टवाळखोरी -१

Submitted by राजेंद्र क्षत्रिय on 7 November, 2012 - 12:03

अकोल्याजवळ वडांगळी नांवाचे छोटेसे गांव आहे. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी वडीलांची तेथे बदली झाली तेव्हा मी दुसरीत व माझा मोठा भाऊ तिसरीत होता. गांवात आम्ही नविनच होतो. गांवाच्या एका बाजुला वाड्यासारख्या एका घरात आम्ही राहात होतो. घरापासून थोड्याच अंतरावर आमची शाळा होती. शाळेत जाताना मुख्य रस्त्यावर चार-पाच टपरीवजा दुकाने होती. तेथे भेळ-भत्ता, लाडू, जिलेबी अशा खाद्यपदार्थांचे एक दुकान होते. जमिनीवर बांबू, लाकडी खांब वगैरे रोवून दोन-अडीच फूट उंच असा लाकडी चौथरा तयार केलेला होता. वर ताडपत्रीचा पाल बांधून छत केलेले होते. चौथऱ्याला चारही बाजूने गोणपाट बांधलेले असे. दुकानात मध्यभागी दुकानाचा मालक बसायचा. त्याच्या पुढील तीनही बाजूंना शेव, पापडी, चिवडा, गोडीशेव असे सर्व पदार्थ परातीमध्ये गंज रचून ठेवलेले असत.

रोज शाळेत जाताना व शाळेतून येताना आम्ही त्या दुकानावरून जात असू.
एकदा शाळा सुटल्यावर त्या दुकानाजवळून जात होतो. सहज भावाचे लक्ष शेव ठेवलेल्या परातीकडे गेले. परातीत शेवेची जी चळत होती, ती ढासळू नये म्हणून त्याभोवती वर्तमानपत्राचा कागद गूंडाळून त्यावर मागील बाजूस गोणपाट लावलेले होते. त्या गोणपाटाला छोटे छोटे छिद्र होते. भावाच्या मनांत काय आले कुणास ठाऊक, तो हळूच वाकून त्या परातीजवळ गेला. आणि त्या छिद्रांत बोट घालून शेव काढू लागला. त्याला तसे करताना बघून मी घाबरलो. त्याचा एक हात ओढून त्याला तसे न करण्यास विनवू लागलो. पण तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. दुकानाचा मालक आमच्या उंचीपेक्षा जास्त उंच असलेल्या चौथऱ्यावर बसलेला होता. त्याच्या समोर पदार्थांच्या पराती ठेवलेल्या होत्या. त्यामूळे त्याला आम्ही दिसण्याची शक्यता अजिबातच नव्हती. मुठभर शेव भावाच्या हातात आली. ती अर्धी-अर्धी आम्ही दोघांनी वाटून खाल्ली होती. शाळा सुटेपर्यंत खूप भूक लागत असे. त्या भुकेल्या पोटी ती शेव इतकी चविष्ठ लागयची कि, त्या शेवेपूढे लाडू, पेढेही फिके वाटावेत.

असेच एक दोन दिवसा आड नंतर रोजच आम्ही शाळेतून येताना शेव आणि शेव खाण्याचा आनंद लुटायचो. पूढे पूढे निर्ढावत गेलो. असेच एक दिवस शाळा सुटल्यावर शेव काढत असताना अचानक एक गिऱ्हाईक दुकानासमोर आले. त्याने आम्हांला शेव चोरताना बघितले. आता आपले काही खरे नाही, हा दुकानदार आता आपल्या चोप देणार आणि घरी वडीलांना कळल्यावर तेही मारणार, या कल्पनेने माझ्या पाचांवर धारण बसली. घसा कोरडा पडला. भाऊ हळूच तेथून सटकला. मी थरथरत तेथेच उभा राहीलो. तो माणूस त्या दुकानदाराला म्हणाला, "अहो, तुमचे लक्ष आहे का ? ही पोरं केव्हाची शेव चोरून खाताहेत". त्यावर दुकानदार म्हणाला, "जाऊ द्या, खाउ द्या, त्या बॅंकेतल्या साहेबांची पोरं आहेत ही". ते ऐकून मला धक्काच बसला. म्हणजे इतके दिवस हा प्रकार दुकानदाराला माहिती होता तर. मला थोडे हायसे वाटले, मी हळूच तेथून सटकलो. त्या शेव चोरीतलं थ्रील संपलं होतं. त्यानंतर जोपर्यंत आम्ही वडांगळीमध्ये राहात होतो, तोपर्यंत त्या दुकानाकडे न बघता दुकानासमोरून पळतच जात असू.

आज इतकी वर्षे झाली, अनेक वेगवेगळी खाद्यपदार्थे खाण्यात आली पण त्या शेवेची गोडी काही औरच होती. त्याची सर आता कुठल्याही पदार्थाला येणार नाही, आणि ते दिवसही आता पुन्हा येणार नाहीत.

हा मनापासून चोरी करण्याचा प्रकार नव्हता तर तो त्या वयातला खोडकरपणा होता. त्या त्या वयात थोडा टवाळखोरपणा, थोडा खोडकरपणा हवाच. बालवयात प्रौढत्व कोणाच्या वाट्याला येऊ नये.

आज सकाळी दिवाळीच्या फराळाची तयारी घरात सुरू होती. तळणांचा वास आल्यावर अचानक शेवेशी जोडल्या गेलेल्या या बालपणाच्या आठवणी जाग्या झाल्या. एका प्रायव्हेट कंपनीत मोठ्या हुद्यावर कार्यरत असलेल्या मोठ्या भावाची आठवण झाली. त्याला फोन केला पण जे बोलायचे होते, ते राहून गेले. उगीचच इकड्च्या तिकडच्या गप्पा झाल्या.

बायकोने विचारले, " आज सकाळी सकाळी भावोजींशी एवढ्या काय गप्पा मारत होते ?". म्हटलं, " तुला नाही सांगणार जा, आमचं सिक्रेट आहे.( शेवेचं)".

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडले Happy

सुरेख.......
हा जो टवाळखोर पणा आहे ना तो प्रत्येकामधे हवाचं. त्याशिवाय बालपणाला काहीच अर्थ राहत नाही.

मी लहान होता तेव्हा आमच्या शेतातल्या पेक्षा शेजारच्या शेतातल्या काकड्या, वाईकं, भाजीपाला चोरुन खायायला खुपच आनंद यायचा ............ खरं म्हणजे दुसर्‍याचं चोरुन खाण्याची मजा वेगळीच असते........

त्या शेव चोरीतलं थ्रील संपलं होतं.
>>>>>>>>
अगदी अगदी... कोणाचेही हेच झाले असते...

लहाणपणी केलेल्या अश्या बर्‍याच चोर्‍या आठवल्या या लेखाच्या निमित्ताने.

एक मित्र तर असला कलाकार होता, दुकानदाराची पाठ वळली की बरणीचे झाकण उघडून आतले चॉकलेट काढायचा... ते ही फाईव्हस्टार.. Happy

आमच्या लहानपणी आमच्या शाळेत जाण्याच्या वाटेवर एक शेतमळा होता. आम्ही मित्रमंडली पहारेकर्‍याची नजर चुकवून कालिंगडे /आंब्याच्या कैर्‍या पळवायचो ...............कधीकधी रखवालदार पाहायचा,पण आम्हाला पकडू शकत नसे ....आणि तसेही ती बाग आमच्या शिक्षकांच्याच मालकीची होती...............!