बस डे वरती पुणे भाळले

Submitted by निशिकांत on 3 November, 2012 - 00:21

(बस डे चे टीव्ही वरील वार्तांकन पाहून सुचलेली कविता)

सत्कर्माचे रोप लागले बघता बघता
बस डे वरती पुणे भाळले बघता बघता

कधी नव्हे ती गाड्यांना अंघोळ लाभली
हरेक गाडी नजरेमध्ये भरू लागली
रूपवतींनी लक्ष वेधले फिरता फिरता
बस डे वरती पुणे भाळले बघता बघता

रुंद केवढे रस्ते इथले ! आज उमगले
किती सुखावह तुरळक ट्रॅफिक मला समजले
बरे वाटले श्वास मोकळे भरता भरता
बस डे वरती पुणे भाळले बघता बघता

नको पक्ष अन् विपक्ष, सारे एकमताने
भाग्य लिहू या आपण अपुले विश्वासाने
पंखांना बळ आज लाभले उडता उडता
बस डे वरती पुणे भाळले बघता बघता

जसे वाहिले उपक्रमाच्या दिवशी वारे
तसेच वागू भान ठेउनी सदैव सारे
स्वप्न जागऊ मनी आगळे जगता जगता
बस डे वरती पुणे भाळले बघता बघता

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users