दिन बुडला

Submitted by उमेश वैद्य on 25 October, 2012 - 10:52

दिन बुडला

श्वासांच्या शुभ्र प्रकाशी
मी तुझी आळविली गीते
दिन बुडला किरणे गेली...
संपले आपुले नाते

जे उरले काही ओठी
मागतेस ते ही आता
देतांना असले देणे
हृदयात कसेसे होते
दिन बुडला किरणे गेली...

धुसरशा जगण्यामध्ये
मी जहाज भरकटलेले
शेवटी पिंजुनी पडले
ते शीड तुझे ग होते
दिन बुडला किरणे गेली....

तू उभे आणि मी आडवे
स्पर्शांचे विणले धागे
निघताना माझ्यापाशी
एकही वस्त्र ना होते
दिन बुडला किरणे गेली....

हे ठरले होते आधी
की दोन दिशांना जाणे
चोचीत घेतले भरूनी
जे मिळून टिपले दाणे
दिन बुडला किरणे गेली....

उ. म वैद्य. २०१२

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users