या शहरात,
इंद्रियांची भूमिका
विस्तारते क्षणोक्षणी.
देह शिणत नाही.
पण, जीव शिणतो नेमाने.
इथेही आहेत
वारुळांचे चक्रव्युह,
सनातन वेदनांचे
अमानुष पर्याय,
गिधाडं-प्रेतांच्या
बेगुमान वस्त्या,
सावलीला दिवस
आणि
करुणेला रात्र.
इथे
काळोखाच्या ओठांतून,
बर्फाळ प्रार्थनाही
वाहत जातात,
अवरोधाच्या उगमाकडे.
भळाभळा अस्तित्व सांडत
गर्दी जगत रहाते,
होकार नकारांमध्ये
अडकलेल्या
ऐतिहासिक आवृत्त्या...
इथल्या किंकाळीतच,
नग्न आत्म्याचा देह
वस्रांसकट जन्म घेतो.
भयमग्न आवेगात
देह नग्न होतो.
आत्मा वस्र घेतो...
या गर्दीतच माझाही
चेहरा असतो हुबेहूब.
सुरा घेतलेले तरुण आणि
फुलं माळलेल्या बायकांमध्ये.
आणि मी असतो,
काळोख जगणारया शरीरात,
भूकेच्या टोलांवर,
जीवाला झोके देत.
सर्वांसह, स्वतःच्या
खुनाचे निर्विकार
कट रचत.
मनातल्या मनात मात्र,
पलिकडचे डोळे
खुणावून सांगतात,
'हे संदर्भ मिटले जावेत.
ही नियती पुसली जावी.
मौनाची रौद्र गाज
रक्तातून कानी यावी.
पैलु पाडलेल्या मुठींना
शुळांचे कोंभ फुटावे.
बंद देहाच्या अवयवांनी
दार मोकळे करावे.
माझाही व्हावा सर्वनाश
माझ्याशिवाय.'
तेव्हा शुभ्र शांततेच्या
एकांतात खुंट तोडुन,
बेहोष वेदनेत मी
सुगंध नाचवत नेईन,
क्षितिजाच्या पारावर
जिवंत होईल,
रख्स-ए-बिस्मिल!
(पूर्वप्रकाशित: नवाक्षर दर्शन, जुलै २०१२)
सुरुवातीची वेदनादायी भग्न
सुरुवातीची वेदनादायी भग्न उद्विग्नता पोहोचली आणि नंतरचा आशावादही.
या गर्दीतच माझाही
चेहरा असतो हुबेहूब.
सुरा घेतलेले तरुण आणि
फुलं माळलेल्या बायकांमध्ये.
यासारख्या ओळींनी कविता मनाची पकड घेते. आवडली.
सुरेख !
सुरेख !
कविता फार आवडली. अद्वैतपर
कविता फार आवडली.
अद्वैतपर वाटली.
रख्स-ए-बिस्मिल च्या ऐवजी रक्स-ए-बिस्मिल हवेय खरेतर.
धन्यवाद.
Sunder... Ani kalat ahe
Sunder... Ani kalat ahe kontya kaptanachi ahe te!
Awadlich!
कविता आवडली..
कविता आवडली..
सुंदर. जबरदस्त. आणि कप्तान
सुंदर. जबरदस्त.
आणि कप्तान इतक्या चांगल्या कविता करू शकण्याची क्षमता असताना उगाच 'कप्तानी ओळख' त्यागून आपले जहाज इथे तिथे का हाकारतो? असाही प्रश्न पडतोय.
वाह !
वाह !