नेपाळ ट्रिप- ट्रिपनंतरचे प्रकाश चित्रमय वर्णन- क्रमशः- भाग १

Submitted by रेव्यु on 6 November, 2012 - 03:46

आम्ही नेपाळच्या ट्रिपवर आमच्या आपण जात आहोत्-सहकुटुंब
पोखरा, जोमसोम्.मुक्तिनाथ्,लुंबिनी व काठमांडू असा ९ दिवसांचा प्लॅन आहे.
येथे पहाण्याजोग्या विशेष जागा स्थळानुसार सांगाल का? तसेच शाकाहारी खादाडी, विशेष खरेदी इ' बद्दलचे माहिती मिळेल का?
तारखा आहेत ९ ते १९ नोव्हेंबर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता विमानाने उतरायला सुरुवात केली होती. त्या दोन डोंगरांच्या मधून वळसा घ्यायला सुरुवात केली. बर्फाच्छादित शिखरे नजरे आड होवू लागली. करड्या रंगांचे उत्तुंग पर्वत दिसू लागले. खाली नागसर्पासारखी डौलदार वळसे घेणारी काली गंडकी दिसू लागली. भातशेतींचे चौकोन दिसू लागले पण अजून धावपट्टी दिसत नव्हती दिसत होता एक सुळका.दोन्ही बाजूला विक्राळ पहाड होते. खाली नदी. अन दूरवर आणखी एक पहाड बुलंद दरवाजासारखा उभा होता अन त्याच्या समोर उजवीकडील पहाड संपत आला होता. त्या दोन्हींच्या मध्ये एक वळसा घ्यायचा होता आमच्या विमानाला अर्थात आमच्या वैमानिकाला.वैमानिकाने खाली उतरायला सुरुवात केली अन मग दूरवर आम्हाला उतरायचे होते त्या धावपट्टीच्या सुरुवातीचा कडा दिसू लागला. एकंदरीतच हा आगळा, श्वास रोखायला लावणारा अनुभव होता. उंची कमी होत होती. वैमानिकाचा हात सदोदित वेगवेगळ्या लिव्हर्स आणि स्टीअरिंग ( मला ते स्टीअरिंगसारखेच दिसत होते) व्यस्त होता.अन मला एकदम त्याच्या स्टीअरिंगवरील गंडा दिसला. शेवटी कुठेतरी श्रध्दा असल्याविना आत्मविश्वास येत नाही हे मात्र खरे.

विमानतळावर उतरलो अन लगेच सामान मिळाले. धावपट्टीवरच पायलट साहेबांचा आणि हवाईसुंदरीचा चहा झाला. आमच्या सामानाबरोबर परतीच्या प्रवासासाठी लागणारे एव्हिएशन पेट्रोल पण आणले होते ते पटकन भरण्यात आले अन परतीच्या प्रवाश्याना घेऊन त्या धाडसी पायलट अन त्या हवाई सुंदरीने आमच्या आणि स्वत:सारख्या धाडशी प्रवाशाना घेऊन उड्डाण भरले.
आम्ही विमानतळावरून बाहेर आलो अन आसमानात नजर फिरवली अन काय दिसत होते- बॉस ( मला हिमालयाला बॉसशिवाय काही दुसरे संबोधनच सुचत नव्हते) आमच्या कडे खाली पहात होते. वाटत होते एक पंधरा मिनिटे चालत गेलो तर त्यांचा चरणस्पर्श करता येईल.
त्या वेळेस माझ्या मनातील भावनांचे वर्णन करणे अशक्य होते. याची देही याची डोळा निसर्गाच्या सान्निध्यात एवढ्या प्रकारच्या उदात्त अनुभूतींचा प्रभाव मला भारावून टाकत होता. आपण किती भाग्यवान आहोत याची मला जाणीव होत होती आणि त्याच वेळेस मानव किती खुजा आहे याची देखील प्रचिती होत होती.
नऊ हजार फूट उंचीवर असल्याने साहजिकच बरीच थंडी होती , वारा देखील होता. पायी पायीच आमच्या ओम गेस्ट हाऊस मध्ये पोहोचलो. सुहास्य वदनाने मालकिणबाईंनी स्वागत केले. चौसोपी वाडाच होता म्हणाना! उजवीकडे सुंदर सजवलेली जेवणाची खोली होती. मधोमध स्वागत कक्ष होता व सभोवताली खोल्या होत्या. साध्या स्वच्छ खोल्या व स्वच्छ न्हाणी. आम्ही मग नेपाळी नाष्टा मागवला. तो म्हणजे बकव्हीटचे घावन ( बकव्हीटला मराठी प्रतिशब्द काय ?? शब्दकोशात तोच इंग्रजी शब्द मराठीत लिहिला आहे!!) आणि बरोबर बटाट्याची भाजी. निसर्गसौंदर्याने डोळे तुडुंब भरले होते ,पोट नाही. शेवटी मूलभूत गरजा आणि जिभेचे लाड पाठ सोडत नाहीत हो!
नाष्टा उरकला अन जरा जीव अन पोट भांड्यात पडले (की नाष्ट्याच्या प्लेटीत पडले?) या निसर्गसौंदर्याच्या पंक्तीप्रपंचात पोटाला पंगतीत बसवायचे राहूनच गेले होते.
मग शिशिरने सांगितले आता आपण मार्फा या नेपाळ मधील मुस्तांग जिल्ह्यातील गावात जाणार आहोत. मार्फा एक सुंदर खेडे आहे. जोमसोम पाशी वाहणार्यात गंडकी नदीपलिकडे ते वसले आहे. पण तिथे बसमधून जायचे होते.साधारण ८ किलोमिटर अंतरावर आहे. जाताना बसमधून जायचे होते व परतीचा प्रवास पायी करायचा बेत होता. साधारण ११-३० वाजले होते. अन मग बाजारात बसची वाट पाहत उभे राहिलो. इथे बस आहेत पण रस्ते नाहीत म्हणजे काय हे खालील फोटो पाहिल्यावर कळेल
बस स्टॉप
मी नेपाळी लागली ब्रह्मानन्दी टाळी
पण सगळ्यात गंमतीच्या आणि नेपाळबद्दलच्या संथ जीवनासंबंधी विमानतळावरील लिहिलेल्या सूचनांचा आम्हाला येथे अनुभव येवू लागला. एक बस आली . बस कसली – एक खटाराच म्हणा ना! पण या खडकाळ भागात, रस्तेविहीन भूभागात, “हम जिधर चलते है, रास्ता खुद ही बन जाता है”- याची प्रचिती आली. या ओसाड गावात ए टी एम मात्र होते अन गंमत म्हणजे बाजूच्या खेड्यातून पैसे काढण्यासाठी एक प्रवासी उतरला अन मागे आम्ही सर्व वाट पाहू लागलो- दहा पंधरा मिनिटे झाली पण पत्ता नव्हता- पण आमच्या शिवाय कोणीही अस्वस्थ झाले नव्हते- कंडक्टर सुध्दा “ येईल ,येईल” म्हणत बसमध्ये नेपाळी गाणी ऐकत बसला होता. वरच्या चित्रांतील ३) नंबरचा प्रवासी एक पव्वा टाकून बसला होता व त्याची ब्रह्मानंदी टाळी लागली होती. काही वेळाने मग आमच्या कडे पहात “या परदेशी पाहुण्यांसाठी “ त्याने “ परदेशी पर्देशी जाणा नही “ ही सी डी लावली , त्या एटीएम वाल्याच्या मित्रांनी त्याला मोबाईलवरून घाई केल्यावर वीस एक मिनिटांनी स्वारी अवतीर्ण झाली. मग बस सुरू झाली.
मार्फा हे एका प्रचंड पहाडामागे, आपले सुसाट्याच्या वार्यातपासून आणि धूळीपासून बचाव व्हावा म्हणून एक नैसर्गिक आडोसा घेवून वसलेले खेडे आहे.बर्याीपैकी मोठे असलेले, थकाली धर्तीचे हे गाव आहे. या गावातील घरे वैशिष्ट्यपूर्ण थाक खोला धर्तीच्या स्थापत्य शास्त्राप्रमाणे बांधलेली आहेत.घरांची छते पार सपाट असून गावात वार्यााचा शिरकाव होवू नये म्हणून चिंचोळ्या गल्ल्या आहेत. या भागात पाऊस खूप कमी होतो कारण ढग येथील पर्वत ओलांडून पोहोचू शकत नाहीत. छ्ते सपाट असल्याने ती धान्य व भाज्या वाळविण्यासाठी सोयीस्कर ठरतात.हे खेडे खूप शांत, प्रसन्न असून याच्या फरसबंदी केलेल्या रस्त्यांखालून ड्रेनेज बनवले गेले आहे. गावात वाचनालय आहे, शाळा आहे, गावाच्या दोन्ही दिशेतील प्रवेशद्वारांवर ’कानी’ म्हणजे कमानी आहेत. गावात एका जपानी पर्यटकाचे स्मारक आहे.
गावाच्या दुसर्यां दिशेस सफरचंदाच्या बागा आहेत.येथील सफरचंदे सर्वोत्कृष्ट समजली जातात पण दळणवळणाची सुगम साधने नसल्याने काठमांडूपर्यंत फारच कमी पोहोचतात. गावात एक प्रेक्षणीय “गोंपा” म्हणजे मोनॅस्ट्री आहे. ही १९९६ साली आणखी मोठी करण्यात आली.
तर अशा सुंदर गावात आम्ही १२-३० पर्यंत पोहोचलो. अन हळू हळू मार्गोत्क्रमण करू लागलो. उजव्या दिशेस पहारा देणारे पिवळे, काळे आणि रेताळ डोंगर, सफरचंदाच्या बागा,गावात लहान लहान दुकाने सर्वकाही मनमोहक होते. गावाच्या दुसर्यास टोकास , रमत गमत ३ तास लागले. वाटेत फोटो घेतले, चहा झाला, सफ़रचंदांच्या बागेत गेलो, हवी तेवढी सफ्रर्चंदे खाल्ली( तिथेच ते ब्रॅंडी सुध्दा बनवत होते. मग एका रेस्तरॉंमध्ये जेवण झाले. जागो जागी निवांतपणे वाचत बसलेले, नुसतेच हिंडणारे विदेशी ( म्हणजे गोरे) पर्यटक होते, भारतीय आमच्या शिवाय आणखी कोणी दिसले नाहीत.
गावाच्या शिवेवर ४-३० च्या सुमारास पुन: पोहोचलो.परतीचा चालत जाण्याचा कार्यक्रम रद्द केला. तिथे एक खोपटेवजा दुकान होते व आत दुकानदार बसची तिकिटे विकत होता. अन दहा एक मिनिटात जो सुसाट्याचा वारा सुरू झाला की उभे राहवेना. प्रचंड थंडी होती. धूळ उडत होती अन बस बर्यानच वेळ न आल्यामुळे त्या खोपटात गर्दी झाली होती. तिथल्या टी व्ही वर नेपाळीत डब केलेला एक दक्षिण भारतीय चित्रपट चालू होता. काय विनोदी सीन होता!
थोड्या वेळात बस आली आणि आम्ही ६ वाजेपर्यंत जोमसोमला पोहोचलो. प्रचंड थंडी होती. जेवायच्या खोलीत एक आयरिश शाळेतील मुख्याध्यापक ( त्याचा मुलगा सायकलवरून ट्रेकला गेला होता), एक फ्रेंच कृषि शास्त्रज्ञ ( तो नाशिकला देखील आला होता आणि त्याने विदर्भातील परिस्थितीचा आणि शेतकर्यांवना हलाखीचे दिवस येतील असा अहवाल महाराष्ट्र सरकारला २००२ दोन साली दिला होता- त्याच्या म्हणण्याप्रमाणे) आणि आम्ही जेवायला एकत्र बसलो- देशांतराच्या गप्पा झाल्या. जवळीक वाढत होती. शेवटी १० च्या सुमाराला उबदार रजईत घुसलो. बाहेर चिडिचुप्प झाले होते. काचेतून बाहेर हिमालयाच्या सावल्या दिसत होत्या. डोळा केव्हा लागला कळले नाही

दिनेश दा, अश्विनी मामी.आंग्रे जी
धन्यवाद
पुढच्या ३ -४ दिवसात टाकतो /पण एकंदरीत तुम्ही सोडलात तर प्रतिसाद म्हणावे तसे मिळाले नाहीतच.
असूदे

रवीसाहेब, तुम्ही जे लिहिलंय ते एकदम मस्तच आहे, फोटोही भारी आहेत, पण वेगळ्या/ स्वतंत्र धाग्यावर का नाही टाकत/ हलवत ? सुरवातीच्या पोस्ट वाचून बहुतेक वाचकांचा असा समज होत असेल की नुसतीच माहितीची देवाण घेवाण दिसती आहे या धाग्यावर.....

बाकी, मी सगळे वाचून काढले- मस्त लिहिलंय, फोटोही अप्रतिमच......

छान लिहिताय आणि फोटो ही मस्तच आहेत.
शक्य असल्यास वेगळा धागा काढा ना.. म्हणजे वाचतांना एक सलगता येईल.
प्रचिंना क्रमांक द्या म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रचि चा उल्लेख करणे सोप्पे जाईल.

काही मदत हवी असल्यास नक्की सांगा.

एक प्रश्न - नेपाळा मधे भारतीय करन्सी चालते असे ऐकुन आहे पण ते लोक ५०० आणि १००० च्या नोटा स्विकारत नाहीत. खर का?

वर सफरचंदाच्या बागेच्या फोटो नंतर जो डोंगरातला एका गुहा/लेणि सारखा फोटो आहे ते प्रत्यक्षा काय आहे?

छान लिहित आहात तुम्ही .. अगदी मी स्व्ताच तिथे आहे असे वाटत आहे .. खरच तुम्ही वेगळा धागा मधे हे लिहा न म्हणजे सलगता येइल वाचतांना .. तिथली संस्क्रुती खाद्य संस्क्रुती बद्दल अधिक माहिती देता आली तर ते लिहा ... वाचायला आवडेल...

रेव्यु.. तुम्ही वेगळा धागा काढाच.. किंवा आहे तोच धागा संपादन करुन तुमच्या पोस्ट मधला मजकूर धाग्यात हलवा... धाग्यात वाचायला नसल्यामुळे गोंधळ उडू शकतो... तुम्ही लिहिलेले सगळे प्रतिसादात आहे... ते धाग्याचा मजकूर म्हणून आले पाहिजे..

रेव्यु...

मस्त लिहिताय.... पण प्रत्येक फोटोची जरा खासियत लिहिलित तर मजा येइल... वेगेळा धागा काढा ह्या पुढच्या वृत्तांता साठी....

एकंदर मस्त चाललय.... एकुण निसर्ग दर्शन हाच मुख्य उद्देश.... हिमालय मस्त टिपलात. माउंट एव्हरेस्ट च्या फोटोवर तसे लिहा म्हणजे कळेल.

खूप छान वर्णन केलं आहे अद्भुतरम्य नेपाळ, पोखरा आणि हिमालयाचे पण..फोटो पण अगदी सुंदर टिपलेत..

"That's the thing about books.They let you travel without moving your feet"
-Jumpha lahiri (Bengali author)

अगदी असच वाटतं प्रवास वर्णनं वाचताना.

एकूणच तुम्हाला तुमच्या प्रवासात आणि जीवनप्रवासात चांगली माणसे भेटली किंवा वाईट अनुभव आले असतील तरी ते आपल्या लक्षात राहात नसावेत....
चांगुलपणा जपणारी माणसंच कायम मनात घर करून राहतात...

Pages