होते कुरुप वेडे....

Submitted by प्राची on 7 October, 2008 - 09:52

सकाळी आरामात उठून आईच्या हातचा गरमागरम चहा पित होते. इतक्यात श्री आला..
"अग आई, हरिहरबुवा गेले."
"अरे देवा.." --आई
"मी निघालोय तिकडेच. तुम्हीही या सगळे आवरुन." श्री आला तसा घाईघाईत निघुन गेला.

आई माझ्याजवळ येऊन बसली. "अंजु, येणारेस का ग तू पण?"
"हो जाऊन येऊ या."

हरिहरबुवा आमच्या गावातलं एक बडं प्रस्थ. गायनक्षेत्रातलं एक नावाजलेलं व्यक्तिमत्व. गावात एक मोठी गायनशाळा होती त्यांची. अगदी गुरुकुलच म्हणा ना. तिथे प्रवेश मिळणं म्हणजे तर मोठी गोष्ट होतीच पण प्रवेश मिळुन तिथे टिकून राहणं ही देखील एक अवघड गोष्ट होती.बुवांच्या कडक स्वभावाच्या कहाण्या सार्‍या गावात सांगितल्या जायच्या. पण त्याचबरोबर त्यांना मानही दिला जायचा. त्यांचे गाणे ऐकणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभवच होता. हरिहरबुवा आमच्या गावाचे भूषण होते.

म्हणुनच आईबरोबर जेव्हा मी बुवांच्या वाड्यात शिरले, तेव्हा तिथली प्रचंड गर्दी बघुन मला आश्चर्य वाटले नाही.पार्थिवाचे दर्शन घेऊन आम्ही माईंना भेटायला आत गेलो. तिथेही एक विचित्र शांतता होती. माईंजवळ घोळका करुन बसलेल्या बायकांत मला त्यांची मुलगी,आसावरी ,दिसली नाही. जरा विचित्रच वाटले.

अशा वातावरणात येते ते दडपण असह्य होऊन मी परसात आले. पण आज आभाळही भरुन आले होते. शेवटी घरी परतावे असा विचार करुन मी वळले, तितक्यात मला कोणाच्या तरी अस्फुट रडण्याचा आवाज आला. मी आवाजाच्या दिशेने गेले तर विहिरीच्या भिंतीमागे एक मुलगी रडत होती. 'काय करावे' या विचारात असतानाच तिने मान वर करुन पाहिले.

"अग, आसावरी, तु इकडे काय करतेस? चल, घरात चल." मी म्हणाले.
"नको. मला इथेच बसु दे. ही माझी आणि बाबांची जागा आहे. फक्त आमची... इथेच बसुन आम्ही आपली मनं मोकळी केली आहेत एकमेकांकडे. मला इथेच थांबु देत." आसावारीला पुन्हा रडु कोसळले.

"अग, असं काय करतेस? बुवा आपल्यातच आहेत, असणार आहेत्...त्यांच्या गाण्याच्या रुपात, त्यांनी घडवलेल्या उत्तमोत्तम विद्यार्थ्यांच्या रुपात.. तु रडु नकोस ग." आता माझाही गळा भरुन आला.

"नाही..नाही... माझ्यात आणि बाबांच्यात ते गाणे कधीच आले नाही आणि येणारही नाही." आसावरी एकदम उसळुन उठली.
मला माझं काय चुकलं तेच कळलं नाही. गाण्याबद्दल एवढी तिडीक आणि तीपण बुवांच्या मुलीला..! मला आश्चर्यच वाटलं.
तिलाही ते जाणवलं असावं.

जरा शांत होत ती म्हणाली,"या इथेच बसुन आम्ही ठरवले होते. गाण्याचा प्रांत माझा नाही...आणि बाबा माझ्यावर कधीच जबरदस्ती करणार नाहीत गाण्यासाठी. केवळ दहा वर्षांची होते मी. मला शिकवण्याचा खुप प्रयत्न केला बाबांनी... पण मला कधी ओढ वाटलीच नाही गाण्याविषयी. गाण्यात आत्माच नसेल तुमचा तर त्या गाण्याला काय अर्थ राहिला?
ज्या घरात बाबा-माईंसारखे पट्टीचे गायक होते, ज्या घराचा दिवस उगवायचा रियाजाने आणि मावळायचा रियाजाने, ज्या घराने जगाला उत्तमोत्तम गायक दिले, त्या घरात माझ्यासारख्या मुलीच जन्म म्हणजे दैवदुर्विलासच.. पण बाबांनी तेही स्विकारले. मला म्हणाले-"आसु, तुला जे आवडेल ते कर. पण त्यात पुर्ण जीव ओतुन कर. त्यात प्राविण्य मिळव. अग, लोक हरिहरबुवा म्हणुन ओळखतात मला, पण आसुचे बाबा म्हणुन ओळखले जायला आवडेल मला.""

बुवांचे हे रुप मला अनोळखी होते. आपल्या शिष्यांनी गाताना केलेली एकही चुक सहन होत नसे त्यांना. त्यांचे कडक धोरण सहन न होऊन गुरुकुल सोडुन गेलेल्यांची अशी अनेक उदाहरणे आम्हांला माहीत होती.

आसावरी काही वेळ गप्प बसून राहिली. मग हलकेच उठुन प्राजक्ताच्या झाडाजवळ जात म्हणाली,"लहानपणी मी त्यांच्याबरोबर त्यांच्या सगळ्या कार्यक्रमांना जायचे. पण प्रत्येकवेळी तेच...'बुवांची लेक म्हणजे गाणं येतच असणार, गाऊन दाखव बघु बाळ... 'आणि मग मी गात नाही हे कळल्यावर 'काय विचित्र आहे मुलगी' अश्या नजरा. आधीआधी मला कळायचेही नाही, पण हळुहळु नजरा बोचु लागल्या. का? का गायचं मी? नाही येत मला गाणं... मी चित्रं छान काढते, दाखवु? बघणार तुम्ही? नाही ,त्यात रस नाही तुम्हांला. फक्त गाणे..गाणे आणि गाणेच. मी गात नाही म्हणजे मी नालायक ठरते का? हो, नालायकच आहे की मी.. बुवांची एकुलती एक मुलगी आणि गाणे गात नाही? मग त्यांच्या मागे त्यांचा वारसा कोण चालवणार? मैफिलींच्या वेळी माझ्या गाण्याचा विषय निघाला की बाबाही अस्वस्थ होत. कुठेतरी त्यांच्या मनात असेलच की मीही गाणं शिकावं. त्यांनी बोलुन नाही दाखवले, पण त्यांच्या डोळ्यांत ती अपेक्षा दिसुन यायची. मग हळुहळु मी मैफिलींना जाणे बंद केले. बाबांनीही आग्रह करणे सोडले.. अंजु, तुला आठवतं शाळेत एकदा चित्रांचे प्रदर्शन होते, त्यात माझ्या चित्राला खुप नावजले होते सगळ्यांनी, नववीत असु आपण. पण तोवर खुप उशीर झाला होता ग.. रोजरोज गाण्याविषयी, छे छे.. न गाण्याविषयी ऐकुन ऐकुन मी सगळ्यांपासुन दुरावले होते. माझी चित्रकला कोणी बघायचे नाही, त्याबद्दल कोणीही उत्सुकता दाखवत नव्हते... केवळ गाणे... यातुनच माझी गाण्याबद्दलची चीड वाढत गेली. सकाळी कानावर पडणारे सुर नको नको वाटु लागले.. वाद्यांचे आवाज असह्य होऊ लागले,या घरात वावरणे नकोसे झाले. शेवटी बारावीनंतर मी या घरातुन, या गावातुन बाहेर पडले. पण , एका जगविख्यात गायकाची लेक मी... बाहेरही वेगळा अनुभव नाही आला. मी घुमी झाले... लोकांपासुन दूर जाऊ लागले. कोणाशी बोलणे, कुठेही बाहेर जाणे बंद केले मी. अगदी टाळताच येत नसेल तर जायचे पण मग आपली खरी ओळख देणे टाळायचे. खरं तर बाबांची मुलगी म्हणुन ओळख देणे अभिमानाचे वाटायला हवे होते मला. पण ती ओळखच मिटवुन टाकली मी. "

आसावरीला हे सगळे असह्य होत होते. तिची उद्विग्नता मला कळत होती. मी तिच्या खांद्यावर हात ठेवला. माझा हात हातात घेऊन ती म्हणाली," अंजु, मला समजुन घेशील का तु? घेशील ना?" मी मान डोलावली.

"याच दरम्यान एका ओळखीच्या मुलीच्या माध्यमातुन मी 'संवाद' च्या वर्तुळात आले. मुकबधिर मुलांच्या मदतीसाठी कार्य करते ही संस्था. मग या संस्थेसाठी पैसे जमा करण्यासाठी मग माझी चित्रप्रदर्शनं भरवु लागले मी. अश्याच एका प्रदर्शनाच्या वेळी माझी अभीशी ओळख झाली. या मुकबधिर मुलांसाठी काम करणारा अभी स्वतः मुकबधीर आहे. त्यानी कधीच बुवांचे गाणे ऐकलेच नाहीये ग... त्यामुळे, मी गात नाही किंवा असं म्हणू या की बुवांची लेक असुनही मी गात नाही, याचा त्याला काहीही फरक पडत नाही. त्याच्या आयुष्यात गाणं नाहीयेच ग.. आणि माझ्याही. तो माझी चित्रांची भाषा ओळखतो आणि मी त्याची. आम्ही जवळ आलो, गेल्या वर्षी लग्नही केलं. बुवांच्या जावयाला गायला तर सोडाच पण बोलताही येत नाही म्हणून भुवया उंचावल्याच, पण आता मला काही फरक पडत नाही. माई-बाबांनी त्याला स्विकारलंय. दोन महिन्यांपुर्वी त्याच्या कार्याचा गौरव झाला तेव्हा बाबांच्या डोळ्यांत जी अभिमानाची झाक दिसली ती मी कधीच विसरणार नाही. खुप कौतुक होतं त्यांना अभीचं."

वडलांच्या आठवणीनं तिला पुन्हा रडु कोसळलं. मी काही बोलणार इतक्यात अभीच तिथे आला. मोठ्या मायेनी त्याने तिचे डोळे पुसले आणि तिला घरात घेऊन गेला. त्यांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे मी पाणावलेल्या डोळ्यांनी पाहत राहिले.

गुलमोहर: 

सुरेख.
कधी कधी गवयाच पोर सुरात रडत नाही. याचा अर्थ हा नाही की त्याने सूर जाणलाच नाही.

प्राची छान आहे कथेचा बेस-- अजुन का नाही खुलवलीस पण ..
अजुन लिहीत रहा..
-----------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
चम्हांलातु चगतोसां चमी चकए चष्टगो...:)

प्राची, माझ्या बुध्दीचा आवाका थोडा कमी पडतोय. पण, कथेच्या शीर्षकाचा अर्थ समजावून सान्गणार का?

प्राची,
तुझी लेखनशैली खुप आवडली.... एक मस्त फ्लो आहे तुझ्या लिखाणात.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

प्राची, आवडली गोष्ट.

सुंदर !
.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **

प्राची, सुर्रेख लिहिलयस...
असे समजून घेणारे वडील असणं भाग्याचं. आजूबाजूचं जग एकाच अपेक्षेनं मुळं बांधून आपलं बोन्साय करीत असताना, त्यातून मोकळं करीत आभाळ दाखवणारे आई-वडील... ही पूर्व पुण्याई आहे!
छान लिहिलयस... इतकं की, अजून लिहायला हवं होतस असं वाटतय Happy

(सावली चित्रपट अशाच धर्तीवर आहे... हे अस्थानी होऊ नये)
-----------------------------------------------------
दम लिया था न कयामत ने हनूज
फिर तेरा वक्त-ए सफर याद आया

छान लिहिलंय प्राची...

खूपच छान प्राची. सुरेख लिहीलयस! गोष्ट थोडी मोठी असती तरी चालली असती. पण नक्की कोणता भाग वाढवायला हवा होता ते नाही सांगता येणार. पण जे जेवढं हवं होतं तेवढं फार सुंदर लिहीलंयस.
अशीच लिहीत रहा. पु. ले.शु.
*~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~*
पारिजातकाचं आयुष्य मिळालं तरी चालेल्..पण लयलूट करायची ती सुगंधाचीच!
Happy

खुपच छान !!!!
एका पेक्षा एक ह्या कार्यक्रमात "किशोरी गोडबोले" नी हि असच सान्गितल होत तीचा अनुभव म्हणुन्...(प्रसिद्ध गायक जयवन्त कुलकर्णी यान्ची कन्या )....

छानच जमलिये ग!!!

दिसलीस तू...फुलले ॠतू..................

तुम्हां सगळ्यांचे आभार...
दाद, 'सावली' अजून बघितला नाही. आता नक्की बघेन.
lovein, तुम्ही, 'एका तळ्यात होती' ऐकलंय का? त्याच गाण्यातली एक ओळ आहे ही.
तळ्यातल्या बदकांच्या पिल्लांत एक राजहंस असतो. पण त्याचे महत्त्व कोणीच ओळखत नाही आणि त्याच्या वेगळेपणावरुन त्याला नेहमी हिणावलेच जाते. पण शेवटी ते आपले महत्त्व सिद्ध करतेच. असा अर्थ आहे त्या गाण्याचा.. आणि या शीर्षकाचाही.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
चम्हांलातु चगतोसां चमी चकए चष्टगो...:)

प्राची मस्त कथा Happy
लिहीती रहा Happy

फारच सुन्दर आहे. विशय पण छान खुलवला आहे अभिनन्दन .....

मस्त लिहिलय.. Happy आवडलं..

कथा फार छान आहे. आवडली.