घनगड आणि तेलबैला

Submitted by सौमित्र साळुंके on 25 October, 2012 - 09:22

घनगड आणि तेलबैला

भेट दिलेले दुर्ग: घनगड आणि तेलबैला

दिनांक: २० व २१ ऑक्टोबर २०१२

दुर्गयात्री: १. आतिश नाईक, २. किशोर सावंत, ३. सौमित्र साळुंके

------------------

लोणावळ्याच्या साधारण दक्षिणेला ३५ किलोमीटरवर घनगड स्थित आहे. गडाची उंची समुद्र सपाटीपासून ७९४ मीटर असून गड पायथ्यापासून २०० मीटर उठावला आहे.

१९ तारखेच्या रात्री साडे अकराच्या मुंबई (बोरीवली डेपो) – स्वारगेट एशियाडने मध्यरात्री अडीच वाजता लोणावळा डेपोत पायउतार झालो. भाम्बर्डे (बऱ्याच ब्लॉग्जमध्ये या गावाचा उल्लेख भाम्बुर्डे असा आढळला आहे) गावी जाणारी एस.टी नऊ वाजताची असल्याने सकाळी सात वाजेपर्यंत थोडी विश्रांती घेतली. डेपोकडे तोंड करून उभे असल्यास आपल्या डाव्या हाताला सगळ्यात शेवटी पाण्याची व्यवस्था आहे. इथे दंतमंजन इत्यादी उरकावे. अलीकडच्या ‘सुलभ’ मध्ये पाणीसुद्धा सुलभ किंबहुना मुबलक आहे तेव्हा चिंता नसावी. हे विस्ताराने लिहिलं कारण घनगड, कोरीगड, तेलबैला असे गिरीदुर्ग तसेच निसर्ग भटकंतीची काही ठिकाणे गाठण्यासाठी आधी लोणावळा डेपो गाठावा लागतो. बेस विलेज असतं तसा हा बेस डेपो.

लोणावळ्याहून भाम्बर्डेला जाणारी हि महामंडळाची लाल डबा बस हे एक जागतिक आश्चर्य होऊ शकतं. साल्तर खिंडीच्या अलीकडेच डाव्या बाजूचा रस्ता पकडून मौजे तिस्करी मार्गे, मुळशी जलाशयाची एक जीभ डावीकडे ठेऊन संपूर्ण डोंगर रांगेला वळसा घालून भाम्बर्डेला पोहोचते. हा गाडीमार्ग इतका अरुंद आणि उंच सखल आहे कि या मार्गावर सार्वजनिक वाहन चालवणे निव्वळ मास्टरीचं काम आहे. आतिशची प्रतिक्रिया मार्मिक होती. म्हटला इथे एस. टी.ला सुद्धा ट्रेक करत यावं लागतं. असो, मार्गे तिस्करी, रस्त्याची मस्करी बघत आम्ही सव्वा अकराच्या सुमारास भाम्बर्डेत दाखल झालो. (लोणावळा ते भाम्बर्डे गाडी भाडे – रू. ११४ तिघांचे)

इथून एक गाडीवाट वळसा घेऊन थेट एकोले या घनगडाच्या पायथ्याच्या गावी जाते. डावीकडे नवरा-नवरी-भटोबाचे सुळके आपलं लक्ष हमखास वेधून घेतात. उजवीकडे शेतभर नाचणी आणि भात झुलत असतो. एकोले गावात शिरण्याआधीच डावीकडे एक ठळक पायवाट गडावर जाते. भाम्बर्डे ते एकोले अंतर पंधरा वीस मिनिटांचे आहे. तर या पायवाटेने आपण दहा-पंधरा मिनिटांत गारजाईच्या मंदिरापाशी येऊन पोहोचतो. मंदिरासमोर दीपमाळ आणि दगडात कोरलेले मारुतीराय आहेत. घनगडावर मुक्काम करावयाचा झाल्यास हे मंदिर उत्तम आहे.

पुढे गेल्यावर एक लोखंडी शिडी दिसते. इथून घनगडाचा कडा डावीकडे ठेवून सरळ गेल्यास एक शिलाखंड जमिनीत तिरपा रुतून बसलेला दिसतो. गडाचा कडा व हि शिळा यामध्ये एका लहानश्या गुहेत वाघजाई देवीची दगडी मूर्ती आहे. त्याच्याच पुढे कड्याला बिलगून जाणाऱ्या अतिशय अरुंद वाटेने काळजीपूर्वक गेल्यास सुमधुर पाण्याचं टाकं लागतं. या इथून पुन्हा आपण शिडीपाशी यायचं. या लोखंडी शिडीवर काळजीपूर्वक चढल्यानंतर आपण गडाच्या माथ्याजवळ पोहोचतो. माथ्यावर जाणाऱ्या मुख्य दरवाज्यात प्रवेशताच वाऱ्याचे वेगवान झोत आपलं स्वागत करतात. निवांत गेल्यास एक तास आणि सरळ सरळ गेल्यास अर्धा तास एव्हढा वेळ माथ्यावर पोहोचण्यास आपल्याला लागतो. शक्यतो गडभेटी निवांत करावी. निरीक्षण, टिपण करत गड दर्शन करावे. शर्यत लावू नये.

गडाच्या माथ्यावर आज प्रचंड गवत मजले असून बरेचसे अवशेष या गवतरानामुळे गुडूप झाले आहेत. माथ्यावरून आजूबाजूचा अतिशय विस्तीर्ण प्रदेश दिसतो. घाटमाथा आणि कोकण दोहोंचे दर्शन होते. इथून तेलबैलाचे सुळके अत्यंत मनोहारी दिसतात. सुधागड हाकेच्या अंतरावर असल्यासारखा भासतो.

सदाशिवरावभाऊंच्या तोतयास या किल्ल्यावर कैद करण्यात आले होते. या हि किल्ल्याने निजामशाही, आदिलशाही आणि शिवशाही पाहिली आहे.

आपण आल्या वाटेने आपण पुन्हा एकोले गावात यायचे. इथल्या विहिरीतून भरपूर पाणी घेऊन आता खरोखर भरपूर चालण्याची तयारी करायची. जवळजवळ दहा किलोमीटर आणि तेही उंच सखल गाडी रस्ता. आम्ही जवळ जवळ पाऊणे दोन तास चालल्यानंतर तेलबैला गावाच्या किलोमीटर भर अंतरावर असताना आम्हाला वडूस्ते-लोणावळा गाडी मिळाली. लांब डावीकडे तेलबैलाच्या मागच्या बाजूला सायंकाळच्या किरणांचा कॅनव्हास आणि मित्रांची सोबत असताना दुरवर जाणारी हि वाट फुलांसारखी टवटवीत वाटू लागते.

संध्याकाळी बरोबर ६ वाजता तेलबैला गावात आम्ही पोहोचलो होतो तेव्हा आमच्या समोर सुर्यनारायण क्षितिजाहून दिसेनासे झाले मात्र त्यांची आसमंतात पसरलेली रक्तवर्णी प्रभा आम्हाला खिंडीपर्यंत पोहोचायला पुरेशी होती. साधारण पस्तीस मिनिटांत दोन्ही सुळक्यांच्या मधल्या खिंडीतल्या बहिरोबाच्या मंदिरात आम्ही पोहोचलो. या खिंडीपर्यंतची तेलबैलाची उंची ७३० मीटर असावी. वरचे सुळके तीनेकशे मीटर असावेत. बहिरोबाच्या शेजारीच पिण्याच्या पाण्याचं टाकं आहे. हे मंदिर ज्या गुहेच्या आधारे बांधलं आहे, त्या गुहेचा सुळका/ भिंत म्हणजे तेलबैला गड. या भिंतीवर तसेच समोरच्या सुळक्यावरसुद्धा आरोहण करता येतं मात्र ते सुनियोजित तांत्रिक प्रस्तरारोहणाचा विषय होत. प्रस्तरारोहण श्रेणी: अवघड

ऑक्टोबरच्या त्या रात्रीचा त्या खिंडीतला वारा मी तुम्हाला कसा ऐकवू? वाट सोपी आहे. एकदा तुमची वाट वाकडी करा.

किसान मेने नामक गावकरी आणि इतर दोन गावकरी सुद्धा इथे रात्री मुक्कामी होते. त्यांनी दिलेली नाचणीची भाकरी खाऊन त्यांच्याकडून खालच्या गावांमध्ये चमचमणाऱ्या प्रकाशदिव्यांच्या आधारे परिसराची माहिती घेतली. या वेळी वारा अक्षरशः धिंगाणा घालत होता.

दिवसभर असं उंडारल्यानंतर रात्री त्या मंदिरात मुक्काम केला. शर्ट, विंडचिटर, माकडटोपी आणि पांघरून असूनसुद्धा थंडी वाजत होती. वाऱ्याच्या उनाडक्या रात्रभर चालू होत्या.

पहाटे सहा वाजता मला जाग आली. आतिश आणि किशोर दोघेही अंथरुणातून बाहेर पडेनात तेव्हा मी बाहेर येऊन समोरच्या सुळक्याच्या पायाशी असलेल्या खोबणीत जाऊन बसलो. अंधुक उजेड, चोहोबाजुच्या डोंगरांची लाइनिंग आणि अवखळ वाऱ्याचा अथक आवेश बघत बसून होतो. थोड्या वेळाने दोघेसुद्धा बाहेर आले आणि आम्ही तिघे निसर्गाचं ते जागं होण्याचं दृश्य डोळ्यांत साठवत निशब्द उभे होतो.

उजवीकडच्या भिंतीखाली एक चूल असून प्रचंड वाऱ्यामुळे आम्ही चहा करण्याचा बेत रद्द केला आणि लोणावळ्यात न्याहारी करायची ठरवलं. पाऊणे आठ वाजता आम्ही झपझप उतरत वीस एक मिनिटांत पायथ्याशी पोहोचलो. लोणावळ्याला जाणारी वडूस्ते-लोणावळा एस. टी तेलबैला गावात सकाळी बरोबर साडे आठला पोहोचते. याच एस. टी.ने सालतर खिंड मार्गे, कोरीगडाच्या पायथ्याशेजारून, ऍम्बी व्हॆली मार्गे लोणावळ्यात पावणे दोन तासात पोहोचलो. इथून मुंबईत यायला महामंडळाच्या चिक्कार गाड्या आहेत.

टिपणे:

१. या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे प्रवास केल्यास संपूर्ण खर्च (सोबत आणलेल्या विकतच्या खाद्यपदार्थांची किंमत वगळून) रुपये तीनशेपेक्षा जास्त येणार नाही.

२. घनगडावर चूल पेटवण्यास योग्य जागा व पुरेसे सरपण मिळू शकते.

३. तेलबैलावर चूल न पेटविल्यास बरे असे माझे वैयक्तिक निश्चित मत आहे

४. सोबत दुर्बिण असल्यास या ट्रेक चा आनंद खचितच द्विगुणीत होऊ शकेल.

५. लोणावळा परिसराचा नकाशा (http://deepabhi.tripod.com/images/lonavala.jpg) आणि कंपास असल्याशिवाय घर सोडू नका

पुन्हा भेटू...

सौमित्र साळुंके

२४.१०.२०१२

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users