रिक्षा चालकांसाठी नीतिपुस्तिका (अर्थात मॅनुअल)

Submitted by मिरिंडा on 24 November, 2012 - 06:23

(सदर पुस्तिका रिक्षा चालकाने जपून ठेवावी. चालवण्यापूर्वी उदबत्ती ओवाळून रोज तिचे पठण करावे. म्हणजे विसर पडणार नाही)

नाकारणे भाडे
तुझाच हक्क आहे
मीटर फास्ट ठेवणे
तुझाच हक्क आहे

जरी पाहसी तू
गरजू प्रवासी
नको थांबू तू
हास त्यांच्यावरी तू

जरी दिसतसे
बस येणार नाही
अनुचित तुजसी
थांबणे स्टॉपजवळी

स्वये सर्वदा
उर्मट वाचे वदावे
सर्व प्रवाशांशी नेहमी
झटकीत जावे

घाईच्या वेळी तुजला
थांबणे इष्ट नाही
घेणे प्रवासी
तुला इष्ट नाही

पाहुनी आजोबा आजी
कापणारे
तया डावलोनी
वेगात जा निघोनी

दया माया बंधुत्व
कामा न ये रे
टंच सुंदरीस मात्र नेणे
जरूरी तुला रे

रेल्वे, टॅक्सीचा संप
दिसता समोरी
कधी स्टेशनावरी
नको फिरकू परी तू

असो वेळ रात्रीची
अथवा रात्र पावसाची
तुला चेव येवो
भाडे नाकारण्यासी

कुणी विचारले जरी
लंडनला जाशी का रे ?
का न्यूयॉर्कला जाणे
आवडे तुला रे ?

उपरोध समजूनही
निर्लज्ज राही
कोडगेपणाने
बसुनी गंमत पाही

जरी हवालदार आला
सोपे होईल तुजला
चिरीमिरी घेऊनी तो
सोडील तुजला

नको खेद मानू
लोकांची गैरसोय दिसता
नको दुःखी होऊ
भाडे न मिळता

अडचण प्रवाशांची
समाधान देई
दूरचे एक भाडे
सार्थकी दिवस लावी

कुणी तक्रार केल्यास
घाबरू नको तू
नियमीत राबता
ठेवि पोलिसांकडे तू

बांधिलकी समाजाची
तुझ्यावरती नाही
कमी काम करूनी
आपुला स्वार्थ साधी

अमराठी असल्यास
चिंता नको रे
तुझी पाठ राखतील
राजकारणी पुन्हा पुन्हा रे

सदर पुस्तिका हिंदीत
लिहूनि घे रे
कुणी मराठीच येईल
मदतीस सहज तुझ्या रे

अशा काही युक्त्या
तुला चांगल्या रे
प्रवासी दुःखी नसती
असशी दुःखी तू रे

इतर चालकांना
विचारून नीती
वाढवी पुस्तिका
सारखी वेळोवेळी

(पूर्व प्रकाशनःमनोगत्/नोड/२२७६१४)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरुण साहेब, इथे नवीन सभासद झालेले नेहमीच असे करतात. इतक्या भारंभार पोस्टी इथे नका हो टाकू, जरा दमानं घ्या.. आणि इतरत्र पूर्वप्रकाशित साहित्य, इथे जसे च्या तसे टाकण्यापेक्षा, मायबोलीसाठी खास लिहा, असा एक जूना मायबोलीकर म्हणून, मला सांगावेसे वाटते.. आपण सूज्ञ आहातच.

प्रतिसादाबद्दल आभारी आहे. दिनेशदा आपण म्हणता ते बरोबर आहे. मायबोलीसाठी लिहित आहेच, पूर्ण झाल्यावर
पाठविन. कुलकर्णी साहेब आपण या लिखाणाला अनावश्यक पाल्हाळ म्हंटले आहे, पण पाल्हाळ वास्तवाशी
संबंधित आहे , हे नक्की. असो. प्रतिसादाबद्दल आभारी आहे.