे, चिनी, जपानी आणि (क्वचित) कोरियन चित्रलीपितला (एकच) शब्द वेगवेगळा उच्चारायचे. जसा J चा इंग्रजी आणि स्पॅनिश उच्चार वेगवेगळा, तसा काही प्रकार असतो का या लीपीत?

माझ्या माहिती, आठवणीप्रमाणे नाहीये. पुन्हा एकदा मेंदुला ताण देऊन बघते.
तुला कोणता शब्द ऐकल्यासारखा वाटतोय का?
बायदवे jose लिहून होजे म्हणण्याचं उदाहरण दिलं आहेस ना? jalapeno/हालापिनो वगैरे

सर्वांना मनापासून धन्यवाद! Happy

सॅम: चिकाटी लागते तशी पण एकुणात मजेशीर मामला आहे.

हरिहरसान : मस्तय स्मरणशक्ती. फक्त स्वत:ला 'सान' म्हणून आपला आपणच आदर दिल्यासारखा वाटतो. ;). बाकी काताकानावाला मुद्दा एकदम पटला.

सायो: खरंय तुमचं. हिरागाना, काताकाना मुळे गोष्टी जरा सोप्या झाल्यायेत खऱ्या.

मृण्मयी: चित्रलिपीतल्या बऱ्याच अक्षरांचे उच्चार त्या त्या शब्दानुसार एकापेक्षा जास्त प्रकारे केले जातात.
昨日: हा शब्द म्हणजे आपला मराठीतला 'काल'. साध्या वाक्यात त्याचा उच्चार 'किनोउ' असा करायचा तर औपचारिक ठिकाणी 'साकुजीत्सू'.

एकाच बैठकीत तुमचे तिन्ही भाग वाचले! सही आहे हे! पण जपानी शिकायला सहनशक्तीचा कस लागत असेल ना? माझ्या कॉलेज मध्ये होती ही भाषा, पण तेव्हा नाही जमले.

पुढच्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा!

मस्त लिहिलेत तीन्ही भाग.
आमच्या एका सिनीयरच्या भाषणात, त्याने जपानीच्या काही भाषिक वैशिष्ट्यांचा विनोदी रीतीने उल्लेख केला होता.
कुणीच आलं नाहिये (दारे मो किते इनाइ) असं म्हणण्याऐवजी, नानी मो किते इनाइ (मी काहीही वस्त्र परिधान केलं नाहिये)... हे आणि असे बरेच विनोदी वाक्प्रयोग त्या भाषणात होते...
तुमच्या लेखामुळे एकूणच जपानी शिकायला सुरुवात केली तेव्हाचे दिवस आठवले.
अगदी सुरुवातीला... मराठी शब्दांनाच शेवटी 'मास' लावून... कोनो सिग्नल दे वळीमास... वगैरे अशी वाक्ये आम्ही करायचो...तेही आठवलं...
इमा नान्साई देस का? => चीइसाई देस Happy वगैरे असले विनोदही आठवले...जाम नॉस्टॅल्जिक केलं ह्या लेखांनी...

निहोन्गो नो बेन्क्यो.... गान्बात्ते कुदासाइ ने !!

will go ची भानगड इथे कोरियातही आहेच. आधी मला जरा विचित्र वाटायचं, पण आता सवय करुन घेतली आहे.

खरं तर या भाषा ज्यांचं व्याकरण मराठीसारखं चालतं (SOV) त्या मराठीतुन शिकणे सोपे असावे असं वाटतं. आधी इंग्रजीतुन शिकताना प्रचंड त्रास झाला होता. आता सोपं वाटते.

धन्यवाद झरबेरा, चैतन्य दीक्षित, विजय देशमुख.

झरबेरा - चिकाटी लागते, पण तितकीच मजाही येते. त्यामुळे उत्साह टिकून आहे. Happy

चैतन्य दीक्षित - चैतन्यसान, अशा गमती-जमतींवर एक पोस्टच लिहा की मग. मजा येईल वाचायला.

विजय देशमुख - अगदी खरंय. जपानीतून मराठीत येणं बरंच सोपं पडतं इंग्लिशपेक्षा.