चिकन जालफ्रेझी

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 27 November, 2012 - 02:26

काल लग्नाचा वाढदिवस होता म्हटलं नवर्‍यासाठी काहीतरी स्पेशल करुया. पाईनॅपल केक तर तयार झाला होता. साथ में कुछ झणझणीत मंगता था. थोडी पुस्तकं चाळली. खालच्या दुकानातून चिकन घेऊन आले. वेगळं काय करावं हा विचार होताच. पण म्हटलं, आधी मॅरीनेशन तर करुन ठेवूया मग बघू पुढचं पुढे.

लग्गेच कृती सुरु केली. पुस्तकातली रेसीपी आणि माझी अक्कल ह्याचा छानसा(?) मेळ साधून सुपरहीट चिकन तयार झालं. अतिशय चविष्ट दिसणारं आणि लागणारं चिकन करायला अगदीच सोप्पंय.

DSC01813-001.JPG

साहित्य : मॅरिनेशन साठी

१ किलो चिकन,
३ टेबल स्पून टोमॅटो केचप,
लिंबाचा रस (साधारण २ लिंबांचा रस)(इकडे मोठी लिंबं रसदार मिळतात. त्यामुळे मी एकच घेतलं.)
२ टी स्पून लाल तिखट
मीठ

साहित्य : ग्रेव्हीसाठी

प्रत्येकी २ टी स्पून आलं, लसूण पेस्ट,
२ टेबल स्पून टोमॅटो प्युरी,
३ कांदे अगदी बारीक चिरुन,
२ अंडी फेटून,
१ टी स्पून हळद
२ टेबल स्पून हिरव्या मिर्च्या अगदी बारीक चिरुन,
१ टी स्पून बादशहा (किंवा कुठलाही) चिकन मसाला
तेल,
मीठ.

कृती :

चिकन स्वच्छ धुवून त्यातलं सगळं पाणी निथळवून टाका.
मॅरीनेशन चं सगळं साहित्य एकत्र करुन चिकन ला चोळून ठेवा. साधारण २ तास झाकून ठेवा.
एका कढईत ३ टेबल स्पून तेल तापत ठेवा आणि त्यात अगदी बारीक चिरलेला कांदा परतवून घ्या.
कांदा सोनेरी रंगाचा झाला की त्यात टोमॅटो प्युरी घाला.
तेल सुटायला लागलं की त्यात आलं, लसूण पेस्ट घाला.
थोडं परतून नंतर त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिर्च्या घाला.
मग त्यात हळद आणि चिकन मसाला घाला.
थोडं परतवून त्यात चिकनचे मॅरीनेट केलेले तुकडे घाला.
सगळं मिश्रण मस्तपैकी परतवून झाकण ठेवा.
साधारण १५ मिनिटात चिकन शिजत आल्यानंतर त्यात १ कप पाणी घाला.
पुन्हा झाकण ठेवा आणि चिकन पूर्ण शिजवा.
झाकण उघडल्यावर मस्त रसरशीत चिकन तयार Happy

पण थांबा पिक्चर अभी बाकी है .. Wink

फेटलेली २ अंडी त्यात घाला. मस्तपैकी ढवळा.
गरम असल्यामुळे अंडी लगेच शिजतील. छान ढवळल्यामुळे अंडी एकाच ठिकाणी न राहता सगळीकडे व्यवस्थित मिक्स होतील.
रश्श्याचं टेक्स्चर पूर्ण बदलेल पण घाबरु नका.
झाकण ठेवा ….आणखी एक वाफ काढा.
आता चिकन जालफ्रेझी एकदम तय्यार Happy

एका छानशा भांड्यात काढून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरा. तोंडाला पाणी नक्कीच सुटणार Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज केलं जालफ्रेझी. फेटलेले अंडे ग्रेव्हीत घालण्याची आयडिया माझ्यासाठी नवीन होती आणि ती सॉलिड आवडलेली आहे. हलाल शॉपमध्ये जायचा आळस केला त्यामुळे नेहेमीचं बोनलेस चिकन वापरलं. लाल तिखट अगदीच कमी घातलं ( त्यामुळे ग्रेव्हीला लाल रंग आला नाहीये ) आणि मिरचीऐवजी स्वादासाठी थोडीशी भोपळीमिरची घातली बारीक चिरुन. चव एकदम मस्त आहे ह्या चिकनची. धन्यवाद जयवी Happy

Jalfrezi.jpg

Pages