नभ राहते उदास ..

Submitted by कमलाकर देसले on 6 December, 2012 - 10:17

नभ राहते उदास ..

जीवा नको ना घेवूस ,विचारांचा गळफास ;
तुझा स्वामी नाही त्याचा , होतो कशाला तू दास ?

तुला आराम मिळेल , अशी सांगतो मी कथा ;
कान उघडे ठेवून ,तूच ऐक मित्रा स्वत:
महानायकाचा बघ , कसा विकास,विलास

काळ्या पांढर्‍या मेघांची , होते आकाशात गर्दी ;
कधी सुखाचा पाऊस , कधी वादळाची वर्दी ..
सारे नभात घडून , नभ राहते उदास ..

बदनामीचा उन्हाळा , धूळ उडते नभात ;
धूळ पोचते का सांगा , आकाशाच्या हृदयात ?
धूळ बसते धुळीत , हाच नभाचा विश्वास ..

राख करण्याची भाषा , सूर्य रोजच करतो ;
आकाशाला जाळणारा , बघ स्वताच जळतो ..
साधा चटकाही नाही , अरे लागतो नाभास..

मेघगर्जने सकट , वारा करतो तांडव ;
पण हालला का सांग , मित्रा नभाचा मांडव ..
जे जे सुरू होते ते ते , संपणार आहे खास..

चंद्र-चांदण्याची छान , लावी झुंबरे पौर्णिमा ;
भय सघन करते , अमावस्येचा काळीमा ..
नभ अभय अलिप्त ,घेते साक्षीत्वाचा श्वास ..
-- कमलाकर देसले

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users