खेळ खेळला वजावटीचा

Submitted by निशिकांत on 22 October, 2012 - 01:52

कधी बेरजा मला न जमल्या खेळ खेळला वजावटीचा
संचय करण्या अमाप पैसा मार्ग न धरला अधोगतीचा

गणेश पूजा सदैव केली आत्मानंदी बुडून गेलो
फक्त आरती घेत असे मी मोह न धरला खिरापतीचा

तानसेन होणे ना जमले कानसेन मी दर्दी बनलो
श्रोता म्हणुनी दु:ख वाटते र्‍हास जाहला सुरावटीचा

राबराबलो शेतावर पण नोंद मालकाचीच दप्तरी
तहसिलमध्ये कोरा होता पूर्ण रकाना वहिवाटीचा

खाणे पिणे जुन्या पिढीचे कष्ट उपसणे लोप पावले
पिझा नि बर्गर नव्या पिढीचा घास जाहला गिरावटीचा

जे असते ते सत्त्य जगाला दिसून येते कधी ना कधी
असे असूनी चेहर्‍यास का ध्यास असावा सजावटीचा

टीव्हीवरच्या कैक मालिका कथानकाविन मस्त चालती
गोड बोलणे, कुणास छळणे सर्व पसारा अदावतीचा

न्याय उशीरा मिळतो जो तो न्याय खरे तर कधीच नसतो
एकच खटला कैक पिढ्यांचा खेळ पाहिला अदालतींचा

वाघ कागदी "निशिकांता" तू विराम दे लिहिण्यास जरासा
अन्यायाच्या विरुध्द आता मार्ग धरावा बगावतीचा

कांही अमराठी शब्दांचे अर्थः-
अदावत--वैतक्तिक वैर
अदालत-- न्यायालय
बगावत-बंड, उठाव

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डिलिटची सोय आता नाही आहे काका मायबोलीवर
एक चुकलेली पोस्ट निवडा ती सम्पादित करा व त्या सम्पादनात फक्त दुसर्‍या पोस्टची लिन्क द्या
वाचकाना तिथे भेट देण्याचे अवाहन करा
मी ही एकदा असेच केले आहे