वार शनीवार. वेळ सायंकाळचे साडेसात. फोनची घंटा खणाणली आणि आम्हा
दोघांच्याही- मी आणि माझी पत्नी- चेहर्यावर एकदम खुशीचे भाव उमटले. सौ. लगबगीने फोनजवळ गेली. अकेरिकेहून मुलीचा फोन होता. त्या काळी मोबाईल जास्त प्रचलीत नव्हते. सोफ्यावर बसून ती मुलीशी बोलत होती. फोनवर मायलेकीच्या प्रशस्त गप्पा चालू होत्या. वीकएंडला काय केले? नातीचं कसं काय चालू आहे? आमका आमका पदार्थ कसा बनवायचा वगैरे वगैरे. आशा गप्पा पाऊण तास ते एक तास चालायच्या. मी तिच्या जवळ बसून गप्पा शांतपणे ऐकत किंवा ऐकण्याचा प्रयत्न करत होतो. शेवटचे दोन तीन मिनिटे माझा नंबर लागायचा. बाबा म्हणजे प्रकृती कशी आहे? प्रकृतीला जपत जा आणि पैशाची काळजी करू नका एवढ्या पुरतेच! मी तरूण असताना फोन नव्हते. पत्र लिहायचा प्रघात होता. आज मला चांगलं आठवतय की मी आईलाच पत्र लिहित असे आणि अगदी शेवटी बाबांना साष्टांग नमस्कार एव्ढाच काय तो त्यांचा उल्लेख असायचा. फरक एवढाच की आमच्या वेळी जे लेखी होतं ते आता फोनवर तोंडी झालं आहे. रविवारी मुलगा आणि सूनबाई फोन करत असत. नातं जरी वेगळं असलं तरी संभाषणाचा आकृतीबंध तोच. फोनवरील संभाषण संपलं की पुन्हा भयाण एकटेपण, खिन्नता, खायला येणारं प्रशस्त घर.
हा प्रकार गेली पंधरा वर्षे आमच्या आयुष्यात चालू आहे. पहिले चार पाच वर्षे मुले परदेशी गेल्यानंतर नोकरीच्या कामात मी खूप व्यस्त होतो. पत्नी पण बर्या पैकी तिने निर्माण केलेल्या मैत्रिणिच्या समूहात व्यस्त असायची. जसा निवृत्त झालो तसा एकटेपणाच्या आणि रिकामपणाच्या झळा जास्तच जाणऊ लागल्या.
मुलं आलटून पालटून दोन वर्षातून एकदा यायची, तीन आठवड्यासाठी. या तीन आठवड्यात थोडे दिवस सूनबाईच्या माहेरी किंवा मुलीच्या सासरसाठी असत. पण हे दिवस म्हणजे आमच्या जीवनातील सुवर्ण काळ ! या काळात खर्या अर्थाने आम्ही दिवाळी साजरी करत असू. घरात गर्दी, नातवंडांचा गोंध्ळ, घरातला अस्ताव्य्स्तपणा, पण सगळं कसं आम्हा दोघांनाही आवडायचं. हिची तर खूप गडबड असायची. कोणाला काय आवडतं याची यादी तयार करून आठवून आठवून पदार्थ बनवणे आणि मायेने भरवणे हा तिचा आवडता छंद होता.
मुलं परत गेली की पुन्हा घर मोठं वाटायला लागायचं. अक्षरशः घर खायला उठत असे. तसं पाहिलं तर घरात काय नव्हतं? पैसा अडका, चैनीच्या वस्तू, उच्चभ्रू वर्गात मोडणारं रहाणीमान. पण कशाची तरी वानवा नेहमीच जाणवायची. आयुष्याला एकटेपणाची किनार कायम काचत असे. सारे आहे पण कांहीच नाही अशी अवस्था होती. मुलं असताना दिवस कसे भुर्रकन उडूणन जायचे. म्हणतात ना आसवाचे दिवस कासवाचे असतात ! आम्ही हेच तंतोतंत अनुभवत होतो.
आयुष्य पण कसं विचित्र असतं पहा! उतारवयात जेंव्हा नको तेंव्हा पैसा भरपूर असतो. डॉक्टरांनी घातलेल्या बंधनामुळे खाण्यावरचा खर्च पण अगदी माफक असतो. मुलं सातासमुद्रापार असल्यामुळे वृध्दापकाळी भरपूर एकांतवास (प्रायव्हसी) मिळतो जो आता जीवघेणा भासतो.
असच चाचपडत जीवन जगत असताना, एकेदिवशी कांही जणांच्या संपर्कात येवून आमच्या विभागात हास्यक्लब आणि ज्येष्ठ नागरीक संघाची स्थापना झाली. आम्ही दोघेही सर्व कार्यक्रमात खूप सहभाग घेऊ लागलो. नवीन लोकांचा सहवास लाभल्यामुळे एकलकोंडेपणा जरासा दूर झाला. श्वास थोडा मोकळा झाल्यागत वाटायला लागला.
आमच्या घराच्या जवळच एकदीड किलोमिटर अंतरावर मुलांचा एक अनाथाश्रम आहे. त्या आश्रमास आम्ही सर्व ज्येष्ठ मंडळी भेट द्यायला गेलो. तेथील एकएक गोष्ट ऐकून, पाहून मन कसं पिळवटून निघालं. संस्थाचालकांचा सेवाभाव पाहिला आणि मी नतमस्तकच झालो.
आम्ही उभयतांनी यावर चर्चा करून या अनाथाश्रमाशी जोडून घ्यायचं ठरवलं. आता आम्ही आठवड्यातून दोन तीन दिवस आश्रमात जात असतो. पडेल ते आणि जमेल ते काम तिथे करतो. तिला संगीताचं अंग असल्यामुळे ती तिथे गाणं शिकवते.
काळाच्या ओघात आमचं त्या मुलांशी नातं विणलं गेलय. त्यांचे निरागस चेहरे, वाळवंटात गिरवळ दिसल्यावर जसे वाटते तसे समाधान देतात. सुरुवातीला स्व्तःला विरंगुळा या मर्यादित कारणासाठी आम्ही जात असू. आता त्या संस्थेशी आम्ही छानपणे बांधले गेलो आहोत. विरान आयुष्यात कारंजं असावं तसं झालय आम्हाला. जीवनाचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. आता आम्हाला मोकळेपणा असा नसतोच.
अनाथाश्रमाच्या वर्धापन दिना निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम करायचा होता. माझ्या पत्नीने खूप मेहनत घेऊन मुलांकडून गाणी बसवून घेतली. कार्यक्रमात जेंव्हा सर्व श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात गाण्यांना दाद दिली तेंव्हा माझ्या पत्नीलाच मूठभर मास चढल्या सारखं वाटलं. आम्हा दोघांनाही खूप खूप आनंद झाला.
एकदा प्रकृती ठीक नसल्या कारणाने आम्ही दोघेही अनाथाश्रमात एक आठवडा जाऊ शकलो नाहीत. लगेच आश्रमातील चार मुले घरी चौकशीसाठी आली आणि येताना आश्रमात नाश्त्यासाठी केलेले थोडे पोहे आमच्यासाठी घेवून आले. पोहे थंडगार झालेले होते पण त्यात आपुलकीचा भरपूर उबारा होता पोहे खाताना मन कसं भभरून येत होतं. त्या रात्री आवंढा गिळत या नवीन नात्यावर थोड्या ओळी भावना व्यक्त करण्यासाठी लिहिल्या ज्या अशा होत्या.
जे कुणी नव्हतेच माझे, सोयरे झाले कसे?
वृक्ष असूनी पिंपळाचा फूल हे आले कसे?
मायबापांनी मुलांना सोडले रस्त्यात का?
गोड त्यांच्या हासण्याला लावले ताले कसे?
त्या निरागस बालकांना आस नव्हती फारशी
अल्प ओलाव्यात कळले विश्व हे चाले कसे
ग्रिष्म होती जीवनाची कुंडली माझ्या तरी
प्रेम शिडकाव्यात माझे अंग हे न्हाले कसे?
आता विचार करायलाही वेळ नसतो एवढी गती जीवनाला प्राप्त झाली आहे. पण जेंव्हा जेंव्हा विचार करतो तेंव्हा तेंव्हा मनात येते की एकेकाळी आम्ही सुखाचा शोध सातासमुद्राच्या पार म्हणजेच मुलगा, मुलगी, सूनबाई, जावईबापू आणि नातवंडात घेत होतो पण दु:खीच होतो. थोडा सकारात्मक विचार आणि कृती केली आणि सुखाचा झुळझुळता झरा घराजवळच सापडला. यालाच तर म्हणतात काखेत कळसा आणि गावाला वळसा!
निशिकांत देशपांडे
चांगलं लिहलय.. तुमच्या वेळेचा
चांगलं लिहलय..
तुमच्या वेळेचा किती चांगला उपयोग करताय..
खूपच छान लिहिलंय. माझ्याही आई
खूपच छान लिहिलंय. माझ्याही आई बाबांची भारतात हीच स्थिती होत असेल
यु गॉट द राइट ट्रॅक... एवढेच
यु गॉट द राइट ट्रॅक... एवढेच म्हणेन. मस्त
छान लिहिलय. खूप आवडलं लिखाण,
छान लिहिलय. खूप आवडलं लिखाण, शिवाय तुमचा सकारात्मक आणि व्यापक दृष्टिकोन.
तुम्हा दोघांना मनापासून शुभेच्छा.
मस्त. तुम्हांला प्रॉब्लेम
मस्त. तुम्हांला प्रॉब्लेम कळला, त्यावर उपाय शोधलात. बर्याच जणांचा वेळ त्यावर विचार करत निराश होण्यातच वाया जातो.
तुमच्या अनाथाश्रमातील कामाला शुभेच्छा.
सायोला अनुमोदन.
सायोला अनुमोदन.
छान!
छान!
छानच.
छानच.
खुप सुंदर. एकदम मनाला भावले
खुप सुंदर.
एकदम मनाला भावले आणि पटले ही.
म्हातारपणी आधार म्हणुन अनाथालयात जाऊन मदत करुन जवळीक साधने. सो मनालाही शांती आणि लहानग्यांना आधार.
मस्त लिहीले आहे. मागील एका
मस्त लिहीले आहे. मागील एका अथःश्रीच्या अंकात मी स्वतःसाठी, सुखासाठी असा लेख लिहीला आहे तो जरूर वाचा तुम्हाला नक्की आवडेल. हो आणि मीनिंगफुल जीवनासाठी खूप शुभेच्छा. कविता पण फार छान आणि प्रामाणिक आहे.
चांगल लिहीले आहे.
चांगल लिहीले आहे.
फारच छान लिहलेय
फारच छान लिहलेय
मनाला स्पर्शून गेलं, सुंदर
मनाला स्पर्शून गेलं, सुंदर लिखाण, काव्यही अप्रतीम
सुंदर लिखाण
सुंदर लिखाण
वा काका, किती सुंदर मार्ग
वा काका, किती सुंदर मार्ग काढलात एकाकीपणावरचा उपाय म्हणून - फारच सकारात्मक.
लेखनशैलीही सुरेखच, काव्य अप्रतिम. अनेक शुभेच्छा.
लेख आवडला. सायो +१
लेख आवडला.
सायो +१
ग्रेट आहात काका
ग्रेट आहात काका तुम्ही!!!
____/\____
छान लिहिलय.
छान लिहिलय.
छान लिहीलेत. एकटेपणावर मात
छान लिहीलेत. एकटेपणावर मात करण्याचा उत्तम मार्ग!
अश्विनीमामी, तो लेख ईथे नाही का टाकता येणार?