महाराष्ट्र हे नाव उच्चारले की सगळ्यांच्या समोर उभा राहतो तो सह्याद्री आणि श्रीशिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेले किल्ले. या प्रत्येक किल्यांनी प्राचीन, अर्वाचीन आणि मध्य युगीन काळात अत्यंत महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती...परंतु जेव्हा युद्धामध्ये विमानांचा वापर वाढला तेव्हा किल्यांचे महत्व कमी झाले. तसेच तेथील देवी देवतांचे महत्व देखील कमी झाले परंतु आजसुद्धा या देवीदेवातांमुळेच हे गड आणि किल्ले टिकून आहेत. याच किल्यांवरील देवी देवता यांची आपण माहिती बघणार आहोत.
महाराष्ट्राचा देव्हारा हा अतिपुरातन आहे. प्रागैतिहासिक काळापासून हा गजबजलेला आहे. महाराष्ट्रात कोणत्याही खेड्या-पाड्यात जा किंवा कोणत्याही मोठ्या शहरात किंवा कोणत्याही डोंगराच्या कुशीत किंवा सह्याद्रीच्या पठारांवर तुम्ही जर बघितले तर तुम्हाला विविध देवी देवता आढळून येतील. अश्याच अनेक देवी देवता या प्रत्येक किल्यावर आढळून येतात. बऱ्याचदा तुम्हाला असे देखील आढळून येईल की किल्यांची नावे ही त्या किल्यावरील किंवा गडावरील देवी आणि देवतांच्या नावाने त्या किल्यांचे नामकरण करण्यात आलेले आहे किंवा त्या गडावरून त्या देवीची किंवा देवाची स्थापना करून त्या देवी देवतांना नावे दिली आहेत.
आज या किल्यांवर तुम्ही गेलात तर तुम्हाला त्या किल्याचे नाव हे त्या गडदेवतेवरून दिसेल. तसेच या गड किल्यांवर इतर अनेक देवी किंवा देवतांची मंदिरे देखील असतात परंतु पहिला मान हा त्या किल्यावरील देवतेचा असतो आणि आजदेखील तो मान हा किल्याखालील गावांमधून त्या गडदेवीला किंवा देवतेला मिळतो. या किल्याखालच्या वाड्यांमधून किंवा गावातून त्या गडदेवीचा किंवा देवतेचा उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात होतो.
गड आणि किल्यांवरील देवी देवतांची नावे देखील अत्यंत वेगवेगळ्या स्वरुपाची असतात. जसे की मेंगाई, भोराई, पद्मावती, कर्णाई, शिवाई, जीवाबाई, अशी विविध देवींची नावे आणि रूपे आपणांस बघावयास मिळतात. तसेच काहीवेळेस त्याठिकाणी देवता देखील असतात कुकडेश्वर, कपर्दिकेश्वर, भुलेश्वर, रायरेश्वर, जगदीश्वर ई. किल्यांवरील या देव्हाऱ्यातील दैवते नाना प्रकृतीची आहेत. त्यांना बऱ्याचदा आकृतीही नसते. तसेच तुम्हाला किल्यांच्या द्वाराजवळ किंवा किल्यावर किंवा गडावर मारुतीरायाचे एखादे छोटेसे देऊळ हे असतेच बऱ्याचदा हे किल्याच्या पायथ्याशी किंवा किल्यावर असते तेथेच हा हनुमान एखाद्या पाषाणात कोरेलेला दिसेल नाहीतर मग एखादा खडक वैशिष्ट्यपूर्ण तासून या मारुतीरायाची निर्मिती केलेली आपणास पहावयास मिळते.
शंभू महादेव जसे सह्याद्रीचे अधिष्ठान तसेच किंबहुना आदिशक्तीचे देखील अधिष्ठान आहे. सातवाहन, शिलाहार, राष्ट्रकुट, भोज, अश्या विविध राज्सात्तांच्या काळात त्या त्या दैवतेला महत्व होते परंतु इ.स १७ व्या शतकात शिवाजीमहाराजांच्या काळात या देवी दैवतांना जास्त महत्व प्राप्त झाले. शिवाजीमहाराजांची कुलदेवता श्री आदिशक्ती तुळजाभवानी देवी होती. त्या देवीचे मंदिर तुळजापूर येथे होते आणि त्या वेळी तुळजापूर आदिलशाहीत होते. त्यामुळे महाराजांच्या मनात जरी श्री तुळजाभवानीचे दर्शन घेण्याची इच्छा असली त्रि त्यांना ते स्वराज्यकार्यामुळे अशक्यच होते. त्यांनी त्या वेळचा धामधुमीचा काळ लक्षात घेऊन आपल्या कुलदेवतेचे मंदिर स्वराज्यातील एखाद्या गिरीदुर्गावर बांधण्याचे योजले आणि त्याप्रमाणे त्यांनी प्रतापगडाची निवड केली.
महाराष्ट्र हा शक्तीचा पुजारी आहे. शक्ति म्हणजे देवी म्हणजे साऱ्या जगाची आई. ही आदिशक्ती आपल्याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या रुपात दिसते. ती कुलदेवतेचे रूप घेऊन कुलांचा सांभाळ करते, तर कधी ग्रामदेवीचे रूप घेऊन गाव राखते. पदूबाई, कळमजाई, फिरंगाई, मेसाई, मुक्ताई, तुळजाई अशा कितीतरी विचित्र नावांनी ती महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात नांदते आहे. कुठे डोंगराची स्वयंभू कपार, कुठे अनघड तांदळा, कुठे उभी शीला तर कुठे सर्व अवयवांनी नटलेली मूर्ती अशा अनेक रूपांनी तिची पूजा होते.
सह्याद्रीतील गड किल्यांवरील देवीदेवताना असे भाग्य लाभत नाही. जुन्नर जवळील जीवधन किल्यावरील जीवाई देवी तसेच तिकोना किल्यावरील हनुमान अजूनही तसेच उन्हामध्ये उभे आहेत. तर लोणावळ्याजवळील घनगड किल्यावरील गारजाई देवी ही मंदिरात तर वाघजाई देवी ही गुहेत स्थानापन्न आहे. बऱ्याचदा किल्यांवर जशी देवीची रूपे बघायला मिळतात तसेच मारुतीरायाची रूपे देखील बघायला मिळतात. यामध्ये काहीवेळेस हा हनुमान भिंतीत कोरतात किंवा महादरवाजाजवळ मारुतीराया आपणास दिसून येतो काही ठिकाणी या मारुतीरायाला राक्षसाला मारताना दाखवले आहे तर काहीवेळेस या मारुतीरायाला मिश्या असलेल्या रुपात आपणास तुंग आणि सुरगड या किल्यांवर बघता येतात. मारुतीराय हे देखील शक्तीचेच रूप आहे.
काहीवेळेस आपल्याला या गडदेवतांमध्ये गणपतीची देखील मूर्ती बघण्यास मिळते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोरीगड या किल्यावर जाताना आपल्याला एक गुहा लागते त्या गुहेमध्ये गणपतीबाप्पा विराजमान आहेत. ही गणपती बाप्पांची मूर्ती अत्यंत सुबक आहे. तसेच नाणेघाट उतरताना देखील गणपती बाप्पा आपल्याला बघायला मिळतात. हरिश्चंद्र गडावर तर गणपती बाप्पांची मोठी गुहा ही गणेशगुहा म्हणून ओळखली जाते या गुहेत गणपती बाप्पांची मूर्ती साधारणतः ८ फुट उंचीची आहे.
सह्याद्रीच्या कडेकपारीत निवास करणाऱ्या या देवतांबद्दल ग्रामस्थांकडे अनेक कथा प्रचलित असतात. मुरबाडनजीकच्या सिद्धगडावरील नारमाता देवीबद्दल माचीवरील ग्रामस्थ वेगळीच कथा सांगतात. नारमाता आणि कळंबजाई दोघी भीमाशंकराच्या भगिनी. देवीचा अभ्यास सांगतो की ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या पत्नी स्वरूपात सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती आहे. दुर्गा म्हणून जी रूपे आहेत ती मुख्यत: पार्वतीची. पण सिद्धगडावर नारमातेला शंकराच्या भगिनी संबोधले आहे. नारमाता सिद्धगडावर तर कळंबजाई भीमाशंकरला. सिद्धगडावरील पुजारी कळंबजाईच्या पूजेला गेले तर पालखीचा पहिला मान त्यांना दिला जातो. माळशेज घाटातील भैरवगडावर आदिवासींची देवी आहे, अर्थातच तांदळा. त्याला चांदीचे डोळे, पाळणा दिला जातो.
बऱ्याच ठिकाणी नावांचा उलगडा किल्ल्याच्या आधारे देखील होत नाही. जसे नारायण गडावरील हस्ताबाई. तोरणा किल्ल्यावर मेंगाई आणि तोरणजाई अशा दोन देवींच्या मूर्ती आढळतात. तसेच राजगडावर देखील तीन देवींचा उल्लेख येतो जनानिमाता, पद्मावती, आणि काळेश्वरी सुवेळा माची आणि संजीवनी माचीला जोडणाऱ्या वाटेवर एका कुंडापाशी ही काळेश्वरी आहे. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई म्हणजे कळसू देवीचे स्थान. कळसूबाईचा इतिहास म्हणजे एक दंतकथा आहे. प्राचीन काळी कळसू नावाची कोळ्याची मुलगी होती. ती पाटलाच्या घरी कामाला होती. कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला अट घातली होती की, मी केर काढणे व भांडी घासणे सोडून इतर कामे करीन. एकदा पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले.पाटलाने कळसूला भांडी घासायला लावले, त्यामुळे चिडून कळसू डोंगरावर जाऊन राहू लागली. तोच कळसूबाईचा डोंगर होय. येथे देखील मूर्ती नसून भला मोठ्ठा तांदळा आहे.
महाराष्ट्रात सुमारे ३५० च्या आसपास किल्ले आहेत. सर्वच किल्ल्यांवर देवीचे स्थान नाही. बारा मावळातील किल्ल्यावर मात्र हमखास देवीची मूर्ती पाहायला मिळते. बऱ्याचदा वेगवेगळ्या गावांमधून किंवा पंचक्रोशीतून आपल्याला वेगवेगळ्या कथा ऐकायला मिळतात. काही लोक कथा असतात तर काही दंतकथा अर्थात अशा माध्यमातून का असेना पण या दैवतांची माहिती आज उपलब्ध होत आहे. या साऱ्याच विषयाचा आवाका प्रचंड आहे. मूळ संदर्भ न मिळणे, ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध नसणे असे अनेक अडचणींचे डोंगर आहेत. या सर्वातून मार्ग काढत या विषयाचा पाठपुरावा होणे गरजेचे आहे. अन्यथा डोंगरमाथ्यावरीलही ग्रामदैवतांच्या इतिहासास आपण पारखे होऊ.
छान धागा
छान धागा
छान धागा :-)
छान धागा

खुप छान माहिती रतनगडावर
खुप छान माहिती

रतनगडावर सुद्धा रतनदेवीची तांदळा मुर्ती आहे.
सुंदर माहिती
सुंदर माहिती
अनुराग.. हे सगळे तू लिहीलेस
अनुराग.. हे सगळे तू लिहीलेस का ?? इतकी छान माहिती कुठून मिळवली.. ??
माहिती आवडली. धन्यवाद.
माहिती आवडली. धन्यवाद.
http://www.lokprabha.com/2012
http://www.lokprabha.com/20121019/navratri_09.htm
दुसर्याच्या लेखातून दोन चार परिच्चेद उचलून धागे काढणार्यांना प्रशासनाने आता एक नवा सेक्शन उपलब्ध करुन द्यावा... असे लोक आणि लेख वाढत आहेत.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/37913
अनुराग, तुझ्याकडुन हि अपेक्षा
अनुराग, तुझ्याकडुन हि अपेक्षा नव्हती.
इथे पोस्ट करण्याआधी निदान त्या लेखातील फोटो आणि त्यावरची नावे तरी पहायची. दोन मायबोलीकरांनी काढलेले फोटोच त्या लेखात आहे (अगदी नावासहित) आणि तोच लेख शब्दबदल करून इथे टाकलास. श्री. सुहास जोशींनी रीतसर परवानगी घेऊनच हे फोटो लेखासोबत प्रदर्शित केले होते.
हे बघ गुगलसर्च केल्यावरही सहज सापडते.
पहिला लेखः (श्री. सुहास जोशी (वरीष्ठ उपसंपादक/वार्ताहर "लोकप्रभा"))
गडकिल्ल्यांवरच्या देवी - Lokprabha.com
www.lokprabha.com/lokprabha/20121019/navratri_09.htm
दुसरा लेखः (भटक्या अनुराग)
किल्यांवरील देवी देवता...!!! | Maayboli
ज्याने http://www.maayboli.com/node/37913 हा धागा काढला त्याच्याकडुन तरी निश्चितच हे अपेक्षित नव्हते.