गणपतीच्या दिवसात बाजारात गेलो तेव्हाचे प्रसंग. घरातून बाहेर पडताना बायकोने, " अहो, जरा केवडा, लाल फुलं, दूर्वा वगैरे घेऊन या अस बजावलं आणि... नुसते भटकून येऊ नका अस प्रेमाचा सल्लाही देण्यास ती विसरली नाही. लोकांच्या प्रचंड गर्दीतून वाट काढत मी वेगवेगळी फुलं, भाज्या बघत बघत जात होतो. खरंतर मी केवडाही शोधत होतो. केवडा विकणारी एकच बाई दिसली. पण तिच्या भोवती बिलकुल गर्दी नव्हती. पुढे पाहिल्यावर काही भय्येही हातात केवडे घेऊन विकताना दिसले. हल्ली कोणीही काहीही विकतो. पण मराठी माणसाकडूनच वस्तू विकत घेण्याचा मराठी बाणा ऐनवेळेवर मूळव्याधीसारखा माझ्या मनात विनाकारण उपटल्याने मी त्या बाईकडे जाऊन विचारलं, " काय मावशे, केवढ्याला दिलं हे कणीस? मावशीने माझ्याकडे पाहून न पाहिल्या सारखं केलं. तरी ही मी परत तोच प्रश्न विचारला. माझे एकूण कपडे आणि इतर भाव पाहून मी तिला केवड्याचा भावही सांगण्याच्या लायकीचा वाटलो नाही. असं मला वाटलं. थोडा रागही आला. पण मी पुढे जात नाही असं पाहून तिने तोंडातली तंबाखू थुंकून, ओठाच्या कोपऱ्यातून भाव सांगितला. "एकच भाव, साठ रुपये लागतील. " मी समजूनही विनोदाने म्हणालो, " अगं मला सगळी कणसं नको आहेत, एकच पायजे. " त्यावर तुच्छतेने पाहतं ती म्हणाली, " एकाचाच भाव सांगितलाय, घेयाचं तर घेवा न्हाई तर जावा. "
केवड्याच्या एका कणसाचा भाव ऐकून माझी मुद्रा आरशात पाहण्यासारखी झाली असावी. मग माझ्या मनात सहज आलं, अशा विक्रेत्यांनी जवळ एक आरसा ठेवावा, आणि आमच्यासारख्या सामान्य गिऱ्हाईकांना तो दाखवावा. नाईलाजाने मी पुढे सरकलो. तेवढ्यात एक मारुती आली. चालवणाऱ्या बाई होत्या. त्यांनी फक्त काच खाली केली व त्या बाईकडे पाहिले. त्याबरोबर ती करंट लागल्यागत उठली व टोपली घेऊन गाडीशी गेली. पाच कणसे गाडीवाल्या बाईंना देऊन हातात शंभराच्या तीन करकरीत नोटा घेऊन ती जागेवर येऊन बसली. मी जवळच असल्याने, तिने माझ्याकडे विजयी नजरेने पाहिले, असे मला वाटले. मारूती अर्थातच गेली होती. तीच गोष्ट लाल फुलांची आणि दूर्वांची. पुढे गेल्यावर काही मुलं दूर्वांची जुडी आणि दोन लाल फुले घेऊन विकत असलेली दिसली. मी भाव विचारला. पाच रुपयाला एक. भाव पटला नाही तरी मी एक गुच्छ विकत घेतला. नंतर केवडे विकणाऱ्या भैय्याकडे गेलो. "ये केवडे का कणीस कैसे दिया भैयाजी? "(मी हिंदीत विचारले) भय्याने मराठीत उत्तर दिले. " दहा रुपयांना एक आहे साहेब. पाहिजे तर वीस रुपयांना तीन घ्या. " मी एक कणीस विकत घेतलं. घरी निघालो..... चालता चालता माझ्या मनात आलं. एखाद्या वस्तूची जास्तीत जास्त किंमत वाढत्या महागाईच्या पातळीवर काय असावी, हे आपले मन ठरवत असावे आणि त्याच्या आसपासची किंमत आपण योग्य समजून देतो. अर्थातच ही किंमत महागाईची पातळी आणि वस्तूची उपयुक्तता यांवर अवलंबून असावी. मला काही अर्थशास्त्राची माहिती नाही. पण वस्तूची दुर्मिळता व जीवनावश्यकता वगळल्यास माझे म्हणणे खरे ठरावे. एखाद्या वस्तूची किंमत साधारणपणे पाच रुपये असेल आणि जर दिवाळी सारखा सण असेल तर त्याची किंमत जास्तीत जास्त दहा झाली तर ठीक वाटेल. पण तीच किंमत जर पंचवीस झाली तर ती सामान्य माणसाला अवाच्या सव्वा वाटेल. अशा वेळेला साधारण माणूस ती विकत घेणारच नाही (जीवनावश्यक नसल्यास). अशा वेळेस पंचवीस रुपयांना विकत घेणारा गुन्हेगार नाही काय? जसे वर वर्णन केलेल्या मारूतीवाल्या बाई तीनशे रुपयांना तीन कणसे विकत घेऊन सामाजिक गुन्हाच करीत नाहीत काय? व अशा रितीने किंमती वाढवण्यास जबाबदार नाहीत का? त्यामुळे सर्वच ग्राहकांनी अशा वस्तूंच्या खरेदीवर बहिष्कार टाकल्यास किंमती खाली येण्यास मदत होईल असे मला वाटते. जवळ मोकळा पैसा (लूज मनी) असलेल्या ग्राहकांनी वाटेल त्या भावात वस्तू विकत घेण्याचे टाळावे हे योग्य. अन्यथा सुक्याबरोबर ओलेही जळते या प्रमाणे न परवडणारा भाव देऊन सर्वसामान्य ग्राहक भरडला जाईल हे नक्कीच. व्यापारी वर्गाला सरकारची काय किंवा ग्राहकांची काय दहशत अशी वाटत नाही. त्यांना ग्राहक हा राजा न वाटता, गरजू भिकारी वाटतो. वाटेल ती भीक द्या आणि ग्राहकाला विकत घ्या अशी वस्तुस्थिती हे पैसे वाले ग्राहक निर्माण करीत असतात.
आम्ही केवडा अथवा लाल फुलं न वाहिल्यास गणपती बाप्पा कोपेल नाही का? आम्ही रूढी सांभाळणारच, हे व्यापाऱ्यांना पक्के माहीत आहे. रोजच्या फुलपुड्यांच्या बाबतीतही तोच प्रकार. पुडीचे पैसे वाढले तरी फुलांची संख्या न वाढता तेवढीच राहते, आणि बरोबरच्या कचऱ्याची संख्या वाढते. कोणताही फुलवाला प्रत्येक हंगामात हंगामी कारण देऊन फुले देण्यास नकार देतो. उदा. साहेब पावसाळा आहे पान्यामुले फुलं खडतात, उन्हाळा आहे हल्ली कळ्या जळतात, हिवाळा आहे फुलं थंडीमुळे फारशी उमलत नाहीत. म्हणजे फुलांची भरभराट असलेला हंगाम परमेश्वरालाही अजून निर्माण करता आलेला नाही. दुकानात असलेली चांगली फुले नक्की कोणासाठी ठेवलेली असतात, कोण जाणे. कदाचित, मारुती वाल्या बाईंसाठी तर नाही? आपल्याला काय वाटते, ते आपण जरूर लिहावे. जाता जात एकच वस्तू सांगतो, जी सर्वसामान्यांच्या आवाक्यातली नसते, ती म्हणजे, "रत्नागिरी हापूस ".
(पूर्व प्रकाशनः मनोगत.कॉम्/नोड/२२३०८)
अशा वेळेस पंचवीस रुपयांना
अशा वेळेस पंचवीस रुपयांना विकत घेणारा गुन्हेगार नाही काय? जसे वर वर्णन केलेल्या मारूतीवाल्या बाई तीनशे रुपयांना तीन कणसे विकत घेऊन सामाजिक गुन्हाच करीत नाहीत काय? व अशा रितीने किंमती वाढवण्यास जबाबदार नाहीत का? >>>
पटले. दुर्दैवाने असे होते हेच खरे. एकच माल रस्त्यावर, सर्व सामान्य दुकानत व मॉलमध्ये अश्स्स तिम्ही लेव्हल वर वेगवेगळ्या किमतीला मिळतो. व प्रत्येक लेव्हल चा मुख्य ग्राहकही वेगवेगळ्या आर्थिक स्तरातला असतो. पण जेव्हा वर सांगितलेल्या उदाहरणासारखी सिच्युएशन असते, उदा. मॉल मध्ये तीच वस्तु अव्वाच्या सव्वा भावात खरेदी करण्याची सवय असलेला एखादा ग्राहक ती वस्तु रस्त्यावर त्या पेक्शा कमी किमतीत अवेलेबल असते तेव्हा पटकन , विचार न करता घेऊन टाकतो. ही जनरल टेंडन्सी आहे. तेव्हा त्याला कदाचित हे माहीतही नसते की खरा बाजार भाव काय आहे! अश्या वेळी कुणावर, कोण निर्बंध घालणार!
म्हणुन आम्ही दिवाळीत खुप कमी
म्हणुन आम्ही दिवाळीत खुप कमी खरेदी करतो अगदीच गरज असेल तरचं. कारण ५० रुपयांची वस्तु ५०० ला ही मिळत नाही. स्टॉक संपला म्हणुन दुकानदार अवाच्या सव्वा किंमत सांगतात. आम्ही दिवाळी च्या खुप आधी किंवा खुप नंतर शॉपिंग करतो. दिवाळीत फक्त विंडो "शॉपिंग."
जी सर्वसामान्यांच्या आवाक्यातली नसते, ती म्हणजे, "रत्नागिरी हापूस ". >>>
महाराष्ट्रात राहुनही आम्हाला खायला मिळत नाही आणि डॉलर कमावणार्या बाई ईमेल वरुन त्त्याचीचं चव कळवतात.
पु.ले.शु.
सुंदर लेख, चांगले मांडलेत
सुंदर लेख, चांगले मांडलेत विचार
एखादी वस्तू वा सेवा मिळवताना,
एखादी वस्तू वा सेवा मिळवताना, मिळवल्यावर ग्राहकाला जे सुख / समाधान मिळते, त्यापेक्षा त्याला द्यावे लागणारे मूल्य कमी असेल, तरच ग्राहक ती वस्तू वा सेवा खरेदी करतो, असा दिसायला साधा, अर्थशास्त्राचा नियम आहे. पण याचे विवेचन करताना, सुख कसे मोजायचे ? ग्राहकाच्या क्रयक्षमतेचे काय ? तो त्या वस्तूचा, संग्राहक तर नाही ? असे अनेक फाटे, फुटतात.
शिवाय मागणी आणि पुरवठा, हे दोन घटक असतातच. एका अक्षावर किंमत आणि दुसर्या अक्षावर हे दोन्ही घेतलेत, तर या दोन्ही ग्राफ्सची एक फुल्ली तयार होते. त्या फुल्लीचा छेदनबिंदू म्हणजे, त्या वस्तूची किंमत. अर्थातच यालाही फाटे फुटतात, ते त्या गोष्तीची दुर्मिळता किंवा प्रासंगिक कारणे, अशी...
आधीच केवड्याची बने कमी आहेत, त्यांना फुलोरे पण मर्यादीतच असतात, शिवाय गणेशाला, हे प्रिय, असे आपण ठरवून ठेवलेय... त्यामूळे..
पुर्वी घरोघर जास्वंदीची झाडे असत आणि दुर्वा तर कुठेही, ऊगवलेल्या असत. या वस्तू विकत घ्यायची, कधी वेळच येत नसे.
मला तर असे वाटते की
मला तर असे वाटते की जीवनावश्यक वस्तूंबाबत 'सर्वत्र एकच भाव' नसणे म्हणजे सामाजिक गुन्हा! बाकी सर्वाकरता ग्राहकाला असलेला वेळ, मिळणारे समाधान व त्याची क्रयशक्ती ह्यावर आधारीत त्याला योग्य वाटतील तितके पैसे त्याने दिले तर ते योग्यच....
कोणास ठाऊक मोटारीतील बाईला आधी कोणीतरी केवड्याच्या कणसाला ७०-८० रुपये सांगीतले असतील व त्यामुळे ६० ला तिला ते स्वस्तच वाटले असेल.
चालता चालता आपल्या जे मनात आलं, 'एखाद्या वस्तूची जास्तीत जास्त किंमत वाढत्या महागाईच्या पातळीवर काय असावी, हे आपले मन ठरवत असावे आणि त्याच्या आसपासची किंमत आपण योग्य समजून देतो' ......तेच माझ्यामते खरे!
कारण आपणही काय केलेत, ज्या गुच्छाची किंमत आपल्यालाच पटत नव्हती त्याला देखील ५ रुपये दिलेत. तो अजुन पुढे गेल्यावर अजून कमी किंमतील मिळत नव्ह्ता ह्याची आपण खातरजमा केली होतीत का?
नसेल तर दुसरा कोणीतरी असाच धागा उघडू शकतो की २ चा माल (चालत आलेल्या माणसानेसुद्धा) ५ ला नेला.
जर का आपण अशी चौकशी करुनच खरेदी केली असेल तर त्या साठी नक्कीच आपण अधिक वेळ घालवलात (कारण तेव्हडा वेळ आपणाकडे होता).
'म्हातारी मेली तरी चालेल पण काळ सोकावायास नको' ह्या उक्तीप्रमाणे खरेतर रडायला हवे; पण सध्याच्या जगात लोकांकडे त्यासाठीपण (म्हणजे काळ सोकावू नये म्हणून रडायसाठी) वेळ नसतो. (हे अर्थातच उदाहरणादाखल आहे कृपया मतितार्थ घ्यावा / शब्दार्थ घेऊन फाटे फोडू नयेत.)
अजून एक शेवटाला मांडलेला मुद्दा म्हणजे, "रत्नागिरी हापूस " हा फळबागांमधील उत्पादनापैकी व खास लागवड व जोपासना करून वाढवण्यात येणार माल असल्याने, त्याला दूर्वा, लाल फुले, केवडा यासोबत एकाच मापात तोलणे अगदीच अयोग्य वाटते. आपल्या आवाक्याबाहेर / महाग वाटत असणारा शेतीमाल / फळफळावळ कित्येकदा उत्पादकांना तोट्यात विकावा लागतो ही वस्तुस्थिती आहे.
केवडा नैसर्गीक रित्या राना-वनात वाढत असल्याने त्याचा असा हिशोब मांडता येणार नाही कदाचीत पण एक जास्वंदीचे फूल, बाजारात येईपर्यन्त त्या झाडाला वाढवायला व फुलवायला किती खत, पाणी, मॅन्-अवर ई. लागले व नंतर त्यासाठी करावी लागलेली हमाली, वाहतुक ई. याचा जर हिशोब मांडला तर ५ रुपये देखील खूप कमीच असतील. मग हा कोणता न्याय...
तुम्ही अगदी बरोबर म्हणताय, पण लक्षात कोण घेतो ?
उत्तम कांबळेंचा सप्तरंग मध्ये
उत्तम कांबळेंचा सप्तरंग मध्ये सुंदर लेख आला होता अशाच काहिशा विषयावर - पाया सुप हा विषय होता.
अग्दी अग्दी @ भारतीय. तोच लेख
अग्दी अग्दी @ भारतीय. तोच लेख आठवला होता.
छी छी..... या तथाकथित
छी छी..... या तथाकथित हिंदु भक्तांची भक्ती किती कोरडी आहे.... असुर नरेश रावणाने स्वतःची मुंडकी कापून देवाला अर्पण केली होती... आणि याना १०० रु ची फुले वहाताना किती यातना होतात!!! वस्तू स्वस्तात मिळाले तरच हे लोक देवाला देणार!! देव म्हणजे बोहारीण आहे का हो?
देव लाडू आणि मोदक खात नाही, ते बरे आहे.. नाही तर यानी महागाईच्या नावाने लाडूही वाटाण्याइतके करुन देवाला अर्पण केले असते.
फुलांच्या किमती वाढल्या
फुलांच्या किमती वाढल्या म्हणून रडारड करण्यापेक्षा बाजारात फुले विकायला बसून चार पैसे मिळवावेत की.. ( नंतर त्याच पैशातून हापूस घेऊन खाता येतील.)