नवे रूप कोजागिरीच्या परी..

Submitted by प्राजु on 29 October, 2012 - 06:38

खुळ्या सावळ्या या नभाला कळेना,
कुठूनी असा साज हा रंगला
इथे मेघ थोडे तिथे मेघ थोडे,
हळूवार कापूस का पिंजला?

तिन्ही सांज होता कशाने अचानक
दिगंतावरी आज लगबग उडे
हळू केशरा सोबतीने नभावर
कुणी शिंपले चांदवर्खी सडे

पहा चांदवा आज भासे निराळा,
जणू चेहरा हा तुझा लाघवी
तुझी पौर्णिमा मीच होऊन येता,
मिठी आज ही का मला लाजवी?

तिथे अंबरी रंगला खेळ अवघा
कसा चंद्र तेजाळूनी धुंदला
इथे मखमली स्पर्श फ़ुलताच देही
नव्यानेच एकांतही रंगला

नव्या चांदव्याचे नवे रूप लाघव,
नभी शुभ्र कोजागिरी पौर्णिमा
तुझे सूर गुंफ़ून देहात माझ्या
जणू अवतरे सुरमयी स्वर्णिमा

तुझे आणि माझे जुने प्रेम झाले
किती दाट त्या घट्ट सायीपरी
तरी केशराचा नवा गंध देतो
नवे रूप कोजागिरीच्या परी

-प्राजु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सु रे ख! Happy

तुझी पौर्णिमा मीच होऊन येता,
मिठी आज ही का मला लाजवी?
>> किती गोड Happy

जणू अवतरे सुरमयी स्वर्णिमा >>
स्वर्णिमा चा अर्थ कळला नाही.

कोजागिरी >>> हा शब्द कोजागरी असा आहे ना? पण कवितेत चालत असावा.

तुझे आणि माझे जुने प्रेम झाले
किती दाट त्या घट्ट सायीपरी
तरी केशराचा नवा गंध देतो
नवे रूप कोजागिरीच्या परी

व्वा प्राजु, चंद्रमाधवीचे शब्द.